डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारताचे माजी उपराष्ट्रपती न्या. हिदायतुल्ला यांच्या निधनामुळे एक थोर कायदेपंडित आणि सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

भारताचे माजी उपराष्ट्रपती न्या. हिदायतुल्ला यांच्या निधनामुळे एक थोर कायदेपंडित आणि सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. केंब्रिज विद्यापीठातून एम.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बॅरिस्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. इंग्लंडमध्ये असताना हिदायतुल्ला यांच्यावर उदारमतवादाचे आणि बुद्धीवादाचे जे संस्कार झाले त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण झाली. नागपूरमध्ये वकिली व्यवसाय, पूर्वीच्या सी. पी. अँड बेरार राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशी विविध पदे त्यांनी भूषविली. 

1979 मध्ये उपराष्ट्रपतिपदापर त्यांची बिनविरोध निवड झाली. ते उपराष्ट्रपती असताना मुंबईतील विधानभवनासमोरील म. ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन त्यांनी केले त्या वेळी केवळ औपचारिक भाषण न करता हिदायतुल्ला यांनी म. फुले यांच्या विचारांवर मार्मिक भाष्य केले आणि 'संस्कारक्षम वयात जर मी म. फुले यांचे विचार वाचले व ऐकले असते तर माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले असते,' असे भावपूर्ण उद्गार काढले.

हिदायतुल्ला हे बंडखोर नव्हते परंतु परंपरेच्या शृंखला मात्र त्यांच्या मनाने तोडल्या होत्या. मरणानंतर त्यांच्या इच्छेनुसार विद्युतदाहिनीत त्यांचे दहन करण्यात आले, हे याचेच द्योतक आहे. हिदायतुल्ला हे वागण्यात ऋजू आणि त्याचबरोबर तत्त्वांच्या बाबतीत तडजोड न करणारे होते. अशा बुद्धिमान आणि चारित्र्यवान व्यक्तींच्यामुळेच सार्वजनिक जीवनाचा स्तर उंचावतो आणि म्हणूनच हिदायतुल्ला यांचे निधन वृद्धापकाळी झाले तरी हळहळ वाटते.

Tags: हळहळ म. फुले काळाच्या पडद्याआड थोर कायदेपंडित न्या. हिदायतुल्ला weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके