डिजिटल अर्काईव्ह

शंभरीच्या दिशेने ‘शिवदर्शन’ ची वाटचाल

दुसऱ्या दिवशी गोपुरीचा रम्य परिसर सोडावा लागला. कार्यक्रम मालवणला होता. मालवणच्या राष्ट्र सेवा दल शाखेने कार्यक्रम घेतला होता. कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.

उन्हाळ्यात ठिकठिकाणी झालेले व लोकप्रिय ठरलेले कार्यक्रम

मे महिन्यात राष्ट्र सेवा दल कलापथकाने शिवदर्शनचे एकूण दहा प्रयोग सादर केले.

दि. 1 मे रोजी शिवदर्शनचा प्रयोग मालाड येथे झाला. त्यानंतर दि. 2 रोजी सेंच्युरी रेयॉन फॅक्टरीत प्रयोग सादर करून कलापथकाचे पन्नास कलाकार दि. 4 मे रोजी दौऱ्यावर निघाले.

त्या दिवशी रात्री पुण्याला साने गुरुजी स्मारकावर मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कलापथकाने पुणे सोडले आणि ठरल्याप्रमाणे दुपारी 1 वा. इचलकरंजी उत्सव समितीतर्फे कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ह्यापूर्वी इचलकरंजी येथे भरलेल्या साहित्य संमेलनात शिवदर्शनाचा प्रयोग झाला होता. त्यावेळी सुमारे दहा हजार लोक कार्यक्रम पहाण्यास जमले होते. ह्या वेळीही सुमारे पंधरा हजार लोक कार्यक्रम पाहाण्यास आले. गर्दी प्रचंड झाल्यामुळे सर्वांना बसण्यासाठी जागा अपुरी पडली. कार्यक्रम सुरू झाला तरी सर्व स्थिरस्थावर करण्यातच कार्यकर्त्यांचा अर्धा तास वेळ खर्ची पडला. नंतर मात्र पूर्ण शांतता. कार्यक्रम पाहून इचलकरंजीकर तृप्त झाले. आणखी एक निमंत्रण शिवदर्शनला मिळाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी इचलकरंजीहून कलापथक साताऱ्याला गेले. तेथे रिमांड होमच्या मदतीसाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमास श्रीमती सुमित्राबाई भोसले आल्या होत्या. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलल्या कार्यक्रम अतिशय आवडल्याचे त्यांनी सांगितले. मनात आले, कार्यक्रम खरोखरच आवडला असेल तर महाराजा शिवाजी प्रतिष्ठानतर्फे त्या अनेक ठिकाणी शिवदर्शनाचे प्रयोग सहज घडवून आणू शकतील!

साताऱ्याहून दि. 7 रोजी कऱ्हाडला पोचलो. सेवा दलाची मित्रमंडळी आमची वाट पहात थांबली होती. गाठीभेटी झाल्या. रात्री कार्यक्रम उत्तम झाला. कऱ्हाडमधील सेवा दलातील मित्रांच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी झाला. ह्या मुक्कामात अधिकाररूढ पक्षातील अनेक लोकही भेटून गेले. त्यांना आणीबाणीचे राजकारण पसंत नाही. त्यांनी साधनेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.

साताऱ्याहून कलापथक चिपळूणला आहे. गेल्या वर्षी चिपळूणला कार्यक्रम झाला असूनही त्यावर्षी तेथील सेवादल शाखेने पुन्हा कार्यक्रम घेतला. प्रयोग हाउस फुल्ल गेला.

त्यानंतर कलापथकाने रातोरात चिपळूण सोडले व पहाटे कणकवलीला आले. तेथे आप्पासाहेब पटवर्धनांच्या गोपुरीत मुक्कामाची व्यवस्था होती. दुसऱ्या दिवशी स्थानिक शाळेच्या मदतीसाठी कार्यक्रम झाला. इतका सुंदर कार्यक्रम कणकवलीत तोपर्यंत झाला नाही, असे अनेक लोकांनी येऊन सांगितले.

दुसऱ्या दिवशी गोपुरीचा रम्य परिसर सोडावा लागला. कार्यक्रम मालवणला होता. मालवणच्या राष्ट्र सेवा दल शाखेने कार्यक्रम घेतला होता. कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.

दि. 10 मे रोजी सकाळी कलापथकातील सेवादल सैनिक सिंधुदुर्ग पाहून आले. दुपारी मालवण सोडले आणि कलापथकाने सावंतवाडी गाठली. सावंतवाडीलाही राष्ट्र सेवा दल शाखेने प्रयोग घेतला होता. वाडीच्या लोकांना कार्यक्रम अतिशय आवडला. प्रयोग पाहण्यास न आलेले लोक एका आगळ्या आनंदाला मुकले असे भेटणारे सांगत होते.

सावंतवाडी रातोरात सोडली. पहाटे राधानगरीहून गाडी पुढे आली आणि गाडीच्या मोटारच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. सर्व जण शिस्तीत खाली उतरले. बायोनेट उघडले तर एकदम आग भडकली! मागील गाडीच्या माणसाने येऊन बॅटरीपासून वायर अलग केली. मुलांनी माती आणि पाणी मारून आग विझवली. ह्या सर्व प्रकरणात दोन तास गेले. गाडी पुन्हा सुरू झाली. कोल्हापूर गाठले. गाडी दुरुस्तीला नेली. गाडीचे वायरिंग जळालेच नव्हते. बायोनेटचे रबर आणि रबर-पॅकिंग जळले होते!

कोल्हापूर दुपारी सोडले आणि सायंकाळी पुण्यास आलो. पुण्याला साने गुरुजी स्मारकावर समाजवादी महिला सभेतर्फे शिबिर सुरू झाले होते. रात्री मुक्काम स्मारकावर झाला. सकाळी स्मारक सोडले. आता स्मारकावरील रावसाहेब पटवर्धन विद्यालयाची इमारत डोळ्यांत भरण्याइतकी बांधून तयार झाली आहे.

दि. 13 मे रोजी सकाळी कलापथकाने पुणे सोडले आणि दुपारी मुंबईत दाखल झाले. आता उरला फक्त नगरचा कार्यक्रम. त्यासाठी दि. 16 मे रोजी सकाळी पुन्हा मुंबई सोडली. दुपारी नगरला जेवायला पोचायचे होते, परंतु घाटामध्ये एक ट्रक आडवा पडल्याने वाहतुकीत खोळंबा झाला. घाटात तीन तास वाया गेले. मग पुण्याला जेवण घेणे आले. शेवटी नगरला सायंकाळी सहाला सर्वजण पोचले. स्थानिक कार्यकर्ते चिंतेत होते. कलापथक नगरात दाखल झाल्यावर ते खुशीत आले. रात्री कार्यक्रम अत्युत्तम झाला. हाउस फुल्ल होते. कार्यकर्ते म्हणाले की आता पुण्यापर्यंत जरी खेळ आला तरी नगरला एक टाकाच. आम्ही तयार आहोत.

असा हा दौरा यशस्वी झाला. शिवदर्शनचे आतापर्यंत नव्वद प्रयोग पार पडले.

Tags: राष्ट्र सेवा दल राष्ट्र सेवा दल कलापथक Rashtra Seva Dal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी