डिजिटल अर्काईव्ह

प्रथमतः या क्षेत्रात शिरकाव मिळणे कठीण. या क्षेत्रातील संस्था काही मूठभर लोकांच्या हातात असतात, व कित्येकदा स्वतंत्र बाण्याच्या बुद्धिमान माणसाची त्यांना काडी इतकीही किमत नसते. किंबहुना असल स्वतंत्र वृत्तीचे लोक घेतल्याने आपले महत्त्व कमी होते ही भीती मनात असते. म्हणून अशा लोकांना येण्याचे टाळणे, किंवा चुकून घेतले गेल्यास त्यांचा तेजोभंग करणे हे अधिकारी मंडळींना अगत्याचे होऊन बसते. मुलाखतीच्या वेळेला त्या विषयाचा अधिकारी यापेक्षा संस्थेतील शासनाधिकारी हा प्रमुख असतो.

'वुई द इंटलेक्च्युअल्स्' हे विरुद अभिमानाने बाळगणारा एक खास वर्ग समाजात वावरत असतो. संख्येने लहान पण बौद्धिक व मानसिक बळ हत्तीचे, असा यांचा दावा असतो. समाजाला प्रगतिपथावर आणून योग्य ते मार्गदर्शन आम्हीच करत असतो अशी यांची समजूत असते. सर्वसामान्य विचारा भाबडा नागरिकही याच दृष्टीने यांच्याकडे पाहात असतो. कोणताही विषय भावनाविवश न होता, केवळ शास्त्रीय पद्धतीने हाताळण्याचे कसब यांच्या हाती आहे. अशी सर्वसाधारण समजूत असते. कोणतीही राजकीय किया इतर अभिलाषा नाही, मनावर कोणतेही दडपण नाही, त्यामुळे खणखणीत कोणाचीही तमा न बाळगता आपले स्पष्ट मत सांगण्याचे धाडस हा प्राणी करू शकतो, असा विश्वास व समज समाजात पसरलेला असतो. सतत व्यासंग व प्रतिष्ठितपणाची हाव नसलेला असा हा प्राणी मान्यवर होणे साहजिकच आहे. Knowledge is power हे आपण म्हणतो ते याच कारणासाठी.

पण प्रत्यक्ष जीवनातील याचा 'अवतार' जवळून पाहिला तर हा इंटलेक्च्युअल दबलेला, पिचलेला, स्वत्वहीन, व एका विशिष्ट पद्धतीत असहाय्य गुलाम म्हणून वावरताना दिसतो. आपल्या विषयातला व्यासंग वाढवून त्यात अधिकारी म्हणून मान्य होण्यापेक्षा, आहे त्या संस्थेतच शासनाधिकारी होण्याची त्याची धडपड चाललेली असते. कारण दीर्घ अनुभवानंतर knowledge is power ही म्हण खोटी असून power is knowledge हेच खरे आहे हे त्याला पटलेले असते. ज्यांच्या कडे अधिकारपद आहे त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रातील अधिकारपदही बहाल केले जाते, हे तो डोळ्यांदेखत पाहात असतो. शासनाधिकार हे अनेक वेळा ज्ञानाचे उगमस्थान मानले गेलेले त्याला परिचित असते. अध्यापन क्षेत्रातील सेमिनार, चर्चासत्रे इ. जवळून पाहिली तर संचालक वर्गाकडे बाबा वाक्यं प्रमाणम्' या दृष्टीने तमाम इंटलेक्च्युअल पाहात असल्याचे आढळून येते. बॉसची मते, मग ती एखाद्या विषयासंबंधीची असोत वा एखाद्या व्यक्तीविषयी असोत, आपोआप स्वीकारली जातात. आपल्या सहकान्यांसंबंधीची मतेदेखील सर्रास स्वीकारार्ह वाटतात. बॉसपेक्षा निराळे मत मांडावयाचे म्हणजे चेष्टा, हेटाळणी यांना आमंत्रण देण्यासारखेच, चुकून मतभेद झालाच तर "मला तसे म्हणावयाचे नव्हते; माझ्या व तुमच्या म्हणयात तसा फरक नाही. मी फक्त तुमच्या म्हणण्याचे स्पष्टीकरण विचारत होतो' इ. मखलाशी करून हा मतभेद केवळ आभास होता असे दाखवण्याची धडपड सुरू होते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हा काही याच पिढीचा अनुभव नाही!

या परिस्थितीस सर्वसामान्य इंटलेक्च्युअल कारणीभूत आहेच, पण त्याहीपेक्षा समाजातील आर्थिक व सामाजिक परिस्थितीही तितकीच कारणीभूत आहे. अध्यापन व्यवसाया पुरते बोलायचे झाल्यास मुळातच यांना भाव कमी. केवळ इतर क्षेत्रे बंद असतात म्हणून बव्हंशी या क्षेत्रात लोक शिरतात. बौद्धिक काम नकोसे असते असे नाही. पण खरेखुरे अस्सल दर्जाचे बौद्धिक जीवन घालवण्यास आवश्यक अशा वातावरणाचा अभाव हे या परिस्थितीचे मुख्य कारण वाटते.

प्रथमतः या क्षेत्रात शिरकाव मिळणे कठीण. या क्षेत्रातील संस्था काही मूठभर लोकांच्या हातात असतात, व कित्येकदा स्वतंत्र बाण्याच्या बुद्धिमान माणसाची त्यांना काडी इतकीही किमत नसते. किंबहुना असल स्वतंत्र वृत्तीचे लोक घेतल्याने आपले महत्त्व कमी होते ही भीती मनात असते. म्हणून अशा लोकांना येण्याचे टाळणे, किंवा चुकून घेतले गेल्यास त्यांचा तेजोभंग करणे हे अधिकारी मंडळींना अगत्याचे होऊन बसते. मुलाखतीच्या वेळेला त्या विषयाचा अधिकारी यापेक्षा संस्थेतील शासनाधिकारी हा प्रमुख असतो. उमेदवाराने त्या विषयातले ज्ञान पाहण्यापेक्षा इतर गोष्टीकडे अधिक लक्ष दिले जाते. माझ्या एका मित्राचा अनुभव याबाबत सांगण्यासारखा आहे. एका मोठ्या संस्थेमध्ये त्याला मुलाखतीला बोलावणे आले. निवड समितीवर त्या संस्थेचे मुख्य चालक होते. ज्या विषयासाठी या माणसास घ्यायचे होते त्या विषयाशी यांचा काही संबंध नव्हता. मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले ते फक्त पगारासंबंधीचे. उमेदवाराचा पूर्वीचा अनुभव विसरून जाऊन त्याने मूळ पगारावर यावे अशी संचालकांची इच्छा. ती इच्छा पाळणारास ही जागा मिळणार होती. उमेदवारांची त्या विषयातील लायकी पाहून योग्य ती किंमत देऊन या माणसास घ्यावे असे संचालकास वाटत नव्हते. अर्थातच माझ्या मित्राला हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते, हे सांगणे नकोच!

हे उदाहरण अपवादात्मक नसून नित्यातले आहे. पुष्कळदा वैयक्तिक प्रेमाखातर किंवा इतर काही कारणासाठी कोणी तरी बडा माणूस एखाद्याला सहजपणे चिकटवून देण्यासारखं महत्कार्य करतो. पण या त्याच्या चिकटविण्याच्या खटाटोपात त्या माणसाचे मानसिक स्वातंत्र्य तो हिरावून घेत असतो. 'तुम्हांस नोकरी लावल्याबद्दल (अन्नाला लावल्या बद्दल) आम्हांला पश्चात्ताप करण्याची पाळी येऊ देऊ नका असे बजावून हा मोठा माणूस सांगतो. याचा अर्थ की, या चिकटलेल्या माणसाने त्या संस्थेमध्ये संचालकांशी अधिकाऱ्यांशी कोणत्याही परिस्थितीत एकनिष्ठ राहून. त्यांच्या अधिकाराचा उपमर्द' न करता, किंवा थोडक्यात अत्यंत नेभळटपणे सेवा करत राहावे. 'मी चळवळ्या नाही, राजकीय पक्षाशी माझा दुरूनही संबंध नाही, समाजातील कोणत्याही सत्याग्रह, मोर्चा इत्यादीत सहभागी होणार नाही' हे नुसते मनाशी ठरवून चालत नाही. तर त्याचे अधिकाऱ्यांसमोर प्रदर्शन करावे लागते. हे प्रदर्शन करत असताना कित्येकदा अतिरेकही होतो, व विनोदही निर्माण होतो. एखाद्या चळवळीची टिंगल करणे आणि चळवळीतले लोक मित्र असूनही किंवा ओळखीचे असूनही त्यांची माझी ओळखही नाही असे आवर्जून सांगणे, त्यांच्या हेतूंविषयी शंका प्रदर्शित करणे, अशा अनेक गोष्टीचा अवलंब करावा लागतो. एखाद्या चळवळीचे गुणदोषविवेचन न करताना, हा एक स्टंट आहे, सत्ता काबीज करण्यासाठी व प्रसिद्धीसाठी टाकलेला हा एक डाव, अशा भाषेत हे तथाकथित निरपेक्ष व शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे इंटलेच्युअल्स आहेत.

उदाहरणार्थ, गेल्या वर्षीचे फी-वाढ आंदोलन घ्या. एकही इंटलेक्च्युअल एखादा अपवाद वगळल्यास या संबंधात विचार करून आपली बाजू मांडावयास पुढे येऊ धजला नाही. ही चळवळ ही एक हुल्लडबाजी किंवा अभ्यास टाळण्याचा एक मार्ग अशा शब्दांत त्याची हेटाळणी झाली. ज्यांना या चळवळीत तात्विक दृष्ट्या काही मुद्दे दिसत होते त्या लोका विषयी विकृत स्वरूपाचा प्रचार व हेटाळणी करण्यात आली. एका कोणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या अभ्यासू माणसाने चळवळीविषयी जराशी सहानुभूती दाखवली तेव्हा, 'हा माणूस चांगला वाचतो, लिहितो, तो असा कधीपासून करू लागला? अशा तन्हेचे उद्गार त्याला ऐकावे लागले. चळवळीतील मुख्य मुद्दयावर काही न बोलता इतरच शेरे मारण्यात आले. चळवळच करायची तर मुले कॉलेजच्या 'इन'मधून बाहेर पडतात व 'आउट' मधून आत येतात तिथे चळवळ करा' असे एका प्राचार्यांनी चळवळीतल्या मुलांना सांगितले. अधिकारी वर्गाच्या पुढे पुढे करणाऱ्या एका प्राध्यापकांनी सांगितले की, कॉलेज बंद काय म्हणून ठेवता? तुमचे म्हणणे बरोबर असेल, आणि ताकद असेल तर रविवारी कॉलेज भरवून बंद पाडण्याचा सत्याग्रह का करत नाही?' यावरून या मंडळीची समज किती बेताची आहे व नारी कुठल्या अवस्थेपर्यंत पोहोचली आहे हे ध्यानात येईल.

याउलट या चळवळीन अधिक विधायक भाग घेतला असता तर चळवळीला उत्तम वळण मिळाले असते, व त्याचा परिपाक म्हणून अनेक सुधारणा घडवून आणता आल्या असत्या. अशा तन्हेची कलाटणी इंटलेक्च्युअल देऊ शकतो हेही उदाहरणाने दाखवता येईल. 'माणूस'तर्फे अन्न स्वावलंबनाचा मोर्चा जेव्हा निघाला होता, तेव्हा त्यास नैतिक पाठिंबा देऊन काही उच्च दर्जाच्या प्राध्यापकांनी चळवळीला एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. एरव्ही याही एका स्तुत्य उपक्रमाची हेटाळणी झाली असती. पण हा एक अपवाद आहे। जरूर लक्षात ठेवले पाहिजे.

अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्याकरता 'अलिप्त राहून टिंगलवजा चर्चा करणे हे आवश्यक आहे यात शंका नाही. मोठ्या मिनतवारीने मिळालेली नोकरी टिकवण्यासाठी योग्य ती खटपट करणे यात गैरवाजवी काहीच नाही. पण कित्येक वेळा अशा प्रयत्नात अतिरेक दिसून येतो.

असे अगदी मामुली प्रश्नांबाबत सुद्धा मतभेद टाळणे, ज्या प्रश्नांचा राजकारणाशी किंवा प्रचलित सामाजिक समस्यांशी दुरान्वयाने देखील संबंध नाही अशा शुद्ध 'अॅकॅडमिक प्रश्नाच्या बाबतीतही मतभेद टाळण्याचा प्रयत्न करणे असे सर्रास दिसून येते. गचांडी मिळण्याची सतत भीती. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पुढेच नव्हे तर सहकाऱ्यांना बरोबरही समोरासमोर चर्चा टाळणे असे गुरू होते. कारण न जाणो त्याने 'रिपोटिंग' होऊन उगाचच कोणाच्या मर्जीन का उतरा, असा विचार मनात येतो. दैनंदिन कामामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टीबाबत इंटलेक्च्युअल्सना मत असते, किंवा काही म्हणायचे असते, पण अधिकाऱ्यांचा 'मूड' पाहून, त्यांचा गैरसमज होणार नाही अशी खबरदारी घेऊन मगच बोलावे लागते. कित्येकदा अतिशय महत्त्वाच्या विषयाबाबत मॅनेजमेंटच्या मताविरुद्ध मत देणे हे धाडसाचेच होऊन बसते. मला एक प्रसंग आठवतो. डिग्रीचे वर्ग विद्यापीठात केंद्रित करावेत की न करावेत असा प्रश्न होता, व त्या संबंधात एक कमिटी कॉलेजमधील लोकांचे

मत अजमावण्यासाठी हिडंत होते. एका कॉलेज मधील याविषयीची कमिटी बरोबरची चर्चा जेमतेम अर्ध्या तासात आटोपली. प्राचार्या खेरीज एकानेही तोंड उघडले नाही. त्यांनी जी बाजू मांडली त्याला सर्वांची मूक संमती आहे असे गृहीत धरण्यात आले. वास्तविक हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा, व बहुतेक लोकांना याबाबत निश्चित मते होती किंवा असावयास पाहिजे होती. पण अधिकृत मताविरुद्ध काही बोलणे हिताचे नव्हते. याही बाबतीत 'अलिप्तपणा' हितावह होता.

'अलिप्तपणा'चा रोग या वर्गात फार फैलावलेला दिसतो. त्याचे मूळ पोटाच्या सुरक्षिततेच्या धडपडीत सापडते. हळूहळू हा रोग बळावत जाऊन असाध्य होतो. माझा हा विषय नाही', 'मी पॉलिटिक्समध्ये पडत नाही', 'मी बाजू घेऊ इच्छित नाही' अशी पालुपदे नित्याची होऊन बसतात. मग कोणत्याही महत्त्वाच्या व मामुली प्रश्नावर त्याचे मत विचारा, या स्वरूपाची उत्तरे देऊन हा प्राणी सहीसलामत निसटून जातो. कोणत्याही प्रश्नावर आपले खणखणीत मत देण्याचे टाळणे हा या वर्गाचा स्थायीभाव आहे. कारण मतप्रदर्शन झाले की वादविवाद आला, विरोध आला, टीका आली. त्यास सामोरे जाण्याचे मानसिक धैर्य प्रथमपासूनच ढासळलेले असते. पण हे चार लोकांत दिसण्यापेक्षा काही आडोसा तयार करून त्या पाठीमागे दसणे हिताचे असते, व असा आडोसा तयार करण्यासाठी हा इंटलेक्च्युअल आपले सर्वस्व पणास लावत असतो.

कित्येकांना तर असे खणखणीत मत देणे हेच कमीपणाचे वाटते. अशा तन्हेची मते मांडणाऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या माणसास ते 'अॅकॅडमिक समजत नाहीत. त्याच्या लिखाणास भडक किंवा प्रचारी अशी विशेषणे लावतात. अलीकडच्या काळात विशेषीकरणाचे स्तोम बरेच माजल्याने इंटलेक्च्युअल्सना एक आधार निर्माण झाला आहे. याचा फायदा घेऊन चर्चा टाळणे सुलभ होते. 'मी सायकॉलॉजिस्ट आहे, सायकिअॅट्रिस्ट नाही' असे म्हणून मानस शास्त्राचा प्राध्यापक बरेच वेळा वेळ मारून नेतो. अर्थशास्त्राचा प्राध्यापक विशेषीकरणाच्या खोडात अधिक सापडलेला असतो. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्याला 'कमिटमेंट' टाळता येते. 'मी अजून त्याचा फारसा विचार केला नाही. दोनही बाजू तशा बरोबर आहेत. या तालावर चर्चा चालवण्याचा प्रघात नेहमी दृष्टीस पडतो. 'कमिटमेंट टाळण्याच्या धडपडीत कित्येकदा हास्यास्पद गोष्टी घडतात. गोवधबंदीच्या चळवळीत मुख्य विषयाला बगल देऊन आयुष्यात भावनेचे स्थान काय? या विषयावर अनेक इंटलेक्च्युअल्स पांडित्यदर्शन करत असत.

या वृत्तीचाच एक भाग म्हणजे मर्यादित वाचन वास्तविक सर्वसामान्य नागरिकांची कल्पना अशी की, इंटलेक्च्युअल हा पुस्तकातील किडा व कोणतेही क्षेत्र त्याला वर्ज्य नाही. प्रत्यक्षात याचे वाचन अगदी मामुली असते, व कित्येकदा विशेष वाचणाऱ्याची टिंगल होते. जास्त वाचणारा याचा अर्थ स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करणारा असाही लावला जातो. साहजिक चनवीन ग्रंथाची मग ते कितीही महत्त्वाचे असोत तोंडओळखही बरेच वेळा होत नाही. सुप्रसिद्ध 'एशिअन ड्रामा' माझ्या टेबलावर पाहून, 'तुम्हांला नाटकातही इंटरेस्ट आहे वाटतं! 'असे उद्गार माझ्या सहकाऱ्यांकडून मला एकदा ऐकावे लागले.

Tags: दास्यमुक्ती विशेषांक 1970 मानसशास्त्र वार्तांकन राजकारण कॉलेज एशिअन ड्रामा नाटक इंटलेक्च्युअल विद्यापीठ Dasyamukti Special Issue 1970 Psychology Journalism Politics College Asian drama Drama Intellectual University weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके