हजार भारत आपल्याला एकात्म करायचे आहेत व त्यासाठी सर्वांनीच झटले पाहिजे. विशेषत: एकाच भूखंडात निवास करणाऱ्या एका भाषेच्या मंडळींत देखील समरसता नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात, चालू राहतात. एकात्मतेचे सणंग ताण्या-धाग्याने विणण्याचे प्रयत्न आपण सर्वजण करू या. एकाच भूखंडातील माणसांमध्ये अधिक एकात्मता व समरसता असली तर असे प्रकार घडते ना. समाजातील ज्यांना सुसंस्कृतपणाचा लाभ झाला आहे त्यांनी त्या लाभापासून वंचित असणारांशी समनुयोग आणि संपर्क राखला नाही तर एका बाजूला वांझ हळहळ आणि दुसऱ्या बाजूला नपुंसक विध्वंस चालू राहील. जागरूकपणे, दिलदारीने आणि अत्यंत चिकाटीने काम केल्यापासून हजार भारत एकात्म होणार नाहीत.
धारवाडच्या गांधी प्रतिष्ठानच्या निमंत्रणावरून डिसेंबरच्या 6,7,8 या तारखांना मी तेथे गेलो होतो. आंतरभारतीसंबंधी मंडळीशीं चर्चा करण्यासाठी. एकात्म भारताच्या नवनिर्मितीसाठी आंतरभारतीतर्फे जे कार्य चालले आहे त्याचे अनेकांनी स्वागत केले. एवढेच नव्हे तर सध्या अशा कार्याची नितांत आवश्यकता असल्याचे धारवाड-हुबळी भागात अशा तऱ्हेची काही पावले टाकण्याची आवश्यकता मंडळींनी मान्य केली. या सर्व चर्चा भाषणांत क्वचित महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या चरत्या जखमेचा उल्लेख डोकावून गेला,नाहीच असे नाही. महाजन कमिशनच्या निवाडयाचा उल्लेखही या संदर्भात झाला. धारवाडहून 8 डिसेंबरला रात्री कर्नाटक-बसने परत निघालो. वाटेत बामेवाडीला काही तरुणांनी बस अडवली. महाराष्ट्र परिवहनाच्या बसेस हुबळीला परतवण्यात आल्या लोकक्षोभाची कल्पना आली. भारतीय समाज इतका विभक्त आहे की, एकाच भारतात हजार भिन्न भिन्न भारत आहेत असे जाणवावे. आणि हे भारत परस्परांशी जणू संबंधित नाहीत, परस्परांवर त्यांचा प्रभाव पडत नाही ! एकात्म भारताच्या नवनिर्माणाची चिंता करणारे कर्नाटक व महाराष्ट्र यांतील भारतीय त्यासंबंधी चर्चा करत असताना व योजना आखत असताना दुसरा भारत केवळ भाषाभिन्नतेच्या नावाखाली परस्पर विध्वंस आणि उच्छेद करण्यासाठी सरसावून उभा होता ! आणि तिसराही एक भारत पाच वेळी उपाससार आणि बेरोजगारी कंठीत असल्याने वणवण भटकत असताही दिसत होता.
भाषेचे जन्मदत्त साधनही समर्थपणे वापरता न येणारा भारत ! सुसंस्कृत भारत, भाषिक उन्मादाने आपली मानवी कर्तव्ये विसरणारा आणि बेभानपणे आपल्या विध्वंसाला प्रवृत्त झालेला भारत, आणि पोटापाण्याच्या विवंचनेमुळे देशोधडीला लागलेला भारत, असे हे हजार भारत, एकाच भू-खंडात वास्तव्य करणारे, पण परस्परांशी अनुबंध नसलेले, परस्परांशी परिचय नसलेले ! ही एकाच भूखंडातली विषमता, विभक्तता आपल्याला संत्रस्त करत नाही हे दुर्देव होय! भारतीय एकात्मतेचे वस्त्र आडव्या उभ्या धाग्यांनी विणले गेले पाहिजे.आपला प्रयत्न फक्त आडव्या धाग्यांनी ते विणण्याचा तर चाललेला नाही?तसा तो चालला असेल तर त्याचे अपयश निश्चित आहे, हे सीमा प्रश्नाच्या निमित्ताने झालेल्या दंगलीनी दाखवून दिल आहे.
व्यासांच्या वारसांची अगतिकता
हे सर्व प्रकार घडत असताना महाराष्ट्र कर्नाटकातील सुसंस्कृत म्हणवणारी आम्ही मंडळी, एकात्म भारताची चिंता करणारी मंडळी अगतिक होऊन विव्हळत बसलो होतो. घडते आहे ते वाईट आहे, पण त्याला आवर घालणे आपल्या हाताबाहेरचे आहे; एवढेच नव्हे तर त्याच्याविरुद्ध सूर काढणेही व्यर्थ आहे, असे कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रातल्याही बहुतेक मंडळींना वाटत असावे. एक कुसुमाग्रज हा सन्माननीय अपवाद ! त्यांनी जाहीरपणे आपल्या व्यथा प्रकट केल्या. पण महाराष्ट्र-कर्नाटकातील भीषण विध्वंस आणि अमानुष अत्याचार थांबव,असे महाराष्ट्र-कर्नाटकातील साहित्यिकांनी संयुक्तपणे काही सांगितले नाही. व्यासांच्या वारसाला त्यांच्यासारखा आक्रोशही करता_आला नाही. एक साहित्यिक खेदाने म्हणाले, सखाराम बाइंडरच्या निमित्ताने होणाऱ्या गुंडगिरीविरुद्ध अनेक साहित्यिक चवताळून उठले, त्यांनी पत्रके काढली, पण कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत चवताळून त्यांनी विध्वंस आणि गुंडगिरी थांबवा असे पत्रक काही काढले नाही ! मनगटशाहीचा त्यांनी कडाहून निषेध केला नाही ! तो निरर्थक कदाचित ठरला असता, कदाचित त्यामुळे प्रक्षुब्ध भावना शमल्याही असत्या.
पोलिसांनी दंडुक्यांच्या साह्याने प्रक्षोभ शमवण्याचा आणि पोलिस पक्षातील व हतबल ठरले केंद्रीय पोलिसांना पाचारण करावे एवढाच मार्ग उरावा हे दुःखद आहे! दुसरे एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणाले, सखाराम बाईंडर हा साहित्याशी संबंधित प्रश्न होता. सीमाप्रश्न हा राजकीय प्रश्न आहे. पण ते काहीही असले तरी विध्वंस आणि अत्याचार हे मानवी जीवनाशी संबंधित प्रश्न आहेतच. सुसंस्कृतपणे, निदान विध्वंस आणि निरपराधी मंडळींवरील अत्याचार टाळून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करूच शकणार नाही का? दारिद्र्याने गांजलेल्या आणि आर्थिक दुरावस्थेची तलवार टांगती असणाऱ्या समाजाने विध्वंसाने त्यात भर घालावी हे केवढे दुर्दैव! भारतीय एकात्मतेचा प्रश्न हा सुसंस्कृत मानवी जीवनाचाही प्रश्न आहे; आणि प्रादेशिक भिन्नतेप्रमाणे सामाजिक भिन्नतेचाही त्या संबंधात विचार होणे अगत्याचे आहे. विध्वंस आणि अत्याचार अमान्य असणारी आम्ही मंडळी परस्परांनाच समजावीत होतो, पण प्रक्षोभ आणि अंध झालेल्यांना समजावण्याची शक्ती काही आमच्यात नव्हती. मानवी दुःख आणि यातना यांना दुर्जनांच्या सामर्थ्यापेक्षा सज्जनांची दुर्बलता तर कारणीभूत नाही ?
ह्या गोष्टी ध्यानी घ्यायला हव्या
साने गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’चे ‘श्यामन ताई’ नावाने कन्नड भाषांतर करणारे,भारतीय संस्कृती हे त्यांचे पुस्तक कन्नड भाषिकांना उपलब्ध करून देणारे श्री. भास्करराव गोखले या सर्व घटनांनी अतिशय व्यथित झाले. धारवाडच्या आंतरभारती कार्यक्रमांना त्यांची साथ होती. त्यांनी काही गोष्टींकडे मराठी मंडळींचे लक्ष वेधले आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात,”या तथाकथित सीमाप्रदेशाच्या बाहेर, कर्नाटकात सीमाप्रदेशाच्या लोकसंख्येच्या दुप्पट तरी संख्या मराठी भाषिकांची विखुरलेली आहे. त्यांची स्थिती किती चिंताजनक आहे याची कल्पना मराठी लोकांना आहे काय? गेल्या पन्नास वर्षात कर्नाटकात राहणाऱ्या आम्हा मराठी भाषकांना कधीही जीविताबद्दल व वित्ताबद्दल चिंता वाटली नाही. आजही कन्नडीगांची वृत्ती आमच्याबद्दल चांगलीच आहे. पण महाराष्ट्रात जे घडल्याचे येथे प्रसिद्ध झाले आहे त्याची थोडी बहुत प्रतिक्रिया येथे निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सज्जन व माणुसकी असणारी माणसे दुर्बळ तर झाली नाहीत, असे वाटू लागते. आपण पाकिस्तान हिंदुस्तान मधील लोकांसारखे परस्परांशी वागू लागणार आहोत काय ? किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात काही कन्नड मंडळी आहेत.म्हणून त्यावर मराठी मंडळी चाल करून गेली, पण तिथल्या कामगारांनी त्यांना हुसकावून लावले म्हणतात. या मराठी मंडळींच्या लक्षात नसेल की, कर्नाटकात किर्लोस्करांचे सात कारखाने आहेत आणि तेथे शेकडो मराठी मंडळी काम करीत आहेत. आंतर भारतीय विचारांची मंडळी या सर्व प्रकरणी अशी हतबल असल्यासारखे का वाटतात ?”
हजार भारत एकात्म करायचे आहे
हजार भारत आपल्याला एकात्म करायचे आहेत व त्यासाठी सर्वांनीच झटले पाहिजे. विशेषत: एकाच भूखंडात निवास करणाऱ्या एका भाषेच्या मंडळींत देखील समरसता नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात, चालू राहतात. एकात्मतेचे सणंग ताण्या-धाग्याने विणण्याचे प्रयत्न आपण सर्वजण करू या. एकाच भूखंडातील माणसांमध्ये अधिक एकात्मता व समरसता असली तर असे प्रकार घडते ना. समाजातील ज्यांना सुसंस्कृतपणाचा लाभ झाला आहे त्यांनी त्या लाभापासून वंचित असणारांशी समनुयोग आणि संपर्क राखला नाही तर एका बाजूला वांझ हळहळ आणि दुसऱ्या बाजूला नपुंसक विध्वंस चालू राहील. जागरूकपणे, दिलदारीने आणि अत्यंत चिकाटीने काम केल्यापासून हजार भारत एकात्म होणार नाहीत.
Tags: Kirloskar Shri. Bhaskarrav Gokhale Shyamchi AAi Sane Guruji Sakharam Binder Vyas Kusumagraj Mahajan Commission Maharashtra Karnatak Seemavad Aantarbharati Gandhi Pratishthan Dharvad किर्लोस्कर श्री. भास्करराव गोखले ‘श्यामच्या आई साने गुरुजी सखाराम बाइंडर व्यास कुसुमाग्रज महाजन कमिशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आंतरभारती गांधी प्रतिष्ठान धारवाड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या