डिजिटल अर्काईव्ह

माझे पती डॉ. वसंतराव गायकवाड यांना मिसाखाली बेमुदत, विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यांचा गुन्हा एकच आणि तो म्हणजे जातीयतेविरुद्ध त्यांनी मांडलेला उभा दावा.

महाराष्ट्राच्या नकाशात अकोला जिल्ह्यातील पांगरीकुटे हे गाव बरेच प्रसिद्धीस पावले आहे.

डॉ. वसंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या गावातील दलितांनी आपल्या न्याय हक्कांसाठी निकराचा लढा दिला आणि त्यापायी जे जे सोसावे लागले ते धैर्याने सोसले.

आणीबाणी ही दुबळ्या समाजघटकांचा कितीही कळवळा दाखवीत अवतरली असली तरी तिचे ते पूतनाप्रेम डॉ. वसंत गायकवाड यांच्यासारख्यांमुळे उघड्यावर पडले आहे!

दलितांचे न्याय्य हक्क पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हामुळे डॉ. वसंत गायकवाड व त्यांचे सहकारी मिसा- बंदी बनवले गेले आहेत आणि त्यांचे न्याय हक्क नाकारणारे मात्र उजळ माथ्याने मिरवत आहेत.

गत वर्षी डॉ. गायकवाड विवाहबद्ध झाले. त्यांच्यासारख्या धगधगत्या अंगाराशी लग्न करायला करारी शकुंतलाबाई तयार झाल्या. पाच जूनला त्यांनी एक पत्र पाठवले.

त्यात त्या लिहितात, ‘’माझे पती डॉ. वसंतराव गायकवाड यांना मिसाखाली बेमुदत, विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यांचा गुन्हा एकच आणि तो म्हणजे जातीयतेविरुद्ध त्यांनी मांडलेला उभा दावा. आज त्यामुळे माझी अगदी अगतिक अवस्था झाली आहे. नुकतीच मी बाळंतीण झाल्यामुळे माझी परिस्थिती फार नाजूक झाली आहे. अशा स्थितीत तुमच्यासारख्या सहृदय मित्रांना साद घालण्याखेरीज मला गत्यंतर नाही. मला काही मदत पाठवू शकलात तरी मी फार आभारी होईन.’’

त्यांचा पत्ता त्यांनी पत्रात दिला आहे तो असा:

श्रीमती शकुंतला गायकवाड, मु.कोयाळी (दहातोंडे) पो. सोमठाणा, ता. मेहेकर, जि. बुलडाणा.

तातडीची मदत म्हणून त्यांना दोनशे रुपये पाठवण्यात आले आहेत.

श्रीमती शकुंतलाबाई गायकवाड या मातेने फोडलेला हा आर्त टाहो एकच एक नाही. 

असे अनेक टाहो देशभर ऐकू येत आहेत.

या मातांना आणि बालकांना अशा हालअपेष्टा भोगाव्या लागाव्या हे आपल्या संस्कृतपणाला एक लांछन आहे. या मंडळींची दीर्घकालीन काही व्यवस्था करता आली तर उत्तमच, पण निदान अशा आपत्प्रसंगी तरी त्यांच्या साह्याला धावून जाता आले पाहिजे.

हेबियस कॉर्पसच्या सुनावणीचा हक्क छिनावला गेला नसता तर डॉ. वसंत गायकवाड व त्यांच्यासारखे हजारो कार्यकर्ते तुरंगाच्या बाहेर येऊ शकले असते.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी