डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

शांतिवन येथे लोकप्रतिनिधी प्रशिक्षण मेळावा

श्रीमती सुरेखा दळवी यांचे ‘मानवी क्षमता विकास, अनुसूचित जातीजमाती व स्त्रियांचा विकास’ यावरील सखोल आणि माहितीपूर्ण विवेचन हे दुपारच्या सत्राचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विकासाच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदु माणूस असला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

रायगड जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग यांनी नुकताच शांतिवन (नेरे, ता. पनवेल) येथे डॉ.पी.व्ही मंडलिक ट्रस्ट, मुंबई व शांतिवन यांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधी प्रशिक्षण मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरणाचा सोहळा रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते झाला. 

या मेळाव्याला जिल्ह्यातील मान्यवर, पत्रकार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मेळाव्याला उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या 250 हून अधिक होती. मात्र खेदाची गोष्ट अशी की या अडीचशेपैकी महिलांची संख्या अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमतेम 7-8 होती. 

महिलांच्या या अनुपस्थितीमागचे कारण समजावून घेऊन त्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचार करण्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवली. मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीकांत देशपांडे यांनी केले. ते म्हणाले की, ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधींनी आपले अधिकार आणि कर्तव्ये जाणून घेऊन त्यांचा विधायक उपयोग केल्यास पंचायत राज्याच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेले विकेंद्रीकरण प्रत्यक्षात येऊ शकेल.

प्रत्यक्ष मार्गदर्शनाची सुरुवात श्री. नवनीतभाई शहा यांनी केली. ‘पंचायत राज्य संस्थांचे अधिकार व विकासातील भूमिका’ हा विषय त्यांनी घेतला. आपल्या घटनेने लोकशाही विकेंद्रीकरणाचा अधिकार दिलेला आहे. प्रत्यक्षात मात्र तो अधिकार मिळायला 40 वर्षे जावी लागली. या अधिकाराची जपणूक करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे, हा मुद्दा त्यांनी सविस्तर मांडला.

डॉ. मुकुंद महाजन यांनी ‘गावपातळीवरील नियोजन’ याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. महाजन अनौपचारिक ‘शिक्षण राज्य साधन केंद्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन- पुणे’ या संस्थेचे मानद संचालक आहेत. शेरोशायरीची पखरण करीत, गंगावतरणासारख्या पौराणिक कथेचा दाखला देत त्यांनी सरकारी योजनांचा सुयोग्य वापर मनुष्यबळ, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा उपयोग काटेकोरपणे व्हायला हवा, त्यातून भांडवलनिर्मिती व्हायला हवी आणि या प्रक्रियेत संपूर्ण गाव सहभागी झाले पाहिजे, हे खुमासदार शैलीत सांगितले.

श्रीमती सुरेखा दळवी यांचे ‘मानवी क्षमता विकास, अनुसूचित जातीजमाती व स्त्रियांचा विकास’ यावरील सखोल आणि माहितीपूर्ण विवेचन हे दुपारच्या सत्राचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विकासाच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदु माणूस असला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

श्री. तेलखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड यांनी ग्रामसभेचे महत्त्व सांगून तिच्या तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली. ग्रामसभा प्रत्यक्ष गावकऱ्यांची झाली पाहिजे, कागदावरील नुसत्या सह्या नकोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर शंकासमाधानाचा कार्यक्रम झाला. शिबिरार्थींनी कायदा तसेच इतर तांत्रिक बाबीसंबंधी अनेक शंका, प्रश्न विचारले. श्री. नवनीतभाई, शहा यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.

मुख्य मेळाव्याच्या अनुषंगाने एक विज्ञान प्रदर्शन (जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांनी भरवलेले) व एक विक्रीकेंद्र होते. या विक्रीकेंद्रात शांतिवन पुनर्वसन केंद्रात विणलेल्या सतरंज्या, ताज्या भाज्या, रायगड जिल्ह्यातील महिला गटांनी तयार केलेल्या विविध खाद्य वस्तू, सुकी मासळी, ताजी, सुकी आळंबी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. 

डॉ. मंडलिक ट्रस्टने या केंद्रावर आपले ग्रामपंचायतविषयक साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. या सर्व पुस्तिकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. भोजनाच्या वेळात तर या स्टॉलवर झुंबड उडाली होती. यावरून अशा प्रकारच्या साहित्याची किती गरज आहे, याची पुनश्च जाणीव झाली. सकाळी शिबिरार्थींची नोंदणी करतेवेळी लोकप्रतिनिधींना एकेक प्रश्नावली दिली होती, परतताना त्यांनी ती भरून द्यायची होती. 

लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची, प्रबोधन साहित्याची गरज वाटते का, असा एक प्रश्न या प्रश्नावलीत होता. शिबिरार्थीनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले आहे. मेळाव्यात घेतलेली गाणी हे या मेळाव्याचे आणि एक खास वैशिष्ट्य! हा लोकप्रतिनिधी मेळावा जिल्हा परिषदेने भरविला होता. जिल्हा परिषदेच्या कलावंत शिक्षक-शिक्षिकांनी अतिशय बहारदार साभिनय गाणी सादर केली. श्री. गवाडे गुरुजींचा उत्साह तर तरुणांना लाजवील असा होता. 

शाहीर लीलाधार हेगडे खास या कार्यक्रमासाठी मुंबईहून आले होते. आपल्या बुलंद आवाजात गावच्या नेत्यांसंबंधी पेश केलेला त्यांचा ‘फटका’ लोकप्रतिनिधींना बरेच काही सांगून गेला. समारोपापूर्वी एक रंगतदार संवाद झडला. एका हातात दारूची बाटली, दुसऱ्या हातात बेचकी, डोक्याला रुमाल बांधलेला कातोडया (कातकरी) आणि त्याने रात्री प्रौढ शिक्षक वर्गाला यावे, असे सांगणारी कार्यकर्ती- ‘दारू पिऊ नको, शिक्षण घे, कुटुंब मर्यादित ठेव. अशा नाना गोष्टी आणि त्यावरचे कातोड्याचे कातकरी भाषेतले जवाब इतके उत्कृष्ठ वठले. 

हे प्रारूप सादर करणारे पाटील पतीपत्नी जिल्हा परिषदेच्या शिक्षक वर्गापैकीच! श्री. देशपांडे पूर्णवेळ मेळाव्याला उपस्थित होते आणि गाण्यात त्यांचा सक्रीय सहभाग होतात. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शांतिवनाचे विश्वस्त श्री. रामभाऊ मोहाडीकर यांनी केले आणि आभार श्री. गोविंदराव शिंदे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वसंत नाचणे यांनी केले.

Tags: गावपातळीवरील नियोजन प्रबोधन डॉ. मंडलिक ट्रस्ट लोकप्रतिनिधी प्रशिक्षण मेळावा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके