डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हा अंक तुमच्या हातात पडेल तेव्हा गोव्याला दर वर्षी 20 ते 30 नोव्हेंबर या काळात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडलेला असेल. शंभराहून जास्त देश, जवळपास तीनशे चित्रपट आणि हजारांमध्ये प्रेक्षक. सलग अकरा दिवस. सिनेमाचा हा वार्षिक उत्सव म्हणजे चित्रपटप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. या पहिल्या लेखात केवळ काही निरीक्षणं-

गाडी पणजीत शिरली आणि क्षणात आपण या शहरापासून दूर गेलेलोच नव्हतो असं वाटलं. मधलं वर्ष जणू पुसून गेलं होतं. मागच्या पानावरून पुढे चालू तसं मागच्या महोत्सवापासून पुढे चालू अशी काहीतरी भावना मनात आली. आयनॉक्सच्या आवारात शिरल्यानंतरही तेच. कालच तर आपण इथे चार सिनेमे पाहिले, त्यावर चर्चा केली, वाद घातला, तिकिटांसाठी असलेली रांग पाहून वैतागलो. आजपासून पुन्हा सगळं तेच करायचंय. दिवसाला किमान तीन सिनेमे पाहायचे आहेत, संयोजनामधले दोष पाहून करवादायचं आहे. जे जे गेल्या वर्षी केलं ते ते सगळं पुन्हा या वर्षीही करायचं आहे. मग मधलं वर्ष पुसून गेलं तर नवल ते काय? स्वाभाविकच, पणजीत शिरताक्षणी मी गोव्याची झाले. किंवा, चित्रपट महोत्सवातल्या जगाचा एक भाग झाले असं म्हणू या हवं तर.

संध्याकाळ झाली आणि दर वर्षीप्रमाणे रस्त्यावर दुतर्फा लावलेल्या रोषणाईने डोळे दिपून गेले. मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये चित्रपट महोत्सव होतो, पण त्यासाठी अख्खं शहर असं नटत नाही. पणजी लहान शहर आहे हे खरंच, पण तरीही जिथे जावं तिथे चित्रपट महोत्सवाची चिन्हं दिसतात. हायवेवरून शहरात शिरल्यापासून ते जवळजवळ मिरामारपर्यंत रस्ता झगमगू लागतो. आयनॉक्सपासून कला अकादमीपर्यंत चालत जाताना इन्स्ट्रुमेंटल संगीत कानावर पडतं. या वर्षी हवेत प्रचंड उकाडा होता, घामाने अंग थबथबत होतं पण तरीही प्रसन्न वाटत होतं.

पुढचे अकरा दिवस हे माझं जग होतं. नेहमीच्या रुटिनपासून दूर, विविध देशांतल्या विविध संस्कृतींच्या जगात आता डोकवायचं होतं. हे सिनेमांचं जग होतं. मात्र, याचा अर्थ, काहीच बदललं नव्हतं असा नाही. महोत्सवाला येणाऱ्या प्रतिनिधींसाठी गेल्या वर्षीपर्यंत 300 रुपये असणारं शुल्क या वेळी थेट एक हजार रुपये इतकं केलं होतं. त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होती. त्याचा थेट परिणाम हव्या त्या सिनेमांची तिकीटं फारसा त्रास न घेता मिळण्यावर झाला. (संयोजनातला ढिसाळपणा कायम होताच. थिएटरच्या बाहेर तिकीट असणाऱ्यांची लांबच लांब रांग लागलेली असतानाही, सिनेमा सुरू व्हायला पंधरा मिनिटं राहिल्यावरच लोकांना आत सोडायचा संयोजकांचा हट्ट न कळण्यासारखा होता. त्यामुळे अनेकदा तिकीट असूनही काळोखात थिएटरमध्ये शिरावं लागायचं. पण ते असो). परदेशी पाहुण्यांची संख्या कमी वाटली, पण ती कसर गोव्यातल्या स्थानिकांनी भरून काढल्याचं जाणवत होतं. कधी नव्हे एवढं कोंकणी कानावर पडत होतं.

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात व्हायला लागला त्याला अकरा वर्षं झाली आहेत. हळूहळू वेगळ्या, जागतिक पातळीवरच्या सिनेमांचा आस्वाद घेणारे गोवेकर वाढू लागले आहेत. पणजीत फिल्म ॲप्रीसिएशनचे कोर्सेस होतात, फिल्म मेकींगची वर्कशॉप्स असतात, एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी)चा तर हा महोत्सव भरवण्यामध्ये दिल्लीइतकाच सहभाग असतो. पण तरीही सुरुवातीला स्थानिक लोकांचा उत्साह हा जत्रेसारखा असायचा. फूटपाथवर लागलेले स्टॉल्स आणि रस्त्यावरची रोषणाई पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस विशेषत: शनिवारी आणि रविवारी तूफान गर्दी व्हायची. इतकी की आयनॉक्सपासून कला अकादमीपर्यंत चालत जायचं असेल तर त्या गर्दीतून वाट काढणं मुश्कील व्हायचं. फूटपाथवर लावलेल्या पोस्टर्सबरोबर फोटो काढून घेण्यात थोरा-मोठ्यांपासून सगळे दंग झालेले दिसत. पण ही धमाल करताना, ज्या कारणासाठी आपलं शहर सजलंय त्या सिनेमांबाबतची उत्सुकता फार कमी जाणवायची. आता ती परिस्थिती बदलू लागलीये. या वर्षी तरी तसं जाणवलं. जत्रा कमी झाली होती आणि त्यातल्या कमी असतील, पण काही जणांना तरी थिएटरमध्ये डोकवावंसं वाटू लागलं होतं.

पहिल्या दिवसापासून चांगले सिनेमे हाती लागणं  अपवादात्मक असतं. हे वर्ष तसं होतं. सर्वसाधारणपणे तीस किंवा पस्तीस सिनेमे बघितले जातात. त्यापैकी दहा ते बारा चांगले असावेत, चारेक उत्कृष्ट असावेत आणि एक किंवा दोन अप्रतिम असावेत अशी अपेक्षा असते. ती पूर्ण झाली तर गुणवत्तेच्या निकषावर महोत्सव सफल झाला, असं विधान थेट करता येतं. या वर्षी (हा लेख लिहीपर्यंत) मास्टरपीस म्हणता येईल असा एकही सिनेमा मला सापडलेला नसला, तरी चांगल्या सिनेमांची संख्या खूप जास्त आहे. (इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, सगळ्यांना सगळे सिनेमे पाहाता येत नाहीत. आपण जे सिनेमे बघतो त्यावरच आपलं मत बनत असतं).

इफ्फीमध्ये जाणवलेलं एक वेगळेपण म्हणजे पोलिसांची असलेली गर्दी. यापूर्वी आयनॉक्सच्या आवारात पोलिस इतक्या मोठ्या प्रमाणावर फिरताना कधीच दिसले नव्हते. त्याचं कारणही स्पष्ट होतं. उद्‌घाटनाच्या दिवशीच भर कार्यक्रमात अरुण जेटलींच्या विरोधात एफटीआयआयच्या दोन विद्यार्थ्यांनी पत्रकबाजी केली. त्यांना पोलिसांनी पकडून नेलं. आणि पोलिस बंदोबस्तात ताबडतोब वाढ झाली. या मुलांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल झाले. त्यांना न्यायालयात हजर   करण्यात आलं. आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे महोत्सवाच्या ठिकाणी चक्क 144 कलम लावलं गेलं. पाच किंवा अधिक माणसं एकत्र जमू शकत नाहीत असं सांगणारं कलम! जिथे केवळ माणसांची गर्दी असणं अपेक्षित होतं अशा ठिकाणी!! नाराजीचा किंचितही सूर आपण अजिबात सहन करू शकत नाही, असं गोव्याचं सरकार सांगत होतं.

गोष्ट इथेच संपली नाही. एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या काही मुलांना इफ्फीमध्ये प्रवेश नाकारला गेला. डॉक्युमेंटरी विभागात एफटीआयआयच्या एकाही विद्यार्थ्याची फिल्म यावेळी निवडण्यात आलेली नव्हती. हट्टाने मग या मुलांनी आपला एक स्वतंत्र महोत्सव आयोजित केला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आणि माध्यमांनी त्याची दखलही घेतली.

यातल्या काही मुलांनी ‘सेव्ह एफटीआयआय’ एवढंच लिहिलेले बॅजेस लावून महोत्सवामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. पण तेवढाही विरोध सरकारला चालणार नव्हता. महोत्सवाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी असा बॅज लावलेल्या दोन मुलांना पोलिसांनी अडवलं. बॅज काढा नाही तर कारवाई करू, इथून बाहेर काढू, अशी दटावणीची भाषा पोलीस बोलू लागले. ही मुलं आरडाओरडा करत नव्हती, घोषणाबाजी करत नव्हती की कोणत्याही कार्यक्रमात वा फिल्म स्क्रिनिंगमध्ये अडथळा आणत नव्हती. तरीही पोलीस ऐकायला तयार नव्हते. वादावादी सुरू झाली, गर्दी वाढली. काही पत्रकार मध्ये पडले. एकाने पोलिसांना विचारलं, ‘सेव्ह टायगर्स’ असं लिहिलेले बॅजेस लावून कोणी आलं तरीही तुम्ही त्यांना अडवणार का? मग या मुलांना का अडवताय? पोलिसांपाशी उत्तर नव्हतं. पण आपल्या ताकदीचा माज निश्चितच होता.

आपल्या संविधानाने लोकशाही मार्गाने निषेध करण्याचा हक्क आपल्याला दिलाय, असं सांगितल्यानंतरही त्यांना मागे हटायचं नव्हतं. ही मुलं गोंधळ घालणार नाहीत याची खात्री काय, असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा मात्र जमलेल्यांना हसावं की रडावं हे कळेना. घातला गोंधळ तर पकडा की त्यांना, इतकं साधं उत्तर होतं. तुम्ही पण त्यांच्यातले आहात का, असंही एका इन्स्पेक्टरने गुर्मीत विचारलं. ‘त्यांच्यातलं असायची गरज नाही, आम्हाला त्यांचं पटलं किंवा नाही पटलं तरी त्यांच्या निषेधाचा अधिकार कसा कोणी अमान्य करू शकणार?’ हे उत्तरही त्या वर्दीतल्या मंडळींच्या पचनी पडत नव्हतं. शेवटी संयोजकांपैकी काही आले. ते मध्ये पडले आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. एफटीआयआयची मुलं त्यांचे बॅजेस लावून फिरताना दिसू लागली. या वादावादीचा परिणाम असा झाला की, त्यांनी आपल्याकडचे आणखी काही बॅजेस वाटले आणि सुरुवातीला ‘सेव्ह एफटीआयआय’ असं सांगणारी केवळ पाच सहा मुलं दिसत होती तो आकडा फुगला.

एका दुपारी आयनॉक्सच्या आवारात टाकलेल्या बाकड्यांवर बसून जेवताना एक तरुण मुलगा म्हणाला, ‘भारतातला सेक्युलॅरिझम खरं तर इथे अनुभवायला मिळतो. संस्कृती रक्षणाच्या नावाने गळे काढणाऱ्या मंडळींनी हे वातावरण एकदा अनुभवायला हवं.’ अगदी खरं होतं हे म्हणणं. इथे येणाऱ्या प्रत्येकाचा धर्म म्हणजे सिनेमावरचं प्रेम हा असतो. सिनेमावर चर्चा करताना कोणाला एकमेकांची ओळख लागत नाही, की जातपात विचारण्याची गरज भासत नाही. अठरा वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंत आणि त्याहून अधिक वयाची माणसं मित्र असल्यासारखी गप्पा मारताना दिसतात. दर वर्षी किंगफिशर बीयरचा स्टॉल आयनॉक्समध्ये असतो. तिथे कायम गर्दी असते. सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत. बीयर पिणाऱ्या मुला-मुलींविषयी कोणी जजमेंटल होत नाही. कोणी कोणाची छेड काढताना दिसत नाही. लहान-मोठं असा भेदभाव करताना दिसत नाही. यातले सगळे जण आपल्या एरवीच्या सामाजिक आयुष्यात समानता पाळत असतीलच असं विधान करणं कदाचित थोडं धाडसाचं ठरेल, पण इथे मात्र चित्र वेगळं असतं. कारण इथे येणाऱ्यांवर जगभरच्या सिनेमांचे संस्कार होत असतात. हा सिनेमा पाहायचा, स्वीकारायचा तर संकुचित असून चालणारच नाही. तो आपल्याला वैश्विक दृष्टिकोन देतो. माणसा-माणसांतल्या नात्यांमधला गुंता दाखवतो. राजकारणाविषयी बोलतो. समाजकारण उलगडतो. इतिहास सांगतो. बरे-वाईट अनुभव देतो. आपल्याला समृद्ध करतो. आपल्या राज्यकर्त्यांना चित्रपट महोत्सवाची ही बाजू समजते का?

(पुढच्या तीन अंकांत काही चांगल्या आणि महत्त्वाच्या सिनेमांविषयी)

Tags: चित्रपट महोत्सव गोवा मीना कर्णिक चित्रपट महोत्सव काय देतो? इफ्फी : 2015 Film Festival Goa Meena Karnik Chitrapat Mahotsav kay deto? IFFI:2015 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके