इंदिरा गांधींची एकाधिकारशाही चालू असताना डोळे मिटून सुखाने शेवटचा श्वास घेण्याची नामी संधी त्यांना आली होती, पण त्या वेळी त्यांनी ती साधली नाही आणि आता पंचाऐंशी उलटल्यावर त्यांना म्हातारचळ लागल्यासारखी हुकूमशाहीची अवदसा आठवली आहे! अशा महाभागांपासून देशाचे रक्षण होईल तो सुदिन म्हणायचा!
राष्ट्रपती श्री संजीव रेड्डी यांनी राजाजी जन्मशताब्दीच्या प्रसंगी केलेले भाषण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पदावर आरूढ झालेल्या माणसाला शोभण्यासारखे नव्हते. जाहीर सभांतून भाषणे करताना त्यांच्यासारख्यांनी तरी अधिक संयम राखणे आवश्यक आहे. संजीव रेड्डी हे मुळात राजकारणी, पण राष्ट्रपतिपदी आरूढ झाल्यानंतर त्यांना आता रोज वारेमाप भाषणे करता येत नाहीत, तेव्हा जेव्हा केव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांचे दबलेले विचार असे बांध फोडून वाहू लागतात. अशा व्यक्तीने आपल्या पदातून निवृत्त होणे श्रेयस्कर होय. तर राजाजी जन्मशताब्दी सोहळ्यात हे राष्ट्रपती म्हणाले की, राजीनामा देण्याचा मंत्र्यांचा संकल्प त्यांना तडीस नेता येत नाही! ज्या राष्ट्रपतींना आपला राजवाड्यातून छोट्या घरात राहायला जाण्याचा साधा संकल्प सिद्धीस नेता आला नाही त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाला असे सांगायला हवे होते की उपलब्ध घरांपैकीच एकादे घर मला तुम्ही राहायला द्या, नवे राष्ट्रपतिभवन बांधण्याची गरज नाही आणि हे होत नसेल तर दुसरा राष्ट्रपती पाहा. एवढेसुद्धा ज्यांना जमले नाही त्यांनी मंत्र्यांवर तोंडसुख घेणे निरर्थक आहे. हेच राष्ट्रपती तामिळनाडूत गेले असताना असेच अफाट बोलले होते. मंत्र्यांच्या मुलांच्या लीलांबद्दल त्यांनी उल्लेख केला व ‘कामराज अविवाहित होते हे त्यांचे भाग्य!’ असे ते उद्गारले होते.
मंत्र्यांच्या मुलांचे, सगेवाल्यांचे पारिपत्य करता न येण्याइतके राष्ट्रपती दुर्बल असतील तर एक तर त्यांनी गप्प बसावे किंवा आपली गादी सोडावी मंत्र्यांच्या सग्यासोयऱ्यांवर साध्या गुन्हेगारी कायद्याप्रमाणे खटले भरण्याला आडकाठी कसली आहे? राष्ट्रपतिपदाला अशोभनीय वक्तव्ये करीत त्या पदाला चिकटून राहण्याऐवजी आपल्या अधिकारांचा त्यांनी एक तर वापर करावा किंवा आपले पद सोडून सामान्य माणसाला असलेले टीकेचे स्वातंत्र्य त्यांनी संपादन करावे! इकडे संजीव रेड्डींचा हा प्रकार, तर तिकडे माजी राष्ट्रपती श्री वराहगिरी व्यंकटगिरी गिरी यांचा दुसरा प्रकार! लोकशाहीने मिळालेले राष्ट्रपतिपद या सद्गृहस्थांनी उपभोगले, एवढेच नव्हे तर ययातीप्रमाणे हे पद पुन्हा उपभोगण्याची त्यांची वासना सुटली नाही, निवृत्त राष्ट्रपतिपदाच्या सुखसोयी जे खुशाल उपभोगतात त्यांना हुकूमशाहीचे डोहाळे सुचावे हे आश्चर्य नव्हे काय? हुकूमशाही असेल तरच निवृत्त राष्ट्रपतिपदाचे लाभ मी स्वीकारीन, नाही तर ते मला नकोत, असे म्हणण्याची काही या माजी राष्ट्रपतींची तयारी नाही! लोकशाही जर या देशाच्या दृष्टीने इतकी निरर्थक या मंडळींना वाटत असेल तर राष्ट्रपती असताना त्यांना ती सहज गुंडाळून ठेवता आली असती. घटनात्मकदृष्ट्या त्यांना तर अधिकार होता; पण त्या वेळी लोकशाही राष्ट्राचे राष्ट्रपती म्हणून यांनी सगळे मानमरातब उपभोगले आणि आता यांना हे तत्त्वज्ञान सुचते आहे. गिरींना लोकशाही मार्गाने हुकूमशाही यायला हवी आहे! पंतप्रधानांचा रबरी शिक्का म्हणून वागलेल्या गिरींना हुकूमशाहीतील चमचांना मिळणाऱ्या फायद्यांची माहिती असल्याने त्यांना हे नवे तत्त्वज्ञान सुचले आहे आणि या सद्गृहस्थांची इच्छा काय, असे काही घडलेले पाहण्याइतके आपण जगावे! इंदिरा गांधींची एकाधिकारशाही चालू असताना डोळे मिटून सुखाने शेवटचा श्वास घेण्याची नामी संधी त्यांना आली होती, पण त्या वेळी त्यांनी ती साधली नाही आणि आता पंचाऐंशी उलटल्यावर त्यांना म्हातारचळ लागल्यासारखी हुकूमशाहीची अवदसा आठवली आहे! अशा महाभागांपासून देशाचे रक्षण होईल तो सुदिन म्हणायचा!
Tags: हुकूमशाही राष्ट्रपतिपद राजकीय स्फुट dictatorship presidency political rhetoric weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या