डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीच्या स्वप्नाचा पाठपुरावा

समाजकार्य : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार | विवेक सावंत

MS-CIT ही संस्था आज एक उत्तम मॉडेल म्हणून विकसित झाली आहे. ती सरकारच्या पाठिंब्याने सुरू केलेली असली तरी ती सरकारी कंपनी नाही. ती सरकारी अनुदान घेत नाही, ती माफक आर्थिक फायदा मिळवणारी कंपनी आहे; पण प्रमुख हेतू समाजविकास हाच असल्याने त्या नफ्याची सामाजिक प्रकल्पांत फेरगुंतवणूक होते. ती मोठ्ठाल्या शहरांत आणि इतर देशांतही स्थिरावली आहे; पण प्रथमतः तिची मुळं खेड्यापाड्यांमध्ये खोलवर रुजली आहेत. शासनाचं सहकार्य मिळवूनही स्वायत्तता कशी अबाधित ठेवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे MS-CIT!


 

महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या पहिल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी फाउंडेशनचे मन:पूर्वक आभार मानतो... एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या शहरी-निमशहरी, तसंच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या व विशेषत: युवांच्या जीवनातील डिजिटल दरी बुजवण्यासाठी MKCL ने केलेल्या संगणकसाक्षरतेच्या नम्र प्रयत्नाला सामाजिक कार्याची प्रतिष्ठा देण्याचे जे औदार्य फाउंडेशनने दाखवले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. 
फाउंडेशनने केलेला हा सन्मान भूतकाळातल्या कामाच्या पावतीपेक्षा यापुढे हे कार्य कसं व्हावं यासंबंधी दिशासूचक आणि स्फूर्तिदायक आहे, असं मी मानतो.   

हा पुरस्कार मला देण्यात येत असला तरी त्याचं श्रेय माझं नसून ते सर्वस्वी माझ्याबरोबर या कार्यात गेली बारा वर्षे मनापासून सहभागी झालेल्या आणि महाराष्ट्राच्या अक्षरश: कोनाकोपऱ्यात संगणकसाक्षरतेसाठी कार्यरत असलेल्या माझ्या पंचवीस हजार सहकारी बंधूभगिनींचं आणि माझ्या गुरुजनांचं आहे, हे नमूद करण्यात मला विशेष समाधान वाटतं. ज्ञानयुगाची पहाट होत असताना नवी माहिती आणि ज्ञान यांचा उगम, त्यांचा साठा, त्यांचं वितरण, त्यांचं सादरीकरण, त्यांच्यावरील प्रक्रिया, त्यातून निर्माण होणारी उपयुक्त माहिती व ज्ञानाची निर्मिती, त्यातून होणारी मूल्यवृद्धी, त्यातून होणारी संपत्तीची निर्मिती या साऱ्या क्रिया झपाट्यानं डिजिटल झाल्या. त्यामुळे संगणकसाक्षरता हे ज्ञानयुगातल्या विकासाच्या संधींचं प्रवेशद्वार बनलं. पण त्याचबरोबर संगणक-साक्षर आणि संगणक-निरक्षर यांच्यात मोठी आणि सतत रुंदावणारी दरी निर्माण झाली. जुन्या विषमता ज्यांच्या वाट्याला आल्या त्यांना आणि काही इतरांनासुद्धा या नव्या विषमतेची झळ पोहोचू लागली. बाकीचं जग ज्ञानयुगात झेप घेत असताना संगणक-निरक्षर लोक एका अंधकारयुगात ढकलले जातील, हे स्पष्ट झालं. त्या संकटावर मात करण्याचा MKCL हा छोटासा सामूहिक प्रयत्न. 

डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार दिला जातोय याचं औचित्य माझ्या दृष्टीनं हे आहे की- त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अंधश्रद्धांच्या, अविवेकाच्या, अवैज्ञानिकतेच्या आणि बुवाबाजीच्या अंधकारयुगात जाण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचीही बाजी लावून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्वसामान्यांना विविध प्रकारच्या अंधकारयुगांमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ.दाभोलकरांइतका उत्तुंग आदर्श क्वचितच सापडेल. 

डॉक्टर माझे खूप जवळचे मित्र होते. त्यांची नि:संदिग्ध कार्यनिष्ठा, अपार कष्ट, स्वयंशिस्त, उच्च गुणवत्तेचा ध्यास, आपला संदेश सर्वांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचण्यासाठी नव्या कल्पनांचा आविष्कार करण्याची त्यांची हातोटी, आपल्या चळवळीविषयी दूरदृष्टी, अप्रतिम संघटनकौशल्य आणि पराकोटीची समर्पित भावना हे डॉक्टरांचे गुण माझ्या मनावर कोरले गेलेले  आहेत. 

डिजिटल दरीवर पूल बांधताना

MKCL निर्मितीच्या काळात अनेक राजकीय नेते आणि विचारवंतांच्या  सहवासात मी आलो. श्री.शरद पवार, श्री.दिलीप वळसे-पाटील, प्रा.डॉ. राम ताकवले, डॉ.विजय भटकर यांच्याशी संगणक शिक्षणासंबंधी वारंवार चर्चा होत असत. एकदा C-DAC च्या Advanced Computing Training School (ACTS) संबंधीच्या चर्चेनंतर पवारसाहेब म्हणाले, ‘‘संगणकाचं शिक्षण भावी काळात सर्वांसाठीच अत्यावश्यक होणार आहे. आजवर तुम्ही ’ Classes’ साठी हे शिक्षण उपलब्ध करून दिलंत; पण 'Masses’ नासुद्धा ते मिळणं अत्यावश्यक आहे. ते ग्रामीण भागापर्यंत, दर्जेदार आणि स्वस्तात स्वस्त कसं देणार?’’ हा दूरदर्शी विचार पुढच्या कामाची जणू प्रेरक शक्ती ठरला. हा विचार माझ्या मनातही अस्पष्टपणे रुंजी घालत असे. ACTS ची भरभक्कम फी न परवडणारे पण हुशार असे अनेक विद्यार्थी होते. त्यांच्यासाठी आम्ही बँकेच्या शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करून देत होतो. पण margin money सुद्धा देऊ न शकणारे अनेक विद्यार्थी होतेच. त्यामुळे केवळ पैशाअभावी संगणकज्ञानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता होती. 

सर्वसामान्यांसाठी उच्च गुणवत्तेचा संगणक-साक्षरता अभ्यासक्रम राज्यभर सर्वदूर उपलब्ध करून देणं हे एक आव्हान होतं. संगणक-तंत्रज्ञान सोप्या भाषेत, विशेष करून मराठीमध्ये ग्रामीण भागात, आदिवासी भागात तसंच डोंगराळ व दुर्गम भागात पोहोचावं, या दिशेने योजना आकाराला येऊ लागली. प्रा.राम ताकवले, डॉ.विजय भटकर आणि मी शासनाशी दोन वर्षं चर्चा करत होतो. श्री.शरद पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील आणि शिक्षण विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव श्रीमती कुमुद बन्सल यांनी या कामी मोठं योगदान दिलं. लोकहिताच्या कळकळीतून आणि विलक्षण दूरदृष्टीने त्यांनी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती या योजनेमागे भक्कमपणे उभी केली. एखाद्या समाजाच्या हिताच्या उपक्रमात राजकीय नेतृत्वाचा आणि शासनाचा सहभाग असणं, याचं महत्त्व मी C-DAC च्या प्रदीर्घ अनुभवातून जाणत होतो. पण तो ‘सहभाग’च असावा; ‘नियंत्रण’ नसावं, हेही माझं ठाम मत C-DAC च्याच अनुभवातून तयार झालं होतं. त्यावर मी ठाम होतो.

शिक्षणाच्या क्षेत्रात मुळाशी जाऊन पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज का आहे, पदवी मिळाली की शिक्षण संपलं असं होऊ नये, आयुष्यभर निरंतर शिक्षण सुरू असायला हवं- ही ज्ञानयुगाकडे वाटचाल करणाऱ्या समाजाची मूलभूत गरज आहे. नव्या तंत्रज्ञान, ज्ञान यामुळे जुन्या जटिल समस्यांना कशी नवी उत्तरं मिळत आहेत, जीवनामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये पदार्थ आणि ऊर्जा यांची जागा ज्ञान किती झपाट्याने घेत आहे, उत्पादने आणि सेवा यांच्यातला ज्ञानाचा अंश किती झपाट्याने वाढतो आहे, नव्या कार्यशील ज्ञानातून संपत्तीची निर्मिती कशी होत आहे, ज्यांच्याकडे जमीन-जुमला, आर्थिक भांडवल, इ. पाठबळ नाही त्यांनाही ज्ञानयुगात नव्या विकासाच्या संधी कशा मिळू शकतात... अशा अनेक मुद्यांवर आम्ही मतं मांडत होतो. ती शासनाला पटत असावीत. त्यामुळेच या साऱ्या प्रश्नांबाबत अभ्यास करण्यासाठी प्रा.ताकवले सरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. मीही त्यात होतो. आम्ही शासनाकडे तीन महिन्यांत अहवाल सादर केला. संगणक साक्षरता आणि ई-लर्निंग हेच आगामी काळात कर्मशील ज्ञानाच्या संपादनाचे आणि युवांच्या नव्या करिअर संधींचे प्रवेशद्वार आहे, हा त्यात प्रमुख मुद्दा होता आणि त्यासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या स्थापनेची शिफारसही आम्ही केली होती. शासनाला अहवाल सादर केल्यावर अनेक महिने प्रतीक्षेत गेले.

पुढे काही महिन्यांनी MKCL संदर्भातल्या योजनेला मंजुरी मिळाल्याचं श्री.दिलीप वळसे-पाटील यांनी फोनवरून सांगितलं आणि MKCL च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी मी घ्यावी, असं सुचवलं. प्रकल्पाला सरकारचं पाठबळ मिळणार होतं, पण पैसा मात्र आमचा आम्हालाच उभारावा लागणार होता. एक विशिष्ट सामाजिक भान आणि उत्तरदायित्वाची भावना मनाशी बाळगून मी या प्रकल्पात उतरलो. त्यात सामाजिकता आणि उद्योजकता यांचा उत्तम मिलाफ साधणं अपरिहार्यच होतं. दोन्ही गोष्टी एकमेकींना पूरक ठरणार होत्या.

एका खोलीत MKCL चं ऑफिस थाटलं. फर्निचरपासून ते मनुष्यबळापर्यंत संसार थाटायचा होता! सी-डॅकचा मोठा अनुभव तोवर गाठीशी आला होता. आम्ही आमचं व्हिजन- मिशन निश्चित केलं. आम्हाला सहा प्रमुख आव्हानांना एकाच वेळी सामोरं जायचं होतं. खेड्यापाड्यांत माहिती तंत्रज्ञान मराठीत आणि सोपेपणानं घराघरांत जायला हवं होतं. म्हणून पुढील ध्येयांसाठीचं ‘बिझनेस मॉडेल’ नक्की केलं. 1) प्रचंड संख्येच्या विद्यार्थिवर्गापर्यंत पोहोचणं, 2) उच्च गुणवत्ता, 3) माफक फी, 4) कमीत कमी कालावधीत ते उपलब्ध करून देणं, 5) शिक्षण सर्वदूर पोहोचवणं, 6) शिक्षण सामाजिक संदर्भात होत असलं तरी त्यातली व्यक्ती-अनुरूपता सांभाळणं व खोलवरचा व्यक्तिगत अनुभव विद्यार्थ्यांना मिळवून देणं (Mass personalisation) (थोडक्यात,  bigger, better, cheaper, faster, wider and deeper)! संगणकशिक्षण देणारी राज्यव्यापी संस्था उभारायची, ती आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवायची आणि आयटीचा प्रसार करून निरंतर शिक्षणाची एक मोठी वाट खुली करून द्यायची- अशा तिहेरी स्तरावर काम सुरू केलं. ‘ज्ञानदीप लावू जगी’ (Creating a knowledge - lit world) हे आमचं सार्थ ब्रीदवाक्य बनलं. ही गोष्ट 2001 च्या ऑगस्ट महिन्यातली!

ज्ञानाधिष्ठित समाजासाठी

MKCL ने सुरुवात केली ती MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) या संगणकसाक्षरता अभ्यासक्रमाने. हा कोर्स महाराष्ट्राच्या अगदी कोनाकोपऱ्यात अल्पावधीतच पोहोचला आणि प्रचंड यशस्वी झाला. आजवर सुमारे 90 लाख विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतला. हा एक जागतिक विक्रम ठरला. हा अभिनव प्रयोग महाराष्ट्रात झाला नसता, तर यापैकी सुमारे 60 लाख विद्यार्थ्यांना संगणकाला स्पर्शही करता आला नसता. त्यांपैकी काहींना मी नेहमीच भेटत असतो. त्यांचा आत्मविश्वास बघितला की अंत:कारण भरून येतं.

राज्यभरातील अनेक छोट्या खढ उद्योजकांना हा कोर्स शिकवण्याची जबाबदारी MKCL ने दिली. त्यांतले बरेचसे सुशिक्षित बेरोजगार होते. त्यांना सातत्याने प्रशिक्षित केले. महाराष्ट्रातील खेडोपाडी, शहरी, निमशहरी, आदिवासी भागांतले शिक्षक आणि विद्यार्थी नजरेसमोर ठेवून MKCL ने स्वयं-शिक्षणाचं ई-लर्निंग मटेरिअल कल्पकतेने तयार केलं. या कोर्सने संगणकसाक्षरता मोठ्या प्रमाणावर रुजवली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पसरलेल्या या कोर्सच्या सेंटर्सच्या नेटवर्कवर नजर टाकली तर हे समजेल की, त्यामुळे एक लाखांहून अधिक तरुणांना ही सेंटर्स चालवण्याचा हायटेक रोजगार मिळालाय- तोही त्यांच्या गावातच! त्यामुळे गाव आणि घरदार सोडून शहराकडे धावायची गरज संपलीय. MKCLकडून अनेक गोष्टींसाठी ऑनलाइन सुविधा पुरवल्या जातात. भारतातल्या 17 राज्यांत MKCL चा विस्तार झालाय, तसंच अनेक देशांतही MKCL ची सेंटर्स स्थापन झाली आहेत. ऑक्टोबर 2007 मध्ये सौदी अरेबियात आमच्या प्रशिक्षणकामाला सुरुवात झाली. राजधानी रियाध आणि इतर अनेक विद्यापीठांत आमची सेंटर्स आहेत. विशेष बाब म्हणजे हजारो महिला या सेंटर्सच्या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

MKCL ही संस्था आज एक उत्तम मॉडेल म्हणून विकसित झाली आहे. ती सरकारच्या पाठिंब्याने सुरू केलेली असली तरी ती सरकारी कंपनी नाही. ती सरकारी अनुदान घेत नाही, ती माफक आर्थिक फायदा मिळवणारी कंपनी आहे; पण प्रमुख हेतू समाजविकास हाच असल्याने त्या नफ्याची सामाजिक प्रकल्पात फेरगुंतवणूक होते. ती मोठ्ठाल्या शहरांत आणि इतर देशांतही स्थिरावली आहे; पण प्रथमतः तिची मुळं खेड्यापाड्यांमध्ये खोलवर रुजली आहेत. शासनाचं सहकार्य मिळवूनही स्वायत्तता कशी अबाधित ठेवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे MKCL! सार्वजनिक, खासगी आणि सामाजिक भागीदारी (प्रायव्हेट, पब्लिक, कम्युनिटी पार्टनरशिप) असणारी ही संस्था! ही संस्था म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं IT क्षेत्रातल्या 5000 लघुउद्योगांचं जाळं, सुमारे 65000 संगणकांचं जाळं, एकाच वेळी 5 लाख विद्यार्थ्यांना e-learning च्या माध्यमातून पोपटपंचीला पूर्णपणे फाटा देणारं, प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची शिकवण देणारं नेटवर्क. शहरी तसेच ग्रामीण भागातल्या लक्षावधी तरुण-तरुणींना कॉम्प्युटरचे स्मार्ट यूजर बनवून आत्मविश्वास देणारं नेटवर्क.

MKCL च्या विशिष्ट जडणघडणीमुळे जवळजवळ 25000 हून अधिक सहकाऱ्यांच्या राज्यव्यापी परिवारात अतिशय आनंददायक असं शैक्षणिक काम करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. माणसातला चांगुलपणा, त्यांच्यातल्या गुणांची विविधता आणि कसब टिपण्याचं शिक्षण मला घरातूनच मिळालं होतं. जातपात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, भाषा, प्रदेश, ऐपत असल्या सीमारेषा तर मला कधी जाणवल्याच नाहीत. कारण लहानपणापासून ‘घरी येणारे सारे जण आपल्यासारखीच माणसं’ आहेत, ही शिकवण मिळाली आणि मोठेपणी तसाच प्रत्ययही येत राहिला. म्हणूनच गुणग्राहकता हे एकमेव तत्त्व मी जाणतो. मला कितीही विचित्र स्वभावाची, परस्परविरोधी विचारांची, मतांची, पार्श्वभूमीची, कार्यप्रणालींची माणसं भेटली तरी ती अस्पृश्य वाटत नाहीत. त्यांच्याविषयी घृणा वाटत नाही. त्यांच्यातले गुण दिसू लागतात. त्यांच्याबरोबर प्रकल्प सुरू होतात. माझे अनेक सहकारी माझ्याशी निवांत संवाद साधताना माझ्या या ‘सर्वोदयी’ स्वभावाची मोकळेपणाने यथेच्छ चेष्टा करतात. मात्र अशा लोकांबरोबर काही चांगले काम उभे राहिल्यावर ते माझ्या गुणग्राहकतेला, सहनशीलतेला आणि चिकाटीला मनापासून दादही देतात. त्यांनीही ही ‘जोखीम’ पत्करायला हरकत नाही, असंही कधी कधी त्यांना वाटू लागतं. कोणत्याही व्यक्तीच्या गुणांचा आधार समाजाच्या हितासाठी आपल्या कामात मिळवण्याचं स्वातंत्र्य आपल्या हातात असतं. तिच्यातील दोष बघत किंवा दाखवत बसण्यात कार्यहानी होते आणि बहुमोल वेळ वाया जातो. कार्याचा योग्य दिशेने विस्तार करताना कठोर होऊन निर्णय घेणं, कटू गोष्टींची अंमलबजावणी करणं, आपल्या सहकाऱ्यांमधून भावी नेतृत्व तयार करण्यासाठी स्पष्ट बोलणं- या बाबी ओघाने येतात. त्या मी करतोच; पण तसं करताना मनं दुभंगणार नाहीत याची मी काळजी घेतो. मनं सांधायला मला आवडतं आणि ते मी मनापासून करतो. 

‘नई तालीम’चा नवा आविष्कार

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात गांधीजींच्या ‘नई तालीम’चा आविष्कार नव्या रूपात आणायचा प्रयत्न MKCL आपल्या परीने प्रयत्न करत आहे. आपलं आजचं शिक्षण जीवनाभिमुख नाही. त्यातून विद्यार्थ्यांना समाजोपयोगी उत्पादक काम कसं करावं, हे शिकता येत नाही. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आज समाजाला आणि शासनाला सतावतो आहे. एका बाजूला उद्योगांना हवी तशी मुलं मिळत नाहीत तर दुसऱ्या बाजूला आपण दिलेल्या पदवीच्या आधारावर मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, हे शल्य विद्यापीठांना बोचतं आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी उद्योगजगत आणि मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने ‘MKCL  फिनिशिंग स्कूल्स’ हा प्रकल्प आम्ही राबवत आहोत. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून आमच्या निवडप्रक्रियेतून पुढे आलेल्या आर्थिक-सामाजिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकांतल्या बारावी उत्तीर्ण मुलामुलींना आम्ही इंडस्ट्री पार्टनर्सकडे तीन वर्षांच्या इंटर्नशिपसाठी पाठवतो. पहिल्याच दिवशी त्यांना offer letter दिलं जातं. सुरुवातीच्या अल्प मुदतीच्या औपचारिक प्रशिक्षणानंतर त्या इंडस्ट्रीत काम करत करत त्यांनी त्या कामाच्या विषयातच MKCL च्या e-Learning प्रणालीद्वारे अभ्यास करून तीन वर्षांत पदवी मिळवावी, अशी अपेक्षा असते. कुठेही घोकंपट्टी आणि पोपटपंची नाही. कामातून ज्ञानप्राप्ती आणि त्या ज्ञानप्राप्तीतून फलदायी काम. तीन वर्षे कामाची आणि पगाराची हमी असते. मात्र काम मधेच सोडलं तर पदवी मिळत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या दोन गोष्टी होतात. एक तर मुलांना प्रत्यक्ष कामातून जीवनाभिमुख शिक्षण मिळतं, तशा शिक्षणामुळे त्यांच्या कामाची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढत जाते आणि इंडस्ट्रीला तीन वर्षे सातत्याने टिकणारं मनुष्यबळ मिळतं. या पद्धतीतून पुढे आलेल्या मुलांना नोकऱ्यांच्या मागे लागावं लागणार नाही. नोकऱ्या त्यांच्याकडे येतील, कारण पदवीबरोबरच उद्योगांना हवी असलेली त्या-त्या क्षेत्रातली अचूक कौशल्यं आणि दुर्मिळ अनुभव त्यांच्याकडे असतील. 

ज्ञान-रचनावादी शिक्षणाच्या दिशेने

आपल्या देशाचे जटिल प्रश्न पारंपरिक पद्धतीने किंवा पाश्चात्त्य देशात लागू पडलेल्या उपायांनी सुटण्यासारखे असते तर आतापर्यंत सुटलेच असते. प्रश्न सुटणं तर सोडाच, ते अधिक उग्र होत आहेत. याचं कारण आमच्या शिक्षणातून अगदी स्वतंत्र विचार करू शकणारे, अंधानुकरण न करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारे, सामाजिक उत्तरदायित्व मानणारे विद्यार्थी आम्ही घडवू शकलो नाही. अपेक्षित एकोत्तरी प्रश्नांना अपेक्षित उत्तरं कशीबशी देणारे आणि अनपेक्षित प्रश्न समोर येताच गोंधळून हतबुद्ध होणारे कोट्यवधी विद्यार्थी ज्ञानप्रधान अवस्थेकडे जाऊ पाहणाऱ्या आपल्या समाजासाठी काहीच करू शकणार नाहीत. उलट, शिक्षणव्यवस्था त्यांचा बोजा समाजावर टाकेल. म्हणून आपल्याला आपल्या विशिष्ट परिस्थितीत कल्पकतेतून आणि अगदी स्वतंत्र विचारातून नवोन्मेष घडवणाऱ्या युवांची पिढीच ज्ञान-रचनावादी शिक्षणातून घडवण्याला पर्याय नाही.डिजिटल साक्षरतेची मोहीम अजून व्यापक करायची आहे. महाराष्ट्रात 90 लाख विद्यार्थ्यांनी MS-CIT अभ्यासक्रम पूर्ण केलाय. पण इतर अनेक राज्यांत- विशेषत: काश्मीर व ईशान्य भारतात- आणि अनेक देशांत MKCL चे उपक्रम घेऊन जायचे आहेत.  

देशाच्या जटिल समस्या आणि शासकीय-खासगी-सामाजिक क्षेत्रांची भागीदारी

आपल्या देशापुढील दशकानुदशके रेंगाळलेल्या अनेक जटिल समस्या सोडवण्यासाठी खरी गरज आहे, ती शासकीय क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र यांच्या भागीदारीची! कारण यांतल्या कुठल्याही एका क्षेत्राला हे आव्हान पेलणं शक्य नाही, हे इतिहासावरून जाणता येईल... शासकीय यंत्रणेत प्रभावी नेतृत्व, लोकाभिमुखता व विश्वसनीयता असेल तर चमत्कार वाटावा इतक्या प्रभावीपणे काम होऊ शकतं. जटिल समस्यांच्या निवारणात शासनाचा पाठिंबा आणि सहभाग हवाच. शासकीय क्षेत्राकडून दूरगामी नियोजनक्षमता, कायदेशीरपणा, पारदर्शकता, अर्थसंकल्पीय तरतूद व राजकीय इच्छासक्ती या आणि अशा बाबी श्रेयस्कर आणि अपेक्षित आहेत. पण शासकीय दप्तर-दिरंगाई, विलंब, एकाधिकार आणि सर्वंकष नियंत्रण व त्यातून बोकाळणारा भ्रष्टाचार व अन्याय्य दमन मात्र नको. 

खासगी क्षेत्रात (विशेषत: लघु आणि मध्यम उद्योजकांमध्ये) उद्यमशीलता आणि प्रयोगशीलता असते. पुढाकार घेण्याकडे कल असतो. ग्राहकांशी संवाद साधण्याचं कौशल्य असतं. संधींचं सोनं करण्याची चपळता असते. कमी वेळेत उद्दिष्टपूर्तीसाठी लागणारी एकाग्रता आणि कार्यक्षमता असते. जोखीम स्वीकारण्याची, धाडस करण्याची जिद्द असते आणि बाजारपेठेतील स्पर्धेला व माफक नफ्यासह आर्थिक आत्मनिर्भतेला पर्याय नसतो याची जाण पक्की असते. सबबी न सांगता आणि येणाऱ्या अडचणींवर कल्पकतेने मात करून ग्राहकाला वेळच्या वेळी उत्पादन किंवा सेवा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असते. गुणवत्तेच्या बाबतीत ग्राहकाभिमुख राहण्याची जबाबदारी असते. जटिल समस्या सोडवण्यासाठी या श्रेयस्कर गुणांची देशाला गरज आहे. पण केवळ खासगी नफ्याचा हव्यास आणि साधनशुचितेचा व सामाजिक बांधिलकीचा अभाव मात्र नको. 

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित, विस्थापित, पीडित, शोषित, गरीब आणि दुर्बल अशा समाजघटकांच्या वास्तविकतेचं सतत भान असतं. त्यांच्या हितासाठी समाजपरिवर्तनाचा आणि सर्वसमावेशक अशा आर्थिक-सामाजिक विकासाचा ध्यास असतो, धोरणात्मक दिशा असते, संघटन असतं व पथदर्शक असं विधायक कार्यही अनेक वेळा असतं. विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध मनस्वी चीड असते. मूल्यनिष्ठा, त्याग, सेवावृत्ती, समर्पित वृत्ती व प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी असते. सामाजिक क्षेत्राच्या या बाबी श्रेयस्कर आहेत. पण जटिल समस्यांच्या सोडवणुकीसाठी खासगी क्षेत्राच्या सहभागाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता आहे. 

या तीनही क्षेत्रांतल्या त्याज्य गोष्टी निग्रहाने बाजूला ठेवून श्रेयस्कर गोष्टींचा मिलाफ घडवून आणायला हवा. MKCL हा त्या दिशेने चालू असलेला एक नम्र पण दृढनिश्चयी प्रयत्न आहे. हे प्रारूप देश-उभारणीच्या इतर क्षेत्रांत उपयुक्त ठरलं तर ते MKCL चं एक महत्त्वाचं योगदान ठरेल... 

Tags: विजय भटकर आयटी महात्मा गांधी नई तालीम शरद पवार एमएस-सीआयटी एमकेसीएल डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक सावंत Vijay Bhatkar IT Mahatma Gandhi Nai Talim Sharad Pawar MS-CIT MKCL Dr. Narendra Dabholkar Vivek Sawant weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विवेक सावंत,  पुणे
md@mkcl.org

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL)


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके