डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुढची चाळीस वर्षं तुमची आहेत. आयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की, आजचं हे जग मला मान्य नाही. जशा जगात मी जन्माला आलो, तशा जगात मी मरणार नाही. हे जग मी बदलून जाईन. माझं आयुष्य खूप अमूल्य आहे. पैशांसाठी मी माझं आयुष्य विकणार नाही, मी भोगला जाणार नाही. मी जेव्हा विकायला तयार होतो, तेव्हा मी भोगला जातो. मी माझ्या जीवनाला एक हेतू, एक प्रयोजन प्रदान करेन. जिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन. जिथे गरज नाही तिथे गर्दी करून मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही.

माझ्या युवा मित्रांनो,

तुमचा जन्म 1990 च्या आसपास झाला. त्याच वेळी ग्लोबलायझेशन आलं. भारतात उदारीकरण झालं. तुमच्यासोबत-सोबतच हे नवं परिवर्तन वाढलं. आज त्याचे अनेक चांगले परिणामही दिसत आहेत. पूर्वी महाराष्ट्रातल्या तरुणांना भाकरी आणि नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती. एकदा बी.ए., बी.कॉम. झालं की कुठे तरी शिक्षक होणं, बँकेत किंवा पोस्टात क्लार्क होणं आणि रिटायर झाल्यावर पुण्यात दोन खोल्यांचा फ्लॅट घेणं, पेन्शन घेणं अन्‌ पर्वतीला चकरा मारता-मारता एक दिवस मरून जाणं. महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाचं हे स्वप्न होतं.

आज तुम्हाला माधुकरी मागावी लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन, असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. तुमच्या खिशात मोबाईल आहे, कानात हेडफोन आहे आणि तुमच्या हातात लॅपटॉप आहे. जगात कुठेही जाण्याचा तुमच्यात आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास तुम्हालाच नाही, तर बारा हजार किलोमीटर  पार करून अमेरिकेपर्यंत तुमचा दरारा पसरला आहे. थॉमस फ्रीडमनने लिहिलं आहे, ‘आज अमेरिकेतील आई- वडिलांना आपल्या मुलांना सांगावं लागतं... अरे, मुलांनो अभ्यास करा, नाही तर भारतातली मुलं तुमचे जॉब्ज्‌ घेऊन जातील.’ जागतिक सुपरपॉवर तुम्हाला घाबरते, एवढा बदल गेल्या वीस वर्षांत झाला आहे. ही महाराष्ट्रातली, भारतातली नवी सुपरपॉवर कशी जगते आहे?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पहिल्याच पानावर त्रिवेंद्रमची एक ठळक बातमी आली होती. सुजित कुट्टन नावाचा एक तरुण मुलगा व त्याची आई या दोघांचा हसरा फोटो आणि बातमीची हेडलाईन- ‘केप्ट इन डार्क अबाउट हिज फादर्स डेथ, ही रेसेस टू विन.’ त्रिवेंद्रममध्ये प्रांतपातळीच्या शर्यती आयोजित केल्या आहेत. सुजित हा धावपटू आहे. तो जिंकण्यासाठी तयारी करतोय. त्याचे वडील हार्ट ॲटॅकने हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आहेत. शर्यतीदरम्यान मन विचलित होऊ नये म्हणून त्याला त्यांच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आली नाही. तो रेसमध्ये धावला आणि त्याने रेस जिंकली. विजयी सुजित कुट्टनचा हसरा चेहरा पाहिला आणि मला प्रश्न पडला- सुजित कुट्टनचे वडील आयसीयूमध्ये जेव्हा एकटे मरत असतील, तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? सुजितने कुठे असायला हवं होतं? तो कशासाठी धावत होता? ते पदक जिंकून त्याने काय मिळवलं?

आपण सगळेच सुजित कुट्टन आहोत. आपलं काही तरी मरतंय आणि आपण मात्र रेस धावतो आहोत. कशासाठी?

‘‘राजू को कितने मिले?’’

आपलं जीवन कसं झालं आहे? मूल जन्माला येतं. दोन-तीन वर्षांचं नाही झालं, तर चांगल्या केजीमध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरू होते. तिथे निवडप्रक्रिया आहे. लहान मूल पुरेसं हुषार आहे की नाही याची खात्री करायला मुलाची परीक्षा होते. चांगल्या रीतीने त्याने परीक्षा द्यावी, म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला ट्युशन लावली. इथून स्पर्धा सुरू होते. चांगली शाळा, चांगले मार्क, चांगली नोकरी... टीव्हीवर एक जाहिरात पाहिली. मुलगा धावत घरी येतो. म्हणतो, ‘आई, आई, आज परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळाले!’ ती म्हणते, ‘लेकिन राजू को कितने मिले?’ त्या आईला मुलाच्या आनंदाचा मागमूसही नाही. ‘या स्पर्धेत तू कितवा आहेस?’ एवढाच तिला प्रश्न.

आज ही स्पर्धा आपल्या मागे कायमची लागली आहे. जी मित्रालादेखील शत्रू म्हणून बघते, तिला स्पर्धा असे म्हणतात. जी ‘मलाच सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे’ असं म्हणते, तिला स्पर्धा असे म्हणतात. आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन स्पर्धामय झालंय. पुढे चांगली नोकरी पाहिजे, चांगला पगार व प्रमोशन मिळालं पाहिजे. यश मिळालं पाहिजे. समाजामध्ये चांगलं स्थान मिळालं पाहिजे. चांगला पगार मिळाला की चांगलं दोन मजली घर मिळालं पाहिजे. यश मिळालं की एक बायकोदेखील हवी. एक चांगली बायको किंवा चांगला नवरादेखील कमवावा लागतो. तेदेखील एक पझेशन. हे करता आलं की, एखादी फॉरेन टूर करावी वाटते. कॉम्पिटिशन किंवा कन्झमशन हेच जर सगळं जीवन असेल, तर आपल्या जीवनाला काय अर्थ उरला? असं झालं, तर जीवन एक सजा ठरेल.

जर अख्खं जीवन सजा असेल, तर मृत्यू हीच त्यातून सुटका व आत्महत्या हीच त्यातून पळवाट. जर आत्महत्या करायची नसेल तर माणसाला उत्तर शोधलंच पाहिजे की, मी जगतो कशासाठी? मी माझ्या जीवनाचा हेतू शोधला पाहिजे. ती माझी जबाबदारी आहे.

जीवनाचं प्रयोजन

व्हिक्टर फ्रँकेल नावाचा एक मानसरोगतज्ज्ञ होता. तो जर्मन होता, ज्यू होता. म्हणून तो जर्मनीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कैदी होता. तिथे भयंकर छळ चालायचा. सुटण्याची आशा नाही. त्या छळाला त्रासून दर दोन-चार दिवसांनी एखादा कैदी आत्महत्या करायचा. व्हिक्टर फ्रँकेल मानसरोगतज्ज्ञ होता. त्याच्या लक्षात यायला लागलं की, आपल्याही मनात आत्महत्येचे विचार हळूहळू यायला लागलेत. तो शोधायला लागला की, मी हा आत्महत्येचा विचार कसा थांबवू? इतर कैदीही आत्महत्येचे विचार करताहेत, त्यांचे विचार कसे थांबवू? व्हिक्टर फ्रँकेलला असं आढळलं की- जगण्यासाठी एक अपूर्ण स्वप्न, करायचं जीवनकार्य शोधलं-फुलवलं की जगण्याला प्रयोजन प्राप्त होऊन आत्महत्येचा विचार दूर होतो. त्याचं ‘मॅन्स सर्च फॉर मीनिंग’ हे सुंदर पुस्तक आहे. त्यात तो एक कळीचं वाक्य लिहितो- ‘दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट द हाउ ऑफ लिव्हिंग.’ मी का जगतो याचं उत्तर ज्यांना सापडलं, त्यांना कसं जगावं हा प्रश्न सतावत नाही. तो प्रश्न सोपा होऊन जातो. मला दोन कपडे हवेत की चार हवेत? मला घर दोन खोल्यांचं हवं की चार खोल्याचं? हे सगळे प्रश्न ‘कसं जगावं’ याचे आहेत. हे प्रश्न गैरलागू होऊन जातात, बिनमहत्त्वाचे वाटतात.

जगायचं कसं, हे आयोजनाचे प्रश्न आहेत; पण महत्त्वाचा आहे जीवनाच्या प्रयोजनाचा प्रश्न. प्रयोजन सापडलं की आयोजन दुय्यम होऊन जातं. आज आपण सगळे आयोजनाच्या प्रश्नात मग्न आहोत. त्यामुळे आपण कशासाठी जगतो आहोत, सुजित कुट्टन का रेस धावत आहे, याचं उतर शोधायला आपल्याला फुरसत नाही. मित्रांनो, तुम्ही जन्मला आहात यात तुमचा पराक्रम  काहीही नाही. तुम्ही जिवंत आहात यातही तुमचा पराक्रम नाही. तरुण आहात. मरणाचे तुमचे दिवसच नाहीत. तुमचा पराक्रम हाच असू शकतो की, तुम्ही जगता कशासाठी हे शोधावं. आपल्या जीवनाला एक हेतू देणं, हेतू निर्माण करणं ही तुमची आणि माझी- सगळ्यांचीच जबाबदारी आहे. म्हणून आज मी तुम्हाला प्रथम आवाहन हे करणार आहे की, आयोजनाच्या प्रश्नात फसण्याअगोदर जीवनाचं प्रयोजन शोधा. हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. इथे वन्समोअर नाही. इथे पुन्हा आपण येणार नाही. हे अमूल्य आयुष्य आपण कशासाठी वापरणार?

शहाणा सौदा

जीवनाचे दबाव असतात. मग आयोजनाच्या मागण्यांसाठी आपण आपलं आयुष्य पाच हजार, पन्नास हजार- कोणत्या तरी किमतीत विकतो. जगात पैसे किती आहेत? समुद्राच्या प्रचंड किनाऱ्यावर तुम्ही उभे आहात. तिथल्या वाळूच्या कणांएवढे असंख्य, आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे पैसे जगात आहेत. एकट्या अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न 17 ट्रिलियन डॉलर आहे. जगात पैसे अमाप आहेत आणि तुमच्याकडे आयुष्य एकच आहे. एकच आयुष्य असल्यामुळे ते अमूल्य आहे आणि जगात भरपूर पैसा असल्यामुळे तो विनामूल्य आहे. कोणत्याही देवाण-घेवाणीचं साधं तत्त्व असतं. जे एक असतं, ते अमूल्य असतं. जे अमाप असतं, त्याला काही मूल्य नसतं. त्यामुळे व्यावहारिक शहाणपण हेच आहे की, तुमच्याकडे असलेलं एकमेव अमूल्य आयुष्य त्या विनामूल्य असलेल्या गोष्टींसाठी विकू नका.

आयुष्याच्या शेवटी तुमचं दिवाळं वाजू नये, यासाठी सांगतो. जगण्यासाठी काही गरजा जरूर असणार आहेत. त्याच पूर्ण कराव्या लागतील. पण ‘मिळालेलं एकमेव आयुष्य पैशासाठी मी मुळीच विकणार नाही- आयुष्याचा असला मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही,’ असा संकल्प करा. आयुष्याला पैशापेक्षाही मौल्यवान असा हेतू पाहिजे. आपल्या मरणापूर्वी तो हेतू शोधणं, हे आपलं स्वातंत्र्य आहे; ही आपली जबाबदारी आहे. केवळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा!

अवती-भवतीचं जग

जगण्याचा अर्थ कुठे सापडेल? आपल्या अवती-   भोवती बघा. हे जगं कसं आहे? या जगात भूक सगळ्यांनाच लागते. पण ज्याला भूक लागते, त्याला अन्न इथं मिळतं का? हे जग न्याय्य आहे का? अन्न निर्माण करतो, तो शेतकरी बघा. तो बाजारात जातो, तेव्हा धान्याचे भाव पडलेले असतात. त्याच्या शेतमालाला मूल्य मिळत नाही, त्याला कर्ज फेडता येत नाही. त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते. गेल्या काही वर्षांत भारतात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे जग न्याय्य आहे? मूल जन्माला येतं. ते कोवळंसं मूल चोवीस महिन्यांचं होतं तोपर्यंत देशातली एक-तृतीयांश मुलं कुपोषित झालेली असतात. हे जग न्याय्य आहे? लहान मुलांना न्यूमोनिया होतो. त्याला श्वास घेता येत नाही, ते धापा टाकत असतं, काळंनिळं पडतं. या आजारात कधी काळी मरणाशिवाय पर्याय नव्हता. आज न्यूमोनियाला चांगली औषधं आहेत. ते अँटिबायोटिक्स कुठे तरी दुकानात असतं. मूल जिथे असतं, तिथे हे अँटिबायोटिक्स पोचत नसतं. ते मूल मरतं. मरणारं मूल तुम्ही कधी बघितलं आहे? बघवत नाही. गडचिरोलीतल्या खेड्यांमधून अतिशय गंभीर आजारी होऊन आलेली आदिवासी मुलं माझ्या बेडवर मेलेली आहेत. हे जग न्याय्य आहे?

कार चालवण्यासाठी अमेरिकेतला 20 टक्के मका बायोडिझेलसाठी वापरला, त्यामुळे धान्याचे भाव जगभर वाढले. उपाशी लोकांना खायला अन्न मिळेना. इथिओपिया आणि बांगलादेशात यावर दंगली झाल्या. कारण काय, तर अमेरिकेत या यंत्रांच्या पोटात बायोडिझेल टाकण्यात येत होतं; पण दुसरीकडे माणसाच्या पोटात टाकायला अन्न नव्हतं. हे जग न्याय्य आहे? असं जग तुम्हाला आणि मला हवं आहे का?

आता महाराष्ट्रात मोठा विलक्षण काळ सुरू आहे. रोज नव्या-नव्या टेक्नॉलॉजी येत आहेत. हा काळ ग्लोबलायझेशनचा. भौगोलिक सीमांच्या विलयाचा. बर्लिन वॉल तुटली. पुण्याची माणसं पेनसिल्व्हानियामध्ये गेली आणि पंजाब व बिहारची माणसं पुण्यात आली. हा काळ गतिमान समयाचा, तांत्रिक विस्मयाचा, भौगोलिक विलयाचा आणि आर्थिक उदयाचा. भारताचा आर्थिक विकास होतो आहे. दोन ट्रिलियन डॉलरच्याजवळ भारताची इकॉनॉमी पोचली. दुर्दैवाने यासोबतच हा काळ राजकीय क्षयाचा आहे. कॉमनवेल्थ गेम, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा, बेल्लारी खाण-घोटाळा, सिंचन घोटाळा.

आपल्या राजकीय नेत्यांची उंची छोटी-छोटी होत चालली आहे. लोकांना खायला मिळत नसताना राज्यातलं 14 लाख टन धान्य अल्कोहोल आणि दारूनिर्मितीकडे वळवण्याचा आपल्या राज्यातल्या नेत्यांनी निर्णय घेतला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेतेदेखील त्यात सामील झाले. सगळ्यांनी आपापल्या मुलांमध्येच 36 कारखाने वाटून घेतले. महाराष्ट्रातल्या राजनैतिक नेतृत्वाची ही आजची पातळी आहे. यांना ‘राजनैतिक’ कसं म्हणावं? राजकीय आणि नैतिक दोन्हींचा इथे क्षय होतो आहे. मुंबईत आणि पुण्यात राजकीय नेत्यांचे मोठमोठे कटआऊट लावले जात आहेत. त्यांची उंची आकाशाला भिडते आहे आणि त्यांच्या लांब-लांब काळ्या सावल्या सगळ्या समाजावर पडल्या आहेत. युरोपचा इतिहास लिहिताना कार्लाइल असं लिहून गेला की, ‘जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांब-लांब पडायला लागतात, तेव्हा समजून घ्या की सूर्यास्त जवळ आला आहे.’

तुम्हाला कुठे घर हवं आहे?

पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. एक आदर्श राज्य निर्माण करू पाहणारी वाटचाल आज पन्नास वर्षांनी आदर्श सोसायटीत जाऊन पोचली आहे. उद्योगपती असो की राजकीय नेता; सगळ्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. प्रत्येकाचा आदर्श सोसायटीत फ्लॅट आहे. आजचा समाज आपल्यालाही खुणावतो आहे, ‘तुलाही हवा का इथे फ्लॅट?’

महाराष्ट्रातल्या युवांनो, तुम्हाला आदर्श सोसायटीतला फ्लॅट हवाय का? तुम्हाला कुठं घर हवंय? आदर्श सोसायटीत की अँटिलामध्ये? तुम्हाला काय व्हायचंय? अंबानी की ए. राजा? प्रश्नच असा आहे की, आपल्यासमोर एवढेच पर्याय आहेत का? आपल्यासमोर एवढाच मेनू आहे का? हे जग तुम्ही मुकाट्याने स्वीकारणार आहात का?

खलिल जिब्रान असं म्हणाला की- संपूर्ण झाडाच्या संमतीशिवाय एक पानदेखील गळून पडू शकत नाही. अख्खं झाड मूकपणे बघत राहतं, संमती देतं; तेव्हा ते पान गळत असतं. समाजामध्ये जे-जे घडतं- भ्रष्टाचार असो की बालमृत्यू- आपली सर्वांची संमती असते म्हणूनच तो  अन्याय घडतो. म्हणून त्या अन्यायाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आपण या अन्यायात भागीदार आहोत. या प्रचंड मोठ्या कंपनीचे आपण शेअर होल्डर आहोत. आपल्याला हे सुरू ठेवायचं आहे, की भागीदारीतून बाहेर पडायचं आहे? जर सामील व्हायचं नसेल, तर आज हे जग जसं आहे तसं राहायला नको. हे जग बदलायला पाहिजे. तरुणांकडून हीच अपेक्षा आहे.

तरुणाईचा जाहीरनामा

तरुणाची व्याख्याच आहे - जो समाजाला तारून नेतो, तो तरुण. मित्रांनो, जग तुम्हाला तारून न्यायचं आहे. मी तुम्हाला आवाहन करणार आहे की, या जीवनाचा रोमान्स करा- जग बदलण्याचा रोमांचकारी अनुभव घ्या. त्या टीव्हीच्या काचेवरचा, मोबाईलचा कचकडी रोमान्स काय कामाचा? जगण्यातल्या खऱ्या-खुऱ्या प्रश्नांना जाऊन भिडा. जीवनाचं जे वरदान मिळालं आहे ते वापरण्यासाठी असं म्हणा, ‘हे जग जसं आहे तसं मला स्वीकारार्ह नाही. मी असा संकल्प करतो की, जशा जगात मी जन्माला आलो तशा जगात मरणार नाही.’ नियतीशी तुमचा असा करार होऊ द्या.

उद्याच्या महाराष्ट्राविषयी तुमचं स्वप्न काय आहे? युवांचा महाराष्ट्र्‌ कसा असावा? युवांचा जाहीरनामा प्रगट झाला पाहिजे. त्यासाठी चार प्रश्न विचारावे लागतील. तुमचा महाराष्ट्र्‌ कसा राहील? तो महाराष्ट्र अस्तित्वात येणार कसा? तो अस्तित्वात कोण आणणार? आणि तो केव्हा अस्तित्वात येणार?

‘जग कोण बदलणार?’ असं विचारलं की, आपण अपेक्षेने शेजाऱ्याकडे पाहतो. हे काम दुसऱ्याने करावं.

एका राज्यात एकदा दुष्काळ पडला. तीन वर्षं पाऊस झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राजाला रात्री स्वप्न पडलं. देवीने राजाला स्वप्नात सांगितलं, ‘तुझ्या राजधानीच्या बाहेर एक शंकराचं देऊळ आहे. त्या देवळाचा गाभारा दुधाने भर, तर गावातला दुष्काळ जाईल.’ राजाने जाहीर केलं की, आज रात्री प्रत्येकाने एक लोटा दूध गाभाऱ्यात टाकावं. पूर्ण गाभारा सकाळी दुधाने भरून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उत्सुकतेनं बघायला गेले. गाभारा भरला होता, पण पाण्याने! गुंडोपंतांनी रात्री विचार केला होता- सगळे दूध टाकणारच आहेत; मी पाणी टाकलं, तर काय बिघडणार आहे? बंडोपंतांनीदेखील हाच विचार केला. प्रत्येकाने हाच विचार केला. त्या राज्याला महाराष्ट्र असे म्हणतात. मग परिवर्तन कोण करणार?

परिवर्तन कोण करणार?

मी लंडनला एका बैठकीसाठी गेलो होतो. राणीच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये, नंतर हाऊस ऑफ लॉर्ड्‌समध्ये व नंतर तिथली लोकसभा- अशा तीन जागी आम्हाला घेऊन गेले. तिन्ही इमारतींच्या मधे असलेल्या चौकात काही तरुण निषेध करत उभे होते. बघायला गेलो. एक गट होता ‘पर्यावरण वाचवा’ यासाठी. दुसरा गट म्हणत होता, ‘गरिबांसाठी सोई आणि सुविधा द्या’. तिसरा गट ‘इराकमधून सैन्य परत घ्या आणि युद्ध बंद करा’ म्हणणारा होता. पर्यावरणवाद्यांचा गट, डाव्या चळवळींचा गट आणि शांतिवाद्यांचा गट. तिघांच्या आपापल्या मागण्या होत्या, आपापले झेंडे होते. पण तिन्ही गटांमागे एक प्रचंड मोठा बॅनर सगळ्यांचा मिळून होता. त्यावर लिहिलं होतं, ‘बी द चेंज युवरसेल्फ, दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड’. हे वाक्य महात्मा गांधीचं. मेल्यानंतर सहासष्ट वर्षांनीदेखील तो म्हातारा ब्रिटिश सत्तेपुढे आव्हान देत उभा होता. जग बदलण्याची आकांक्षा ठेवणाऱ्यांना आजही त्या म्हाताऱ्याचं वाक्य प्रेरणा देत आहे. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. परिवर्तनाचे महानायक तुम्ही आहात!

पण आपल्याला तर असं वाटतं की- मी लहान आहे, नगण्य आहे, अडथळे आहेत; मी काय करणार? पर्यावरणाच्या क्षेत्रात एक सुंदर वाक्य आहे- ‘टिंबक्टूमध्ये एका फुलपाखराने पंख फडफडवले तरी त्यामुळे शेवटी पॅसिफिक समुद्रात वादळ निर्माण होऊ शकतं.’ या जगात अनंत गोष्टीच एकमेकांशी निगडित आहेत. छोट्याशा कृतीचा परिणाम काय होईल याची कल्पना कोणी करू शकत नाही. कोणी तरी इंटरनेटवर आवाहन केलं, त्यामुळे चर्चगेटवर पन्नास हजार लोकांनी मेणबत्या पेटवल्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. सामान्य माणूस आता छोटा उरला नाही, असामान्य झाला आहे. फक्त बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी.

मानवजातीच्या इतिहासात एका आयुष्यात सगळ्यात जास्त पैसे कमावलेला माणूस म्हणजे बिल गेट्‌स. हा जगातला नंबर एकचा श्रीमंत माणूस होता. त्याने काय करावं? त्याने आपल्या संपत्तीतली पन्नास अब्ज डॉलर्सची संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करून टाकली. त्याने  मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ सामाजिक कामात वाहून घेतलं. आता तो जगातला नंबर एकचा श्रीमंत उरला नाही.

पण याहूनही मोठा चमत्कार पुढचा. जो जागतिक श्रीमंतांच्या यादीत नंबर दोन होता, वॉरन बफे- तो आता नंबर एक झाला. तुम्हाला माहीत आहे, सर्वांत जास्त श्रीमंत होण्यासाठी किती गळेकापू स्पर्धा असते. श्रीमंत क्रमांक एक झाल्यावर वॉरन बफेने काय करावं? तो म्हणाला, मला पैसे कमावता येतात; पण मला ते समाजसेवेसाठी वापरता येत नाहीत. त्याने आपली संपत्ती बिल गेट्‌सला सामाजिक कार्यासाठी दान दिली.

हे काय घडतं आहे? आता भारतातही ते घडायला लागलं आहे. आपण वाचलं असेल की, अझीम प्रेमजींनी भारतातील शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी आठ अब्ज डॉलर्स दान द्यायचं जाहीर केलंय. हे तिघे आपल्याला काय सांगताहेत? ‘आम्ही अमाप पैसा कमावला, पण शेवटी या पैशात समाधान नाही.’ म्हणून पैसा दान देऊन ते समाजसेवेकडे वळले आहेत. मग मित्रांनो, एवढा मोठा लांब फेरा करून आता ते समाजसेवेकडे वळले आहेत, तर आपण तिथूनच का सुरुवात करू नये?

महाराष्ट्रात असंही घडतंय...

आपण जर महाराष्ट्राकडे पाहिलं तर असं दिसतं की, इथे काही वेगळे चमत्कार आधीच घडले आहेत. महाराष्ट्राची मानसिक सफर तर करा. अण्णा हजारे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार असो की माहितीचा अधिकार असो; एकटा अण्णा लढतो. पुण्यात अनिल अवचट आणि त्यांची पत्नी यांनी व्यसनमुक्तीवर मुक्तांगणचं काम हे आपलं लाईफ मिशन केलं. आता त्यांची तरुण मुलगी मुक्ता त्याची जबाबदारी घेते आहे. सोलापूरला वसलेले अंकोलीतले अरुण देशपांडे आणि सुमंगल देशपांडे. अंकोलीच्या वाळवंटात जाऊन पाणी कसं साठवता येईल आणि कमी गरजेत माणूस कसं जगू शकतो याचे प्रयोग त्यांनी केले आहेत. कोकणात जाल जिथे दिलीप कुलकर्णी आहेत, ज्यांनी आपल्या गरजा कमीत कमी कशा करता येतील हे स्वतः जगून दाखवलं आहे. तिकडे विदर्भात अमरावतीमध्ये जाल; तर वरुड गावाजवळ वसंत आणि करुणा फुटाणे नावाचं जोडपं सेंद्रिय शेती करून कसं जगता येईल, हे प्रयोग करत आहेत. मेळघाटात आशिष व कविता सातव हे तरुण डॉक्टर जोडपं काम करत आहे. गडचिरोलीत प्रकाश व मंदा आमटे प्रसिद्ध आहेत. शोधग्राममध्ये अनेक तरुण प्रश्न हाती घेत आहेत. कोणी दारुचा, कोणी तंबाखूचा, कोणी बालमृत्यूचा, आदिवासी आरोग्याचा प्रश्न हाती घेतो आहे. सगळ्या महाराष्ट्राची शोधयात्रा करावी आणि या तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी. आपण भाग्यवान आहोत की; महाराष्ट्रात हे घडलं आहे, घडतं आहे.

‘निर्माण’ ही संघटना निर्माण झाली. शेकडो तरुण यात एकत्र येत आहेत. त्यांतले अनेक जण विविध सामाजिक उपक्रम करत आहेत. ते तरुण आहेत, विद्यार्थी आहेत. कोणी शिकवत आहेत, कोणी रोजगार हमी योजनेत सुधारणा करत आहेत. कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, तर कोणी शिक्षणाच्या प्रश्नांवर. कोणी पर्यावरण कसं वाचवता येईल यावर, तर कोणी धान्यापासून दारू निर्माण करण्याच्या विरोधात काम करत आहेत. कोणी हात कसे धुवावेत यावर, तर कोणी आयटीचा वापर करून खेड्यांमध्ये व आदिवासींपर्यंत शिक्षण आणि आरोग्यसेवा कशी पोहोचवता येइल यावर.

जग कसं बदलावं?

हे जग कसं बदलावं? अनेक पर्याय आहेत. सेवेची कृती, वैज्ञानिक संशोधनाची कृती, निषेधाची कृती, संघटनेची कृती, जागृतीची कृती. अजून एक पर्याय तुमच्या-माझ्या हातात आहे. तो म्हणजे, सांस्कृतिक बदलाचा. तुम्ही आणि मी रोज कसे जगतो, ते म्हणजे संस्कृती. मी रोज कसा जगतो, हे माझ्या हातातच आहे. यातनं संस्कृती आकार घेते, घडते. म्हणून मी संस्कृतिकर्ता. नव्या पद्धतीने जगणं म्हणजे जगण्याची नवी संस्कृती निर्माण करणं आहे. ही नवी राजकीय कृती आहे.

आपण कसं जगतो, यातून जग घडतं. आपण कपडे कसे घालतो? आपण वाहन कोणतं व किती वापरतो? आपल्या जगण्याच्या प्रत्येक छोट्या-छोट्या निर्णयामध्ये या जगाचं भवितव्य ठरत असतं. म्हणून वेगळ्या पद्धतीने जगणं, ही राजकीय कृती आहे. हे पीपल्स पॉलिटिक्स आहे. मी कसा जगतो, हा माझा जाहीरनामा आहे. हा जाहीरनामा लिहिण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आणि मला आहे. यूज युवर नोट ॲज ए व्होट. आपण खर्च करत असलेली नोट ही कोणत्या तरी जगाला आपलं व्होट असतं. जेव्हा मी नोट अशा गोष्टींवर खर्च करतो की ज्याने पर्यावरण नष्ट होणार आहे, तेव्हा मी ग्लोबल  वॉर्मिंगला व्होट देत असतो. म्हणजे याच्या उलटं मला करता येईल. माझी नोट सावधपणे वापरून मी राजकीय परिवर्तनदेखील स्वतःच आणि आजच करू शकतो. मी जगाचं भवितव्य ठरवू शकतो. हे नवं पॉलिटिक्स आहे. आपलं जगणं बदलण्याची राजकीय कृती.

युवा मित्रांनो, करिअर आणि कंझम्प्शन यात तुम्ही व्यग्र आहात पण माझ्या कन्झंप्शनमधून पृथ्वीचं करिअर ठरत असतं. आणि माझ्या अमर्याद इच्छा संपतच नाहीत. बाजारात गेलं... हिरव्या रंगाची साडी आणली, खूप आवडली. पण घरी येईपर्यंत वाटायला लागतं, ती लाल किनारीची साडी जास्त चांगली होती. आपल्या इच्छांना अंतच नाही. मनाचा हा स्वभावच आहे, ते कधीच तृप्त होत नाही. तो म्हातारा म्हणून गेला- ‘देअर इज इनफ ऑन धिस अर्थ फॉर एव्हरीबडी नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड.’ या पृथ्वीतलावरती प्रत्येकाच्या गरजेपुरतं आहे, पण लोभापुरतं नाही. म्हणून परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागते. ‘बी द चेंज युवरसेल्फ.’

मी कोणाचा?

पण जगातला कुठलाही माणूस एकटं बेट नाही. स्वतःविषयी असा भ्रम कोणी बाळगू नये. आपलं जगणं हे अभिन्नपणे एकमेकांशी जोडलं गेलं आहे. मला एकट्याला मुक्ती नाही. इथे तुमचं आणि माझं जगणं-मरणं समाजासोबत बांधलं गेलं आहे. समाज जगला नाही, तर तुम्ही-आम्ही जगू शकत नाही. ताडोबाच्या जंगलात जा. जंगलात सांबर ओरडतं तेव्हा असा अर्थ होतो की, वाघ जवळपास दबा धरून बसला आहे. सांबर आपल्याच कळपाला इशारा देतं, सावध करतं. पण हे करताना ते वाघाला कळू देतं की, ते स्वतः कुठे आहे. आपला जीव धोक्यात टाकून ते कळपाला का सावध करतं? त्याला का कोणी परोपकार शिकवले असतो? आपल्या कळपाला वाचवणं, गरज पडली तर त्यासाठी आत्मत्याग करणं; हे निसर्गाने तुमच्या-आमच्या, त्या सांबराच्या जीन्समध्येच दिलं आहे. कळप वाचला तरच सांबर वाचेल आणि कळप वाचलाच तर अजून छपन्न सांबर निर्माण होतील. निसर्गाने आपल्याला ही प्रेरणा देऊन घडवलं आहे.

इतरांच्या जगण्यासोबत माझं जगणं जोडलं आहे. माझ्या जगण्याचा हेतू इतरांच्या गरजांत दडला आहे. आपल्या भारतात ‘मी कोण आहे’, ‘कोऽहम’चा खूप शोध झाला. ‘मी कोण आहे?’ हा अशक्य असा प्रश्न आहे. वस्तुतः याचं खरं उत्तर एका वेगळ्या प्रश्नात आहे. तो प्रश्न आहे, ‘मी कोणाचा आहे?’ म्हणून ‘मी कोण आहे’ याचा शोध घेण्याऐवजी ‘मी कोणाचा आहे’ या प्रश्नातून कृतीसाठी कार्यक्रम व जीवनाला प्रयोजन मिळतं.

‘मी कोणाचा?’ हा प्रश्न विचारला की, माझ्या जीवनात इतरांचं महत्त्व लक्षात यायला लागतं. मग कायम ‘मी-मी’ म्हणणाऱ्या मनाला लक्षात येतं की, ‘यू आर, देअरफोर आय ॲम.’ तुझं अस्तित्व आहे म्हणून मी आहे. ‘तू’ आहेस म्हणून ‘मी’ जन्माला येतो. नाही तर ‘मी’ शब्दाची काही गरजच पडत नाही. म्हणून माझा जगण्याचा हेतू तुझ्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये आहे आणि त्यातून ‘मी कशासाठी जगावं’ हा माझाही प्रश्न सुटतो. म्हणून मित्रांनो, इतरांच्या जगण्याचे प्रश्नू शोधून काढा. ते प्रश्न तुमची वाट बघत उभे आहेत. तुमचा कुष्ठरोगी, तुमचा बालमृत्यू कुठे तरी तुमची वाट बघतोय. शोधा त्याला. त्याचे पाय धरा. खरंच तो तुमचा उद्धार करून टाकील. तो तुमचा विठ्ठल. आपल्या स्वार्थातच तर आपलं सगळं दुःख दडलेलं आहे. त्यातून उद्धार करायला तुमचा विठ्ठल तुमची वाट पाहतोय. प्रश्न जागोजाग तुमची वाट बघत बसलेले आहेत. तुमच्यात साहस आहे का?

एक गोंधळेला माणूस बापूंकडे गेला. बापू म्हणाले, ‘‘मी तुला एक जादूचा तावीज देतो; तुझा प्रश्न हमखास सुटेल. जेव्हा जीवनात तुझ्या मनात द्वंद्व उभं राहील आणि स्वार्थ प्रबळ होईल; तेव्हा आयुष्यात पाहिलेल्या सर्वांत दुःखी, कष्टी, हतबल माणसाचा चेहरा आपल्या डोळ्यांपुढे आण. आणि स्वतःला प्रश्न विचार की- मी जे काही पुढचं पाऊल उचलू जात आहे, त्यामुळे त्या माणसाची हतबलता कमी होणार आहे का? ही जर कसोटी लावलीस तर तुला आढळेल की, तुझ्या मनातला स्वार्थ कमी व्हायला लागला आहे. उत्तर तुला लख्ख दिसायला लागेल.’’

ओन्ली कनेक्ट

हे समाजातले दुःख, प्रश्न सोडवायचे कसे? ‘रंग दे बसंती’ सिनेमा आहे. त्यात खुशालचेंडू तरुण आयुष्यात मजा-मस्ती करत असतात. एक प्रचंड भ्रष्टाचार बघतात आणि त्यांचं माथं सणकतं. ते त्यास भ्रष्ट नेत्यांना गोळ्या घालतात. प्रश्न सुटला का? युवांना रेव्ह पार्टीत मश्गूल ठेवता यावं म्हणून पुण्यात, नाशिकमध्ये वाईन फेस्टिव्हल  होत असतो. ‘या युवांनो, या आणि जेवढी हवी तेवढी मजा करा, मस्त राहा’. बारामतीकर आपल्याला सांगतात ‘वाईन इज अ फ्रूट ज्यूस.’ हातभट्टीची दारू काढणं हा गुन्हा आहे. पण पुणे विद्यापीठात दारू कशी काढावी, वाईन कशी काढावी याचा कोर्स शिकवतात. मस्ती नावाची गोळी मिळते. ती खाऊन युवा मश्गूल होतो. यामध्ये जर आपण मश्गूल झालो, तर तो प्रश्न सुटला?

हे दोन्ही पर्याय कामाचे नाहीत. गोळ्या घालण्याचा पर्याय कामाचा नाही आणि गोळ्या खाऊन मश्गूल होण्याचाही नाही. गोळी घालायची असेल तर- गरिबीला घाला, बालमृत्यूला घाला, अज्ञानाला घाला, स्वतःमधल्या अतिरेकी लोभाला आणि भोगवादाला घाला. आपल्या जीवनात कॉम्पिटिशन आहे, कन्झमशन आहे. हे सगळं आपण नाकारू शकत नाही. पण त्यांची जागा हळूहळू कनेक्शनने घेतली पाहिजे. कवी म्हणाला, ‘नो मॅन इज ॲन आयलँड, कम्प्लीट इन हिमसेल्फ. सो ओन्ली कनेक्ट.’ जिथे दुःख आहे, त्या कम्युनिटीशी कनेक्ट्‌ झालं पाहिजे.

जगात यशासाठी स्पर्धेच्या लांब-लांब रांगा लागल्या आहेत. आपणही त्या क्यूमध्ये शेवटी उभे असतो. आपला नंबर केव्हा लागणार; माहीत नाही. अशा क्यूमध्ये जर तुम्ही उभे आहात, तर काय करायचं? विनोबांनी याचं बिनतोड उत्तर सांगितलं आहे. ‘जगाकडे पाठ फिरवा म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभं राहील.’ त्या क्यूममध्ये पुढे जायची धडपड करण्यापेक्षा ‘फक्त तोंड फिरवा.’ इतकं सोपं आहे. तुम्ही जर यशाच्या त्या क्यूमध्ये शेवटी असाल, तर तुम्हाला परिवर्तनाच्या क्यूमध्ये पहिलं होता येतं. बस, तुमची दिशा बदला. तुम्हीच पहिला क्रमांक बनाल.

तुमचा संकल्प

पुढची चाळीस वर्षं तुमची आहेत. आयुष्य ही तुम्हाला एकदाच मिळणारी संधी आहे. संकल्प करा की, आजचं हे जग मला मान्य नाही. जशा जगात मी जन्माला आलो, तशा जगात मी मरणार नाही. हे जग मी बदलून जाईन. माझं आयुष्य खूप अमूल्य आहे. पैशांसाठी मी माझं आयुष्य विकणार नाही, मी भोगला जाणार नाही. मी जेव्हा विकायला तयार होतो, तेव्हा मी भोगला जातो. मी माझ्या जीवनाला एक हेतू, एक प्रयोजन प्रदान करेन. जिथे प्रश्न आहे तिथे मी जाईन. जिथे गरज नाही तिथे गर्दी करून मी स्वतःच एक प्रश्न बनणार नाही. इतरांच्या जगण्याच्या समस्या कशा सोडवायच्या, यातून ‘जगायचं कशासाठी’ ही माझी समस्या सुटते. दुसऱ्याच्या जगायच्या धडपडीत माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. मी माझ्या जीवनाला प्रयोजन, अर्थ प्रदान करीन.

माझ्या युवा मित्रांनो, आजपासून महाराष्ट्र तुमचा. तुम्हाला दिला. सत्ता तुमची आणि जबाबदारीही तुमचीच. या महाराष्ट्राला घडवा आणि तो घडेपर्यंत आपलं जगणं स्थगित करू नका. जसं जग तुम्हाला हवं वाटतं, तसं स्वतः जगायला आजपासून सुरुवात करा. तसं जग घडवण्यासाठी स्वतःला घडवा आणि तुमचा महाराष्ट्र, तुमचं जग निर्माण करा.

रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर कविता आहे. सूर्य अस्ताला जातो आहे. तो म्हणतो, ‘मी दिवसभर जळून इथे प्रकाश दिला; आता कोण माझी जागा घेईल? पृथ्वीला प्रकाश कोण देईल?’ चंद्र आपला चेहरा काळा करून म्हणतो, ‘मी तर काय येऊन-जाऊन परप्रकाशी. मी काय करू शकतो?’ तारे म्हाणतात, ‘आम्ही किती छोटे. आम्ही काहीच करू शकत नाही.’ चंद्र नाही म्हणतो, तारे तोंड लपवतात, ग्रह नकार देतात. झोपडीतला एक छोटा दिवा म्हणतो, ‘हे पित्या, मी खूप छोटा आहे. माझी शक्ती ती किती? पण माझ्या हृदयातलं तेल असेपर्यंत त्याच अंधारलेल्या झोपडीचा कोनाडा मी प्रकाशित ठेवेन.’ माझ्या मित्रांनो, तुमचा दिवा असाच जळत राहो.  

Tags: तरुणाई अभय बंग युवा दिवाळी अंक inspirational yuwa diwali ank youth abhay bang weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. अभय बंग
search.gad@gmail.com

 'सर्च' या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन (बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधन). 
 स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 


Comments

 1. Vidya vilas bobde- 23 Sep 2020

  Khupach sunder vichar aani kary

  save

 1. Yogendra Natu- 23 Sep 2020

  *डॉक्टर तरुणांना प्रेरित करण्याच एक मोठ्ठ कार्य तुम्ही या लेखाद्वारे करित आहात कौतुक आहे

  save

 1. Mahadeo Kause- 23 Sep 2020

  अप्रतिम लेख .

  save

 1. Shailesh Dhondiram Patil- 23 Sep 2020

  Happy Birthday, Sir

  save

 1. Avadhut Shingare- 23 Sep 2020

  एकदम प्रभावी व जीवन जगण्याची पद्धत एकदम वेवस्तीत रित्या मांडली आहे डॉक्टर साहेब एकदम अप्रतिम लेख तरुणांना एक नवी उमीद येते या लेखातून .....

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके