डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तुळशीच्या शोकात्मिकेचं खरं आकलन झालं ज्येष्ठ-श्रेष्ठ समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांना. इंदिरा संतांच्या कवितेच्या निमित्ताने ते मांडताना त्यांनी तिची पुराणातली जन्मकथाही उलगडून दाखवली आहे. त्यांच्याच शब्दांतजीवनाच्या डगमगत्या टोकावर येण्याचे, अखेरच्या उंच क्षणावर उभे राहण्याचे साहस - निकराचे साहस इंदिराबबाईंनी अनेक कवितांमध्ये केले आहे.  

तुळस या वनस्पतीशी असणाऱ्या माझ्या नात्याला 50- 60 वर्षे झाली. त्यातील अलीकडची साठ वर्षे मी शंभर टक्के नास्तिक आहे. देव, धर्म यांच्याशी माझे गेली साठ वर्षे देणे- घेणे नाही. मी पुण्यातल्या दक्षिणमुखी मारुतीजवळ राहतो. दहा वर्षांपासून राहतो. शनिवारी तिथे मारुतीच्या दर्शनाभिषेकासाठी रांगा लागलेल्या असतात. मला तिथूनच ये-जा करावी लागते, पण मी एकदाही त्याला- म्हणजे दक्षिणमुखी मारुतीला हाय-हॅलो केले नाही. तुळशीच्या बाबतीत एवढा परकेपणा घडला नाही, एवढे मात्र खरे. मी एकूण चार-पाच घरे बांधली. प्रत्येक वेळी घराची ‘तुळशीबाग’ केली आहे. दहा वर्षे मी चौथ्या मजल्यावर राहतो. पण तुळशीच्या लागवडीसाठी खिडक्यांना बॉक्स करून घेतले. आजही गॅलरी आणि खिडक्या मिळून माझ्या फ्लॅटमध्ये तीसेक तुळशी आहेत. मी शेवटचा श्वास तुळशींवरून आलेल्या हवेतच घेणार आहे, एवढं नक्की! 

माझं वय पाच हजार अडुसष्ट वर्षे आहे. मी पक्का भारतीय आहे. भारतीय संस्कृती आणि धर्म माझ्या डीएनएमध्ये असणे, हा माझ्या वयाचाच भाग आहे. म्हणून तर तुळशीचं-माझं नातं पाच हजार वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. मी ते का नाकारीन? या दीर्घ वयाची सगळी वर्षे मला नीट आठवतात. 

किती कितीक नावं दिली गेली या काळात माझ्या तुळशीला! वृंदावनात ती प्रकट झाली, म्हणून तिला ‘वृंदावनी’ म्हणतात. ती असंख्य वृक्षांत निरंतर पूजा प्राप्त करते, म्हणून तिल ‘विश्वपूजिता’ म्हणतात. देवाला फुलं अर्पण केली आणि तुळशीपत्र अर्पण केले नाही, तर देव प्रसन्न होत नाही म्हणून तुळशीला ‘पुष्पसार’ म्हणतात. तुळशीच्या प्राप्तीने संसारात परमानंद प्राप्त होतो, म्हणून तिला ‘नंदनी’ म्हणतात. या देवीची संपूर्ण विश्वात कशाशीही तुलना करता येत नाही, म्हणून तिला ‘तुळशी’ म्हणतात. 

तुळशी ही कृष्णाची जीवनस्वरूप आहे, म्हणून तिला ‘कृष्णजीवनी’ म्हणतात. ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये तुळशीचे स्वरूपा, अमृतोद्‌भव, भक्तिसुधा, विष्णुवल्लभा असे वर्णन आहे. उपनिषदमध्ये ‘जन्म-मृत्यू विनाशकारी’ असे तुळशीचे वर्णन केलेले आहे. पद्‌पुराणाच्या पाताळखंडात एकोणऐंशीव्या अध्यायात असे वचन आहे की, ‘तुळशीमाळा धारण करून जो साधक विष्णुपूजा आणि देवपूजा करील, त्याची पितृकर्मे आणि देवकर्मे द्विगुणित होतील.’ देवी भागवतात भगवान विष्णूने कार्तिक पौर्णिेला तुळशीला वर दिला की, ‘तू विेशवंद्य होशील. मी तुला गळ्यात आणि मस्तकी धारण करीन.’ 

महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की, ‘जी व्यक्ती तुळशीपत्राने माझे पूजन करते, तिला पाहून इंद्रदेवही भयभीत होतो.’ पद्‌मपुराणात असे म्हटले आहे की- देवव्रत, पितृव्रतमध्ये तुळशीचे एक पानही महापुण्यदायक ठरते. जी व्यक्ती भगवान महाविष्णूचे मंत्रस्तोत्र पठण भक्तिपूर्वक करून तुळशीच्या मंजिरी अथवा तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करते, ती व्यक्ती पुढच्या जन्मी आईचे दूध पीत नाही. अर्थात, तिचा पुनर्जन्म होत नाही. तो जन्म- मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. अशी व्यक्ती स्वत:च्या अनेक पिढ्यांचा उद्धार करते. 

श्रीकृष्णाने गोपिकांच्या हिताकरता गोती नदीच्या किनारी तुळशीचा वृक्ष लावून वाढविला होता. श्रीरामाने राक्षसांचा वध करण्यापूर्वी शरयू नदीकिनारी तुळस लावून प्रार्थना केली होती. श्री शंकर पतिरूपाने प्राप्त व्हावेत, म्हणून पार्वतीने हिमालय पर्तवतावर तुळस लावून प्रार्थना केली होती आणि अभीष्टसिद्धीप्राप्तीकरता तुळशीचे सेवन केले होते. श्रीरामाने आपले हित साधण्याच्या इच्छेने दंडकारण्यात तुळस लावली होती आणि लक्ष्मण व सीतेने तिला मोठ्या भक्तिभावाने वाढवले होते. तुळशीच्या जन्मासंबंधी निरनिराळ्या कथा आहेत. स्कंदपुराणात म्हटले आहे की, दैत्यांनी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे काही थेंब भूतलावर पडले, त्यामधून तुळस उत्पन्न झाली. ही तुळस ब्रह्मदेवाने विष्णूला दिली. दुर्गा भागवतांनी ‘निसर्गोत्व’ या पुस्तकात तुळशीच्या जन्माच्या सहा कथा दिल्या आहेत. त्या सहाही वेधक आहेत. पैकी दोन स्कंदपुराणात आणि चार ब्रह्मवैवर्त व देवी भागवतात आहेत. त्याहीपेक्षा त्यांच्या ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ या पुस्तकात आलेल्या आणखी दोन कथांमध्ये धनगरांच्या लोकसाहित्यातली त्यांनी दिलेली कथा मला विशेष आवडते. यापेक्षा तुळशीची वेगळी जन्मकथा मी मुलांसाठी लिहिली आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून तिचे प्रसारण झाले. माझ्या ‘झाडफुलांच्या जन्मकथा’ या पुस्तकात तुम्हाला ती भेटेल. 

या सर्व कथांचा सारांश माझ्या मनातली तुळशीची स्त्रीप्रि तमा पूर्ण करणारा आहे. माझ्या मते, ती दुहेरी-तिहेरी शोषणाचे उदाहरण आहे. पुरुषप्रधानता, सवतीमत्सर, हलक्या किंवा दलित जातीतले तिचे असणे, विठ्ठल किंवा विष्णूचे तिच्यावर कितीही प्रेम असले तरी व्यवस्थेपुढे त्याचेही हतबल असणे हा भाग तर आहेच; पण तिच्यावर झालेला बलात्कार- तोही युद्ध जिंकण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक केलेला- हाही एक महत्त्वाचा घटक आहे. 

तुळशीच्या शोकात्मिकेचं खरं आकलन झालं ज्येष्ठ-श्रेष्ठ समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांना. इंदिरा संतांच्या कवितेच्या निमित्ताने ते मांडताना त्यांनी तिची पुराणातली जन्मकथाही उलगडून दाखवली आहे. त्यांच्याच शब्दांत- जीवनाच्या डगमगत्या टोकावर येण्याचे, अखेरच्या उंच क्षणावर उभे राहण्याचे साहस - निकराचे साहस इंदिराबार्इंनी अनेक कवितांध्ये केले आहे. शेवटी हा काळोख त्यांच्या मनाच्या कलंडलेल्या आभाळातूनच वाहत आला आहे. पण पेट घेऊन त्याने रात्र संपवली, तरी दिवसाच्या राखेमध्ये एक वेल्हाळ तुळस उभी राहते. 

कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ

उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ

मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी

ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ

पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ

म्हणजे, रात्र खऱ्या अर्थाने संपलीच नाही. दिवसाची राख झाली आहे आणि रात्रीची तुळस! तळे नाही, रितेपणाचा ‘डोह’ आहे. खोल, गहिरा. ओढून घेणारा. काळ्या पाण्याचा ‘डोह’च. जन्मोजन्मीच्या दु:खाचा ‘राळ’ आहे रात्रीच्या उराशी. ‘राळ’ ज्वालाग्रही आहे आणि रात्रीला पेटायचेच आहे. त्याच एका तिरीमिरीच्या इच्छेने मंत्रावल्यासारखी ती आली आहे डोहापाशी आणि आत सरळ झोकून दिले आहे तिने स्वत:ला. आतल्या निखाऱ्यावर झोकून दिले आहे.  

मग तिची तुळस कशी झाली? आणि तुळसच का? तुळशीची पुराणकथा इथे जागी केली आहे इंदिराबार्इंनी. तुळस म्हणजे वृंदा. जालंधर दैत्याची पत्नी. नवऱ्यावर तिचे अलोट प्रेम होते. इतके प्रेम की- तिचे पातिव्रत्य हेच जालंदरचे बळ होते. त्याचा वध करण्यासाठी देवांनी त्याच्याशी युद्ध मांडले. पण वृंदेचे पातिव्रत्य अबाधित असेतो जालंधर हरणारच नाही, हे त्यांना कळून आले. मग विष्णूने जालंधराचेच रूप घेतले आणि तो रणांगणातून परतून आला आहे, असे समजून वृंदा त्याच्या स्वाधीन झाली. जालंधराचा वध करणे देवांना सहज शक्य झाले. 

हे समजले, तेव्हा दु:खाने वेडीपिशी झालेली वृंदा जगली नाही. तिने चिता पेटवली आणि त्या आगीत उडी घेतली. वृंदा गेली, पण विष्णू पश्चात्तापाने चूर झाला. चितेपाशीच बसून राहिला. मग देवांनी त्याच्यासाठी त्या चितेत तुळस लावली. त्या तुळशीशी पुढे कृष्णावतारात विष्णूने लग्न लावले. 

डॉ. अरुणा ढेरे यांच्या समृद्ध आकलनामुळे या पुराणकथेचा गाभ्यातला अर्थ उकलत कवितेच्या शेवटाकडे आपण जातो. शेवटच्या ओळीत त्या अर्थाचे ब्रह्मांड आले आहे. पतीवर अलोट प्र्रे करणारी वृंदा. विष्णूने तिला फसवून घडवलेला तिच्या पतीचा मृत्यू आणि तिने स्वत:ला जाळून घेऊन केलेले आत्मसमर्पण. तुळस म्हणजे वृंदा. दु:खाने काळी-पांढरी झालेली. आगीतून वर आलेली. दिवसाची राख आहे आणि रात्र पुन्हा जिवंत राहिलेली. 

तुळशीची कथा मला उदास, खिन्न करून टाकते. रुक्मिणीने तिचा अशोभनीय छळ केला. सवतीमत्सराचा एवढा तीव्र दाह तुळशीइतका कुणीच सहन केला नसेल. आणि विठोबाने तिच्यावर केलेला अन्याय का कमी आहे? तुळस ही खरोखरच उत्कट आणि वासनारहित प्रेमाचे प्रतीक आहे. असे असताना धारिणीने जसे मालविकेला समजून घेतले, तसे रुक्मिणीने तुळशीचे प्रेम का समजून घेतले नाही, हा प्रश्न मला पडतो. तुळस आणि विठोबा या प्रेमसंबंधांकडे वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहता आले पाहिजे. इथे स्त्री-पुरुषाचा शारीरिक संबंध संपूर्णपणे गौण समजला गेलेला आहे. आदर्श पुरुष आणि नारी यांच्या कर्तृत्वाची व जीवनाची सफलता कर्तव्यपूर्तीत आहे, कामसाफल्यात नाही. 

दुर्गा भागवतांनी कोकणात प्रचलित असलेल्या तुळशीच्या कथेचा सुंदर संदर्भ दिला आहे. ब्राह्मणकन्या तुळशी बापाने घरातून काढून लावल्यावर विठोबाचा आश्रय घेते. एकमेकांचे एकमेकांवर अकृत्रिम प्रेम. पण पुढे रुक्मिणीने तुळशीचा घात करण्यासाठी कपट केले. तुळशीला विठोबाच्या प्रेमाची शंका आली. पुढे शंकानिरसन झाले, तरीही तिने फिरून त्याच्या सहवासाचा मोह धरला नाही. ती सीतेप्रमाणे स्वेच्छेने भूमीत गुप्त झाली. तिच्या वनस्पतीरूपी प्रतीकाबरोबरच पुढे विठोबाचे लग्न लागले. दुर्गाबाई लिहितात, ‘विरहाबद्दलची ही एक तीव्र ओढ जी तितक्याच उत्कट आणि अनिवार प्रीतीतून जन्मते, जी अत्यंत भीषण वा अतिशय रमणीय असते आणि जिचा आविष्कार प्रीतीच्या चिरंतनतेचा साक्षात्कार घडवतो- ती विरहाची ओढ तुळशीच्या रूपाने साहित्यात वावरते आहे.’ 

झाडांवरच्या लेखमालेत तुळशीबद्दल लिहिताना मी घसरलो आहे, घसरतो आहे, हे आता माझे मज कळो आले आहे. वास्तविक मी सामाजिक जाणिवेचा कवी! ‘अंकोरवट’मधील कविता लिहिणारा!! पण माझा प्रवासही अनिलांसारखा प्रीतरंगी रंगण्यात विसर्जित झाला की काय? अडुसष्टाव्या वर्षी मलाही 

एक रंग प्रीतीचा, तयात जीव रंगला माझा 
तसा कशात नाही मग जीव रंगला माझा 

- असे वाटू लागले की काय? 

अंतिमत: माझी प्रतिमा ‘प्रेमाचा भाष्यकार’ अशीच राहणार की काय? 

आणखी एक विचाराचा भुंगा माझ्या डोक्यात घोंगावतो, तो हा की- हिंदू धर्मात विशेषत: वारकरी संप्रदायात तुलसीपूजनाचे एवढे महत्त्व कशासाठी? विष्णुप्रिया म्हणून वैष्णवांना तिचे महत्त्व असेल, तर घरोघरी तुळशीवृंदावनच कशासाठी? रुक्मिणीवृंदावन का नाही? मानवरूपा तुळशीचे अखेर, प्रत्यक्षात तुळशीचे लग्नच लागले नव्हते, तर मग कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिेपर्यंतच्या काळात कुठल्याही दिवशी- विशेषत: द्वादशीला एका असफल प्रेकथेला सफल करून दाखवण्याचा अट्टहास कशासाठी? याचा मी खूप विचार केला आहे आणि निष्कर्षस्वरूपात या परंपरेला वंदन केले आहे, एक प्रेमाचा भाष्यकार म्हणून. 

पुण्याला निगडीत एक सुंदर उद्यान नव्याने निर्माण केले आहे, ‘भक्ती-शक्ती’. त्यात संतश्रेष्ठ तुकाराम आपल्या उजवीकडच्या शिवाजीमहाराजांच्या कमरेला हाताचा विळखा घालताहेत. तुकारामांच्या डाव्या बाजूला वारकरी भजनात दंग आहेत. एकाजवळ टाळ, एकाजवळ मृदंग. त्या मांदियाळीच्या मध्यभागी एका बाईच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन आहे, त्यात ब्रान्झची सुंदर मंजिऱ्या आलेली तुळस डोलते आहे. हे मी पाहिले, तीस ऑक्टोबर 2003 ला संध्याकाळी सात वाजता! माझे हृदय आणि डोळे, दोन्ही भरून आले!  

आताही मी आषाढीच्या काळात जेव्हा पुण्यातून वारकऱ्यांची दिंडी जाताना पाहतो, तेव्हा डोक्यावर छोटे वृंदावन आणि त्यात तुळस पाहून दर वेळी मला भरून येते- का कुणास ठाऊक! 

आणखी एक प्रश्न. तुळशीची पूजा करायला धर्माने स्त्रियांनाच का सांगितले आहे, पुरुषांना का नाही? पंढरीची वारी करणाऱ्यांमध्ये फक्त स्त्रियाच का तुळशीवृंदावन डोक्यावर घेतात, पुरुष का नाही? नटसम्राट बेलवलकर ‘सरकार’साठी एक तुळशीवृंदावन हवे म्हणतात, स्वत:साठी का नाही? विष्णू किंवा विठोबाने तिला हृदयात घेतले, घरात का नाही? ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ असेच का? याचा अर्थ सगळे पुरुष स्वत:ला विष्णू समजतात आणि तुळशीला अंगणातच ठेवतात. मला हे वैषम्य पूर्वीपासून जाणवले. म्हणून मी चार वेळा नवे घर बांधले, पण तुळशीवृंदावन एकदाही बांधले नाही. ‘तुळशीबाग’ मात्र केली. 

आता तर चौथ्या मजल्यावर राहत आहे आणि माझ्या घरात पंचवीस तुळशी आहेत! ठीक वागतोय नं मी स्त्री-जातीशी? तुळशीशी? मी जर कधी पायी वारीत गेलो असतो, तर मुद्दाम डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन गेलो असतो. मानवी तुळशीला एक महान प्रेयसी म्हणून सॅल्यूट करतो. मी नास्तिक; त्यामुळे वृंदावन बांधले नाही, बांधणार नाही. पण मनातल्या मनात एक स्त्री होऊन तुळशीची पूजा करतो आणि आता एक वनस्पती म्हणून तिचे लाड करतो. मी रोज तुळशीची दहा पाने चावून खात असल्याने पाच-पंचवीस झाडं तरी मला पुरतात! भारतभर उगवणारे, विवक्षित उग्र सुगंधाने पानोपानी भरलेले, मंजिऱ्यांनी नटलेले; पण ज्याचे सौंदर्य विशेष निरीक्षणाखेरीज पाहणाऱ्याच्या डोळ्यांत कधीच भरत नाही, असे हे झाड आहे. नाजुकपणा हे त्याचे वैशिष्ट्य. लहानपणी लिंबेकरांचे प्रवचन ऐकायला मला आवडायचे. आपल्या गोड आवाजात ‘तुळशीची मंजिरी ही वाहू या हरीला’ हे गाणं म्हणायचे, तेव्हा डोळ्यांपुढे त्या मंजिऱ्या, त्यातली ती निळी- जांभळी अशी ती अर्धी देठाच्या संपुटातच लपलेली फुलं डोलायची. मी या मंजिऱ्यांना खुडताना चित्तात अतिहळुवारपणा आणलेला आहे. 

और क्या इसमें ज्यादा कोई नरमी बरतूं 
दिल के जख्मों को छुआ है तेरी गालों की तरहा 

नख न लागू देता बोटांच्या समोरच्या गादीत पकडून मी असंख्य मंजिऱ्या तोडल्या आहेत- आजीसाठी, आईसाठी. आताही मी माझ्या बागशाहीतली फुलं आईला देवपूजेत वापरू देत नाही. फार तर तिला फुलवाल्याकडून दहा रुपयांची फुलं आणून देतो. पण आमचा फुलवाला कोरोनानं मेला, तेव्हा लहानपणाचा हळुवारपणा चित्तात आणत मोठ्या मुश्किलीने एखादी मंजिरी खुडून एखाद्या एकादशीला तिला देतो. 

तुळशीचे झुडूप दोन ते पाच फूट उंचीचे, हिरव्या रंगाचे (श्वेत तुळस) अथवा काळपट तांबूस रंगाचे (कृष्ण तुळस) असते. तिची पाने विशिष्ट तीक्ष्ण सुगंध असलेली, लंबगोलाकार, कडा अखंड किंवा बोथट, दंतुर. पानांवर किंचित लव असते. पानांच्या खालच्या भागावर शिरांच्यामधे बारीक तैलग्रंथी असतात. पुष्पमंजिरी बारा ते चौदा सेंमी लांब, बी गोलाकार, लहान, चपटे, तांबूस, धुरकट असते. हिवाळ्यात फुले व फळे येतात. प्रामुख्याने तुळशीचे पांढरी व काळी म्हणजे ‘श्वेत तुलसी’ व ‘कृष्ण तुलसी’ असे दोन प्रकार आहेत. कर्पूर तुळस नावाचा एक प्रकार कापराचा वास असलेला असून, त्यापासून कापूर काढतात. औषधासाठी तुळशीचे पंचांग- पाने, मुळे व बिया वापरतात. तुळशीच्या माळेचा उपरोधिक उल्लेख ‘ही गळा घालूनी तुळसीची लाकडे’ असा शाहीर राम जोशी करतात. वारकरी श्रद्धेने ती परिधान करतात. जो ही वैजयंतीमाला गळ्यात घातलो, तो माळकरी होतो. अशा गळ्यातून त्यानंतर मद्य व मांस उदरात जात नाही. 

रानतुळशीचा गंध मला तुळशीपेक्षा जास्त आवडतो. फणीश्वरनाथ रेणूंचे ‘वनतुलसी की गंध’ हे व्यक्तिचित्रांचे पुस्तक नावामुळेही मला आवडते. रानतुळशीला उर्दूत सब्जा म्हणतात. त्याचे बी सरबतात वापरतात. गालिबच्या कवितेत ‘सब्जा’चा उल्लेख आहे. औरंगजेबाने आपल्या खुलताबाद येथील कबरीवर ‘सब्जा’ लावण्यास सांगितले होते. मी ही कबर पाहिली आहे. तिथे अजूनही ‘सब्जा’ आहे. 

Tags: इंदिरा संत फणीश्वरनाथ रेणू गालिब दुर्गाबाई भागवत तुळस विश्वास वसेकर tulas vishwas vasekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके