डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘शुकशकुन’ला कवि यशवंत पुरस्कार

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्रकवि यशवंतांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी कवि यशवंत पुरस्कार दिला जातो. यशवंतांच्या कुटुंबीयांनी साहित्य परिषदेकडे यासाठी जमा केलेल्या निधीतून हा पुरस्कार नवोदित मराठी कवीला आणि त्याच्या कवितेला उत्तेजन म्हणून देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी कवि नरेंद्र बोडके यांची निवड करण्यात आली. साधना प्रकाशनाने अलीकडेच त्यांचा ‘शुकशकुन' हा पुरस्कारप्राप्त संग्रह मोठ्या देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्रकवि यशवंतांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी कवि यशवंत पुरस्कार दिला जातो. यशवंतांच्या कुटुंबीयांनी साहित्य परिषदेकडे यासाठी जमा केलेल्या निधीतून हा पुरस्कार नवोदित मराठी कवीला आणि त्याच्या कवितेला उत्तेजन म्हणून देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी कवि नरेंद्र बोडके यांची निवड करण्यात आली. साधना प्रकाशनाने अलीकडेच त्यांचा ‘शुकशकुन' हा पुरस्कारप्राप्त संग्रह मोठ्या देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. 

कवि यशवंतांच्या जन्मदिनी, 9 मार्चला हा पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पोतदार यांच्या हस्ते कवि नरेंद्र बोडके यांना प्रदान करण्यात आला. सुरुवातीला परीक्षकांच्या वतीने आपले विचार मांडताना श्री. संतोष शेणई यांनी सांगितले, “नरेंद्र बोडके गोव्याचे आणि मी कोकणातला. म्हणजे लाल माती आणि हिरवी कांती असा हा आमचा शेजार आहे. 

यंदाच्या पुरस्कारासाठी परीक्षक काम करताना, आम्ही सर्व या नात्याने रसिकांचे प्रतिनिधी आहोत ही भावना सतत आमच्या मनात होती. म्हणूनच परीक्षक म्हणून केवळ रसिकतेची कसोटी आम्ही लावली आणि एकमताने 'शुकशुकन’ची निवड केली. आज निरनिराळी सोंगे घेऊन कवितेच्या गावाला जाणे ही गोष्ट प्रतिष्ठित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही एका अस्सल कवितेचा गौरव करतो आहोत.” 

पुरस्कार वितरणानंतर कवीने आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “यशवंतांच्या नावाने असलेला हा पुरस्कार मला मिळणे हा माझ्यादृष्टीने एक भाग्याचा योग आहे. परंपरा आणि नवता यांना एकमेकांना वंदन करण्याची संधी या पुरस्काराने मिळाली. आयुष्यातली अनेक स्थित्यंतरे, अवस्थांतरे यांमधून माझी कविता मार्गक्रमण करीत राहिली. या सर्व काळामध्ये माझ्यामधला प्रश्नकर्ता सतत जिवंत राहिला. आयुष्यातल्या अनुभवांना छेद देत असताना त्याने मला सतत जागे ठेवले. आता माझ्या पुढील आयुष्यातल्या सिंदबादच्या आणखी एका सफरीसाठी हा पुरस्कार मला आधार देईल, माझे मनोबल वाढवील.” 

समारंभाच्या अध्यक्षा अनुराधा पोतदार यांनी सांगितले की, या पुरस्काराच्या निमित्ताने ह्या कवीशी माझा नव्याने परिचय होतो आहे. शब्दांच्या पृष्ठभागावर दिसणारी कविता वरवर जाणवते त्यापेक्षा अधिक आत कुठेतरी दडलेली असते. 

ही कविता मला आवडली, माझ्या मनाला भिडली. कवीच्या परिपक्वतेचा आणि प्रगल्भतेचा आविष्कार या संग्रहातील कवितांतून जाणवतो. ऐंद्रिय अनुभवांबरोबरच इतरही अनुभव ही कविता समर्थपणे व्यक्त करते. कवितेतल्या प्रतिमा सर्वस्वी कवीच्याच असाव्यात असा प्रत्यय येतो. भविष्यकाळातही या कवीकडून अशीच अनुभवसमृद्ध कविता लिहिली जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. समारंभाचा समारोप परिषदेचे कार्यवाह गं. ना. जोगळेकर यांनी केला. 

यशवंत पुरस्काराचे मानकरी नरेंद्र बोडके यांचे साधना परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!

Tags: नरेंद्र बोडके अनुराधा पोतदार कवयित्री मराठी कवी मराठी कवी शुकशकुन साहित्य महाराष्ट्र कवि यशवंत पुरस्कार Narendra Bodke Anuradha Potdar Poet Marathi Poet Shukshakun Liturature Maharashtra Yashwant Award weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके