डिजिटल अर्काईव्ह

निव्वळ पाच हजार रुपये सुरुवातीचे भांडवल जमवून सुरू केलेल्या या संस्थेची वार्षिक उलाढाल आता 130 कोटींच्या पलीकडे गेलेली आहे. ग्राहक चळवळीची मुहूर्तमेढ तर अपना बाजार ने रोवलेलीच आहे. त्याच बरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचे भानही ही संस्था विसरलेली नाही. संस्थेतर्फे 'दादासाहेब सरफरे आरोग्यसेवा' या आघाडीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेऊन वेळोवेळी मोफत किंवा अल्प किमतीत आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात.

मागील आठवड्यात मुंबईमध्ये अशी एक घटना घडली की जिची नोंद मुंबईमधील सर्व वृत्तपत्रांना घ्यावीच लागली. मुंबईच्या ग्राहक चळवळीतील एक अग्रगण्य संस्था, मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी मंडळ या संस्थेचा सुवर्णमहोत्सव आणि त्या निमित्ताने पंतप्रधान श्री. इंदरकुमार गुजराल यांनी मुंबईला दिलेली भेट, ही घटना निश्चितच महत्त्वाची होती. या भेटीच्या निमित्ताने या संस्थेची आणि तिने चालविलेल्या 'अपना बाजार' या ग्राहक दुकानांच्या साखळीची ओळख मुंबईकरांना अधिक जवळून व्हावी हा इष्ट योगायोगच समजला पाहिजे. आज अर्थजगतामध्ये वाहणाऱ्या वैश्विकीकरणाच्या वाऱ्यांमुळे खाजगीकरणाची भाषा सर्रास बोलली जात आहे. वातावरणात केंद्रित अर्थकारणाची हवा भरून राहिली आहे. या वादळात टिकून राहून स्वतःच्या कर्तृत्वाची ग्वाही देत ज्या अगदी मोजक्या सहकारी संस्था उभ्या आहेत त्यांत मुंबई कामगार या संस्थेचा क्रमांक फार वरचा आहे. 

अपना बाजार म्हणून जरी या संस्थेला सर्वसामान्यपणे ओळखले जात असले तरी तिची मूळ मातृसंस्था मुंबई कामगार ग्राहक सहकारी मंडळ ही आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी नायगावमध्ये स्प्रिंग मिल आवारातील एका झाडाखाली 'नायगाव कामगार' या नावाने या ग्राहकसंस्थेची स्थापना झाली. कै. दादासाहेब सरफरे आणि त्यांचे काही सहकारी यांनी या प्रयोगाची सुरुवात केली. त्या वेळी नायगाव हे समाजवादी कार्यकर्त्यांचे मोहोळ होते आणि संघर्षाबरोबरच विधायक प्रवृत्तीकडे ओढ असणारे अनेक कार्यकर्ते नायगावमध्ये होते. 1948 साली स्थापन झालेल्या या कामगार सहकारी ग्राहक संस्थेचा पसारा एक धान्य व किराणा दुकानापासून पुढे वाढत गेला. त्या वेळी मुंबईत अन्यत्रही अशी छोटया छोटया सहकारी संस्थांची दुकाने होती. पण 1956  साली रेशनिंग उठविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यामुळे ही बहुतेक सर्व दुकाने डबघाईला आली. त्या वेळी नायगावमध्ये खंबीरपणे पाय रोवून उभे राहिलेल्या 'नायगाव कामगार’ ने या संस्थांना आधाराचा हात दिला आणि त्या संस्थांची दुकाने चालवायला घेतली. 

त्यातूनच 'नायगाव कामगार’ चे रूपांतर 'मुंबई कामगार ग्राहक सहकारी मंडळ' या संस्थेत झाले. प्रथमतः ही सर्व दुकाने मुख्यतः धान्य व कापड या दोन वस्तूंच्या विक्रीपुरतीच मर्यादित होती. त्यात स्थिर झाल्यावर संस्थेने औषध विक्रीच्या सहकारी क्षेत्रात प्रवेश करून औषधांची दुकाने सुरू केली आणि ही दुकाने चोवीस तास उघडी राहतील अशी व्यवस्था केली. 1968 साली संस्थेचे 'अपना बाजार' हे सकल वस्तू भांडार (सुपर मार्केट) सुरू झाले. मुंबईत तरी त्या वेळी सहकारी तत्वावर चाललेले हे एकमेव सकल वस्तू भांडार होते. विशेषतः या भांडारात अंगीकारलेले स्वयंसेवा तत्व जसजसे यशस्वी होऊ लागले आणि विविध प्रकारच्या मालाचा दर्जा जसजसी राखला जाऊ लागला तसतशी अपना बाजारच्या नावाची कीर्ती पसरू लागली. आज मुंबईत अपना बाजारच्या पाच शाखा निघालेल्या आहेत, रत्नागिरी व हडपसर येथे दोन भांडारे आहेत. अट्टावीस दुकाने, दहा फिरती दुकाने एवढा मोठा पसारा वाढला आहे. 

याशिवाय दूध वितरण, चाळीसगाव येथील डेअरी प्रकल्प, डाळी, मसाले, लोणची यांचा तळोजा येथील प्रकल्प आणि नव्या मुंबईतील बेकरी इत्यादी सेवाही या संस्थेतर्फे सुरू झाल्या आहेत. निव्वळ पाच हजार रुपये सुरुवातीचे भांडवल जमवून सुरू केलेल्या या संस्थेची वार्षिक उलाढाल आता 130  कोटींच्या पलीकडे गेलेली आहे. ग्राहक चळवळीची मुहूर्तमेढ तर अपना बाजार ने रोवलेलीच आहे. त्याच बरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचे भानही ही संस्था विसरलेली नाही. संस्थेतर्फे 'दादासाहेब सरफरे आरोग्यसेवा' या आघाडीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेऊन वेळोवेळी मोफत किंवा अल्प किमतीत आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे व्याख्यानमाला आयोजित करून अनेक विषयांची माहिती ग्राहकांना आणि हितचिंतकांना करून देण्यातही ही संस्था मागे राहिलेली नाही. या शिवाय साहित्यजत्रा, ग्रंथप्रसार असे लोकसेवेचे बहुविध उपक्रम या संस्थेतर्फे चालू ठेवण्यात आलेले आहेत. 

एका लहानशा बीजाचे एका महावृक्षात रूपांतर होण्यासाठी येथील कार्यकर्त्यांची अजोड निष्ठा, परिश्रम, उत्साह कारणीभूत झाले आहेतच, पण त्या शिवाय अपना बाजारला बाबूराव गोड, गजानन खातू आणि पांडुरंग कांबळी यांच्यासारखे जे सरव्यवस्थापक लाभले त्यांचाही अपना बाजारची एक एक वीट रचण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे हे येथे नमूद केलेच पाहिजे. विशेषतः श्री. गजानन खातू यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने विस्ताराची जी झेप घेतली ती उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे श्री. पांडुरंग कांबळी यांनी ग्राहक व सहकारी चळवळीतील तज्ज्ञ म्हणून विदेशातही मिळविलेली मान्यता अभिनंदनीय आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'अपना बाजार अशोक मेहता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रीसर्च' नावाचा एक शैक्षणिक प्रकल्प जुलैपासून सुरू करण्याचे संस्थेने ठरविले आहे. 

व्यवस्थापनाच्या क्षेत्रात दर दिवशी निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देता यावे या दृष्टीने या संस्थेचा अभ्यासक्रम आखण्यात आलेला आहे. यामध्ये गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाचाही समावेश करण्यात आला आहे. जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना आणि सार्वजनिक क्षेत्र आकुंचित होत चालले असताना सर्वसामान्य माणसांचे हितरक्षण करणे फक्त सहकारी चळवळीलाच शक्य आहे, हे अपना बाजारने दाखवून दिले आहे. संस्थेचे अनेक संस्थापक आणि जुने सेवक आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्या जागी आलेल्या नवीन मंडळींचा दृष्टिकोन घडविण्याचे काम आता उरलेल्या जुन्या मंडळींना करायचे आहे. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या अनेक सहकारी संस्थांमधून भ्रष्टाचाराचे बुडबुडे वर येत असताना अपना बाजारसारखी संस्था पन्नास वर्षे चालून आणि विस्तार होऊनही निष्कलंक राहते हे या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे मोठेच यश आहे.

Tags: अपना बाजार  चाळीसगाव पांडुरंग कांबळी गजानन खातू  बाबूराव गोड Apana Bajar Chalisgoan Pandurang Kambali Gajanan Khatu Baburao God weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी