वारे गुरुजींनी गरदरेवाडीचं मॉडेल उभे केलंय. गरदरेवाडी शाळेचा 22 मार्च 2026 रोजी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्धघाटन सोहळा पार पडला. त्याच वेळी 250 शाळांच्या 'शिक्षण परिवर्तन यात्रे'ची सुरुवात झाली आहे. ही महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाच्या परिवर्तनाची नांदी ठरावी आणि हाती घेतलेले कार्य तडीस जावे. वारे गुरुजी म्हणजे प्रचंड ऊर्जा असलेला झंझावात आहे. वेगळी दृष्टी घेऊन येणारे एखादेच वारे गुरुजी असतात. अशा माणसांची समाजाला मार्ग दाखवण्यासाठी गरज असते. वेगवेगळ्या काळांच्या गरजेनुसार कोणी ना कोणी समाजासाठी पुढाकार घेणारे तयार होत असतात. वारे गुरुजींच्या रूपाने असं नेतृत्व उभं राहत आहे.
वारे गुरुजी हे नाव माहीत नाही असा महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रातला माणूस भेटणं अवघड आहे. त्यांचं नाव घेतलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीची शाळा. जिल्हा परिषदेची वाबळेवाडीची शाळा ही नावीन्यपूर्ण इमारतीच्या मॉडेलमुळे प्रसिद्धीस आली. प्रत्येक वर्गखोली स्वतंत्र वर्गखोलीला काचेच्या भिंती, पॉलिकार्बोनेट व टेन्साइल मेंबरचा वापर केलेलं एकावर एक असं दुहेरी छत. मोकळी स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश. या वर्गखोलीला पंख्याची आणि वेगळ्या प्रकाशव्यवस्थेची गरजच नाही. वर्गखोलीच्या खाली रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी चार लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, वर्गांच्या सभोवताली बाग, फुलझाडे, मोठी झाडे. दाट जंगलं वाटावं अशी गर्द झाडी. शाळेला कुंपणही काचेचं. वर्गखोल्यांच्या मधोमध कृत्रिम हिरवळीचं मैदान. सौर ऊर्जेतून विजेच्या सर्व गरजा पूर्ण करणारी यंत्रणा - झिरो एनर्जी स्कूल.
या शाळेत 2012 ते 22 या काळात काय किमया केली होती वारे गुरुजींनी! सात वर्ग, दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिकवण्यासाठी शासनाने नेमलेले फक्त दोन शिक्षक. अशा परिस्थितीमध्ये गुरुजींनी पहिली ते चौथीच्या मुलांसाठी एक अभ्यासक्रम बनवला. पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम बनवला. मुले गटवार बसून शिक्षण घेऊ लागली. त्या अभ्यासक्रमाची अशी साखळी बनवली होती की, पहिली ते चौथीची मुलं एकत्र बसून अभ्यास करत होती. शिकत होती. ज्याला ज्या वर्गाचं अपेक्षित आहे ते शिकणं सुरू होतं.
'विषयमित्र' यासारख्या संकल्पनेत अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक जे शिकवू शकत नाहीत, ते त्याचा मित्र शिकवू शकतो. विद्यार्थ्यांच्याकडून विविध प्रकल्प करून घेतले जाऊ लागले. प्रकल्पामध्ये प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्याला काही ना काही काम होतं. या कामातूनच वेगवेगळे विषय मुलं शिकत होती. शाळा मराठी माध्यमाची असली तरी, विद्यार्थ्यांचं इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांनी विविध सत्रांचं नियोजन केलं. रोज दोन तास असे दोन महिन्याची सत्रं, रोज तीन तास अशी तीन महिन्यांची सत्रं, दिवसभर सहभागी होण्याची दहा दिवसांची सत्रं. हा अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थी चांगलं इंग्रजी बोलतील हा विचार केला आहे. बोलण्यासाठी आवश्यक व्याकरणाचा विचार केलेला आहे. पाठांतर आणि घोकंपट्टीला फाटा देऊन प्रत्यक्ष संवाद आणि प्रात्यक्षिकावर भर दिलेला आहे.
दत्तात्रय वारे गुरुजींना विज्ञान हा सर्व विषयांचा गाभा वाटतो. प्रत्येक घटनेचा प्रसंगाचा मूलभूत सिद्धान्त शोधणे व चिकित्सक वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे, हे विज्ञानाचे अंतिम सत्य परिमाण आहे. विज्ञान विषयाचे अध्यापन हे केवळ पुस्तकातून अथवा डिजिटल माध्यमातून करणे फार चुकीचे आहे. निसर्ग हा सगळ्यात मोठा विज्ञानशिक्षक आहे. त्यामध्ये मुक्तपणे संचार करत विज्ञान शिकता येऊ शकते. शालेय वेळापत्रकात हे सगळं बसवणं अवघड आहे. त्यातूनच 'आविष्कार प्रयोगशाळा' या संकल्पनेचा जन्म झाला. विज्ञानाच्या पुस्तकातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणारी मॉडेल्स प्रयोगशाळेमध्ये निर्माण केली. आठवीपर्यंतचे विज्ञान शिकता शिकता अभियांत्रिकीच्या सर्व विभागांतील मूलभूत ज्ञान विद्यार्थ्याला मिळेल इथपर्यंत हा विस्तार केला. विज्ञानाला जोडून तंत्रज्ञानाची विविध मॉडेल्स प्रयोगशाळेमध्ये वापरली जाऊ लागली. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, कम्प्यूटर, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी, अॅग्रीकल्चर यांसारख्या अनेक विषयांवर मुले काम करू लागली. वारे गुरुजींनी यासाठी त्यांच्या मदतीला घेतले इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले तरुण. या तरुणांच्या फळीने शाळेचे नाव रोशन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'आविष्कार प्रयोगशाळे'चा विस्तार होऊन तीन भागांमध्ये प्रयोगशाळा विभागली. रेडीमेड मॉडेल्स, वर्कशॉपमध्ये बनवलेली विविध प्रकारची मॉडेल्स आणि पुढचा टप्पा इनोवेशनचा. वारे गुरुजी म्हणतात, 'केवळ पुस्तके वाचल्याने किंवा डिजिटल व्हिडिओ पाहिल्याने इनोव्हेशन होत नसते. त्यासाठी पूर्वीच्या धारणेवर प्रत्यक्ष कृती होणे, कृतीतल्या चुका समजून घेणे, त्यावर केलेला विचार, सुचलेले उपाय या सगळ्या गोष्टी इनोव्हेशनसाठी आवश्यक असतात. एखाद्या देशाची प्रगती ही देशातल्या लोकांना ज्या नवीन कल्पना सुचतात, त्यावर अवलंबून असते.
वाबळेवाडीच्या शाळेतील मुलांच्या इनोव्हेशनचं एक उदाहरण पाहू या. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या लोकांनी शाळेला भेट दिली त्या वेळी हॅरिसन कंपनीच्या सात स्कूल बॅग मुलांसाठी भेट दिल्या. कोणी मुलगा/मुलगी कल्पकतेने सार्वजनिक हिताच्या आणि इतरांना प्रेरणा देतील अशा काही नावीन्यपूर्ण गोष्टी करेल, त्या मुलाला/मुलीला बॅग द्यायची असं चर्चा करून ठरलं. मुलांच्यात चढाओढ लागली. आर्यन वाबळे या विद्यार्थ्यांनं शाळेमध्ये उपलब्ध असलेलं रोबोटिक्स किट वापरून रोबोट तयार केला. बंद पडलेल्या ड्रोनचा कॅमेरा रोबोटला जोडला. कॅमेरा आणि रोबोट मोबाइलला जोडला. त्यामुळे कितीही दूरवरून रोबोटला आणि कॅमेऱ्याला तो चालवू शकत होता. कच्च्या रस्त्यावरून, पायऱ्यावरून कुठूनही चालू शकणारा रोबोट आणि 360° मध्ये फिरू शकणारा कॅमेरा या क्षमतेमुळे आर्यन कुठेही बसून, कोणत्याही ठिकाणची पाहणी करू शकत होता. त्याच्या उपयोगाविषयी आर्यनने गुरुजींना सांगितलं, 'ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये अतिरेकी कुठे बसले आहेत याचा अंदाज न आल्याने शोधकार्यातील आपल्या लोकांची जीवित हानी झाली. भविष्यात अशा यंत्रामुळे आपण हानी टाळू शकतो'.
असं बरंच काही वारे गुरुजींच्या प्रयोगशाळेत घडत राहतं. इतर शाळांमध्येही असं घडणं अपेक्षित आहे; परंतु परिस्थिती विपरीत आहे. शासनाकडून काही शाळांना 'अटल प्रयोगशाळे'साठी खूप उपयुक्त साहित्य दिलंय. त्याचबरोबर इतरही योजनांमधून काही शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या साहित्याला शिक्षक आणि मुलं क्वचितच हात लावतात. हे साहित्य कसं वापरायचा आहे याचं फारसं ज्ञान शिक्षकांना नाही. साहित्याची माहिती नाही, प्रशिक्षण मिळालं नाही अशी कारणे शिक्षक सांगतात. शासनाने खूप साहित्य द्यायचं आणि ते धूळ खात पडायचं ही नित्याचीच बाब आहे.
बहुतेक वेळा विज्ञान प्रदर्शनामध्ये शिक्षकच मॉडेल (उपकरण) तयार करतात आणि विद्यार्थ्यांचे मॉडेल म्हणून प्रदर्शनात ठेवतात. मॉडेलची माहिती सांगताना विद्यार्थ्यांच्याकडून पाठ करून घेतलेलं विद्यार्थी भडाभडा बोलतात. तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरती क्रमांक मिळवलेली उपकरणे पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनात कॉपी-पेस्ट करून कुठे कुठे दिसतात. अशा प्रकारामुळे कल्पकता, नावीन्याला प्रेरणा कशी मिळणार? काही मुलं धडपड करत असतीलही. काही लोक कष्टपूर्वक मॉडेल तयार करून स्पर्धेत यशस्वी होतात. नाही असं नाही. स्पर्धेत क्रमांक मिळाल्यानंतर शिक्षक आणि शाळेला मानसन्मान मिळतो. 'इन्स्पायर अॅवॉर्ड' प्रदर्शनातही थोड्याफार प्रमाणामध्ये हीच स्थिती आहे. काही वेळा बाजारात विकत मिळणारी मॉडेल्स विद्यार्थ्यांच्या नावावरती प्रदर्शनात मांडली जातात. (गलगोटिया विद्यापीठाने चिनी बनावटीचा कुत्र्याचा रोबोट ठेवल्याच्या बातम्या नुकत्याच आल्या, अगदी तसं.) अशा प्रकारामुळे योजनेच्या मूळ हेतूलाच तडा जातो. याउलट, वारे गुरुजी पुढील पंधरा-वीस वर्षांमध्ये जगाच्या काय गरजा असतील, याचा विचार करून शाळतील प्रत्येक गोष्ट करतात.
शाळेची गुणवत्ता मोजण्याचा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा हा निकष रूढ झाला आहे. 'आपण यामध्येही कमी नाही' हा संदेश जावा म्हणून ते स्पर्धा परीक्षेला मुलांना बसवतात. खास एवढेच काम करणारे काही शिक्षक आणि शाळा असतात. निवडक मुलांना परीक्षेला बसवतात. त्यांतली निवडक मुले गुणवत्ता यादी येतात. वारे गुरुजी मात्र शंभर टक्के मुलांना परीक्षेला बसवतात आणि शंभर टक्के मुलं पास होतात. गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांचे प्रमाणही मोठं आहे.
हे सगळं करत असताना त्यांनी पालकांना, ग्रामस्थांना सोबत घेतलं. त्यांचा गुरुजींवरती गाढ विश्वास होता, म्हणून तर यात्रेत तमाशासाठी रक्कम खर्च न करता टॅबलेट आणले. 2012 या वर्षी वाबळेवाडीची शाळा महाराष्ट्रातील पहिली टॅबलेट स्कूल झाली. त्याच वर्षी तिला आयएसओ मानांकन मिळालं. 2014 मध्ये गुणवत्ता मूल्यांकन कार्यक्रमांमध्ये वाबळेवाडी पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होती.
वारे गुरुजींचं काम थक्क व्हावं असं आहे. त्यांच्या कामाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. इतकं असूनही त्यांची कथा एकदम वळण घेते. चकवा वाटावं असं वळण. वारे गुरुजींचं निलंबन तक्रारी, चौकशी, निलंबन - अशा आत्मसन्मान दुखावणाऱ्या कितीतरी गोष्टी घडल्या. वातावरण गढूळ झालं. 'गडबड कराल, तर तुमचा वारे गुरुजी करू'. अशी धमकी शिक्षकांना ऐकू येऊ लागली. वारे गुरुजींनाही या गोष्टीचा वैताग आला होता. त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा मंजूर होण्याची वेळ आली नाही, ही गोष्ट वेगळी. नंतर जालिंदरनगर शाळेत (2022 मध्ये) झालेली बदली ही त्यांना एक प्रकारची शिक्षा होती. शाळेचा पट फक्त तीन.
या सगळ्या घटना त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल करणाऱ्या ठरल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यातही अपमानाला तोंड द्यावं लागलं होतं. त्यांनी आयुष्यभर पायांत वहाणा घातल्या नाहीत. वारे गुरुजींनीही तशीच पायांत वहाणा न घालण्याची शपथ घेतली होती.
वेळ बदलली. एके दिवशी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे स्वतः त्यांच्या शाळेत आले. त्यांचं काम पाहिलं. त्यांना पोशाख आणि वहाणा दिल्या. हे घडलं याचं कारण वारे गुरुजी हिंमत हरले नव्हते. त्यांनी निराशा झटकली होती. हेतू स्पष्ट असला की, निराशेला थारा नाही. ते झपाटून कामाला लागले. 'T-4 Education' या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जालिंदरनगरच्या शाळेनं जगामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे निकष, मतदानाची पद्धत यांबाबत मतभेद होऊ शकतात. तरीही वाबळेवाडीचं उभं केलेलं काम हा काही अपघात नव्हता, हे वारे गुरुजींनी सिद्ध करून दाखवलंय.
कृष्णात पाटोळे, दशरथ माळी, शितल रुगे या शिक्षकमित्रांच्या सोबत मी 11 फेब्रुवारी 2026 रोजी जालिंदरनगर आणि वाबळेवाडीच्या शाळेला भेट दिली. या शाळेत शिकून NIOS (National Institute of open schooling) मार्फत परीक्षा देणाऱ्या राजेश्वरीनं आम्हाला शाळा दाखवली. कसलेल्या गाइडप्रमाणे ती शाळेची माहिती देत होती. महाराष्ट्रातील विविध शाळांना भेटी देत असताना मुलांना संधी दिली, तर ते संधीचं सोनं करतात हे अनुभवाला आलं होतं. राजेश्वरीच्या रूपाने पुन्हा एकदा ते दिसलं.
मृतप्राय झालेल्या जालिंदरनगरच्या शाळेला हिरवाई आणि शैक्षणिक वातावरणाने जिवंत केलं आहे. रेडिओ स्टेशन, संगीत शिक्षण, ब्रेन जिम, गेम झोन, टेक्नॉलॉजी स्किल सेंटर, कला कार्यानुभव खोली, सुसज्ज ग्रंथालय अशा नावीन्यपूर्ण गोष्टी पाहून भेट देणारे भारावून जातात. जालिंदरनगरच्या शाळेमध्ये बावीस प्रकारचे स्किल शिकवले जातात.
वारे गुरुजी म्हणतात, 'विद्यार्थ्यांनी असं म्हणू नये की, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे मी असा झालो, नाहीतरी कोणीतरी मोठा झाला असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे मी मोठा झालो, असं त्यांनी म्हणायला पाहिजे. विद्यार्थ्यांना उपयोजनावर आधारित प्रश्न विचारायला पाहिजेत. शाळेत कल्चर पाहिजे. शिक्षकांबद्दल मुलांना आदर वाटला पाहिजे. एक वेळ शिकवता नाही आलं तरी चालेल; मात्र शिक्षकांच्या शब्दाने विद्यार्थ्याचं आत्मबळ जागृत झालं पाहिजे.' त्यांच्या या म्हणण्याला जालिंदरनगरमधील शैक्षणिक वातावरण पुष्टी देतं.
स्वतः शिकणे, मित्रांच्या मदतीने शिकणे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिकणे आणि उरलंच तर शिक्षकांच्या मदतीने शिकणे हा वारे गुरुजींच्या शिकण्या शिकवण्याच्या पद्धतीचा आत्मा आहे. जबाबदारी दिली की जबाबदारी घेतली जाते हे 'विषयमित्रा'कडून शिकण्याच्या पद्धतीमध्ये दिसून येतं. शिकवणाऱ्या मित्राला आत्मसन्मान वाटतो आणि शिकणाऱ्याला सहज शिकण्याचा आनंद मिळतो. बंधुभाव वाढतो, स्पर्धा करायची नाही, एकमेकांच्या मदतीने शिकायचं आहे हा विचार रुजतो.
ज्या वेळी वाबळेवाडीचा पट बत्तीसवरून साडेसातशे होतो त्या वेळी इतर कुठल्यातरी शाळेची मुलं कमी होऊन ती वाबळेवाडीत आलेली असतात. बऱ्याच खाजगी शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्याची किंवा बंद पडल्याची उदाहरणे आपण बघतो. इथं उलट स्थिती झाली होती. वाबळेवाडीच्या शाळेमुळे साडेतीनशे पट असलेली एक खाजगी शाळा बंद पडली होती. अलीकडे शासन स्वयंअर्थसाहाय्य खाजगी शाळांना एकदमच पहिली ते आठवी, पहिली ते दहावी, पहिली ते बारावी अशी मान्यता देतं. काही शाळांत एकदम चारशे-पाचशे विद्यार्थी प्रवेश घेतात. आसपासच्या जिल्हा परिषद शाळांच्या वरती त्याचा विध्वंसक परिणाम होतो. शिक्षण ही सेवा न राहता धंदा झाल्यामुळे अशा गोष्टी घडू लागल्या आहेत. अशा शाळांना मान्यता दिल्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा पट कमी झाला म्हणून कधी कोणी उठाव केला नाही की, अशा खाजगी शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
बंद पडलेली खाजगी शाळा सामान्य कार्यकर्त्याची नव्हती, तर ती बड्या लोकप्रतिनिधीची होती, असे वारे गुरुजी म्हणतात. ती शाळा बंद पडली हे वारे गुरुजींच्या विरोधात तक्रारी होण्याचं मुख्य कारण. जे कुठेच कागदावरती येऊ दिलं नव्हतं. आलेल्या परिस्थितीशी वारे गुरुजींनी दोन हात केले. शाळेसाठी देणगी घेतली जाते, त्या देणगीच्या पैशांतून शेतजमीन घेतली आहे, असे त्यांच्यावर आरोप झाले. मुलांनी शिकू नये, इतर शाळेत त्यांना प्रवेश मिळू नये, यासाठी अडथळे आणले गेले. वारे गुरुजींच्या मागे चौकशी लागली. आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू झाला. अधिकाऱ्यांवरही याचा दबाव होता. गुरुजींची बदली झाली की, इतर शिक्षकांना कमकुवत करणं अवघड नव्हतं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुजींना समोर बसवून बदली करून घेण्याविषयी सुचवलं. वारे गुरुजी म्हणतील तिथं त्यांची बदली होऊ शकत होती. अशी बदली इतर शिक्षकांचं मनोबल खचण्यासाठी पूरक ठरली असती. साहेब म्हणत होते, 'तुमचं बरोबर असलं तरी आमच्यावर दबाव आहे. वारे गुरुजी त्यांना म्हणाले, "साहेब, तुम्ही सर्वांत वरिष्ठ. तुमचा अधिकार मोठा. मी एक सामान्य शिक्षक. तुमच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांनी असं दबाव घेऊन काम केलं तर माझ्यासारख्यांनी काय करावं?" चौकशी झाली. अहवाल आला. निलंबनासाठी अहवाल पुरेसा होता. निलंबन केलं, की बदलीसाठी गुरुजींच्या अर्जाची आवश्यकता नव्हती. शाळाच नव्हे, तर तालुक्याच्या बाहेर बदली करता येणार होती. आणि झालंही तसंच.
गुरुजींच्यावर तीन आरोप ठेवण्यात आले होते. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, कामात कसूर. गुरुजी म्हणतात, 'मी रात्रंदिवस काम केलं. गावाच्या, समाजाच्या सहभागानं शाळा उभी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा केली. याला हलगर्जीपणा म्हणत असतील, तर असा हलगर्जीपणा मी वारंवार करेन'. पूर्ण चौकशीअंती या सर्व दोषारोपांतून वारे गुरुजींना मुक्त करण्यात आलं. हा त्यांच्या तळमळीनं केलेल्या कामाचा विजय होता. बदलून गेल्यानंतर त्यांना मिळाली होती तीन विद्यार्थ्यांची शाळा, जालिंदरनगर. करून दाखवणं हाच पर्याय होता. 'पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा', असे म्हणणारे विद्यार्थी घडायचे असतील, तर प्रथम शिक्षकांच्या पाठीचा कणा ताठ असायला हवा. वारे गुरुजींच्या पाठीचा कणा ताठही होता आणि कणखरही होता.
वारे गुरुजी समाज-सहभाग मिळवतात, मोठमोठ्या संस्थांकडून, कंपन्यांकडून सीएसआर मिळवतात, भव्य इमारत आणि वेगळ्या वर्गखोल्या बांधणं प्रत्येकाला शक्य नाही. ते फक्त वारे गुरुजींनीच करावं. ते त्यांनाच शक्य आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेला हे शक्य होणार नाही, अशी चर्चा सुरू असते. त्यामुळेच की काय, त्यांच्यासारखं काम इतर शाळांनी करावं म्हणून कोणी अधिकारी आग्रह धरताना दिसत नाहीत.
काही शिक्षक असे असतात की, त्यांना वाटतं, वारे गुरुजींनी काही फार वेगळं केलेलं नाही. हे तर आम्हीही आमच्या शाळेत करतो. त्यात थोडसं तथ्यही आहे. निवर्गपद्धत, विषयमित्र, विद्यार्थी संसद, लोकसहभाग, परसबाग, वृक्षारोपण या गोष्टी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या नावांनी किंवा वेगवेगळ्या स्वरूपांत बघायला मिळतात. काही शिक्षक यासाठी जीवतोड मेहनत घेतात. अशा शिक्षकांची महाराष्ट्रामध्ये कमतरता नाही. खेड्यापाड्यांतल्या वाडीवस्तीवरच्या द्विशिक्षकी शाळांमध्ये तर निवर्ग पद्धत राबवावीच लागते. इयत्ता एक ते चारचे वर्ग, त्या वर्गांचे सर्व विषय, प्रत्येक वर्ग स्वतंत्र करून विषयावर शिकवणं शक्य नसतं. गटात बसून एकमेकांच्या सहकार्याने शिकणं, गटप्रमुखांच्या मदतीने शिकणं, मित्रांच्याकडून शिकणं या गोष्टी खटाव तालुक्यामध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना 2001-02 मध्ये 'धडपड मंच'च्या माध्यमातून आम्ही सुरू केल्या होत्या. त्यापूर्वीही काही शाळांमध्ये शिक्षक असं काम करत होते.
('शाळाभेट' या माझ्या पुस्तकात असे उपक्रम आणि कृती महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये सुरू असल्याच्या नोंदी आहेत.) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्षानुवर्षे लोकसहभाग घेतच आहेत. 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम' सुरू असताना कोट्यवधींचा लोकसहभाग शिक्षकांनी जमा केला होता. खाजगी शाळांशी स्पर्धा करत भौतिक सुविधा चांगल्या होण्यासाठी शिक्षकांना शिकवण्याबरोबर पैसे गोळा करण्याचेही काम करावे लागते. अधिक रक्कम गोळा करणाऱ्यांचे कौतुकही केले जाते. यातून स्पर्धा निर्माण होते. आपोआपच गुणवत्ता वाढवण्यावरचे लक्ष रक्कम गोळा करण्यावर केंद्रित होते. त्यामुळे समाज-सहभाग म्हणजे काय, याची स्पष्टता यायला हवी. पण ग्रामस्थ आणि शाळा यांचं नातं घट्ट असावं, त्यांना शाळा आपली आहे असं वाटावं, हे मात्र नक्की.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील कित्येक शिक्षक कल्पकतेने विविध प्रकल्प आणि उपक्रम राबवत असतात. त्यांच्याइतकी कल्पकता अभावानेच खाजगी शाळांमध्ये बघायला मिळते. अशा शिक्षकांचं काम, त्यांची कल्पकता क्वचितच उजेडात येते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना हे नवीन नाही. फरक इतकाच आहे की, या सर्व शाळांमध्ये या सर्वच कृती, उपक्रम किंवा मुलांची शिकण्याची पद्धत दिसत नाहीत. ते विखुरलेलं आहे. त्यामध्ये सातत्य नाही किंवा लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. कल्पकतेचा एकत्रित विचार करून त्याचं सार्वत्रिकीकरण करण्यामध्ये व्यवस्था अपयशी झालेली आहे. आणि नेमकं हेच साध्य करण्यामध्ये वारे गुरुजी यशस्वी ठरले आहेत.
वारे गुरुजी मुलांना प्रकल्पातून शिकण्यासाठी संधी देतात. ते म्हणतात, 'कृतीतून शिकणे व शिकल्यानंतर ज्ञानाचे पूर्ण रूप कृतीत उतरवणे ही खरी शिक्षणाची पद्धत आहे'. शिक्षणतज्ज्ञही हेच सांगतात. वारे गुरुजींनी ते तंतोतंत कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. एके 'काळी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र प्रकल्प, समूह प्रकल्प याच्यासाठी मूल्यमापनामध्ये गुण ठेवण्यात आले होते. प्रकल्पाच्या विविध पद्धती कळाव्यात म्हणून शिक्षकांना पुस्तिका देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 'मुक्त प्रकल्प' हा एक प्रकार होता. पुस्तिकेत त्याची उदाहरणांसह माहिती देण्यात आली होती. वारे गुरुजींचं कौतुक याचसाठी आहे की, त्यांनी हे सगळं अभ्यासपूर्वक वाबळेवाडीच्या शाळेमध्ये रुजवलं. वाबळेवाडीचा पट बत्तीस होता, तो साडेसातशे झाला. विद्यार्थिप्रवेशासाठी भली मोठी प्रतीक्षा यादी. आसपासच्या काही खाजगी शाळा बंद पडल्या. वाबळेवाडी शाळेचा पट वाढला, हे वारे गुरुजींचं यश आहे; परंतु व्यवस्थेचे अपयश आहे. इतर शिक्षक आणि व्यवस्थेसाठी नामुश्कीची गोष्ट आहे.
आपल्याकडे व्यक्ती काम करते. एखादे शिक्षक उत्तम काम करतात, एखादे मुख्याध्यापक उत्तम काम करतात, एखादे गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी उत्तम काम करतात. ते त्यांच्या ठिकाणावरून बदलून गेले की, ते काम जागेवर थांबतं. व्यक्तीने काम करण्यापेक्षा व्यवस्था कामाला लागली पाहिजे. आपल्याकडे उलट घडतं. व्यक्ती काम करते आणि व्यवस्था ढिम्म असते. व्यक्तीने केलेल्या कामामुळे तात्पुरता बदल घडतो. व्यवस्था कामाला लागली तर दीर्घकाळ टिकणारा बदल घडतो. ते काम शाश्वत असतं. वाबळेवाडीला भेट दिल्यानंतर मला हे प्रकर्षानं जाणवलं.
वारे गुरुजींनी निर्माण केलेल्या भौतिक सुविधा त्यांच्या कामाच्या आजही साक्ष देतात. त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या, त्यांतील गटात काम करणे, विषयमित्र हे थोड्याफार प्रमाणात तिथं दिसतं. इतर संकल्पना आणि त्यांचा विचार पुसट झाला आहे. हे घडण्याचं कारण म्हणजे वारे गुरुजींबरोबर काम करणाऱ्यांपैकी आज एकही शिक्षक त्या शाळेत नाही. वारे गुरुजींना ओळखणारे, त्यांचे मित्र असणारे जयसिंग नन्हे हे शिक्षक मुख्याध्यापक म्हणून वाबळेवाडीच्या शाळेत काम करतात. वारे गुरुजींवर आरोप झाल्यानंतर, त्यांना पाठिंबा म्हणून राजीनामा देणारे हेच ते एकमेव गुरुजी. शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आजही सुरू आहेत. तरीही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वर्गसजावटीसारख्या गोष्टी तिथे नव्याने सुरू झाल्या आहेत. काचेच्या भिंतीला लावलेले शैक्षणिक तक्ते आत येणारा प्रकाश रोखत आहेत. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत सुरू आहे. बदल घडविण्यासाठी एक माणूस बदलून उपयोग नाही, तर समूहाला बदलावं लागेल, व्यवस्थेला बदलावं लागेल. अर्थात, एकेक माणूस बदलल्यानेच समूह बदलेल. वाबळेवाडी शाळेत वारे गुरुजीबरोबर काम करणारे शिक्षक वाबळेवाडीतून बदलून इतर शाळेत गेले आहेत. त्या प्रत्येक शिक्षकाची अशी एकेक शाळा उभी राहायला हवी होती. कदाचित, 'तुमचा वारे गुरुजी करू'. हे वाक्य त्यांना सारखं आठवत असावं. आज रोजी वाबळेवाडी शाळेला अठरा शिक्षक मंजूर असताना चौदा शिक्षक कार्यरत आहेत. इतकी चांगली शाळा असताना या शाळेत बदलीची मागणी करून पुरेसे शिक्षक का आले नाहीत हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांच्या पुढाकारातून हजारो ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष आणि शिक्षकांनी वाबळेवाडीच्या शाळेला भेटी दिल्या होत्या. वाबळेवाडीचे ग्रामस्थ आणि स्वतः वारे गुरुजी यांना वेळोवेळी छत्रपती संभाजीनगर येथे बोलावलं होतं. वारे गुरुजींनी आणि वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी शिक्षकांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला होता. प्रेरणा दिली होती. त्यातूनच काही शाळा उभा राहिल्या होत्या. हा अनुभव वारे गुरुजींच्या गाठीशी आहे. ते म्हणतात, 'वाबळेवाडीची जागतिक दर्जाची शाळा उभी राहायला अडीच वर्षे लागली. जालिंदरनगरची शाळा एक वर्षात उभी राहिली. गरदरेवाडीची शाळा एक महिन्यात उभी राहिली'. एक महिन्यात जागतिक दर्जाची शाळा उभी करणं म्हणजे काय हे समजणं जरा अवघड आहे. वारे गुरुजींचा कामाचा वेग प्रचंड आहे. ते वाऱ्याच्या वेगाने धावतात. इतर शिक्षकही त्याच वेगाने धावतील असे नाही. प्रत्येकाचा वेग वेगवेगळा असतो. यात एक धोका आहे. शाळा जागतिक दर्जाची करणे ही सामान्य गोष्ट नाही, त्यासाठी जादूची कांडी लागेल असा विचार सर्वसामान्य शिक्षकांच्या मनात येणे साहजिक आहे. त्यामुळे त्यांना हा वारे गुरुजींचा स्वप्नाळूपणा वाटण्याची शक्यता आहे. स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. एक महिन्यात जागतिक दर्जाची शाळा उभी राहू शकते हा सर्वसाधारण शिक्षकांसाठी धक्का आहे. या धक्क्यातून सावरायला, हा विचार शिक्षकांच्या मनात रुजायला काही कालावधी द्यावा लागेल. त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. त्यांचं मनोबल वाढवावं लागेल.
गावची मुलं शिकणार आहेत, त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे याची खात्री गावाला पटली की, गाव आपल्या मागे येतं हे वारे गुरुजींनी पुराव्यासह सिद्ध केलं आहे. जिल्हा परिषदेच्या 250 शाळा जागतिक दर्जाच्या करण्याचा त्यांचा मानस आहे. या शाळा उभ्या राहिल्या की, हळूहळू महाराष्ट्रभर अशा शाळा होतील. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे या कामात त्यांच्यासोबत आहेत, असं सध्याचं चित्र आहे. यापूर्वीही जालिंदरनगरच्या शाळेत शिक्षणमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला होता. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील शिक्षकांनी बघावा म्हणून यूट्यूबवरून लाइव्ह करण्यात आला होता. त्यासाठी शिक्षकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. वातावरण निर्मिती झाली आणि वारे गुरुजींचा प्रामाणिकपणा व्यवस्थेनं स्वीकारला, तर महाराष्ट्राचं चित्र पालटू शकतं. इतर कार्यक्रमांसारखा हाही एक कार्यक्रम ठरू नये. शासन बदललं की, त्याचा 'कार्यक्रम' होऊ नये. यापूर्वी शासनामार्फत 'अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा' सुरू करण्यात आलेल्या होत्या. वारे गुरुजींच्या संकल्पनेप्रमाणे थीम घेऊन इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांना एकत्रित शिकवण्याचा विचार त्यामध्ये होता. काय झालं माहीत नाही; परंतु आज त्या शाळा दिसत नाहीत. लाट आल्यासारखे कार्यक्रम येतात, योजना येतात आणि लाट निघून गेल्यानंतर पुन्हा पूर्वीपेक्षा वाईट स्थिती येते. चांगलं काम करत असताना काही शिक्षकांनी अधिकाऱ्यांचा रोष ओढावून घेतलेला असतो. ते डूख धरून असतात. आणि मग लाट ओसरल्यानंतर शिल्लक राहतो तो फक्त कचरा. तसे घडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. वारे गुरुजींच्या रूपाने आपल्यासमोर आशेचा किरण आला आहे. अशा प्रकारे स्वप्नं पाहणारा, स्वप्नं पेरणारा एखादा अवलिया महाराष्ट्रामध्ये असू शकतो ही खूप आशादायक गोष्ट आहे. इतर मार्गाला लागलेल्या शिक्षकांना वारे गुरुजींचं पटणार नाही. ज्यांचं मानसिक वय उत्तरार्धाकडे झुकलं आहे त्यांना वारे गुरुजी स्वप्नाळू वाटतील. जे झपाटून काम करत आहेत, त्यांना गुरुजी जवळचे वाटतील.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 16 व 17 मार्च 2026 रोजी 'बाल मराठी साहित्य संमेलन' घेण्यात आले. त्या संमेलनामध्ये 'मराठी शाळांचे भवितव्य आणि पालकांची मानसिकता' या परिसंवादात मी आणि वाबळे गुरुजी सहभागी होतो. 'मराठी माध्यमातून शिकूनसुद्धा जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्रातील मुले घेऊ शकतात; लोकसहभाग, समर्पित शिक्षक आणि प्रशासनाचं पाठबळ असेल तर जागतिक दर्जाच्या शाळा करणे अवघड नाही'. अशी त्यांनी मांडणी केली. वाबळेवाडीच्या शाळेला मिळालेले यश हा त्याचा सज्जड पुरावा आहे. त्या वेळी त्यांच्यासोबत वाबळेवाडीचे सतीश वाबळे आणि सतीश कोठावळे हे ग्रामस्थ आले होते. नंतर माझ्या ध्यानात आलं, ज्या ज्या ठिकाणी वारे गुरुजी जातात त्या त्या ठिकाणी वाबळेवाडीचे कोणी ना कोणी ग्रामस्थ त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. जीव की प्राण म्हणून त्यांना सांभाळतात. ते वारे गुरुजींच्या बरोबरीने शिक्षणाच्या कामात सहभागी झालेले आहेत. पालकांना, गावाला विश्वास दिला तर काय घडू शकतं हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. आमच्या गप्पांमध्ये वारे गुरुजी म्हणाले, 'महाराष्ट्रातील शाळा जागतिक दर्जाच्या करत असताना शिक्षकांच्या मागे गाव उभा करून देणार आहे. मेलेल्या माणसालासुद्धा उभं करणार. काम झाल्याशिवाय थांबणार नाही.'
वारे गुरुजींनी गरदरेवाडीचं मॉडेल उभे केलंय. गरदरेवाडी शाळेचा 22 मार्च 2026 रोजी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्धघाटन सोहळा पार पडला. त्याच वेळी 250 शाळांच्या 'शिक्षण परिवर्तन यात्रे'ची सुरुवात झाली आहे. ही महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाच्या परिवर्तनाची नांदी ठरावी आणि हाती घेतलेले कार्य तडीस जावे. काळांच्या गरजेनुसार कोणी ना कोणी समाजासाठी पुढाकार घेणारे तयार होत असतात. वारे गुरुजींच्या रूपाने असं नेतृत्व उभं राहत आहे. ते पुढाकार घेत आहेत. त्याची दखल समाज आणि शासनाने घ्यायला हवी. 'तुझा वारे गुरुजी करू'. या धमकीचं रूपांतर 'मी वारे गुरुजी आहे, याचा मला अभिमान आहे', असं म्हणणाऱ्या शिक्षकांची फळी निर्माण झाली, तर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाला सोन्याचे दिवस येतील.
दत्तात्रय वारे, पुणे
Mob.8668515224
(सर्जनशील शिक्षकांच्या कामाच्या संदर्भातील लेखमाला नामदेव माळी साधनासाठी करीत आहेत. 3 जानेवारी, 14 फेब्रुवारी व 4 एप्रिल या अंकांत तीन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या मालिकेतील हा चौथा लेख आहे.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या