डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

''भ्याडपणा आणि हिंसा या दोहोंमधून मला निवड करायची झाली तर मी हिंसा पत्करीन. तरीही अहिंसा ही हिंसेपेक्षा श्रेष्ठ, क्षमा ही शिक्षेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे अशी माझी धारणा आहे. क्षमा हा योद्ध्याचा अलंकार आहे. जेव्हा शिक्षा देण्याचे सामर्थ्य असते तेव्हा त्यापासून दूर राहणे ही खरी क्षमाशीलता होय. दुर्बलाने क्षमेची भाषा करणे म्हणजे मांजराच्या तोंडात सापडलेल्या अर्धमेल्या उंदराने मांजराला क्षमा केली असे म्हणण्यासारखेच आहे."

वेदांच्या अपौरुषेय सामर्थ्यावर माझा विश्वास नाही. बायबल, कुराण, झेंद अवेत्सा यांचेही सामर्थ्य वेदांच्या इतकेच आहे, असा माझा विश्वास आहे. हिंदू धर्मग्रंथांवरील माझा विश्वास दृढ असला तरी त्यांतील प्रत्येक वाक्य अथवा शब्द अपरिवर्तनीय आहे, दैवी आहे असे मला वाटत नाही. किंवा या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास भी पुरेपूर केलेला आहे आणि त्यांतील सर्व ज्ञान मी आत्मसात केले आहे असाही माझा दावा नाही. परंतु या ग्रंथातील शिकवणुकीचे सार मात्र मला समजले आहे. त्यांतील सत्य मला उमजले आहे अशी माझी खात्री आहे. पण त्यांतील तर्क आणि नैतिकता यांच्याशी विसंगत असलेल्या कोणत्याही स्पष्टीकरणाचे बंधन, मग ते कितीही विद्वत्तापूर्ण असो, मी स्वीकारणार नाही. माझ्या विचाराप्रमाणे हिंदू धर्म हा केवळ वेगळा, एकटा असा धर्म नाही. त्यामध्ये जगातील सर्व प्रेषितांच्या उपासनेला वाव आहे. रूढार्थाने तो प्रचारक धर्म नाही. त्यामध्ये आतापर्यंत अनेक समूह किंवा पंथ सामावले गेले असले तरी त्यांच्या समावेशाबरोबर त्याचे स्वरूप अधिक विकसनशील आणि तरल बनलेले आहे. हिंदू धर्म प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार उपासनेसाठी मार्गदर्शन करतो आणि म्हणूनच सर्व धर्मांशी त्याचे शांततापूर्ण सहजीवन असते. 

(यंग इंडिया, 6 ऑक्टोबर 1921)

---

कायदेभंगाच्या चळवळीत सामील होऊ पहाणाऱ्यांनी प्रथम कायद्यांचे स्वतःहून आणि आदरपूर्वक पालन केलेले असले पाहिजे. बहुदा कायद्याचे पालन हे आपल्याकडून तो मोडला गेला तर त्यामुळे होणाऱ्या शिक्षेच्या भीतीपोटी होते. विशेषतः ज्या कायद्यांचे पालन नैतिकतेला बांधलेले नाही, त्यांच्या बाबतीत हे विशेष होते. उदाहरणार्थ, एखादा प्रामाणिक, प्रतिष्ठित माणूस चोरी करणार नाही पण तो वाहतुकीचे नियम सहजपणे मोडू शकतो - विशेषतः त्यासाठी शिक्षेचा धाक नसेल तर, सत्याग्रहासाठी अपेक्षित अशा अनुशासनात हे बसत नाही. समाजाचे कायदे सत्याग्रह्याकडून जाणीवपूर्वक आणि स्वयंप्रेरणेने पाळले जातात, कारण ते त्याचे पवित्र कर्तव्य आहे हे तो जाणत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती कायद्यांचे पालन इतक्या काटेकोरपणे करते तेव्हाच तिला कायद्यातील चांगले-वाईट किंवा न्याय्य-अन्याय्य ठरविण्याचा अधिकार प्राप्त होतो, तेव्हाच एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कायदेभंग करण्याचा निर्णय घेण्यास ती पात्र ठरते. जनतेला हा निकष न लावता मी सत्याग्रहाच्या चळवळीत ओढले, ही माझी हिमालयाएवढी मोठी चूक झाली.

(चौरीबुन्याच्या संदर्भात, आत्मकथेतून)

---

भ्याडपणा आणि हिंसा या दोहोंमधून मला निवड करायची झाली तर मी हिंसा पत्करीन. 1908 साली माझ्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर माझ्या मुलाने मला विचारले होते की, तो जर त्या ठिकाणी उपस्थित असता तर त्याने काय करायला हवे होते? मला मरणाच्या दारात सोडून त्याने तेथून पळ काढणे हे योग्य की आपले सर्व सामर्थ्य एकवटून आणि जरूर पडल्यास हिंसा स्वीकारून प्रतिकार करीत मला वाचविणे हे योग्य? तेव्हा मी त्याला सांगितले की, हिंसा पत्करूनही मला वाचविणे, हे त्याचे कर्तव्य होते. बोअर युद्ध, झुलूंचे बंड किंवा 1914 च्या महायुद्धात मी काम केले ते याच भूमिकेने. म्हणून ज्यांचा हिंसेवरच विश्वास आहे त्यांच्यासाठी शस्त्रशिक्षण आवश्यक आहे असे मला वाटते. भारताने स्वतःचा सन्मान राखण्यासाठी शस्त्रसज्ज व्हावे असे मी म्हणेन, कारण भ्याडपणाने अगर शरमिंदे होऊन स्वत:च्या अपमानाचे हिंदी जनतेने साक्षी होणे हे मला केव्हाही नामंजूर आहे. तरीही अहिंसा ही हिंसेपेक्षा श्रेष्ठ, क्षमा ही शिक्षेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे अशी माझी धारणा आहे. क्षमा हा योद्ध्याचा अलंकार आहे. जेव्हा शिक्षा देण्याचे सामर्थ्य असते, तेव्हा त्यापासून दूर राहणे ही खरी क्षमाशीलता होय. दुबलाने क्षमेची भाषा करणे म्हणजे मांजराच्या तोंडात सापडलेल्या अर्धमेल्या उंदराने मांजराला क्षमा केली, असे म्हणण्यासारखेच आहे. 

(आत्मकथेतून)

---

माझ्या सर्व म्हणण्याचे सार असे की, माणसाने त्याच्या खऱ्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हावे. त्याच्याकडे हा संयम नसेल तर त्याची चाल विनाशाच्या दिशेने होईल. थेंबाथेंबाने बनणाऱ्या अथांग सागरासारखे हे जग व्यक्तीव्यक्तीने भरलेले आहे, हे सत्य तर सर्वज्ञातच आहे... 
आज ज्या परिस्थितीत आपल्या देशातील खेडी आहेत त्याच परिस्थितीत ती राहावीत असे माझे मुळीसुद्धा मत नाही. माझ्या मनात एका आदर्श खेड्याचे स्वप्न आहे.... त्या खेड्यातील माणसे हुषार आहेत. शहाणी आहेत. जनावरांप्रमाणे घाण आणि काळोख यांत रहाणारे ते लोक नाहीत. तेथील स्त्री-पुरुष स्वतंत्र आहेत आणि कोणत्याही गोष्टीला तोंड देण्यास समर्थ आहेत. या खेड्यात रोगांच्या साथी नाहीत; कोणी आळशी, निरुद्योगी नाही किंवा कोणी खुशालचेंडूही नाही. इथे प्रत्येकाला श्रमदान करूनच जीवनाला हातभार लावावा लागेल.

...जर गावागावांत वीज आली तर तिच्या साहाय्याने गावक-यांनी आपली अवजारे, हत्यारे चालविण्यास माझा विरोध नाही; फक्त गावात राखीव कुरणे असतात त्याप्रमाणे गावाच्या मालकीची वीज उत्पादक केंद्रे निर्माण करण्याची जबाबदारी जनतेने अथवा शासनाने घेतली पाहिजे. आदर्श ग्राम निर्मितीच्या चळवळीतील शिक्षण हे खेडयांइतकेच शहरातील लोकांसाठीही महत्त्वाचे आहे.

(‘हरिजन’ मधून)

Tags: हरीजन भवन महात्मा गांधीं Harijan Bhavan Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके