डिजिटल अर्काईव्ह

राष्ट्र सेवा दलाचे शाखानायक शिबिर

आम्ही ह्या शिबिरात जे काही शिकवले ते काही साध्य नव्हे. ते आहे साधन. शारीरिक कार्यक्रम, करमणूक, अभ्यासवर्ग, कला पथक वगैरे साधनांनी आम्हाला तरुण एकत्र करायचे आहेत. आमचे साध्य आहे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, त्यासाठी ही शिक्षण घेऊन गेलेली तरुण मुले-मुली घडतील.
 

10 मे ते 20 मे ह्या काळात राष्ट्र सेवा दलातर्फे पुण्याला साने गुरुजी स्मारकाच्या जागेत शाखानायक शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिरात महाराष्ट्राच्या सतरा जिल्ह्यातून अठ्ठ्याऐंशी आणि आंध्रमधून एक असे एकूणनव्वद सैनिक आले होते. शाखा चालवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नेतृत्वगुण यावेत या दृष्टीने शिक्षणाची योजना करण्यात आली होती.

शारीरिक शिक्षणाला रोज सात तास व बौद्धिक शिक्षणाला तीन तास देण्यात आले होते. शिवाय गाणी, हस्तव्यवसाय आणि करमणूक यासाठीही वेळ ठेवण्यात आला होता.

शारीरिक शिक्षण देण्यासाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या श्री द. दा. काळे यांना खास बोलावले होते. श्री काळे, श्री किसन अरकल आणि श्रीमती सिंधू काटे यांनी शारीरिक शिक्षण देण्याचे कार्य केले.

सर्वश्री एस्. एम्. जोशी, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, डॉ. फडके, नरहर कुरुंदकर, लीलाधर हेगडे, बा. य. परीट आणि सुहास पालेकर यांनी बौद्धिके घेतली.

करमणुकीच्या कार्यक्रमाला सर्वश्री राजगुरू, राम नगरकर, मुरलीधर राजूरकर, राजा मंगळवेढेकर, लीलाधर हेगडे, संजय अंबिके यांनी आपला वेळ दिला. छंदवर्ग व कार्यालय विमलताई गरुड यांनी सांभाळले. रसोईघर आणि भोजनव्यवस्था यासाठी शांताबाई मलकापुरे आणि त्यांच्या सहकारी झटत होत्या.

समारोपाचा कार्यक्रम दि. 30 मे रोजी सायंकाळी सेवा दलाचे अध्यक्ष श्री लीलाधर हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री एस्. एम्. जोशी आणि सेवा दलाचे वयोवृद्ध विश्वस्त श्री भाऊसाहेब रानडे उपस्थित होते.

सुरुवातीस श्री एस्. एम्. जोशी यांना मानवंदना देण्यात येऊन, त्यानंतर शारीरिक कार्यक्रमांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यानंतर शिबिराचा अहवाल श्रीमती सिंधू काटे यांनी वाचून दाखवला. त्यानंतर श्री लीलाधर हेगडे यांचे भाषण झाले. ते म्हणाले की, ‘’आम्ही ह्या शिबिरात जे काही शिकवले ते काही साध्य नव्हे. ते आहे साधन. शारीरिक कार्यक्रम, करमणूक, अभ्यासवर्ग, कला पथक वगैरे साधनांनी आम्हाला तरुण एकत्र करायचे आहेत. आमचे साध्य आहे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, त्यासाठी ही शिक्षण घेऊन गेलेली तरुण मुले-मुली घडतील.’’

श्री एस्. एम्. जोशी म्हणाले, ‘’स्वातंत्र्य येऊन अठ्ठावीस वर्षे झाली तरी गरिबाच्या झोपडीत मात्र स्वातंत्र्याचा प्रकाश आला नाही. तो प्रकाश आपल्याला न्यायचा आहे. हे करीत असता आपल्याला त्रास होईल तो आपण सहन केला पाहिजे. असल्या शिबिरांमुळे मुलांच्या मनाला आणि शरीराला शिस्त लागते. पुढच्या वेळी आजच्या शिबिरापेक्षा तिप्पट संख्या असायला हवी.’’

ह्या शिबिरात प्रत्येक शिबिरासाठी रु. 40 फी ठेवण्यात आली होती. ही फी आणि प्रवास खर्च इतकी रक्कम प्रत्येक सैनिकाला उभारावी लागली. इतका खर्च करून शिक्षण घेण्यासाठी सर्वजण आले होते.

Tags: नानासाहेब गोरे राष्ट्र सेवा दल नरहर कुरुंदकर भाऊसाहेब रानडे राम नगरकर Raja Mangalwedhekar राजा मंगळवेढेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी