डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘सत्य’धर्माचा पुजारी

आपल्या कामामुळे वली देशभर लोकप्रिय ठरत असला, तरी याच कामामुळे आपल्या समाजातील चुकीचे काम करणारे अनेक लोक दुखावलेही गेले आहेत. ते वलीला ‘आपले काम थांबव’ अशी धमकी देत असतात. वली म्हणतो, ‘‘मला धमकी देणारे अनेक मेसेजेस येतात. मी माझे काम बंद करावे यासाठी ही मंडळी दबाव आणतात. काहींनी तर जीवे मारण्याची धमकीही दिलीये.’’ पण या धमकीने वली अजिबात घाबरला नाही, उलट तो अधिक उत्साहाने कामाला लागलाय. तो अतिशय आत्मविेश्वासाने म्हणतो, ‘‘मैं किसी से डरता नहीं हूँ. दो दिन की जिंदगी है और रोज घरसे ये सोचकर निकलता हूँ की आज दूसरा दिन है!’’

‘आपण शाळेत का जातो बरं?’ असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही काय उत्तर द्याल? अभ्यास करायला. बरोबर? पुढचा प्रश्न जर असा विचारला की, ‘अभ्यास का करायचा? तर तुम्ही उत्तर द्याल की ‘मोठ्ठं होण्यासाठी.’ आणि शेवटचा प्रश्न जर असा विचारला की, ‘मोठ्ठं होऊन काय बनायचंय तुम्हाला?’ तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील- मी डॉक्टर होईन, कुणी म्हणेल- मी इंजिनिअर होईन, कुणी आणखी काही सांगतील.

आपल्यापैकी कुणी असा असेल का, जो म्हणेल की, ‘मला मोठ्ठं होऊन नेता व्हायचंय, मंत्री व्हायचंय, संसदेत जायचंय.’ एकही जण नसेल! बरोबर ना? चुकून कुणी पालकांसमोर ही इच्छा बोलून दाखवली, तर कित्ती रागावतील ते; हो ना? पण आपण जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशात राहतो, हे तर तुम्ही जाणताच. आणि आपल्या या भल्या मोठ्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो. म्हणजे काय तर, प्रौढ नागरिकांनी मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपला देश चालवतात. किती मोठी जबाबदारी असते त्यांच्यावर, किती तरी अधिकारी दिमतीला असतात त्यांच्या. त्यांना मिळणारा सन्मान आणि रुबाब ही वेगळाच असतो. असं  असूनही आपल्यापैकी कुणालाच का बरं व्हावंसं वाटत नसेल राजकारणी? तर अगदी असाच प्रश्न दिल्ली- नोएडातील जेनेसिस ग्लोबल स्कूलचा ‘हेडबॉय’ (विद्यार्थी प्रतिनिधी) असलेल्या बारा-तेरा वर्षांचा वली रहमानीलादेखील असताना पडला होता.

लहानगा वली तीन भावंडांमध्ये सर्वांत मोठा. वलीचे कुटुंब मूळचे कोलकात्याचे. त्याचे वडील शिफउद्दीन हे हातरिक्षा चालवायचे. आई शबाना घरीच असायची. हॉटेलात काम करत वलीच्या वडिलांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. मग अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करत त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. आपल्या वलीने खूप अभ्यास करावा, डॉक्टर वा इंजिनिअर व्हावं- असं त्याच्या आई-वडिलांना वाटायचं. मात्र वलीला व्हायचं होतं लीडर, म्हणजे नेता. सुरुवातीला त्याने आपली इच्छा घरी बोलून दाखवली नाही. तो अभ्यास करत राहिला आणि चांगल्या मार्कांनी बारावी पास झाला.

दरम्यानच्या काळात तो अभ्यासासोबतच अवांतर वाचनही करायचा. पुस्तके, मासिके वाचायचा. वृत्तपत्रदेखील न चुकता वाचायचा. नेता बनण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती असायला हवी, म्हणून तो या सगळ्या गोष्टी मन लावून करायचा. माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटही वापरायचा. लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने फेसबुक अकाउंटही उघडले होते. हे सर्व करत असताना त्याने स्वत:च्या अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. मग त्याने आपल्या नेता बनण्याच्या इच्छेविषयी आई-वडिलांना सांगितले, तेव्हा ते रागवले नाहीत, मात्र त्यांनी हे हसण्यावारीच नेले.

इ.स.2016 मध्ये वलीचे बारावीचे पेपर सुरू असतानाच उत्तर प्रदेश या आपल्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या. निकाल लागले आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. लहान असूनही सामाजिक जाणीव असलेला वली अस्वस्थ झाला. अनेक चांगले पर्याय असूनही वादग्रस्त पोर्शभूमी असलेला नेता देशातील सर्वांत मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री होतो, यामुळे तो बेचैन झाला. मग त्याने आपला मोबाईल घेतला आणि एक व्हिडिओ बनवला. मनातली अस्वस्थता त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शेयर केली. खूप मुद्देसूद बोलला वली. या निवडीमुळे देशाला आणि राज्याला काय अडचणी येतील, याचे त्याने आपल्या परीने विश्लेषणच केले होते. बिचारा रात्री तसाच तळमळत झोपला, पण सकाळी उठून पाहतो तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. अनेकांनी तो शेयर केला होता. लाखो जणांनी त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आणि त्याची तारीफही केली होती.

या प्रसंगाने वलीच्या मनात एक अंकुर फुटला. बारावीची परीक्षा संपली आणि त्याने आई-वडिलांना सांगितले की, तो पदवीसाठी लगेच ॲडमिशन घेणार नाही. ‘‘मला देशासाठी आणि देशबांधवांसाठी काही तरी करायचे आहे, त्याचा विचार करण्यासाठी मला वेळ हवाय.’’ असं तो म्हणाला. घरचे खूप नाराज झाले, मात्र वलीची जिद्द आणि चिकाटी त्यांना माहीत होती. त्यांनी होकार दिला. मग पुढचं पूर्ण वर्षभर तो आपल्या कल्पनांना आकार देऊ लागला. ‘‘समाजसेवा म्हणजे social work हे work नसून duty म्हणजे कर्तव्य आहे, ते मला माझ्या कामाद्वारे पार पाडायचे आहे.’’ असे त्याने घरी सांगून टाकले.  

त्यानंतर फेसबुक, युट्यूब इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयांवर तो बोलू लागला. देशासमोरील प्रश्न, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न यावर आपली मतं मांडू लागला. इतका लहान मुलगा इतक्या मोठ्या प्रश्नांवर मुद्देसूद बोलतो, न घाबरता आपली मतं मांडतो, याचं लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. त्याचे व्हिडिओ लोकप्रिय ठरायला लागले. बघता-बघता वली रहमानीचे लाखो चाहते तयार झाले. सोशल मीडियावर या चाहत्यांना फॉलोअर्स म्हणतात. वलीचे फॉलोअर्स देशभर तयार झाले. त्याचाही आत्मविेशास वाढला. देशसेवेचे, जनसेवेचे कर्तव्य पार पाडण्याचा मार्गही त्याला मिळाला. देशाला आणि लोकांना रोज भेडसावत असणाऱ्या समस्यांवर तो निर्भीडपणे बोलू लागला. पुढील दोनच वर्षांनी वली रहमानी देशातील सर्वांत कमी वयाचा सोशल मीडिया इंफ्लुएन्सर (सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजावर प्रभाव टाकू शकणारी व्यक्ती) बनला.

आपल्या देशामध्ये अनेक समस्या आहेत. त्यांपैकी काही सामाजिक स्वरूपाच्या आहेत, तर काही आर्थिक. या सर्वांवर हा लहानगा अतिशय अभ्यासू पद्धतीने व्यक्त होतो- भले मग तो विषय नोटबंदीचा असो की झुंडबळींचा. राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्वच विषयांवर तो व्यक्त होतो. त्यासाठी प्रचंड संशोधन आणि अभ्यास करतो. आपल्या देशातील महिला अनेक सामाजिक समस्यांना तोंड देत असतात. त्यांपैकी एक समस्या म्हणजे मुस्लिम समाजातील तीन तलाकचा प्रश्न. या तीन तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयीची अतिशय संतुलित भूमिका त्याने मांडली. देशातील मोठे विचारवंत कोड्यात पडलेले असताना 20 वर्षांच्या वलीने ‘सर्वांनी या निर्णयाचे  स्वागत करायला हवे’ अशी भूमिका घेतली. वयाच्या मानाने त्याच्यातील असामान्य परिपक्वताच यातून दिसते, नाही का?

अनेक वेळा काय होतं- लहान वा तरुण मुले एखादी महत्त्वाची गोष्ट सांगत असली तर मोठी मंडळी त्यांना गप्पच बसवतात; वर म्हणतात, तू लहान आहेस, या मोठ्यांच्या गोष्टीतले तुला काय कळणार आहे? आपल्या देशातील पालकांची ही भूमिका वलीला पसंत नाही. तो म्हणतो, ‘‘क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना इंग्रजांनी पहिल्यांदा अटक केली, तेव्हा ते फक्त 14 वर्षांचे होते. भगतसिंग यांना 23 व्या वर्षी फाशी दिले गेले. मौलाना आझादांना वयाची 18 वर्षेही पूर्ण झाली नव्हती, तेव्हा त्यांना आपल्या विद्वत्तेसाठी अबुल कलाम म्हणजे विद्यावाचस्पती अशी पदवी जनतेने दिली होती. हे सगळे महापुरुष माझे आदर्श आहेत. मला यांचेच अनुकरण करायचे आहे.’’

वली रहमानी ज्या विषयांवर बोलतो, त्यांपैकी बहुतेक विषय मोठ्यांचे म्हणजे राजकीय असतात. असे असले तरी वलीच्या मतांवर आणि त्याने मांडलेल्या मुद्यांवर देशभर चर्चा घडून येते. त्याचे जसे अनेक चाहते आहेत, तसे विरोधकही आहेतच. तो एकाच राजकीय पक्षाच्या विरोधात बोलतो, असा आरोपही काही जण करतात. याविषयी वली अतिशय स्पष्टपणे सांगतो, ‘‘मी कुठल्याच राजकीय पक्षाचा विरोधक किंवा समर्थक नाही. मी सत्याचा पुजारी आहे आणि हे सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा मी माझा धर्म समजतो.’

2017 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षापासून व्हिडिओजच्या माध्यमातून देशातील विविध विषयांवर मुद्देसूद भाष्य करणारा वली आता वीस वर्षांचा आहे. मागील दोन वर्षांत त्याच्या ‘Wali Rehmani’ या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओजची संख्या 60 च्या पलीकडे गेली आहे. त्यात तो कधी अस्खलित इंग्रजी बोलतो, तर कधी हिंदी अणि उर्दूमध्ये. ‘आतिशी प्रश्नांना घाबरते का?’ या व्हिडिओमध्ये, आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मर्लिना यांची वलीने घेतलेली मुलाखत आहे. त्यात त्याने विचारलेले प्रश्न मोठ्या पत्रकारांनाही धडे देणारे आहेत.

फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया साईट्‌सवर आता वलीचे लाखो फॉलोअर्स तयार झाले आहेत. वयाने लहान असला तरी त्याची बुद्धी आणि तळमळ पाहून अनेक टीव्ही चॅनेल्सच्या चर्चांमध्ये त्याला तज्ज्ञ म्हणून बोलावले जाते. समोर वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या मंडळींनाही तो आपल्या मुद्देसूद मांडणीने नामोहरम करतो. अनेक सार्वजनिक कार्यक्रम, शाळा- महाविद्यालये, विद्यापीठे इत्यादींमधून त्याला प्रमुख वक्ता म्हणून बोलावले जाते आणि तोही अतिशय आत्मविेशासाने या सभा गाजवून येतो. दि.2 ऑक्टोबर 2018 रोजी म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी मध्य प्रदेशातील 70 हजार आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या सभेला उद्देशून त्याने केलेले भाषण युट्यूबवर प्रचंड गाजले होते.  

वली हे सगळं का करतोय, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याने यालाही उत्तर दिलंय, ते असं, ‘‘फ्रान्सचा महान योद्धा नेपोलियनचे एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, ज्यात तो म्हणतो की- जगात खूप समस्या आहेत, लोक दु:खी आहेत. पण चुकीचं काम करणारे लोक यासाठी जबाबदार नाहीत, तर शांत बसणारी आणि काहीच न करणारी चांगल्या विचारांची माणसं यासाठी दोषी आहेत.’’ वलीला असं शांत बसायचं नव्हतं, त्यासाठी त्याने हा उपद्‌व्याप सुरू केला.

आपल्या या अवाढव्य देशाची लोकसंख्या आता जवळपास 130 कोटी आहे. त्यामानाने आपल्याला उपलब्ध असणाऱ्या सोई-सुविधा अतिशय कमी आहेत. यामुळे आपल्या देशात एकीकडे खूप श्रीमंत लोक दिसतात, तर दुसरीकडे उपाशीपोटी झोपणारे गरीब दिसतात. आपल्या देशातील खूप मोठ्या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या अन्यायाविषयी वलीच्या मनात प्रचंड चीड आहे. आपल्या देशातील गरीब आणि श्रीमंत हा भेद संपून जावा, लोकांनी एक- दुसऱ्यांशी प्रेमाने वागावे, यासाठी तो पोटतिडकीने काम करतो आहे.

प्रत्येक देशाची राज्यघटना असते, कायदा असतो, नियम असतात; त्यानुसार देशाचा कारभार चालतो. आपला देशही अशाच राज्यघटनेवर चालतो. ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हे मानवाने निर्माण केलेले जगातील सर्वांत सुंदर पुस्तक आहे,’’ असे वलीला वाटते. या पुस्तकाने प्रत्येक भारतीय नागरिकाला काही अधिकार दिले आहेत, तर काही कर्तव्ये सांगितली आहेत. त्यामुळे आपल्या राज्यघटनेला हवा असणारा भारत घडविण्यामध्ये वली खारीचा वाटा उचलतो आहे. आपल्या कामामुळे वली देशभर लोकप्रिय ठरत असला तरी, याच कामामुळे आपल्या समाजातील चुकीचे काम करणारे अनेक लोक दुखावलेही गेले आहेत. ‘तू आपले काम थांबव’ अशी धमकी ते देत असतात.

त्यासंदर्भात वली म्हणतो, ‘‘मला धमकी देणारे अनेक मेसेजेस येतात. मी माझे काम बंद करावे यासाठी ही मंडळी दबाव आणतात. काहींनी तर जीवे मारण्याची धमकीही दिलीये.’’ पण या धमकीने वली अजिबात घाबरला नाही, उलट तो अधिक उत्साहाने कामाला लागलाय. तो अतिशय आत्मविेश्वासाने म्हणतो, ‘‘मैं किसी से डरता नहीं हूँ. दो दिन की जिंदगी है और रोज घरसे ये सोचकर निकलता हूँ की आज दूसरा दिन है!’’

एकीकडे वली व्हिडिओच्या माध्यमातून देशातील विविध प्रश्नांवर बोलू लागला, तर दुसरीकडे आपल्या वयाच्या आणि विचारांच्या मुलांचा शोधही घेऊ लागला. पण वर्षभर शोधूनही त्याला एकही मुलगा किंवा मुलगी सापडली नाही. आपल्या या शोधमोहिमेविषयी वली म्हणतो, ‘‘माझ्या वयाचे कुणीच मुले-मुली राजकारण, सामाजिक समस्या या विषयावर खुलेपणाने किंवा छुप्याने का होईना, बोलताना फारसे दिसत नाहीत. वर्षभर शोध घेऊनही मला एक जणही मिळाला नाही. तेव्हा मी ठरवले, आपण अशी दहा तरी मुलं तयार करू यात, जी आपल्यासारखं काम करू शकतील.’’

वलीला 2040 मध्ये आपल्या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे. त्यासाठी भविष्यात देशाचे सामाजिक आणि राजकीय नेतृत्व करू शकतील, असे सहकारी त्याला तयार करायचे आहेत. मात्र मोठी मुलं निवडायची तर ती आपल्या सामाजिक संस्कारांमुळे राजकारण आणि समाजकारण यांकडे चुकीच्या दृष्टीने पाहू लागतात. म्हणून वलीने लहान बालकांचा शोध घेतला. कारण नेतृत्व तयार करण्यासाठी मुलांच्या नेतृत्वगुणांचा विकास करणे आवश्यक असते. नेते आईच्या पोटातून तयार होत नाहीत, ते घडवावे लागतात. वलीला असे नेतृत्व घडवायचे आहे.

वली म्हणतो, ‘‘मात्र माझ्या या प्रोजेक्टसाठी कोणते आई-वडील आपली लहान मुले मला देणार होती? कोणीच नाही. पुढे, प्रेषित मुहम्मद यांचे अनाथ मुलांविषयीचे वचन एके दिवशी माझ्या वाचनात आले आणि मला मार्ग सापडला. मी ठरवले की, आपण अनाथालय सुरू करायचे. 20 वर्षांचा होईपर्यंत 10 मुलांचा बाप व्हायचे.’’  

अनाथालय सुरू करण्याची कल्पना वलीने जवळच्या मंडळींना बोलून दाखवली, तेव्हा अनेकांनी त्याला वेड्यात काढलं. मग या कल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी त्याने सोशल मीडियातील आपल्या लोकप्रियतेचा उपयोग करायचे ठरवले. त्याने लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये जमा केले आणि आपल्या मूळ गावी म्हणजे कोलकात्यात ‘उम्मीद’ या संस्थेची 2018 मध्ये स्थापना केली. आता वली 23 मुलांचा ‘अब्बाजी’ (बाप) झाला आहे. ‘उम्मीद’ अनाथालय असले तरी येथे केवळ प्राथमिक गरजाच भागविल्या जातात असे नव्हे. लहान मुलांमध्ये नेतृत्व घडविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये शिक्षणासोबतच येथे शिकवली जातात. आणि हे सर्व केलं जातं अगदी मोफत. जनतेतून मदत मिळावी यासाठी वलीने ऑनलाईन चळवळही उभी केली आहे. त्याच्या आवाहनाला आता लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळू लागलाय.

वयाची अवघी विशी पूर्ण केलेला वली रेहमानी अशा पद्धतीने अनेक आघाड्यांवर यशस्वी नेतृत्व करतोय. स्वतःला सेलिब्रिटी म्हणवून घेणे त्याला आवडत नाही. तो म्हणतो, ‘‘मी सेलिब्रिटी मुळीच नाही, कारण सेलिब्रिटींचे फॅन्स असतात. मी लीडर आहे आणि माझे चाहते हे माझे फॉलोअर्स.’’ वली या अरबी शब्दाचा अर्थ होतो मदत करणारा आणि रहमानी म्हणजे देवमाणूस. इंटरनेटचा सदुपयोग करत वली आपल्या देशात शांतता नांदावी, लोकांमध्ये बंधुभाव वाढावा यासाठी व्हिडिओजच्या माध्यमातून जनजागृती करतोय. आडबाजूला पडलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. दुसरीकडे ‘उम्मीद’ या संस्थेच्या माध्यमातून भविष्याचे नेते तयार करण्याचा ‘कारखाना’ (हा त्याचाच शब्द) उभा करून तो अनाथांसाठी देवमाणूसही ठरतोय.

Tags: समीर शेख Sameer Shaikh वली रहमानी Wali Rehmani weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर शेख
sameershaikh7989@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके