डिजिटल अर्काईव्ह

जातिभेदाचा पाठपुरावा करणाऱ्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हीन लेखणाऱ्या या निर्णयाला शासन जबाबदार आहे. हे का व कसे घडले याचा जाब मुख्यमंत्र्यांनी व शिक्षणमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि निर्णय रद्द करून जनतेची माफी मागितली पाहिजे.

जातिभेदाचे विषबीज

जिल्हा परिषदांमध्ये सवर्ण मुलांना एका रंगाचे आणि मागासवर्गीय मुलांना त्यांच्याहून वेगळ्या रंगाचे गणवेष देण्यात येणार आहेत, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हा निर्णय शिक्षणखात्याने घेतला की समाजकल्याण विभागाने घेतला, याला कोणी प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे का, या गोष्टी गैरलागू आहेत. 

जातिभेदाचा पाठपुरावा करणाऱ्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना हीन लेखणाऱ्या या निर्णयाला शासन जबाबदार आहे. हे का व कसे घडले याचा जाब मुख्यमंत्र्यांनी व शिक्षणमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि निर्णय रद्द करून जनतेची माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सतत मी धर्मभेद मानीत नाही, जातिभेद मानीत नाही असे मानभावीपणाने म्हणत असतात. अल्पसंख्यांक समाजावर बहुसंख्यांक समाजाच्या काही कल्पना लादण्यासाठी आणि मागासवर्गीयांच्या काही आवश्यक असलेल्या खास सवलती कमी करण्यासाठी असा व्यापक दृष्टिकोनाचा आव आणणे सोयीचे आहे. परंतु जातीजातीतील उच्चनीच भाव नष्ट करण्याऐवजी तो आणखी दृढ व्हावा यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेगळे गणवेष देण्यात मात्र त्यांना काही गैर वाटत नाही.

शासनाच्या या निंद्य निर्णयाविरुद्ध पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ठराव केला हे योग्यच झाले. महाराष्ट्रातील नगरपालिका व जिल्हापरिषदा यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे नाकारले पाहिजे. राष्ट्र सेवादल, छात्रभारती आदी संघटनांनी याविरुद्ध चळवळ केली पाहिजे. रयत शिक्षण संस्था विवेकानंद शिक्षण संस्था आदींनी पुढाकार घेऊन जातिभेद माजविणारा हा निर्णय ठोकरला पाहिजे. शिक्षक संघटनांनीही या निर्णयास कडक विरोध केला पाहिजे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यावर अर्थातच गप्प बसणार आहे.

सरकार लवकरच सांस्कृतिक शिक्षण सुरू करणार आहे. ज्या सरकारला संस्कारक्षम वयातील निरागस मुलांच्या मनांत गणवेष वेगळे ठेवून जातिभेदाचे विषबीज पेरावयाचे आहे, त्या सरकारचे सांस्कृतिक शिक्षण कसे असेल याची कल्पनाच करवत नाही. शासनाचे शिक्षणखाते व समाजकल्याण खाते यांची मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेगळे गणवेष देण्याची कृती घटनेतील तत्त्वांच्या विरोधी आहे. ही रद्द झालीच पाहिजे.

रंगावरून जात ठरते ही कल्पनाच आपणास मान्य नसून, मागासवर्गीयांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या रंगामुळे कुणाची भावना दुखावली असेल, तर सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना या रंगाचे गणवेश दिले जातील किंवा गरज पडल्यास रंगही बदलला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी आज केले.

श्री. डांगे यांची भूमिका जातीयवादी नसली तरी हा छोटा विषय आहे, हे त्यांचे विधान बरोबर नाही. त्यांनी निर्णय तातडीने बदलावा आणि सर्व विद्यार्थ्यांना सारखेच गणवेष द्यावेत.

----------

विकृत मनोवृत्तीचे हिडीस प्रदर्शन

पुण्यामध्ये श्री. गोपाळ गोडसे, श्री. मदनलाल पहावा या म. गांधी खून खटल्यात शिक्षा झालेल्या आरोपींचा सत्कार करण्यात आला, ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. सत्कार समितीतर्फे असे सांगण्यात आले की श्री. गोपाळ गोडसे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त हा सत्कार होता. परंतु त्यांचा एकट्यांचा सत्कार न करता या खटल्यातील दुसऱ्या आरोपीचाही सत्कार केल्यामुळे या प्रसंगामागील विकृत मनोवृत्ती स्पष्ट झाली. श्री. सुधीर फडके यांनी सत्कार समारंभातून अंग काढून घेतले हे उचित झाले. भारतीय जनता पक्षाचे काही नेते सत्कार समितीचे सदस्य होते परंतु ते हजर राहिले नाहीत. मात्र पुण्यातील काही प्रमुख नागरिकांनी याविरुद्ध जे पत्रक काढले त्या पत्रकावर सही करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही नेता नव्हता. अटलबिहारी वाजपेयी आणि अन्य भाजपवाले वेगळे कसे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

सत्कारसभेच्या बाहेर काही काँग्रेस नेत्यांनी व अन्य नागरिकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. सभेत घोषणा करणाऱ्या चौघाजणांना जबर मारहाण करण्यात आली. म. गांधींच्या खुनाचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध शांततापूर्ण निदर्शने झाली हेच योग्य होते. समाजातील हीन, निंद्य आणि विकृत वृत्तीचे निर्मूलन समाजाचे प्रबोधन करूनच करावे लागेल. 

म. गांधी हे केवळ स्वातंत्र्यलढ्याचे सेनानी नव्हते, ते ख्रिस्त, बुद्ध यांच्याप्रमाणे मानवतावादी संत होते. त्यांचा खून हा माणुसकीवरील कलंक आहे. या खुनामुळे खुनी नष्ट झाले आणि म. गांधी अमर झाले. जगात सर्वकाळी, सर्व ठिकाणी काही माणसे विकृत असतातच, गोपाळ गोडसेचा सत्कार करणाऱ्या लोकांनी अशाच मनोवृत्तीचे हिडीस प्रदर्शन केले.

Tags: गोपाळ गोडसे महात्मा गांधी गणवेश मागासवर्गीय विद्यार्थी जातिभेद Gopal Godse Mahatma Gandhi Uniforms Backward Class Students Caste weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी