मामांची जिव्हाळ्याने भरलेली पत्रे हा अनेकांच्या जीवनातला एक ठेवा बनला आहे. ही पत्रे कधीकाळी एकत्र झाली तर त्यातूनही मामांची एक हृद्य अशी प्रतिमा उभी राहील. मामांच्या अमृत महोत्सवप्रसंगी विदर्भातील दोन शाळांनी आचार्यकुलाच्या संकल्पनेप्रमाणे शिक्षणाचे प्रयोग करण्याचे ठरवले आहे. ह्या गोतावळ्यात इतर शाळा सामील झाल्या तर तेजस्वी शिक्षणाची नवी पहाट उदयाला येईल. मामांचा अमृत महोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील अर्ध शतकातील सत्कार्याचाच गौरव आहे. अशी मंडळी बहुत असावी, एवढीच या समयी मनकामना!
श्री मामा क्षीरसागर यांचा अमृत महोत्सव आज साजरा होत नाहे. मामांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे आणि त्यांचा चैतन्यदायी मधुर सहवास असाच लोकांना व विशेषतः मुलांना मिळावा, ही सदिच्छा. मामा म्हणजे दृढ स्वातंत्र्यनिष्ठा, मामा म्हणजे प्रखर राष्ट्रीय वृत्ती, मामा म्हणजे दलित-पीडितांचा उमाळा, मामा म्हणजे ऋजुता आणि मामा म्हणजे भगिनींचा कैवार. महाराष्ट्रात आचार्यकुलाची कल्पना सर्वत्र पोहोचावी म्हणून मामांनी किती खटपट केली! नोकरशाहीचा जाच आणि संघटित सौदेबाजी यांच्या चिमट्यात अडकलेले शिक्षण मुक्त व्हावे, ही मामांची तळमळ. आचार्य हा ज्ञाननिष्ठ, विद्यार्थिनिष्ठ व मूल्यनिष्ठ असावा, त्याचबरोबर तो निर्भय, निर्वैर व निष्पक्ष असावा. अवघा समाजच शिक्षणात सामावला जावा, असे मामांनाही वाटते व तसा अहर्निश प्रयत्न ते करीत असतात. त्यांचे स्वतःचे जीवन हे या बाबतीत घडा घालून देण्याइतके निर्मळ आहे.
म. गांधींच्या सत्याग्रह चळवळीत शिक्षण सोडून मामा सामील झाले. 'की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने' असे ज्यांना म्हणता येईल अशा मंडळींपैकी मामा हे एक. गोवा विमोचनाच्या चळवळीत मामा निर्धाराने सामील झाले, कारण गोव्याचे पारतंत्र्य म्हणजे भारतीय स्वातंत्र्यातील अपूर्णता, असे त्यांना वाटत होते. मामांची शाळा बिनभिंतीची आहे आणि अनौपचारिक शिक्षणाची मामा ही साक्षात पाणपोयी आहेत. त्यांचे सहज बोलणे हा हितोपदेश असतोच, पण नित्य नवे शिकण्याइतके त्यांचे मन उमदे आहे. मामांनी आपल्या प्रासादिक वाणीने कितीतरी जीवने उजळून टाकली आहेत. गीते म्हणताना मामा मंत्रमुग्ध करतात आणि बोलतात तेव्हा त्यांचे शब्द तळमळीने नुसते ओथंबलेले असतात. मामांना अहंता व आळस यांचा जराही स्पर्श झालेला नाही. आज वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरदेखील त्यांचा चाललेला कर्मयोग विस्मयचकित करतो.
डोळ्यांनी थोडे कमी दिसत असल्याने त्यांच्या संचारावर आता काही मर्यादा आली असली तरी त्यांचा कर्मयोग सतत चालू असतो आणि त्यांचा कर्मयोग हा निष्काम कर्मयोग आहे. ‘निज कामना कुछ भी नहीं है सब समर्पण इस को' असे ते जयप्रकाशांप्रमाणेच सहज म्हणू शकतील. मामांचा पिंड हा एका वेगळ्या उन्नत अर्थाने आध्यात्मिक आणि धार्मिक आहे. जीवनमूल्यांबाबत ते सतत जागरूक असतात आणि त्यामुळे आणीबाणीमुळे ते बेचैन झाले, एवढेच नव्हे तर त्या निमित्ताने जिवलगांच्या तुटीही त्यांना सहन कराव्या लागल्या. विनोबांबद्दल त्यांना अनन्य अशी निष्ठा, पण आणीबाणीबाबतची त्यांची भूमिका मामांना मान्य झाली नाही. त्यांची निष्पक्षता, मूल्यांबाबत निष्पक्षता राखण्याइतक्या पराकोटीला कधी पोहोचली नाही.
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे ते सतत पक्षपातीच राहिले. सामाजिक आणि आर्थिक न्याय हा त्यांना अध्यात्मपोषक वाटत आला आणि त्या चळवळीच्या अंगानेच ते सदैव उभे दिसले. अंधेरीच्या साधकाश्रमात त्यांनी जो प्रवेश केला तो केवळ शरीराने केलेला प्रवेश नव्हता वा ती क्षणिक ऊर्मीदेखील नव्हती. सर्वार्थाने त्यांनी साधकाश्रम स्वीकारला आणि कोठेही असले तरी ते साधकाश्रमात वास्तव्य करून असतात. दर्यापूरला प्रबोधन विद्यालय त्यांनी स्थापन केले आणि नावारूपाला आणले, कोल्हापूरला ग्राम सेवाश्रम चालवून त्यांनी जाती, धर्म, वंश, भाषा, स्त्री-पुरुष असा भेदभाव न मानणारे भारतीय नागरिकत्व ग्रामीण तरुणांत रुजवले. माधानच्या कस्तुरबा केंद्राला मामा हा एक अक्षय आधार वाटत आला आहे. भूदान ग्रामदान आंदोलनात ते अपार कष्टले.
कोरगावकर ट्रस्टचे कार्यवाह म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. महाराष्ट्रातील सद्भावनाप्रेरित अनेक लहानथोर मंडळींशी मामांचा घनिष्ठ संबंध आला. मामांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या अनेक विधायक संस्था आहेत. मामांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक गौरवग्रंथ संपादित करण्यात आला असून त्याचेही प्रकाशन आज नागपूरला आचार्य दादा धर्माधिकारी आणि अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या साक्षीने होत आहे. अडीचशे पानांच्या ग्रंथाची दोनशे पाने विविध शैक्षणिक प्रश्नांची चर्चा करणाऱ्या लेखांनी व्यापली असून पन्नास पानांत मामांच्या जीवनासंबंधी अण्णांनी लिहिलेले आहे. मामांसारख्यांचे जीवन हाच एक उद्बोधक जिवंत ग्रंथ असतो आणि त्यातले पान न् पान हे प्रेरक असते. मामांचा गोतावळा फार मोठा आहे आणि त्या सर्वांची इच्छा या अमृत महोत्सवाप्रसंगी मामांच्या जीवनाचे दर्शन व्हावे अशी होती. शेवटी भैयाजी वैद्य यांनी मामांच्या पाठीस लागून त्यांच्या जीवनयात्रेचे टिपण लिहावयाला त्यांना भाग पाडले. ग्रंथाचा हा भाग फार मोलाचा असा आहे. अर्थात मामांसारख्या मंडळींना जीवनाची हाक अशी उत्कट असते की असे काही लिहिण्यासाठी कागद-कलम घ्यायला त्यांना फुरसतच नसते. त्यातून स्वतःबद्दल लिहिताना त्यांना किती अवघडल्यासारखे झाले त्याची कल्पना त्यांच्या जीवनयात्रेवरून सहज येते. मामांसारखी माणसे म्हणजे अनेकांना मोठाच दिलासा असतो. अशा मंडळींनी मामांसंबंधी आपल्या आठवणी नोंदवल्या तर त्यांचाच एक मोठा ग्रंथ होईल. मामांची जिव्हाळ्याने भरलेली पत्रे हा अनेकांच्या जीवनातला एक ठेवा बनला आहे. ही पत्रे कधीकाळी एकत्र झाली तर त्यातूनही मामांची एक हृद्य अशी प्रतिमा उभी राहील. मामांच्या अमृत महोत्सवप्रसंगी विदर्भातील दोन शाळांनी आचार्यकुलाच्या संकल्पनेप्रमाणे शिक्षणाचे प्रयोग करण्याचे ठरवले आहे. ह्या गोतावळ्यात इतर शाळा सामील झाल्या तर तेजस्वी शिक्षणाची नवी पहाट उदयाला येईल. मामांचा अमृत महोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील अर्ध शतकातील सत्कार्याचाच गौरव आहे. अशी मंडळी बहुत असावी, एवढीच या समयी मनकामना!
Tags: अमृत महोत्सव अलौकिक व नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व मामा क्षीरसागर व्यक्तिपरिचय Amrit Mahotsav Supernatural and Selfless Personality Mama Kshirsagar Personality weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या