डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

15 ऑगस्ट हा गांधीजींचे सचिव आणि सहकारी महादेवभाई देसाई यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हा लेख.

महादेव हरिभाई देसाई बी ए.एल.एल.बी. महात्मा गांधीजींची जणू दुसरी काया, दुसरं हृदय, गांधीजींचे स्वीय सचिव, पुत्र, आशक, मस्त फकीर. महादेवभाई म्हणजे गांधी-पुरुषार्थाची ऊर्जस्वल जीवनकथा. 'सर्वे शुभोपमायोग्य' या एकमेव बिरुदाचे अधिकारी. महादेवभाई गांधीजींचे सचिव या नात्यानेच एवढे विख्यात झाले की त्यांच्या अंगभूत अन्य गुणविशेषांचा परिचय अभ्यासकांपुढे कमीच मांडला गेला. गुजराती, हिंदी, मराठी, बंगाली, उर्दू, इंग्रजी या विविध भाषांत त्यांचा सदैव मुक्त संचार होता. भारतीय तत्त्वज्ञानाचे साक्षेपी चिंतक, गीतेच्या अंतरंगाचे सश्रद्ध अभ्यासक, विनम्र निसर्गप्रेमी, पारदर्शी साहित्यरसिक, रसिले सारस्वत, जीवनस्पर्शी चरित्रलेखक, यशस्वी अनुवादक, तन्मय डायरीलेखक यांसारख्या विविध भूमिकांमधून होणारे महादेवभाईचे दर्शन केवळ मनोज्ञ असेच आहे. 

पत्रकारिता हा महादेवभाईच्या स्वयंप्रज्ञ प्रतिभेचा एक आगळा- वेगळा पैलू आहे. सत्याग्रहाच्या अनेक आघाड्यांवर संघर्षरत असणाऱ्या महादेवभाईंना आपल्या आयुष्यातली पहिली जेलयात्रा पत्रकारितेमुळे घडली. या घटनेचे मग आपल्याला आश्चर्य वाटत नाही. 1921 साली आपल्या 'इंडिपेंडेंट' या पत्रासाठी मोतीलालजींनी गांधीजीजवळ महादेवभाईची मागणी केली होती. गांधीजींच्या आदेशाबरहुकूम महादेवभाई अलाहाबादेत दाखल झाले होते. पत्राच्या संपादक मंडळातील सर्वच सदस्य सर्वश्री मोतीलाल, जवाहरलाल आणि जॉर्ज जोसेफ यांना अटक झाली होती. छापखान्यावर जप्ती होती. महादेवभाईंना 'I  shall not Die’ नावाचा लेख त्या वेळी चक्रमुद्रांकित करून वितरीत केला आणि इंग्रजी सत्तेने त्यांना कैदेत डांबले. या नैनी जेलमध्ये महादेवभाईंनी कमालीचे अत्याचार सोसले.

निर्भीड, आक्रमक लिखाण 

22 डिसेंबर 1921 साली हस्तलिखित 'इंडिपेंडंट चा नवा अवतार' शीर्षकाने लिहिलेला अग्रलेख त्यांच्या दणकट लेखणीचा पुरेसा परिचय घडवायला समर्थ आहे. सरकार व त्याच्या दमननीतीवर कमालीचे कोरडे आपल्या या लेखातून ओढताना ते म्हणतात, 'आम्हांला अटक करून सरकारने आपल्या विवेक बुद्धीवरच कुऱ्हाड चालवली आहे. स्वतःच्या ‘कथनी करनी' कडे सरकारचे मुळीच लक्ष नाहीये!' या काही ओळींमधूनसुद्धा त्यांची निर्भयता स्पष्ट डोकावताना दिसते. यंग इंडिया, नवजीवन हरिजन, हरिजन बंधू, इंडिपेंडंट... पत्र कुठलंही असो, महादेवभाईची आवेशयुक्त लेखणी गर्जना करताना दिसते. निडर होऊन राजदंडाची पर्वा न करता व इंग्रजी जुलमी सत्तेला मुळीच भीक न घालता त्यांनी केलेली पत्रकारितेची वाटचाल हे अग्निस्नान आहे. ‘हरिजन बंधू’ चे संपादक म्हणून नाव तर श्री. चंद्रशंकर प्राणशंकर शुक्ल हे छापले जात होते पण या संपादनात महादेवभाईचा वाटा सिंहाचा होता हे गुजराती पत्रकारितेचा इतिहास बघू जाता ठळकपणे ध्यानी येते. 

'नवजीवन’ आणि 'चंग इंडिया' मधून भेटणारी त्यांची पत्रकार-विद्या तर साऱ्यांच्याच परिचयाची अशी आहे. भाषेवर विलक्षण प्रभुत्व अरखंड कार्यशक्ती, अकंप आत्मविश्वास, त्वरित निर्णयशक्ती, सुहृढ सिदधतिनिष्ठा या गुणांसोबत त्यांच्या ठायी असणारा सर्वात मोठा गुण त्यांचा निर्भीडपणा आणि न्यायनिष्ठा सांगता येईल. परकीयांच्या विरुद्ध आग ओकणारी त्यांची लेखणी स्वकीरयांविरुद्ध लिहितानासुद्धा स्फूलिंग वर्षाव करायवी हे फारच अप्रूप आहे. या संदर्भात त्यांनी व्यक्तीचा विचार न करता वृत्तीचा विचार केला. कुणालाही आपले मित्र मानले जाही. देशबंधू दास किंवा लाला लजपतराय असोत किंवा आपले निकटचे स्नेही-साथी फुलचंदभाई असोत- सारख्याच प्रखरतेने त्यांनी लिहिले. खेडा जिल्ह्यातील आंदोलन असो, किंवा 1937-38 सालच्या सांप्रदायिक दंगली असोत व्यापक राष्ट्रहिताचाच विचार त्यांच्या नजरेपुढे अखंड नंदादीपासारखा तेवताना दिसतो. 

महात्मा गांधींनी घालून दिलेल्या पत्रकारितेतल्या आदर्शाचे ते जणू प्रत्यक्ष प्रतीकच होते. बहुभाषाविद महादेवभाई भाषाप्रभू होते. पत्रकारितेच्या क्षणजीवित्वाबद्दल काय लिहावे? पण त्यांचे लेखन विचारपरिप्लुत, भावदर्शी आणि भविष्य-संकल्पी असल्यामुळे आजही ते साहित्याइतकेच ताजे व टवटवीत आहे. राजकारणातील सूक्ष्म अंतःप्रवाह, तपशीलवार टिपणं, मुद्देसूद नोंदी यांतून आलेला त्यांचा विचार तर आजही आवश्यक आहेच पण भाषिक डीलामुळे त्याची गुणवत्ता साहित्यापेक्षा यत्किंचितही उणी ठरत नाही. गुजराती भाषेचे रूप, व्यक्तित्व, मांडणी आणि आखणीमध्ये ‘नवजीवन' चा वाटा कुणीही नाकारू शकणार नाही असाच आहे. 

पत्रकारांना अंतर्मुख करणारे भाषण

1936 साली अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या गुजराती साहित्य परिषदेच्या 12 व्या अधिवेशनात महादेवभाई पत्रकार विभागाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षपदावरून दिलेल्या भाषणातून पत्रकारितेविषयी आपले जे विचार मांडले ते केवळ अपूर्व असेच म्हणावे लागतील. आपल्या वक्तव्याच्या प्रारंभीच आपली भूमिका नम्रपणे मांडताना ते म्हणाले होते, 'माझ्या या निवडीमुळे अनेकांना आनंद झाला खरा, पण काही मित्र रुष्टही झालेत ; त्यांच्या नाराजीचा स्वर जर मला इथं ऐकायला आला तर मी हे आसन आनंदाने सोडून देऊन खाली उतरायला सिद्ध आहे.' त्यांच्या या उद्गारात लोकशाही मूल्यांच्या जपणुकीबाबत ची त्यांची जागरूकता आढळून येते.

‘गुलाम देशातल्या वृत्तविवेचनाची उडी ती कुठवर?’ असा सार्थ प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्वराज्याच्या संकल्पनेचा उद्घोष करत म्हटले होते की केट्टा येथे झालेल्या भूकंपाच्या ठिकाणी किती बरे वृत्तपत्र प्रतिनिधी पोचू शकले? भूकंपाबाबतची खरीखुरी माहिती किती लोकांपर्यंत आपण पोचवू शकलो? भूकंपाची माहिती देऊ इच्छिणाऱ्या लेखण्या कैदेत डांबून ठेवण्यात आल्या. अशा परिस्थितीत 'स्वतंत्र पत्रकारिता' या शब्दाच्या अर्थाचा जीवघेणा संकोच होतोय. या संदर्भात अनेक विदेशी चळवळीचा इतिहास नोंदवत त्यांनी स्वतंत्र पत्रकारितेच्या महत्त्वाचा उद्घोष केलेला आढळतो. साहित्य परिषदेच्या मंचावरून बोलत असल्यामुळे महादेवभाईंनी साहित्य व पत्रकारिता यांचा समन्वित विचार केला आहे. 

"त्वरेने लिहिलेले साहित्य म्हणजे पत्रकारिता अशी एका आंग्ल वृत्तविवेचकाची व्याख्या नोंदवून त्यांनी रस्किनची साहित्यविषयक व्याख्या दिली आहे- 'माझे लेखन सत्य, जनहितकारी, सुंदर असेल तर ते साहित्य!' हा रस्किनचा विचार पुढे मांडताना ते म्हणतात की एडिसन, डीफो, हैजलिट, डिकन्स, एडविन ऑन्नल्ड, किपलिंग, गटे, अनातोले फ्रान्स ही तमाम सारस्वतांची यादी खरे म्हणजे पत्रकारांचीच आहे. हेही या निमित्ताने विशेषत्वाने ध्यानी घेण्यासारखे आहे. ते म्हणतात की बॉस्वेलकृत डॉ. जॉन्सनचे जीवनचरित्र, गटे आणि अँकरमॅनचे संवाद, प्लेटोचे काल्पनिक संवाद, सॉक्रिटिसच्या खटल्याची वर्णने आणि नुकत्याच घडलेल्या 1922 च्या आग्रा कैदेतील गांधीजींच्या खटल्याचे 'मैचेस्टर गार्डियन’ मधील आरेखन सारेच साहित्याच्या कक्षेत येते असे मला वाटते. याच संदर्भात मणिलाल नथूभाई, नवलराव, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, काकासाहेब कालेलकर, यांचे लेखन पारखून घ्यावे असेच आहे. 

बोधपर आनंददायक आणि लोकहितकारी लेखनाचा अंतर्भाव साहित्यातच करावा लागेल, असा याचा अर्थ होतो. देशी पत्रांच्या कार्यांचा आढावा घेत त्यांनी या पत्रांया उल्लेख 'इंग्रज पत्रकारितेचे टीपकागद’ असा केला. त्या अनुकरणधर्मीयतेची आजची ओळख ही यानिमित्ताने तपासून घेता येण्यासारखी आहे. अनुकरणाला विरोध न नोंदवता ते पुढे म्हणतात 'हे जर जनहिताची उपासना करणारे ठरत असेल. मांगलिक असेल तर मग त्यालाही माझी ना नाही. मंत्राच्या सदुपयोग व दुरुपयोगाप्रमाणेच वृत्तपत्रांची ही कथा आहे-' पत्रकारितेला दुधारी तलवार मानत त्यांनी 'मिशन' व 'प्रोफेशन’ चा अभिनव विचारही मांडला आहे. 

पत्रकारिता : लोकप्रक्षिणाचे वाण

वर्तमानपत्राचा आशय लोकसेवा आहे ही महादेवभाईची ठाम मान्यता होती. ते म्हणतात की कधी-कधी वृत्तपत्रे सेवेऐवजी असेवेचीही भूमिका घेताना दिसतात. सांप्रदायिक दंगलींच्या वेळी सामंजस्य उभे करणे, युद्धप्रसंगी शांततेचा आग्रही विचार मांडणे, मालक-मजूर संघर्षात नेमकी सत्य भूमिका घेणे- यांतून पत्रकारितेच्या अमृतस्पर्शाने समाजजीवन चैतन्यमय होऊ शकेल याउलट असत्याच्या विषाने समाजाची राख-रांगोळीच होईल; स्वतःच्या दैनिकाच्या प्रतिष्ठेसाठी देशाची अब्रू जात असेल तर पुनर्विचाराची नितांत आवश्यकता आहे; वर्तमानपत्रे म्हणजे लोकप्रशिक्षणाची शाळा असे आपले मत नोंदवून त्यांनी पुढे सांगितले आहे की पत्रकार लोकमताचे प्रतिबिंब झेलतो आणि लोकमताची प्रतिष्ठापना करतो. लोकमताला ज्ञानसमृद्ध आणि सत्यस्वरूपी बनवणे हे पत्रकाराचे महत्त्वाचे कर्तव्य होय. पत्रकारिता धर्माचा विचार समजावून सांगताना इंग्लंडच्या सी.पी.स्कॉटच्या पुढील उद्धरणाचे महत्त्व सांगत त्यांनी समजावले की प्रत्येक वृत्तपत्राच्या कार्यालयात पुढील उद्धरण ठळक अक्षरांत लावण्यासारखे आहे. 

'वृत्तपत्र काराला किमान पुढील गुणांची तर आवश्यकता आहेच - प्रामाणिकपणा, स्वच्छता, निडरता, न्यायबुद्धी आणि वाचकांबद्दलच्या आपल्या कर्तव्याचे भान," महादेवभाईचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. 'मराठी वृत्तपत्रांनी जणू निंदेचे व्रत घेतले आहे.' अशी गंभीर प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. भल्याभल्या नेते मंडळींवर आणि संस्थांच्या कारभारावर शिवराळ लिहिताना मराठी पत्रकारिता सोवळे-ओवळे पाळत नाही असा या आक्षेपाचा अर्थ आहे. या घाणीची उदाहरणे मी देणार नाही!' असे म्हणत म्हणत त्यांनी 'हरिजन’ मधून छापून आलेल्या एका वृत्ताचा मराठी वृत्तपत्राने केलेला विपर्यास नोंदवला आहे. पुढे लगेच ते म्हणतात- 'पण मराठी वृत्तपत्रांचेच दोष मी का बरे सांगावेत? गुजराती वृत्तपत्रांची कथा तरी काय न्यारी आहे? मराठी वृत्तपत्रांच्या तोंडावर थुंकतील एवढी त्यांची तयारी आहे. 

फरक एवढाच आहे की मराठी पत्रकारितेत किमान बुद्धिविलास तरी आढळतो पण गुजरातीत दुष्टबुद्धीशिवाय मात्र काहीच आढळत नाही. या पत्रकारितेतला नमुना कागदावर अंकित करणे नसून कलंकित करणेच ठरेल!' अपवादभूत पत्रविद्येचा नामोल्लेख करत त्यांनी 'प्रजाबंधु' आणि 'लोकवाणी' चा उल्लेख केला आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, शुद्ध साहित्य या दृष्टींनी जर कुठल्या साप्ताहिकाला अनुकरणीय मानायचे असेल तर 'मैचेस्टर गार्डियन’ला असे आपले मत अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी सांगून टाकले आहे.

वृत्तकर्त्यांचे कर्तव्य : निर्भीड सत्यकथन

आपल्या भाषणाचा समारोप करताना रस्किनच्या विचारांचा आढावा घेत ते म्हणतात की ताजे समाचार, तपासून बघितलेली विधाने, आत्म्याला पोषक नवनवी तत्त्वे, शुद्ध भाषेचा आग्रही विचार ज्या वृत्तपत्रांतून आढळेल त्यांची कमाई होईल की नाही हे मी काही सांगू शकत नाही पण वाचकांची मात्र कमाई होईल, धणी पुरेल. सी.पी.स्कॉट, लॉईड गॅरिसन डीलेन स्कॉट, अब्राहम लिंकन यांसारख्या अनेक नामवंतांचा विचार त्यांनी आपल्या भाषणातून उद्धृत केला आहे. डीलेन स्कॉटवे हे उद्धरण त्यांनी दिले आहे- 'राज्यकर्त्यांचा धर्म भले शांत राहण्याचा असेल पण वर्तमानपत्राचे कर्तव्य परिणामांची तमा न बाळगता सत्यकथन करणे हेच आहे. अन्याय-अत्याचाराचा बुरखा फाडणेच आहे. जगाच्या न्यायासनापुढे सत्यकथनाचा विवेकी आग्रह धरणेच आहे.. वृत्तकर्त्याचे तर हे कर्तव्यच आहे की स्वच्छ परिधानातील धुरंधरांच्या कृष्णकृत्यांना आणि रक्तरंजित हातांनी सिंहासनावर विराजमान झालेल्या सत्ताधीशांना जनतेच्या न्यायालयात खेचून अनावृत करावे. 

वृत्तविवेचकाची भूमिका ही इतिहासकाराप्रमाणे सत्यशोधनाची आणि सत्य प्रकटीकरणाची असते.' महादेभाईंनी वृत्तपत्र विद्येला एक जबाबदार आणि पवित्र व्यवसाय मानले आहे. 'जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो ऐवजी आज 'जब भूख मुकाबिल है तो अखबार निकालो' अशी स्थिती असल्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे. गांधीजींप्रमाणेच महादेवभाईही निष्ठापूर्वक पत्रसृष्टीशी संबद्ध होते. राष्ट्रीय चैतन्याच्या स्पर्शाने भारलेले महादेवभाई राष्ट्रधर्मी पत्रकार होते. त्यांची पत्रकार-प्रज्ञा संस्कारपूत निःस्पृह आणि समतोल अशीच आहे. मधुर, साधी, परिणामकारक अशी विशिष्ट शैली त्यांनी विकसित केली. सत्यनिष्ठेचा आग्रह, लोककल्याणकारी इच्छा, दुर्दम्य राष्ट्रीय भावना समतोल दृष्टिकोन, लोकगम्य संस्कारसंपन्न भाषा, विवेचक निष्पक्षता यांसारख्या अनेक बहुमोल गुणांनी त्यांची पत्रकारिता नटलेली आहे. गांधीजींच्या जीवनशैलीचे भाष्यकार, प्रासादिक भाषाप्रभू, सिद्ध अनुवादक, साहित्यप्रेमी पत्रकार या नात्याने महादेवभाईवे महत्व श्रेष्ठतम आहे. गांधीयुगीन चैतन्यप्रवाहाची ही एक सौम्य सात्त्विक विचारधारा आहे.

Tags: पत्रकार   काकासाहेब कालेलकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक नवलराव  मणिलाल नथूभाई महादेव हरिभाई देसाई विश्वास पाटील Reporter kakasaheb kalelakr Mahatma Gandhi Lokmanya Tilak Lawalrao Manilal nathulal Vishwas Patil Mahadew Haribhai Desai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विश्वास पाटील.,  कोल्हापूर
vishwas07@gmail.com

पत्रकार, दै. लोकमत

 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके