डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या निवडणुकीत नातेनूरी निवडून आले तरी त्यांना खातमी यांच्याबरोबर अटीतटीची लढत यावी लागेल असे मोठमोठया राजकीय अभ्यासकांचे आणि पाश्चात्त्य मुत्सद्यांचे मत होते. खातमी यांच्या अनपेक्षित आणि प्रचंड विजयामुळे या सर्व अंदाजांना धक्का तर लागलाच आहे आणि मुस्लिम समाजातील सत्तेजवळ असलेल्या मौलामालवीचे महत्त्वही या नवीन राजवटीत कमी होणार आहे.

इराणमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत इराणचे पूर्वीचे सांस्कृतिक मंत्री मोहंमद खातमी हे भरघोस बहुमताने विजयी झाले आहेत. मोहंमद खातमी हे सुधारणावादी समजले जात असल्यामुळे त्यांच्या विजयामुळे इराणमधील कट्टर धर्मवादी समाजव्यवस्थेला मोठाच धक्का पोहोचला आहे. इराणमधील संसदेचे सभापती अली अकबर नातेनूरी हे खातमी यांच्याविरुद्ध अध्यक्षपदासाठी उभे होते. नातेनूरी हे कडवे मुस्लिमपंथी असून इराणमधील धार्मिक राजसत्तेचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या पराभवामुळे धार्मिक दवाबाखाली असलेल्या राज्यव्यवस्थेला असलेला जनतेचा विरोध स्पष्ट झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सध्याचे अध्यक्ष अकबर हाशमी रफसजानी हे निवृत्त होत आहेत. इराणचे अध्यक्ष म्हणून ते अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर दोन वेळा निवडून आले. 

कायद्याप्रमाणे एक व्यक्ती दोनपेक्षा अधिक वेळा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभी राहू शकत नसल्यामुळे आठ वर्षानंतर ते सत्तेपासून दूर होत आहेत. 1979 साली खोमेनी यांनी इराणचे शहा यांना इराणबाहेर हुसकून लावले आणि मूलतत्त्ववादी इस्लामी राजवटीचा पाया घातला. आधीचे राज्यकर्ते शहा हे अमेरिकाधार्जिणे होते आणि त्यांनी इराणला अद्यायावत बनविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराला उधाण आले. संतप्त जनतेने नंतर हद्दपार केलेल्या खोमेनींना परत बोलावून शहांना देशत्याग करणे भाग पाडले. पण खोमेनींच्या काळात देशाची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्याप्रमाणे झाली. आधुनिक आणि सुधारलेल्या देशाला खोमेनिंनी मध्ययुगीन मुस्लिम मूलत्त्वादी काळात परत नेले. 

खोमेनीच्या धर्मवादाला विरोध करणारे देशोदेशी पांगले आणि त्यांनी अमेरिका व इतर देशांत आश्रय घेतला. स्त्रियांवर जाचक बंधने लादली गेली. या सर्वांचा परिणाम म्हणून जनतेच्या मनात असंतोष खदखदत राहणे साहजिकच होते. म्हणून या निवडणुकीत नातेनूरी निवडून आले तरी त्यांना खातमी यांच्याबरोबर अटीतटीची लढत यावी लागेल असे मोठमोठया राजकीय अभ्यासकांचे आणि पाश्चात्त्य मुत्सद्यांचे मत होते. खातमी यांच्या अनपेक्षित आणि प्रचंड विजयामुळे या सर्व अंदाजांना धक्का तर लागलाच आहे आणि मुस्लिम समाजातील सत्तेजवळ असलेल्या मौलामालवीचे महत्त्वही या नवीन राजवटीत कमी होणार आहे. खातमी यांच्या मवाळ धोरणांमुळे आणि उदार दृष्टिकोनामुळे इराणमध्ये परिवर्तनाचे नवे युग निर्माण होईल आणि इराणी जनतेला अधिक खुलेपणाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके