डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

व. बा. बोधे निरनिराळे रंग केवळ आपल्या डोळ्यांत साठवून थांबत नाहीत, तर त्या रंगांनी आपले अंतरंग कसे आणि किती प्रकारे रंगवले आहे, याचा मनोज्ञ शोध घेतात. त्या वेळी त्यांची शैली गद्यकाव्यच निर्माण करीत असते. एखादा आवडलेला पदार्थ पुरवून-पुरवून आणि मिटक्या मारीत खावा, तसे त्यांचे हे चटकदार वर्णन वाचताना होते. बोधे यांचे निरीक्षण सूक्ष्म तर आहेच, पण त्याला मानव्याचे एक अस्तर जोडले जाण्याने हे लेखन उत्कृष्ट ललितगद्य होते. माणसांच्या निरनिराळ्या रंगांसंबंधीचे त्यांचे पृष्ठ 14 वरील भाष्य या संदर्भात पाहण्यासारखे आहे. साधं बाभळीचं झाड. हज्जारदा पाहिलेलं. त्याचे काटे, बारीक तेजहीन पानं, वाकडंतिकडं त्याचं वाढणं... यात सुंदर काय आहे? हेच झाड व. बा. बोध्यांच्या नजरेनं कसं दिसतं पाहा

 

संवेदना, भावना  व विचार हे अनुभवाचे तीन घटक मानायचे झाल्यास संवेदना हे अनुभवाचे प्रवेशद्वार आहे, असे म्हणावे लागेल. मात्र माणूस संवेदनांच्या पातळीवरील अनुभवात जास्त वेळ टिकून राहत नाही. चटकन ती संवेदना भावना आणि विचारात बदलते. संवेदनासंदेश मेंदूत पोहोचला, की त्याचे रूपांतर जाणिवा आणि आकलनात होताना या प्रवेशद्वाराचा सामान्यपणे विसर पडतो. प्रा. व. बा. बोधे यांनी ‘चैतन्य पंचक’ हा सुंदर ग्रंथ लिहून संवेदनाचा एक उत्सवच साजरा केला आहे. बालकवी, श्रीनिवास विनायक कुलर्णी, श्री ज्ञानेश्वर अशा फार कमींना ही किमया साधता आली, जी बोधे यांनी प्रस्तुत ग्रंथात साधली आहे.

पंचक म्हणजे पाचांचा समूह. पाच ज्ञानेंद्रिये ही चैतन्याची प्रवेशद्वारे आहेत. त्यातही गंध आणि रुची म्हणजेच वास आणि चव या दोन संवेदनांनी माणसाच्या जीवनात ‘रसिकता’ आणून ते समृद्ध केले आहे. मात्र व. बा. बोधे यांनी पाचही ज्ञानेंद्रियांत डोळ्यांना आग्रक्रम दिला आहे. निसर्गात कोणत्याही घटकाचं केवळ रूपच आधी आपल्या नजरेस पडतं, आधी रंग नजरेत भरतो. म्हणून त्यांनी पहिल्या प्रकरणाला ‘रंगलो मी रूपरंगी’ असं नाव दिलं आहे. कसल्या कसल्या रंगांची उधळण अनुभवली आहे या लेखकानं! पाणी, आभाळ, वळवाचा पाऊस, ओढा, पूर, रानफुलं, पिवळ्या रंगाची सगळी फुलं, गुलाबी कांगुण्या, बांडगुळाला लागणारे लाल फुलांचे घोस, आंब्याचे विविध रंग, भाज्यांच्या हिरवेपणातले वैविध्य, शेतातल्या मातीचा रंग, घाणेरी, कण्हेर, कारळा, जवस, चवळीची गुलाबी फुलं, मोहरी, तूर आणि उडदाची पिवळी फुलं, कोथिंबिरीची पांढरी फुलं, ज्वारीचा फुलोरा वेगळा तर बाजरीचा वेगळा, शेळ्यांच्या तोंडावरले पांढरे पट्टे, कोकराच्या लाल जिभा, गायीच्या वासराच्या कानाच्या आतील गुलाबी अस्तर, निरनिराळ्या प्राण्यांच्या विष्ठा, पायवाटा, कोंबड्यांचे रंगसौंदर्य, चितूर हा देखणा पक्षी, बायकांची पातळं, चिंचेचा चिगूर. किती-कितीच रंग डोळ्यांनी पिऊन धुंद झालेला लेखक पहिल्या प्रकरणाच्या ओळीओळींत दिसतो. जिकडे पाहावे तिकडे रंगच रंग उधळलेले -

     किती रंगविशी रंग

     रंग भरले डोळ्यांत

     माझ्यासाठी शिरिरंग

     रंग खेळे आभाळात

बहिणाबार्इंचे सश्रद्ध मन काहीही समजो, आपल्यासाठी श्रीरंग म्हणजे साक्षात निसर्गच असतो. देवाला श्रीरंग, रंगनाथ, पांडुरंग, कर्पूरगौर अशी रंगांवरून नावं देणारी संस्कृती तरी किती सुंदर, नाही का?

व. बा. बोधे निरनिराळे रंग केवळ आपल्या डोळ्यांत साठवून थांबत नाहीत, तर त्या रंगांनी आपले अंतरंग कसे आणि किती प्रकारे रंगवले आहे, याचा मनोज्ञ शोध घेतात. त्या वेळी त्यांची शैली गद्यकाव्यच निर्माण करीत असते. एखादा आवडलेला पदार्थ पुरवून-पुरवून आणि मिटक्या मारीत खावा, तसे त्यांचे हे चटकदार वर्णन वाचताना होते. बोधे यांचे निरीक्षण सूक्ष्म तर आहेच, पण त्याला मानव्याचे एक अस्तर जोडले जाण्याने हे लेखन उत्कृष्ट ललितगद्य होते. माणसांच्या निरनिराळ्या रंगांसंबंधीचे त्यांचे पृष्ठ 14 वरील भाष्य या संदर्भात पाहण्यासारखे आहे.

साधं बाभळीचं झाड. हज्जारदा पाहिलेलं. त्याचे काटे, बारीक तेजहीन पानं, वाकडंतिकडं त्याचं वाढणं... यात सुंदर काय आहे? हेच झाड व. बा. बोध्यांच्या नजरेनं कसं दिसतं पाहा : ‘‘बाभळीचे झाड हिरवेगार असते. फांद्या काळपट असतात. फुलं पिवळीधम्मक. लाल राखाडी. साल काढली तर आतला गणा पांढराशुभ्र, ओल्या सालीत तांबडी-गुलाबी झाक. धुरकट रंगाच्या काट्यांनी खेकड्यागत नांग्या पसरलेल्या. वर सुगरणीची करप्या गवताची जाळीदार घरटी. त्यावर पिवळी मस्तकं कलकलत असलेली. इंद्रधनुष्य वर्षातून एकच महिना दिसतं, पण बाभळीच्या झाडावरची ही रंगउधळण बारमाही सुरू असते.’’

जगात कुरूप म्हणून एकही झाड नाही. ‘अग्ली ट्री इज यट टु बी बॉर्न.’ प्रत्येक झाड सुंदरच असतं. मात्र ते पाहायला व. बा. बोधे यांची संवेदनशीलता हवी. अनेक सुंदर अवतरणं देण्याचा मोह होतोय. पण मिठाईच्या दुकानावर ग्राहकाला छोटासाच तुकडा द्यायचा असतो. म्हणून आता हा एकच छोटा तुकडा. ‘‘चराचरांत सौंदर्य सामावलंय. दोन पुरुष उंचीच्या चिंचेच्या झाडाखाली उभा राहून मी मोरांना डोळंभर साठवत होतो. चिंचेचं झाड वाकलेलं. त्याची पानं-फुलं माझ्या चेहऱ्यावर रुंजी घालत असलेली. आयुष्यात पहिल्यांदा चिंचेचं फूल इतक्या जवळून पाहिलं. पिवळ्या नांगड्यावर गुलाबी कळ्या फुललेल्या. प्रत्येक कळी टम्म फुगलेली. कळी फुगली की चार पाकळ्या पसरतात. आत पिवळे चार केशर. मंद रंगांच्या गुलाबी पाकळ्या. फुलांची चवही आंबटगोड. लहानपणी मी कोकरांना ही फुलं खायला घालायचो. त्यांच्या चवीने खाण्यातच माझा आनंद दडलेला असायचा.’’

आपण आपले 80 टक्के अनुभव आणि ज्ञान डोळ्यांद्वारे मिळवत असतो. त्यामुळे व. बा. बोधे यांनी या ज्ञानेंद्रियालाच अग्रपूजेचा मान दिला आहे, हे सार्थ आणि यथोचित वाटते.

 ‘चैतन्यपंचक’ या पुस्तकातील दुसरे प्रकरण गंध संवेदनेचे आहे. लेखकाने त्याला ‘गंधाची जादुई दुनिया’ असे नाव दिले आहे. गंध ही आद्य संवेदना आहे. सहजपणे ती होते. दृष्टीसाठी प्रकाश आवश्यक, चवीसाठी पदार्थ जिभेवर हवा. गंधासाठी श्वास आत घ्यायला हवा. पण तो चालूच असतो. माणसाला हवे असो की नसो, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत गंध येणारच. व. बा. बोधेंसारख्या काहींची नाकं तीक्ष्ण असतात, तर काहींची बोथट. आपल्यापैकी प्रत्येकास विशिष्ट प्रकारचे वास येत नाहीत किंवा कोणता ना कोणता वास येत नाही. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे याला एक प्रकारचा ‘गंधांधळेपणा’ म्हणतात. अर्थात ही बाब पूर्णत: गुणसूत्राधारित असते.

प्रा. बोधे म्हणतात, ‘‘मला स्वत:ला शिवाराचा हिरवा गंध आवडतो.’’ इथंपर्यंत ठीक आहे. पण याला जोडून ते पुढे म्हणतात, ‘‘शहरी माणसांच्या नाकापेक्षा खेड्यातल्या माणसांची नाकं जास्त संवेदनशील असतात’’. हे काही पटणारे नाही. सगळ्यांच ग्रामीण लेखकांचं बालपण खेड्यात आणि प्रौढपण शहरात गेलेलं आपण पाहतो. बोधेसुद्धा लिहितात, ते आपल्या शाळकरी वयातील अनुभवांविषयी; हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

बोधे यांना आवडणाऱ्या गंधांची यादी मोठी आहे. बारतोंडीचं फूल, पारिजात, जाई-जुई, लिंबोणीचं पान, वाघाट्याचा तुरट ठसका आणणारा वास, ठसका देणारा हिरव्या मिरचीचा वास, स्वयंपाकघरातून येणारे वास, पिकलेल्या शिवारातील कणसांचा वास, कढीपत्त्याचा वास, पांढऱ्या मातीने सारवलेल्या घराचा वास आदी. हा संपूर्ण लेख म्हणजे वासांचा घमघमाटच आहे. आवडणाऱ्या वासांबद्दल त्यांचे एखादे विधानही मोठे मार्मिक असते. उदाहरणार्थ- ‘(जाई-जुईच्या) पांढऱ्या रंगात साऱ्या जगाची विनम्रता लपलेली’, ‘गंधहीन जगणं माणसं कसं जगतात देव जाणे’, ‘ऋतू बदलला की, ओढ्याचा गंध बदलतो’, ‘शेळ्यांची कोकरं अत्तराच्या कुप्या घेऊन हिंडत असतात’, ‘पोरींचा घोळका अंगावरून गेला की, येणारी सुगंधाची लाट तुमचं आयुष्य वाढवत जाते’, ‘सगळ्यांत श्रेष्ठ वास आईच्या पदराचा’, ‘उदबत्तीचा गंध स्मशानातील मुडदे उठून बसतील, एवढा टवटवीत’, ‘उंबराच्या फळ्या काढताना करवतीने जो भुसा पडतो, तोही मुठीत धरून हुंगावा’, ‘गंध जगण्यालाही संजीवनी देतो, दर्प घायाळ करतो’.

एक वेलदोडा हातात घेऊन तुम्ही-आम्ही अनेकदा खाऊन पाहिला असेल, पण एक वेलदोडा खाण्याचाही ‘उत्सव’ होऊ शकतो, तो या पुस्तकातच. ‘‘वेलदोडा चार पाकळ्यांचा. रंगाने हिरवट. आता बारीक चौदा खडे एकमेकांना चिकटलेले असतात. वेलदोडा ठेचावा. चहाच्या उकळत्या रसायनात टाकावा. मग त्याचा गंध अनुभवावा. जीभ आणि नाक एक झाल्याशिवाय हा खमंग वास अनुभवता येत नाही. दाताखाली चिरडताना हा कुरकुरतो. मोगऱ्याच्या कळीसारखा गंध टाकायला लागतो. याचा गंध थेट टाळ्याला भिडतो. कण दाताच्या फटीत अडकतात तशी सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला लागतात. याची चव नि गंध तुरट असतो, पण काळजाला सुखावतो. काळपट, तपकिरी चूर्ण हुंगले तरी वास येत नाही. पण तोंडात, चहात, कॉफीत टाकलं की घमघमायला लागते.’’ प्रा. बोधे अशा प्रकारे संवेदनांचे केवळ जाणिवेत रूपांतर करून थांबत नाहीत, तर त्या एका संवेदनेलाही ‘उत्सव’ बनवितात. त्यांची ही पद्धती वाचकाची आस्वादक्षमता वाढवून त्याची रसिकता समृद्ध करणारी असते, असा अनुभव या पुस्तकाच्या ओळीओळींतून येतो.

डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे म्हणतात, तशी गंधाची गोष्ट ही एक न संपणारी गोष्ट आहे. ज्यांना काहीच वास येऊ शकत नाही, त्याविषयी आपण कल्पना करू शकणार नाही. दरेक श्वासासह कोणतातरी वास येत असतोच. काही हवेसे वाटतात, तर काही नकोसे. वास घ्यायचा झाल्यासच माणूस हुंगण्याची क्रिया करतो. मांजरे, कुत्री व इतर सर्व प्राणी सतत हुंगत असतात. सभोवताल समजण्याचा सर्वांत खात्रीचा मार्ग म्हणजे गंध, असे अलिखित समीकरण त्यांच्यात असते. गंधाला ‘प्राण्यांचा प्राण’ म्हटले आहे, ते उगीच नाही. आपण अगदी गर्भाशयात वाढत असल्यापासून गंधाच्या सान्निध्यात असतो. गर्भजलाचा वास आपल्या जन्मानंतर आपल्या आईच्या छातीला येतो असे म्हणतात. आपली जीवनशैली आपण इतकी वाईट तऱ्हेने बदलून टाकली आहे आणि इतक्या काळज्या, ताणतणाव घेऊन घाईचे जीवन जगत आहोत की, सुगंधाच्या विश्वाकडे आपले लक्षच नाही. त्यामुळे आपण किती प्रकारच्या गंध-आनंदाला मुकतो आहोत, मुकलो आहोत याची जाणीव ‘चैतन्य पंचक’ हे पुस्तक आपल्याला करून देते.

पाच ज्ञानेंद्रियांचे तीन वर्ग पडतात. पहिला वर्ग रासायनिक, ज्यात नाक व जीभ ही ज्ञानेंद्रिये येतात. त्यांच्या गंध आणि रुचीच्या मुळाशी पदार्थांचे रासायनिक रेणू आहेत. म्हणून आपण प्रा.बोधे यांच्या अनुक्रमाने जाण्याऐवजी गंधावरील ललितगद्याला जोडून ‘जीभ : रसास्वादाचे महाद्वार’ या लेखाचा विचार करणार आहोत. पदार्थाचा वास यायचा तर त्याचे रेणू हवेत मिसळले जाणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे पदार्थाची चव कळण्यासाठी तो जिभेवर यावा लागतो आणि पाण्यात विरघळलेला असावा लागतो. तोंडात लाळ असतेच. त्यामुळे अगोदर विरघळलेला नसल्यास लाळेत विरघळून त्याची चव आपल्याला कळू शकते. बोधे यांना नाक व जीभ यांचे नाते -विज्ञान माहीत असावे. त्यांनी ‘गंधित चर्वणा’ असा मोठा अर्थपूर्ण शब्द वापरला आहे. पुढे तपशीलही कधी जोडून येताना दिसतो. उदाहरणार्थ- ‘पेरू खाताना जीभ आणि घ्राणेंद्रियं एका वेळी उद्दिपित होतात’ हे वाक्य. एवढंच काय, सध्या कोरोनाची नवी लक्षणे सांगताना वास न येणे आणि चव न कळणे हे लक्षण सांगितले आहे. हाही या दोन ज्ञानेंद्रियांच्या अन्योन्य संबंधाचा एक पुरावा आहे.

आपल्या जिभेनं जे असंख्य चवींचे उत्सव साजरे केले ते आठवताना बोधे लिहितात, ‘‘माझ्या जिभेनं काय चाटलं नाही...?’’ त्या आधी त्यांनी लिहिलंय, ‘‘खाण्याच्या बाबतीत मी जिभेचा बादशहा आहे.’’ हे प्रकरण वाचल्यानंतर खरोखर त्याची प्रचिती येते. बोध्यांना गोड आणि खमंग दोन्ही पदार्थ सारखेच आवडतात. दुसरे म्हणजे त्यांना शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार प्रिय आहेत. त्यामुळे ते या रसिकतेच्या बाबतीत ‘च्यूझी’ किंवा ‘विचित्र’ नसून  चोखंदळ आहेत, असे म्हणता येते.

हा लेख वाचताना शाकाहाराची दुनिया केवढी वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे, हे लक्षात येते. त्याचबरोबर बोधे यांना आवडणारे कितीतरी पदार्थ आपण अजून चाखण्याचे बाकी आहेत, ही आपल्या अभि‘रुची’ची मर्यादाही कळते. स्वत:ला मी मोठा खवैया समजत होतो. पण बोधेंचा लेख वाचल्यानंतर माझा अहंकार कमी झाला. तसाच प्रत्येक वाचकाचा होईल. मी तर न चाखलेल्या पदार्थ्यांची यादीच केलीय. बघू या बोधेंची बरोबरी आपण करू शकतो का?

बोधे चवीचे प्रकार सांगतात. ‘गोड, कडू, आंबट, खारट, तुरट, तिखट, मचूळ, बेचव, मंदाळणी...’ यातला मंदाळणी हा चवीचा प्रकार किंवा तो शब्द मला अपरिचित आहे. बोधे ग्रामीण लेखक असल्यामुळे या प्रदेशातली सुंदर बोलीभाषा त्यांच्या लेखनात वारंवार येते. ही बोलीभाषा समजून घेतल्याशिवाय त्यांच्या लेखनातली ‘गोडी’ आपल्याला कळणार नाही. बोधेंना याची जाणीव आहे. त्यामुळे ते कधी छान समजून सांगतात. उदाहरणार्थ- ‘‘माझ्या गावात कोणी माणूस मृत्युपंथाकडे वाटचाल करू लागला, की आई म्हणायची, ‘त्येचं काय खरं न्हवं. पाप्याचं पितर झालंय. त्येच्या सगळ्या अमृतकळा बसल्या.’ ’’ वास्तविक यातील तीनही शब्द परिचित आहेत. पण अर्थ कळत नाही. म्हणून पुढे बोधेच सांगतात, अमृतकळा बसणे म्हणजे जिभेला कोणतीही चव न जाणवणे. सगळे जगणे चवहीन होणे. ‘चव कळण्याचे जिभेचे सारे सामर्थ्यच नष्ट झाले तर माणसाचे कलेवर व्हायला वेळ लागत नाही.’ हा वाक्प्रचार तर सुंदर आहेच; पण जिभेचे जगण्यातले महत्त्वही अधोरेखित करणारा आहे.

जो जातिवंत खवैय्या आहे, तो दूर, डायनिंग हॉलमध्ये बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याला स्वयंपाकघरातही तितकेच रमावेसे वाटते. एखादा पदार्थ चांगला कशाने होतो, याची त्याला उत्सुकता असते; असायलाच पाहिजे. बोधे सहजपणे या प्रकरणात याही रेसिपीज सांगून जातात, हे मला महत्त्वाचे वाटते. उत्तम स्वयंपाक येतो की नाही, हे कळायला मार्ग नाही; पण तो उत्तम कशाने होतो याकडे त्याचं बारकाईने लक्ष असतं. वाघाट्याची भाजी किंवा हिरव्या मिरच्यांचा खर्डा कसा करावयाचा हे त्यांचे पुस्तक वाचूनही शिकून घेता येईल.

अशा ‘अनुभवसंपन्न’ माणसाला इतरांना ज्ञान द्यावे वाटणे स्वाभाविक आहे. ‘दही काचेच्या भांड्यात लावलेले असावे म्हणजे त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होत नाही’ आणि ‘जोंधळ्याच्या पानावर साखर पडलेली असायची. मी पानन्‌पान चाटून खायचो.’ ही दोन्ही विधानं पटण्यासारखी नाहीत. दुधाचे दही हे जीवाणूंनी त्यावर केलेल्या प्रक्रियेनं होतं. मडक्यात लावलेलं दही हे सर्वोत्तम. आम्ही स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दही लावतो. बोधे यांनी काचेचं भांड कुठून काढलं आणि अनिष्ट म्हणतात, ती रासायनिक प्रक्रिया कोणती? जोंधळ्यावर पडलेली कीड ‘साखर’ कशी होईल? मी तर लहानपणी ही सुंदर ओवी ऐकलेली आहे.

     मायची गं माया

     शेजी करू गेली

     लटकी गं साकर

     जोंधळ्याला आली.

त्यामुळे माझ्या जोंधळ्याला कितीही कीड पडली, तरी ती चाखली नाही. बोधे जर बहिणीबाई चौधरींजवळ असे काही बोलले असते तर ‘कशाले काय म्हनू नई’ या कवितेत दोन ओळी वाढल्या असत्या. मुद्दा हा आहे की, बोधे यांचे प्रत्येक विधान सरसकट स्वीकारण्यासारखे नसते. ते तारतम्याने घ्यावे लागते.

चवीचंसुद्धा एक विज्ञान आहे. एखादा पदार्थ तोंडात घेऊन घोळविल्याशिवाय त्याची चव कळत नाही. मी उरळीकांचनच्या आश्रमात एक सुंदर गोष्ट शिकलो. घनपदार्थ प्या आणि द्रवपदार्थ (चावून) खा. मी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये चेरीचे एक फळ तोंडात जास्तीतजास्त वेळ कसे घोळवता येते ते शिकलो. मी ‘तोत्तोचान’ या पुस्तकात तोमोईच्या शाळेतलं ‘बत्तीस वेळा चावून खावा। प्रत्येक घास जेवताना’ हे गाणं शिकलोय. जिभेच्या समोरच्या टोकाला आणि तिन्ही बाजूंना हजारोंच्या संख्येने जे उंचवटे असतात (त्यांना ‘पॅपिले’ म्हणतात) तिथून लाळ सुटते आणि तिथेच फक्त चव समजते. गिळताना तो एक घास असतो, एक घोट असतो. अर्थात चांगला खवैया होण्यासाठी या ज्ञानविज्ञानाची तशी गरज नाही.

नाक व जीभ ही ज्ञानेंद्रिये एका गटात येतात, म्हणून आपण गंध व रस या संवेदनांबद्दलचे लेख जोडून विचारात घेतले. तसा दुसरा गट आहे त्वचा व कानाचा. त्यांच्यामार्फत स्पर्श व ध्वनीची जाणीव व्हायला मदत होते. त्यांच्यामागची उत्तेजना ही दाब (प्रेशर) आणि कंपने (व्हायब्रेशन्स) या स्वरूपाची आहे. स्पर्शाबद्दलच्या लेखाला बोधे यांनी ‘असेच नवथर स्पर्श दिवाणे’ असे  शीर्षक दिले आहे. स्पर्श आणि शब्द यांचे हे नाते बोधे यांच्याही लक्षात आले आहे. ते लिहितात, ‘‘स्पर्श आणि नाद एकरूप झालेले असतात. सतारीला नुसतं बोट लावलं तर ती झंकारते. तुणतुणं हुंकारते. ढोलकी खणाणते. झील धरणाऱ्याच्या हातातला त्रिकोण टिंगटिंग करायला लागतो. हार्मोनियमनवर बोटं फिरली की स्वरांची दौलत लहरत जाते.’’

प्रा. बोधे कितीतरी स्पर्शांविषयी लिहितात. फुलांचा स्पर्शर्- त्यात गुलबक्षी, झेंडू, गुलाब यांतही पुन्हा प्रत्येक फुलाच्या स्पर्शाची संवेदना वेगळी, सगळे सुखावणारे स्पर्श या लेखात एकत्र केले आहेत.

‘पानाफुलांचे स्पर्श सुखावणारे, आयुष्य वाढविणारे असतात. आंब्याच्या अंजिरी पालवीचा स्पर्श मधाळ असतो. गारवा पेरणारा असतो. सीताफळाला फुटणारी पालवी नजरबंदी करते. लिंबोणीची पालवी मिठ्ठास असते. सोजळलेल्या बाभळीला फुटलेली लेकुरवाळी पालवी, छाटलेल्या बोराटीला फुटणारे हिरवेगार पोपटी तरांडे मोहक असतात. पाऊस पडल्यावर भुरकट गवताच्या ठोंबाला फुटणारी हिरवीगार गवताची पाती माणसाच्या मृत आयुष्यावर फुंकर घालतात. या हिरव्या विश्वाचा स्पर्श कातड्याखालचं चैतन्य जागवतो. हे नाहीसं झालं तर माणसं बधिर होतील. बारीकसारीक गोष्टींसाठी एकमेकांचा जीव घेतील.’’

हा परिच्छेद इथे अनेक कारणांसाठी उद्‌‌धृत केला आहे. बोधे यांना त्या त्या अनन्यसाधारण अनुभूतींसाठी नेमके शब्द कसे सुचतात, याचे कौतुकमिश्रित आश्चर्य वाटावे असा हा लेखनप्रपंच आहे. या परिच्छेदातील एक शब्द बदलून त्याच्या जागी पर्यायी शब्द ठेवून पाहा. या लेखाची प्रत्ययकारिता त्याने नक्की कमी होईल. संवेदनांची तरल अनुभूती घेण्याची विलक्षण ताकद आणि ती वाचकांपर्यंत संक्रमित करण्यासाठी लाभलेले विलक्षण असे शब्दसामर्थ्य आपल्याला थक्क करते. संवेदनांच्या पातळीवर अनुभवाला टिकवत लिहिणे अत्यंत अवघड आहे. त्या संवेदना लगेचच एखाद्या भावनेकडे आणि विचारांकडे आपल्याला घेऊन जातात. बोधे असे होऊ न देता, संवेदनांचे एक समृद्ध विश्व आपल्यासमोर ठेवतात. ज्ञानेश्वर, श्रीनिवास, विनायक कुलकर्णी आणि पाडगावकर यांच्यानंतर बोधे यांनाच ही किमया साधता आली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे कुबेराला लाजविणारे असे हे धन बोधे यांना लाभले आहे. ते धन त्यांनी आता वाचकांसाठी उधळून दिले आहे.

 

चैतन्य पंचक

लेखक : प्रा. व. बा. बोधे

अक्षरबंध प्रकाशन, पुणे,

पृष्ठे : 144, मूल्य : 100/- रुपये

Tags: pustak chaitanyapanchak vishwasvasekar पुस्तक व भा बोधे चैतन्य पंचक विश्वास वसेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके