डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुरुषोत्तम शेठ यांच्या ग्रंथनामाचा अर्थ आहे ‘आर्ट गॅलरी’ ही साधीसुधी नाही तर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची आई गॅलरी आहे. या परीक्षणाच्या शिरोभागी मी बर्ट्रांड रसेल यांचे एक सुंदर आणि अन्वर्थक विधान दिले होते. त्यात म्हटल्याप्रमाणे या सर्व व्यक्तीचित्रांमधून, विविधतेने नटलेल्या या ललित लेखांमधून कळत-नकळत पुरुषोत्तम शेठ यांचेही व्यक्तिमत्त्व पाझरत येते. या लेखांचे सार काढताना आपल्या प्रस्तावनेत भानू काळे यांनी शेठ यांचे सुरेख पोट्रेट काढले आहे ते पृष्ठ अकरावर मुळातून वाचण्यासारखे आहे. मराठीतील व्यक्तिचित्रात्मक ललित गद्याच्या सगळ्या मर्यादा पार करून ‘स्मारिका’ हा त्या वाङ्‌मय प्रकारातला नवा मानदंड ठरावा असा ग्रंथ झाला आहे.

सुमारे पंचाऐंशी वर्षांचे नाही म्हटले तरी प्रदीर्घ आयुष्य लाभलेले प्राचार्य शेठ हे बहिर्मुख वृत्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना स्वत:पेक्षा स्वेतरांच्या व्यक्तिमत्त्वात अधिक रस आहे. मुंडकोपनिषदात फार सुंदर श्लोक आहे. ‘परस्परांशी गाढ सख्याने संबंधित असलेले दोन पक्षी एका वृक्षावर टेकलेले आहेत. त्यांच्यापैकी एक पिंपळाचे फळ आवडीने खात आहे आणि दुसरा न खाता त्याच्याकडे पाहत आहे. पुरुषोत्तम शेठ यांची ‘स्मारिका’मधील लेखनाची भूमिका ‘दुसऱ्या पक्ष्या’ची आहे आणि ती स्वागतार्ह आहे.

पुरुषोत्तम शेठ यांना एका अर्थाने भाग्यवान म्हटले पाहिजे. देशपातळीवर ज्यांचे श्रेष्ठत्व निरपवादपणे सिद्ध झालेले आहे अशा महान विभूतिमत्त्वांचा सहवास त्यांना लाभला. जयप्रकाश नारायण, डॉ.राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस, महादेवी वर्मा, मोहन धारिया, हमीद दलवाई, डॉ. नरेंद्र दाभोलकर, नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा अशी ही माणसं! आणि ही माणसं पुरुषोत्तमजींवर प्रेम करतात, ते पुरुषोत्तमजी धन्यच की! गालिब म्हणतो-
चाहिए अच्छों को जितना चाहिए
वे अगर चाहें तो फिर क्या चाहिए
गालिबचा हा शेर केवळ शब्दच्छल नाही हे लक्षात घ्या. अशा व्यक्तिमत्त्वावर लिहिणं म्हणजे शिवधनुष्य उचलणं! दुसऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वांत, कार्यकर्तृत्वात नुसता रस असून पुरेसं नाही, तर त्या त्या व्यक्तिमत्त्वाचं समृद्ध आकलन मांडायला प्रचंड लेखकीय ताकद लागते. शेठ यांच्याकडे निश्चितपणे ती आहे, याचा पुरावा म्हणजे ‘स्मारिका’ हे पुस्तक!

पुरुषोत्तम शेठ यांचा ऐन तारुण्याचा काळ महाराष्ट्र आणि विशेषत: पुणे येथील निरनिराळ्या चळवळी, संस्था, संघटना आणि नेतृत्व यांच्या चैतन्याने सळसळणारा कालखंड होता. त्यातही पुन्हा देशाचा स्वातंत्र्यलढा ते 1952 मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुका यांचाही तो काळ. या सर्वांमध्ये लेखक भारावून गेल्यासारखे वावरले. वर उल्लेखिलेली सर्व उत्तुंग व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्याखेरीज पुणे आणि साताऱ्यातील सर्व क्षेत्रांतले कार्यरत माणसं त्यांनी जवळून पाहिली. यांतले एकेक व्यक्तिमत्त्व म्हणजे धगधगते यज्ञकुंडच होते. त्या त्या क्षेत्रातली ती ती व्यक्तिचित्रं रेखाटताना ‘स्मारिका’ या पुस्तकात महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रं शेठ यांच्या लेखनात उजळून निघाली आहेत. ही माणसं, ही क्षेत्रं महाराष्ट्राचा, देशाचा बहिश्चर प्राण ठरावीत अशी आहेत. राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, राष्ट्र सेवा योजना, बँकिंग, वैद्यक क्षेत्र, भारतीय सेना, मुस्लिम सत्यशोधक चळवळ, उच्च शिक्षण, साधना साप्ताहिक, कामगार चळवळ, कोकण रेल्वे, भारतीय स्वातंत्र्यलढा, कम्युनिस्ट पार्टी, आंतरभारती, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर इत्यादी क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींविषयी लिहिताना ती क्षेत्रे, त्या त्या क्षेत्राचा सखोल असा अंतर्वेध घेतात.

हे लेख वाचताना सामान्य वाचकाला अपरिचित अशी बरीच दुर्मीळ माहिती मिळते. पंडित नेहरूंनी अच्युतराव पटवर्धनांना आपली कन्या इंदिरा हिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला होता हे वाचून मी चाट पडलो. अच्युतरावांनी उत्तर दिले, ‘‘पंडितजी, आपली मुलगी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. मी पडलो थिऑसॉफिस्ट, मला कोणतेही भौतिक आकर्षण नाही. आपल्या महत्त्वाकांक्षी कन्येला मला देऊन तिचे जीवन संन्यस्त करू नका.’’ यावर लेखकाचे मिस्किल विधान असे- ‘‘इंदिरा गांधींच्या सौभाग्याने अच्युतराव पटवर्धन व इंदिरा गांधींचा विवाह झाला नाही.’’ (पृ.36)

त्याग हे भारतीय संस्कृतीचे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शेठ यांनी त्यागी माणसं पाहिली, अनुभवली आहेत. आपली सगळी संपत्ती, धन देशाला, संस्थांना, चळवळींना वाटून टाकून फकीर होणे हे जुन्या, मूल्यात्मक जीवन जगणाऱ्या पिढीचे एक वैशिष्ट्य होते. नानासाहेब गोरे यांनी आपले दातृत्व कधी उघड होऊ दिले नाही, पण त्यांनी त्यांच्या हयातीत पुण्याचे आवाबेन रचना केंद्र, राष्ट्र सेवा दल, डॉ. दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती, देहदान मंडळ यांत या रकमा वाटून टाकल्या. ही पुंजी त्या काळातल्या किमान दहा लाखांपेक्षा जास्त होती. नानासाहेबांनी स्वत:साठी काही ठेवले नाही. डॉ.लोहिया यांच्याबद्दल लेखक लिहितात- ‘‘त्यांच्या निधनाच्या वेळेस फक्त बारा झब्बे, बारा धोतरे, बारा जाकिटे एवढीच त्यांची संपत्ती शिल्लक होती. माहेश्वरी मारवाडी समाजात जन्माला येऊनही लोहिया फकीरच राहिले.’’ प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी स्वत:ला मिळालेली छत्तीस लाखांची पेन्शन संस्थेला देऊन टाकली.

एस.एम.जोशी यांचे संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीचे कार्य, यशवंतरावांचे पत्नीप्रेम व पत्नीनिष्ठा, महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री होण्यासाठी यशवंतरावांनी वापरलेले मराठा कार्ड, शरद पवारांनी मोहन धारियांशी केलेली दगाबाजी अशा प्रकारची बरीच वेगळी आणि क्वचित सनसनाटी माहिती या पुस्तकात मिळते, परंतु त्यामागे सत्य आणि वस्तुनिष्ठा असते. सनसनाटी विधाने करून हवा निर्माण करण्याची शेठ यांची प्रवृत्ती नाही, तर आपले विधान भक्कम तपशिलाने उभे करून ते पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवतात. ‘‘मी नेहमीच आरक्षणाच्या विरोधी आहे’’ किंवा ‘‘कम्युनिस्ट नेहमीच कोलांटउडी मारतात’’ ही त्यांपैकी काही उदाहरणे. माझ्यासारख्याला न पटणारी विधानेही ते सहज करून जातात. उदा. ‘‘यदुनाथजींनी नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांना पुढे आणले.’’ याचा विपर्यास असा होतो की, यदुनाथजी झाले नसते तर या दोघांचे कार्य महाराष्ट्राला कळलेच नसते! असो.

पुरुषोत्तम शेठ यांच्या ग्रंथनामाचा अर्थ आहे ‘आर्ट गॅलरी’. ही साधीसुधी नाही तर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची ‘आर्ट गॅलरी’ आहे. या सर्व व्यक्तिचित्रांमधून विविधतेने नटलेल्या या ललित लेखांमधून कळत नकळत पुरुषोत्तम शेठ यांचेही व्यक्तिमत्त्व पाझरत येते. या लेखांचे सार काढताना आपल्या प्रस्तावनेत भानू काळे यांनी शेठ यांचे सुरेख पोर्ट्रेट काढले आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. मराठीतील व्यक्तिचित्रात्मक ललितगद्याच्या सगळ्या मर्यादा पार करून ‘स्मारिका’ हा त्या वाङ्‌मयप्रकारातला नवा मानदंड ठरावा असा ग्रंथ झाला आहे.

स्मारिका
प्रा. पुरुषोत्तम शेठ
दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे 380, किं. 550 रुपये
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके