डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘इस बार, शरद पवार!' असा नारा नाशिक अधिवेशनात देऊन राष्ट्रवादीचे नेते पवारांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी प्रचारास लागले आहेत. लोकसभेत पवारांची ‘पॉवर' चालणार की मायावतींची ‘माया' चालणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच; पण तरुणपणापासूनच सत्तेची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या पवारांना पंतप्रधानपदाचे स्वप्न 1991 पासूनच पडत आहे. सद्या राजकीय परिस्थितीत आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी येईल असे त्यांना वाटते आहे. काँग्रेसशी बोलणी करताना दबावतंत्राचा एक भाग म्हणून पवारांनी शिवसेनेशी जवळीक साधली असली तरी त्यामागील सत्तेची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. महाराष्ट्रातून अधिकाधिक खासदार आणि राज्याराज्यांतील मित्रपक्षांच्या संख्येवर पंतप्रधानपदाचे गणित जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो;परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे समीकरण जुळणे अवघडच दिसते.

शरद पवार म्हणजे एक महत्त्वाकांक्षी नेतृत्व. महाराष्ट्राचे राजकारण स्वत:च्या ताकदीवर ते फिरवू शकतात एवढा प्रभाव त्यांचा राज्यात आहे. मुख्य काँग्रेसपासून ते जेव्हा जेव्हा वेगळे झाले तेव्हा स्वबळावर त्यांनी 50 ते 70 आमदार निवडून आणले. 1985 मधील समाजवादी काँग्रेस व 1999 व 2004 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे यश हे त्याचे उदाहरण. एकदा भेटलेल्या कार्यकर्त्याचे नाव लक्षात ठेवणारा आणि महाराष्ट्राची खडान्‌खडा माहिती असणारा नेता अशी प्रतिमा असणारे  शरद पवार तरुणपणापासूनच सत्ताकांक्षी दिसतात. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 1978 चा ‘पुलोद'चा प्रयोग.

आणीबाणीनंतर 1977 साली केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. 1977 च्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात मोठी फूट पडून इंदिरा गांधी निष्ठांची काँग्रेस (इं.) व इंदिरा विरोधकांची काँग्रेस(अर्स)असे दोन पक्ष उदयास आले. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आणि राज्यातही काँग्रेसचे विभाजन झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व शरद पवार अर्सबरोबर गेले. 1978 सालची विधानसभा निवडणूक दोन्ही काँग्रेस पक्षांनी स्वतंत्रपणे लढविली. पण कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने एकमेकांविरुद्ध निवडणुका लढविणाऱ्या दोन्ही काँग्रेस पक्षांनी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरकार स्थापन केले. पवारांनी वसंतदादांविरुद्ध जुलै 1987 मध्ये बंड केले आणि ते 44 आमदारांना बरोबर घेऊन काँग्रेस आघाडीतून बाहेर पडले.

सत्ताकांक्षी पवारांनी जनता पक्षाच्या मदतीने ‘पुलोद'चे सरकार स्थापन करून ‘मुख्यमंत्री' बनण्याची महत्वाकांक्षा तरुणपणीच पूर्ण केली. त्यानंतर ते तीन वेळा मुख्यमंत्री झाले, पण ते काँग्रेस पक्षात येऊन. काँग्रेसपासून वेगळे राहून स्वतंत्रपणे महाराष्ट्राचे राजकारण करण्यावर मर्यादा येऊ लागल्याने आणि विरोधी गटात राहून पुन्हा सत्ताप्राप्ती शक्य नसल्याचे पाहून पवारांनी राजीव गांधींच्या कालखंडात 1986 मध्ये समाजवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये विलिनीकरण केले.

चार वेळा मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या पवारांना आता पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले आहे. तशी संधी 1991 साली चालून आली होती. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जे काठावरचे बहुमत मिळाले त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेसने 38 जागा जिंकल्या, त्यामुळे पंतप्रधानपदावर हक्क सांगणाऱ्या काँग्रेस नेत्यांत पवारांचे नाव आघाडीवर होते, पण पी.व्ही. नरसिंहरावांनी बाजी मारली आणि पवारांना संरक्षणमंत्री पदावर समाधान मानावे लागले. परंतु 1993 मध्ये मुंबई बाँबस्फोटानंतर त्यांना राज्यात परतावे लागले. 1995 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पराभूत झाली आणि राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली. 1998 च्या लोकसभा निवडणुकांत शिवसेना-भाजप विरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी पवारांनी रिपब्लिकन पक्षाचे गट व समाजवादी पक्षाला बरोबर घेऊन 37 जागा जिंकल्या आणि पवार विरोधी पक्षनेते झाले. परंतु 1999 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पवारांनी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा (13 वर्षांनी)दुसरे बंड केले. निमित्त होते सोनिया गांधींच्या नेतृत्वाचे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या जन्माने भारतीय नसल्याने त्यांना पंतप्रधानपद भूषविण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका घेत शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारीक अन्वर यांनी मे 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात बंड केले.

खरे तर सोनियांना सक्रिय राजकारणात आणण्यात पवारांचाच मुख्य पुढाकार होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 1991 मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारले. 1991 ते 1997 पर्यंत त्या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या, पण या कालखंडात काँग्रेसचा झपाट्याने ऱ्हास होत होता. त्यामुळे 1998 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्यासहित इतर काँग्रेसजनांच्या आग्रहावरून त्या सक्रिय राजकारणात उतरल्या.त्या पक्षाध्यक्षा झाल्या त्यावेळी विदेशीपणाचा मुद्दा का उपस्थित केला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी झालेली निवड, त्यांना काँग्रेसमधून मिळणारा वाढता पाठिंबा आणि विरोधी पक्षनेत्यांपेक्षा संसदीय पक्षाच्या नेत्याला प्राप्त झालेले निर्णय प्रक्रियेतील स्थान, यामुळे विरोधीपक्षनेते असलेले पवार अस्वस्थ होते. त्यातूनच नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा असलेल्या पवारांनी सोनिया गांधीविरुद्ध बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस उदयास आली. पवारांनी काँग्रेसविरोधात जे दोन्ही बंड केले (1978 व 1999) त्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत मराठा वर्ग व शुगर लॉबी त्यांच्यामागे उभी राहिली. त्याआधारेच ते आपले राजकारण पुढे रेटू शकले.मात्र काँग्रेसविरोधात बंड करूनही त्यांना काँग्रेसशी जुळवून घ्यावे लागले. 1999 आणि 2004 च्या निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीतून राष्ट्रवादीला काँग्रेसशी आघाडी करून सत्तेत राहता आले. आता 2009 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा पुन्हा पुढे आली आहे. त्याची व्यूहरचना म्हणून त्यांनी दबावतंत्राचे राजकारण सुरू केलेले दिसते.

पवारांची खेळी

पवारांच्या राजकारणास राज ठाकरेंनी ‘धोकायंत्र' असे संबोधले आहे. मा धोकायंत्रामुळे म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाढत्या जवळिकीमुळे काँग्रेस आणि भाजपात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवारांच्या या धोकायंत्रामागे सौदेबाजीची व्यूहरचना दिसते. महाराष्ट्रात काँग्रेसकडून जागा वाढवून घेण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करण्याची चर्चा पसरवली. या सौदेबाजीतून राष्ट्रवादीला दोन-तीन जागा वाढून मिळतीलही. शिवाय विधानसभेसाठी अधिक जागा व मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे पदरात पाडून घेण्याची ती व्यूहरचना दिसते. यात काँग्रेसने अधिक ताठर भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राष्ट्रवादीने शिवसेना हा एक पर्याय ठेवला आहे. शिवाय यातून भाजप-शिवसेना युतीत गोंधळ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू दिसतो. त्यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन त्याचा फायदा दोन्ही काँग्रेसला मिळू शकतो. हे करतानाच पवार रिपब्लिकन पक्ष व समाजवादी पार्टीला बरोबर घेण्याची भूमिका घेताना दिसतात. त्यातून मतविभागणी टाळली जाऊ शकते.

शिवसेनेनेही पवारांच्या पंतप्रधानपदास पाठिंबा दिला आहे. शिवसेनेमध्ये एक गट राष्ट्रवादीबरोबर युती करण्याच्या बाजूने आहे. कारण भाजपाबरोबर जाऊन महाराष्ट्रात पुन्हा सत्ता प्राप्त करणे शक्य नसल्याने, राष्ट्रवादीबरोबर युती करून सत्ता मिळवण्याच्या बाजूचा आहे. राष्ट्रवादीची सेनेबरोबर युती झाली नाही तरी निवडणुकीनंतर पवारांना संधी आलीच तर मराठीच्या मुद्यावर सेना पवारांना पाठिंबा देऊ शकते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सेनेने भाजपच्या उमेदवारास पाठिंबा न देता काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रीयन असल्याने त्यांना पाठिंबा दिला होता.

एकीकडे काँग्रेसबरोबर दबावतंत्र वापरून अधिक जागा मिळवायच्या, दुसरीकडे सेनेशी सख्य राखायचे आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदारांचा पाठिंबा मिळवायचा आणि तिसरीकडे राज्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांशी मैत्री करून पंतप्रधानपदावर दावा करायचा अशी त्यांची खेळी आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस किंवा भाजप यांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तिसरी आघाडी, काँग्रेस आघाडी व भाजप आघाडीतील काही प्रादेशिक पक्षांशी पवार मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत. परंतु सर्व प्रादेशिक पक्षांना मिळून 271 चा आकडा गाठणे अशक्य आहे. त्यामुळे पवारांचे गणित चुकण्याचीच शक्यता अधिक दिसते.

मराठा आरक्षणाचे राजकारण

शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी

  लोकसभा निवडणूक प्राप्त जागा प्राप्त मते
काँग्रस (एस) 1980 01 11.8
काँग्रेस (एस) 1984 02 12.1
राष्ट्रवादी काँग्रेस 1999 6 21.6
राष्ट्रवादी काँग्रेस 2004 9 18.6

निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला दिसतो. पवारांनी मराठा समाजाला नोकऱ्या व शैक्षणिक क्षेत्रांतील आरक्षणाचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर ‘त्यांना राजकीय क्षेत्रात आरक्षण नको' असे म्हटले आहे. खरे तर या प्रश्नात राज्यकर्ते तेच आणि मागणी करणारे तेच अशी अवस्था झाली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा पातळीपर्यंत संख्येने अधिक असलेल्या मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. राज्यातील शंभराहून अधिक विधानसभा मतदारसंघात सातत्याने मराठा उमेदवारच निवडून येताना दिसतात. (जणू ते मतदारसंघ मराठा जातीसाठीच आरक्षित आहेत.) असे असताना ‘मराठ्यांना राजकीय आरक्षण नको' या मुद्याला काहीच अर्थ नाही. राष्ट्रवादीने विनायक मेटेंना पुढे करून मराठा संघटनांच्या समन्वम समितीद्वारे ही मागणी पुढे रेटली, हे आता उघड झाले आहे.

यामागे शिवसेनेचा मराठा पाठीराखा कमी करून तो स्वत:कडे वळवणे अशी राष्ट्रवादीची खेळी दिसते. राष्ट्रवादीला पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात मराठ्यांचा पाठिंबा आहे, पण मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या विभागात मराठ्यांचा पाठिंबा शिवसेनेला अधिक मिळताना दिसतो. 1990 नंतर या विभागातील गरीब, बेकार मराठा समाज प्रस्थापित काँग्रेसपासून आणि प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांपासून दूर जाऊन शिवसेनेचा पाठीराखा बनला. शैक्षणिक व नोकऱ्यातील आरक्षणाच्या मुद्यातून शिवसेनेकडील हा पाठीराखा वर्ग राष्ट्रवादीकडे वळविण्याचा आणि त्याआधारे या विभागात पक्षविस्तार करण्याचा हेतू दिसतो. पवारांची ही खेळी यशस्वी झाली तर त्याचा फटका सेनेला बसू शकतो. परंतु या खेळीतून राष्ट्रवादीचा ओबीसी मतदार दुरावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस- प्रादेशिक पक्षच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेर इतर काही राज्यांत चार-दोन आमदार असले तरी आणि राष्ट्रीय पक्षाची मान्यता असली तरी राष्ट्रवादी हा अजूनही एक प्रादेशिक पक्षच आहे. महाराष्ट्रातही या पक्षाचा विस्तार संपूर्ण राज्यभर नाही. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड आहे; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पक्ष प्रभावी आहे; पण मुंबई-कोकण व विदर्भात पक्षाचा प्रभावी कमी दिसतो. शिवाय सामाजिक पाठीराख्यांचा विचार करता मराठा समाज हा पक्षाचा प्रमुख पाठीराखा. काही अपवादात्मक ठिकाणी ओबीसी, आदिवासी आणि मुस्लिम समाज पक्षाबरोबर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर राज्यभर पक्ष विस्तारण्याचे आणि मराठेतर समाजघटकांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘इस बार, शरद पवार' असा नारा दिला असला तरी हा प्रश्न अंतर्गत गटबाजीने पोखरलेला आहे. साहेबांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी राष्ट्रवादीतील नेते एकत्रित येतील काय, हा प्रश्न आहेच!

...तर आश्चर्य वाटू नये

भविष्मात सत्तेसाठी शरद पवार हिंदुत्ववादी पक्षांबरोबर गेलेतर आश्चर्य वाटू नये. तसा पवारांच्या सत्ताकांक्षी राजकारणाचा इतिहास आहे. 1980 ते 1986 मा कालखंडात पवारांनी मुख्य काँग्रेस पक्षापासून वेगळे राहून आणि काँग्रेसविरोधी पक्षांचे नेतृत्व स्वत:कडे घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या कालखंडात जनता पक्ष, शेकापसह पवारांनी भाजपशी जुळवून घेण्याची भूमिका घेतलेली दिसते. उदाहरणार्थ- मार्च 1982 मध्ये राज्यसभा व विधानपरिषदेवर निवडून देण्याच्या जागांसंबंधी भाजप व पवारांची समाजवादी काँग्रेस यांनी परस्पर सहकार्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार राज्यसभेसाठी समाजवादी काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना भाजपने पाठिंबा दिला होता, तर विधानपरिषद निवडणुकीत समाजवादी काँग्रेसने भाजप उमेदवारास पाठिंबा दिला. दुसरे उदाहरण म्हणजे औद्योगिक क्षेत्रांत गुंडगिरी करणाऱ्या शिवसेनेसारख्या संघटनांना सरकारने आळा घालावा, अशी भूमिका घेणारे पवार (एप्रिल 1981) कालांतराने म्हणजे शिवसेनेने काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर शिवसेनेच्या जवळ गेलेले दिसतात.

म्हणजेच या कालखंडात काँग्रेस विरोधी असलेला कोणताही पक्ष त्यांच्यासाठी अस्पृश्य नव्हता. 2004 साली राष्ट्रवादी भाजपशी युती करणार अशी चर्चा होती; पण केंद्रातील राजकारण भाजपविरोधी असल्याने आणि राज्यातही भाजपची ताकद मर्यादित असल्याने चर्चा पुढे सरकू शकली नाही. आज आघाड्यांच्या राजकारणात विचारप्रणालीचा मुद्दा दुय्मम ठरला असून सत्तेस अधिक महत्त्व आलेले दिसते. काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असले तरी त्यांनी सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांत काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काही ठिकाणी सेना-भाजपशी युती केलेली दिसते. तर काँग्रेसनेही राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना-भाजपची मदत घेतल्याचीअनेक उदाहरणे आहेत.

हे सर्व वास्तव असले तरी पवार हिंदुत्ववादी पक्षाबरोबर उघडपणे आघाडी करणे शक्य नाही. भाजप आणि शिवसेनेतील युतीचा मुख्य आधार हा हिंदुत्वाचा मुद्दा आहे. तसा आधार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाही. पवारांनी हिंदुत्ववादी पक्षांशी युती केल्यास ते हिंदुत्ववादाचा स्वीकार करणार का, हा प्रश्न आहे. पवारांची महाराष्ट्रात एक बहुजनवादी, धर्मनिरपेक्ष नेता म्हणून प्रतिमा आहे. यशवंतराव चव्हाणांचे वारस म्हणून त्यांनी सामाजिक न्यायाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महिला, मुस्लिम,दलित आणि ओबीसी संदर्भातील त्यांची धोरणे महत्त्वपूर्ण ठरतात. त्यातून त्यांची जी बहुजनवादी प्रतिमा निर्माण झाली आहे, ती प्रतिमा जपण्यासाठी ते उघडपणे हिंदुत्ववादी पक्षाबरोबर जाणे टाळतील.

Tags: विवेक घोटाळे शरद पवार कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पंतप्रधान prime minister congress rashtrawadi congress sharad pawar vivek ghotale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विवेक घोटाळे

कार्यकारी संचालक, द युनिक फाऊंडेशन, पुणे
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके