डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मराठी नाट्यरसिकांना ‘किंग लिअर’पेक्षा ‘नटसम्राट’ का भावला असावा?

मग नटसम्राटलाच मराठी प्रेक्षकांनी का पसंती दिली असावी,  असा प्रश्न निर्माण होतो.  त्याचे महत्त्वाचे कारण म्हणून चटकन  ध्यानात येतो,  या दोन नाटकांतील मुख्य पात्रे  म्हणजे लिअर आणि बेलवलकर यांच्या  अवकाशाचा फरक. लिअर हा एका देशाचा  राजा आहे,  तर बेलवलकर हे रंगभूमीवरील  सम्राट. अर्थातच लिअरचा आवाका मोठा तर  नटसम्राटाचा मर्यादित असणे साहजिक आहे.  दुसरे असे की- किंग लिअरमध्ये ग्लॉस्टरचे  दुय्यम,  पण तसे समांतर कथानक आहे.  त्यामुळे ते नाटक पाच अंकी आहे. तीन अंकांच्या नटसम्राटमध्ये मात्र तसे नाही. लिअरमध्ये लिअर आणि ग्लॉस्टर दोघांचाही  कटू अनुभव आहे,  तर नटसम्राटमध्ये  बेलवलकरांचा. लिअरबरोबर केंट आणि  विदूषक असले,  तरी ते त्याचे नोकरच  आहेत. उलट बेलवलकरांबरोबर त्यांची पत्नी  आहे. तीच त्यांचा आधार आणि  काळजीवाहक आहे.  

गेल्या वर्षअखेरीला, 23 डिसेंबरला ‘नटसम्राट’ या  नाटकाने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले,  तरीही मराठी नाट्यरसिकांतील या नाटकाबाबतचे आकर्षण कायम आहे. वि. वा. शिरवाडकर यांनी ‘किंग लिअर’ या शेक्सपिअरच्या  नाटकावरून प्रेरणा घेऊन हे नाटक साकार केले,  याबाबत दुमत  नाही. त्यामुळेच ‘किंग लिअर’ आणि मराठी प्रेक्षक यांचा सूर  फारसा का जुळला नाही आणि नटसम्राटाबरोबर तो बेमालूमपणे  का जुळला,  असा प्रश्न पडतो. कारण मराठीमध्येही ‘किंग लिअर’चे रंगमंचावर सादरीकरण क्वचितच झाले होते. बहुधा  स्पर्धेमध्येच भुताडिया यांनी केले होते.  लिअर हा राजा आहे,  तर गणपतराव बेलवलकर रंगभूमीवरील नटसम्राट. दोघे आता आपल्या त्या मानाच्या  स्थानावर नाहीत,  कारण लिअरने राज्याची वाटणी दोन  मुलींमध्ये केलेली आहे; तर निवृत्त नटसम्राटाचा सत्कार  होतो आहे आणि त्याने सत्काराचे वेळी मिळालेली रक्कम,  तसेच आपली सारी संपत्ती आपल्या मुलाला व मुलीला देऊन  टाकली आहे. म्हणजे आता दोघांकडेही आपले असे  काहीही राहिलेले नाही. पण येथेच मुख्य फरक आहे.  नटसम्राटाबरोबर त्याची बायको कावेरी- जिला तो सरकार  म्हणतो,  ती- आहे. लिअरबरोबर मात्र फक्त त्याचा फूल (विदूषक) आहे. केंट हा लिअरचा खरा भक्तही राजाने  हाकलून दिले तरी,  वेश पालटून त्याच्याबरोबर आहे.  आपण बापावर किती प्रेम करतो,  हे रंगवून सांगणाऱ्या  ज्या दोन मुलींमध्ये लिअरने राज्य वाटले (आणि धाकटीने  मात्र तसे खोटे बोलण्यास नकार दिल्याने तिला बेदखल  केले),  त्यातील मोठी गॉनरिल त्याला त्याचा लवाजमा कमी  करायला सांगते,  ते मान्य न केल्याने तो दुसऱ्या मुलीकडे  रीगनकडे जायला निघतो,  पण ती तर त्याला लवाजमा  आणखीच कमी करायला सांगते. ते मान्य नसल्याने तो  भरकटत असतो. 

नटसम्राट बेलवलकरही काही काळ मुलाबरोबर राहतात.  तिथे त्यांच्या नाटकाच्या सवयींमुळे- म्हणजे नातीसाठी, म्हणजे त्यांच्या लाडक्या ठमीसाठी- मोठ्या आवाजात  बोलणे,  प्रेमाने लबाड-ढालगज-गधडी असे म्हटले,  तरी  त्या शब्दांना शिव्या समजले जाते. त्यावरून त्यांना  खडसावण्यात येते. त्याशिवायही बरेच काही ऐकवले जाते.  यात त्यांच्या मुलाची भूमिका दुय्यम असते; कटू बोलण्याचे  काम सून शारदाच पार पाडत असते,  तो फक्त अधून-मधून  दुजोरा देत आपण तिच्या बाजूचेच असल्याचे दाखवून देत  असतो. कावेरी त्यांना तिथून बाहेर पडण्याचा आग्रह करते.  बेलवलकर म्हणतात : कुठे जाणार सरकार? मी तर असा लुळा पांगळा. त्यावर ती विचारते : माझ्यावर भरवसा नाही  का?  ते म्हणतात : तुमच्यावरच्या भरवशाशिवाय काय  शिल्लक राहिलंय माझ्याजवळ?  ती ‘आपण नलूकडे जाऊ,  राहीनगरला’, पहाटेच्या गाडीनं म्हणून सांगते. त्यावर ते : ‘आणि आजची रात्र?’ असा प्रश्न करतात. त्याच्या  उत्तरातच कावेरीचे मन आणि बेलवलकरांवरचे प्रेम प्रकट  होते. ती म्हणते : स्टेशनवर काढू;  रस्त्यावर झाडाखाली  राहू; पण इथं नाही. तुमचा अपमान एखादे वेळी तुम्ही सहन  कराल,  पण मी नाही करायची. 

नंतर मुलीकडेही चोरीचा  संशय घेतल्यामुळे,  आधार देणाऱ्या पत्नीच्या निधनानंतर  भ्रमिष्ट झाल्याने ते तिथूनही बाहेर पडतात. लिअरला असा आधारही नाही,  त्यामुळे दिलासाही नाही.  राजवाड्याबाहेर पडण्याचा निर्णय त्याचा त्यानेच घेतल्याने तो  बाहेर पडला आहे. तो बाहेर पडल्यावर त्याच्या मुली गॉनरिल आणि रीगन त्याच्या स्वभावाबाबत बोलतात. ‘कॉर्डिलियावर  त्यांचे सर्वाधिक प्रेम होते,  तिलाच त्यांनी अविचाराने टाकून  दिले आहे. तो कदाचित त्यांचा म्हातारचळ म्हणता येईल. पण  एरवीही स्वतः काय करतो आहोत,  हे कळण्याची त्यांची कुवत  बेताचीच होती,’ असे रीगन म्हणते. त्यावर गॉनरिलही ‘अगदी  उभारीच्या काळातही त्यांचा स्वभाव अतिरेकी होता आणि  आता त्याच्या जोडीला या व्याधिग्रस्त आणि शीघ्रसंतापी वयाबरोबर येणारा दुर्दम्य असा हट्टीपणा आपण गृहीत धरला  पाहिजे,’  असे सांगते. आणि नंतर ‘आता आहेत त्याच  स्थितीत ते अधिकार गाजवू लागले,  तर त्यांनी नुकताच केलेला  तो सत्तात्याग हा आपल्याला अपायकारक ठरायचा,  म्हणून  आपणच काही तरी केलेच पाहिजे आणि तेही तापलेले आहे,  तोवरच’ असे म्हणते.  बेलवलकर कावेरीसह त्यांच्या लाडक्या कोकराकडेम्हणजे  मुलीकडे येतात. तिथेही त्यांचे नाट्यप्रेम आणि  गणपतराव जोशांवरील भक्ती आड येते. कारण ते  गणपतरावांबद्दल एकही उणा शब्द ऐकून घेण्यास तयार  नसतात अन्‌ जावयाच्या साहेबाला घराबाहेर जायला  सांगतात. 

नाटकप्रेमी विठोबा हाच तिथे काही प्रमाणात  दिलासा असतो,  जसा लिअरला विदूषकाचा. पण बाहेरची  भजी खाणे,  पसारा करणे अशा सवयींनी त्यांना घराबाहेर  आउटहाऊसमध्ये हलवले जाते. कावेरी आजारी पडते. पण  तिथे गेल्यावरही त्यांच्यावर चोरी केल्याचा संशय मुलगी घेते  आणि त्यांना नाही,  तर कावेरीला हा अपमान असह्य होतो. त्या धक्क्याने ती मरण पावते. एकाकी आणि काहीसे भ्रमिष्ट  बेलवलकर गावी म्हणजे मोरवाडीला जायला निघतात;  तर  लिअर मुलींच्या अटी अमान्य असल्याने जायला निघतो.  इथून नंतर मात्र लिअर आणि बेलवलकरांचा प्रवास अन्‌  वादळासारखे प्रसंग हे खूपसे सारखे आहेत. कॉर्डिलिया त्यांची अवस्था कळल्यानंतर फौजांसह त्यांच्या शोधात  असते. तसेच बेलवलकरांची मुलेही त्यांचा शोध घेत असतात. दोन्ही नाटकांत शोध पूर्ण होतात,  पण अपेक्षित  सुखद शेवट मात्र होत नाही.  मग नटसम्राटलाच मराठी प्रेक्षकांनी का पसंती दिली  असावी,  असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे महत्त्वाचे कारण  म्हणून चटकन ध्यानात येतो,  या दोन नाटकांतील मुख्य पात्रे  म्हणजे लिअर आणि बेलवलकर यांच्या अवकाशाचा फरक. 

लिअर हा एका देशाचा राजा आहे,  तर बेलवलकर हे  रंगभूमीवरील सम्राट. अर्थातच लिअरचा आवाका मोठा तर  नटसम्राटाचा मर्यादित असणे साहजिक आहे. दुसरे असे  की- किंग लिअरमध्ये ग्लॉस्टरचे दुय्यम,  पण तसे समांतर  कथानक आहे. त्यामुळे ते नाटक पाच अंकी आहे. तीन  अंकांच्या नटसम्राटमध्ये मात्र तसे नाही. लिअरमध्ये लिअर  आणि ग्लॉस्टर दोघांचाही कटू अनुभव आहे,  तर  नटसम्राटमध्ये बेलवलकरांचा. लिअरबरोबर केंट आणि विदूषक असले,  तरी ते त्याचे  नोकरच आहेत. उलट बेलवलकरांबरोबर त्यांची पत्नी आहे.  तीच त्यांचा आधार आणि काळजीवाहक आहे. लिअरने  मोठ्या मुलींना राज्य देऊन धाकटीला बाहेर काढल्यावर,  ‘राजा तू करतो आहेस,  ते अनिष्ट आहे’, असा इशारा देऊन  केंटने भविष्याची सूचना दिली आहे;  तर कावेरीनेही त्यांनी  मुलांना सारे काही देऊन टाकल्यावर त्यांना ‘माणसं वाईट  नसली तरी म्हातारपण वाईट असतं. पुढचं वाढलेलं ताट  द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये माणसानं’ असे सुनावले होते. (तेव्हाच खरे तर पुढे काय होणार,  याची सूचना दोन्ही  नाटककारांनी दिली आहे.) पण राजा केंटला हाकलून देतो व  नंतरही स्वतः होऊन राजवाडा सोडतो,  पण बेलवलकर मात्र  कावेरीबरोबरच मुलाकडे राहतात. हाच मुख्य फरक आहे.  कारण कावेरी ही बेलवलकरांचा आधार आहे. तेच  म्हणतात की, ती म्हणजे त्यांच्यासारख्या गलबताचे बंदर  आहे. विसाव्यासाठी येण्याचे ठिकाण आहे. त्यांचे सारे  काही समजून घेणारी आणि त्यांची जिवापाड काळजी घेणारी  आहे. 

उलट,  केंट व विदूषक आणि काही प्रमाणात  ग्लॉस्टरही लिअरची काळजी घेणारे आहेत; पण पत्नीप्रमाणे  ते त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारे असले,  तरी प्रसंगी दटावू शकणारे नाहीत. तो हक्क जो कावेरीला आहे,  तो  त्यांना नाही. इथेच या नाटकांची वाट वेगळी होते. नटसम्राट  हे बऱ्याच प्रमाणात कौटुंबिक स्वरूपाचे होते (आणि मराठी  प्रेक्षकांची कौटुंबिक नाटकांची आवड वारंवार सिध्द झाली आहे- अगदी ती नाटके पूर्ण मेलोड्रामा असली तरी!)  नटसम्राटमध्ये दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशाच्या सुरुवातीचा आणि तिसऱ्या प्रवेशातील कावेरीबरोबरचे  बेलवलकरांचे संवाद त्या दोघांमधील बंधाची कल्पना देऊन जातात. त्यात थट्टा-विनोद, थोडा प्रेमालाप,  लटका रुसवा- फुगवा आहे आणि त्याबरोबरच एक-दुसऱ्याबद्दल वाटणारी  काळजी स्पष्ट करणारे,  तसेच कावेरीचा समजूतदारपणा,  त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात बेलवलकरांचे कावेरीवर  असणारे अवलंबित्वही दाखवणारे आहे. पहिल्या प्रवेशात  तिची मुलीवरची माया स्पष्ट दिसते. स्टेशनवर त्यांना  घेण्यासाठी कोणीच आलेले नाही,  हे पाहून बेलवलकर त्रागा  करतात तेव्हा ती समजावते : असं व्हायचं नाही. काही तरी गोंधळ झाला असला पाहिजे- तुम्हाला पाणी हवंय ना? उगीचच उन्हामध्ये तापत उभे राहिलात. आणि त्यांना पाणी  देऊन म्हणते : रात्री डोकं ठणकायला लागलं तर... मग  बेलवलकर तिचं वाक्य पुरं करतात : दाबून देणार नाही. हे करणार नाही,  ते करणार नाही. पृथ्वीच्या आरंभापासून  बायकांचे ब्रीदवाक्य आहे हे... 

तिसऱ्या अंकात त्यांना घराबाहेर आउटहाऊसमध्ये ठेवले  जाते,  तेव्हा कावेरी म्हणते : आपण इथं राहू नये,  असं वाटतंय मला. बेलवलकर विचारतात : आणि जायचं कुठं?  तेव्हा ती सांगते : आपण आपल्या गावी जाऊन राहू.  मोरवाडीला. ते विचारतात : तुला त्रास होतोय कावेरी? तेव्हा ती म्हणते : तुम्हाला कळत नाही का?  पण बेलवलकर  सांगतात : मुलं वाजवीपेक्षा जास्त सभ्य आहेत. मनात काही  आलं तरी ती बाहेर बोलत नाहीत. आपणही आपल्याला  काही कळतच नाही असं दाखवावं आणि हाताला लागेल ती  फांदी घेऊन लोंबकळत राहावं,  यातच शहाणपण आहे. तेव्हा  ती स्पष्टपणे सांगते : नको. या अवस्थेत माझी तब्येत कधी  सुधारायची नाही. आणि नंतर त्यांना समजावते : आपण दूर  झालो,  वाडीला जाऊन राहिलो,  तर त्यांच्या मायेला पारखं  होण्याचा प्रसंग यायचा नाही. प्रेम टिकायलादेखील माणसं जरा दूरच असावी लागतात.  त्यावर ते म्हणतात : तुमचं म्हणणं बरोबर आहे.... नली,  माझं कोकरू,  नाचत-बागडत येईल माहेरी आपल्याकडे... मग नंदा आणि शारदाही येतील माझ्या ठमीला घेऊन. माझ्या  मनातून, सरकार... ठमी जातच नाही... बस,  ठरलं.  वाडीला जायचं. नशीब की,  वाडीतलं घरटं आपण कुणाला  देऊन टाकलं नाही. पण आता त्याची काय दशा झाली  असेल,  कुणास ठाऊक! त्यावर कावेरी म्हणते : त्याची  काळजी नको. हे घर सुटलं ना की,  माझा बिछानाही सुटेल.  मी माझ्या हातानं भिंती लिंपून काढेन, जमीन सारवीन,  रंगदेखील मीच देईन. एकदा कमरेला पदर बांधला की,  खोपट्याचाही राजमहाल करीन मी. आपण मात्र मधे-मधे  लुडबूड करायची नाही,  की माझ्या अंगावर ओरडायचं  नाही- आधीच सांगून ठेवते!  आणि पैशाची गोष्ट निघताच आपण चंद्रहार विकून आलेले पैसे ट्रंकेत ठेवले आहेत,  असे सांगते. 

मग  बेलवलकर म्हणतात : एक शेत आहे अजून. त्यावर ती  म्हणते : मग शेतीची अवजारं घेऊ, बैल घेऊ. आणि मग .. तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचं... ते या कल्पनेने सुखावतात  आणि मग त्यावर तिथे गेल्यावर काय काय करायचे यावर  त्यांचे बोलणे होते. त्यातच ते तिला सांगतात की- बायको  मैत्रीण असू शकते,  असतेही. पण मैत्रिणीपेक्षाही आई  अधिक असते. दिवाणखाना कमी असतो,  पण देऊळ जास्त असते. आकाश कमी असते,  पण पृथ्वी अधिक असते.  थोडक्यात,  बायको हे बंदर असतं कावेरी,  नवरा नावाच्या  गलबतासाठी... गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात  होतो,  पराजयाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. अशी  आहे बंदराची महती- म्हणजे बायकोची- म्हणजेच तुझी.  त्यांच्या या संवादातूनच लिअर आणि त्यांच्यातला फरक  स्पष्ट होतो. कारण बेलवलकरांच्या गलबताला भरकटलं  तरी बंदर आहे,  लिअरचं गलबत भरकटलेलं असलं तरी त्याला असं बंदर नाही. त्यामुळेच कावेरीच्या निधनानंतर  त्यांचे- नटसम्राटाचे भ्रमिष्ट आणि सैरभैर होणे,  हे ओढूनताणून  आणलेले न वाटता स्वाभाविक वाटते. त्यापूर्वी त्यांच्यावर मुलीनेच घेतलेला चोरीचा संशय  आणि ती करत असलेले त्याचे समर्थन यामुळे सात्त्विक  संताप आलेले बेलवलकर म्हणतात : मी पैसे चोरले?  सरकार,  तिला माहीत आहे- माझ्या क्रोधाला पाय नाहीत,  हात नाहीत,  लुळा पांगळा आहे तो. वडाऱ्यांनी अर्धवट  चिरलेलल्या डुकराचं धड नुसतं- गटारात तडफडणारं! 

मी पैसे चोरले?  नाही सरकार,  मी रागावणार नाही. काय उपयोग आहे त्याचा?  मी रागावणार नाही, पण तुम्हाला  सांगून ठेवतो,  मी रडणारही नाही. डोळ्यांत आसवं जमायला लागली तरी खिळे मारून डोळ्यांच्या खाचा करीन  संभाजीसारख्या. पण तुझ्यासारख्या आळईसमोर रडणार  नाही. मी पैसे चोरले?  मी पैसे चोरले?  आणि त्यावर मुलगी  बेभानपणे ‘होऽहोऽ तुम्ही चोरले!’  असे म्हणून हाताने डोके  दाबून निघून जाते. त्यानंतर बेलवलकर म्हणतात : मी चोर  आहे! (छातीवर हात आदळत) मी चोर आहे! मी अप्पा बेलवलकर,  नटसम्राट,  लक्षावधीची मालमत्ता गुलाल- बुक्क्याप्रमाणे ज्यानं उधळून दिली, तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला- आपल्या पोरांच्या घरांमध्ये!  परमेश्वरा,  मी इतर सारं काही सहन केलं असतं- पण हे... त्यांचे हे शब्द ऐकताच आजारी कावेरी भिंतीचा, कॉटचा  आधार घेत त्यांच्या जवळ येते आणि ‘ऐकलंत का?’  असे  विचारते. त्यावर बेलवलकर क्षीण स्वरात ‘काय म्हणतेस?’  असा प्रश्न करतात. आणि मग कावेरी म्हणते : सारी दुनिया  आपल्यासाठी संपली आहे आता. आपण दोघंच उरलो  आहोत. आपण दोघंच. एकमेकांसाठी. माझ्या गळ्याची  शपथ आहे,  मी सांगीन ते ऐकायचं. तेव्हा ते म्हणतात : काहीच समजत नाही,  सरकार. आणि मग कावेरी त्यांना  म्हणते : माझ्या काळजाच्या चिंध्या होताहेत. पण मी जगणार आहे- तुमच्यासाठी. मी बरी असते तर एक  क्षणभरही हे सहन केलं नसतं. नंदाच्या घरातून बाहेर पडले  तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला बाहेर पडले असते. पण या  आजारामुळे मी अगतिक झाले आहे, लाचार झाले आहे.

मला माझा भरवसा वाटत नाही. म्हणून सांगते,  ऐकताहात ना? आजची रात्र इथे काढू. कोणाला तरी बरोबर घेऊन उद्या  सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ. मी बंगल्यात जाऊन  येते. एकदा तिला स्पष्ट विचारते, काय तुझ्या मनात आहे  म्हणून. आम्ही घर सोडायला तयार आहोत,  पण असा अभद्र  शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस... मी पायांवर  डोकं ठेवून तिची विनवणी करीन. बये,  तुझ्याजवळ कधी  काही मागितलं नाही,  पुढेही मागणार नाही. पण आज पदर  पसरते तुझ्यापुढे. एखादा माणूस बरोबर दे आणि आम्हाला  मोरवाडीपर्यंत पोचवण्याची व्यवस्था कर. आम्ही आमची  थेरडी थोबाडं तुझ्या संसारात पुन्हा कदापिही दाखवणार  नाही. पण तुम्ही बसायचं इथं!  माझी शपथ आहे. डोकं  फिरवून घ्यायचं नाही. मला थोडं बरं वाटलं ना,  म्हणजे मी  वाटेल तेवढे आयाससायास करीन. मोरवाडीला गेल्यावर  सुखा-समाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारं  अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कूस वांझ  राहिली,  असंच मी समजते. आपली साथ आहे,  तोपर्यंत  कशाचीही पर्वा नाही मला.

मी मनानं खचले नाही. तुमचा आधार मिळाला,  तर कुठल्याही वादळवाऱ्यात दगडासारखी  उभी राहीन- कुठल्याही काळोखातून तुमच्यासाठी रस्ता  काढीन. पण माझं एवढं ऐकायचं- तुम्ही शांत राहायला हवं- ऐकाल ना?  नाटकातील तिच्या या पहिल्याच दीर्घ संवादातून  कावेरीची जिद्द प्रकर्षाने प्रकट होते. ती आजारी आहे आणि  तरीही मुलीचे घर सोडून जायचा आग्रह करत आहे,  कारण  चोरीचा आरोप तिला असह्य झाला आहे.  आणि नंतरही खरोखरच काय झाले आहे हे कळल्यावर  अगतिकपणे सांगते : माझं ऐकायचं. ते विचारतात : काय  सांगणार आहेस?  ती सांगते : मुलीचा गैरसमज झाला. पण  पोरीचा जीव बावरून गेला होता. आपले हाराचे पैसे  ट्रंकेमध्ये होते. तिला या पैशांचं काहीच माहीत नव्हतं. तिला वाटलं... पण त्यांच्या संतापचा पुन्हा उद्रेक होतो. मुलगी  धावत जाऊन त्यांच्या पायावर हात ठेवत व ‘अप्पा’ मी चुकले! मला क्षमा करा, अप्पा, तुमच्या या कोकराला क्षमा  करा!’ तसे म्हणते तेव्हा पुन्हा त्यांचा संयम संपतो आणि ते  म्हणतात : खबरदार चांडाळणी,  त्या शब्दांचा उच्चार  करशील तर! माझं एक लाडकं कोकरू होतं. होतं,  पण आता  कुठं आहे ते?  माझा भ्रम होता तो. गोजिरवाण्या  कोकरासारखी मुलगी होती. एक सशासारखा मुलगा होता.  पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पाहा- ते सांगतील,  कोणीही  कोणाचं नसतं. 

अंतराळात भटकणारा एखादा आत्मा  आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वीवरच्या मातीत उतरतो  आणि आम्हाला वाटतं की, आम्ही बाप झालो- आई  झालो. पण खोटं सगळं खोटं! आपण फक्त जिने असतो, फक्त जिने! आणि ते खुर्चीवर कोसळतात. तेव्हा कावेरी  उठून त्यांच्याकडे येण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणते : माझं एकदा ऐकायचं- मला आता हे सहन होत नाही- छातीत कळ येते आहे- पण- आजची रात्र इथं काढायला  हवी. उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ- मी खचले  नाही- मी तिथं तुमच्यासाठी- तुमच्यासाठी- आई गं! असं म्हणत कोसळते तेव्हा ते ‘सरकारऽऽ सरकारऽऽ’ असं  ओरडत तिच्याकडे जातात. पण ती तेव्हाच गेलेली असते,  हे  नंतरच्या अंकाच्या सुरुवातीला कळते.  नंतरच्या तिसऱ्या अंकातील दुसऱ्या प्रवेशापासून पुढे सारे  नाटकच बेलवलकरांचे आहे. लिअरप्रमाणे भटकताना ते  म्हणतात : घर देता का घर, एका तुफानाला कुणी घर देता का  घर...? आणि शेवटी : तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको,  पदवी नको,  हार नको,  थैलीमधली भेट नको. एक हवं लहान घर,  पंख मिटून राहण्यासाठी... एक हवी आरामखुर्ची,  तुफानाला बसण्यासाठी... आणि  विसरू नका बाबांनो,  एक तुळशीवृंदावन हवं,  मागच्या  अंगणात- सरकारसाठी! 

सरकारऽ सरकारऽऽ यातूनच त्यांची  अगतिकता स्पष्ट होते. कावेरीविना ते असहाय बनले आहेत  हे कळते आणि कावेरीचे महत्त्व आपोआपच अधोरेखित  होते. हाच या दोन नाटकांतला जाणवण्याजोगा फरक आहे. कारण लिअरला आधार देण्यासाठी कॉर्डिलिया आलेली  आहे,  पण पराभवानंतर दोघेही अटकेत आहेत आणि तिथेच  तिचा अंत होतो.  त्यानंतर बेलवलकरांना आधार देतो बूट पॉलिश करणारा  राजा. लिअरला ज्याप्रमाणे केंटचा आहे,  तसा. पण  विठोबाने त्यांना शोधून काढल्यावर सांगतो की, सर्व मंडळी  येत आहेत. तेव्हा ते विचारतात : सर्व?  विठोबा उत्तरतो : होय,  सर्व. मग ते विचारतात : ठमीसुध्दा?  तेव्हा तो हो  म्हणतो आणि सांगतो : नाही म्हटल्यावर आकांत केला  पोरीनं आणि आधीच जाऊन बसली गाडीत. (ठमीच्या  रूपाने नाटकात कौटुंबिक जिव्हाळा आणि वात्सल्याचाही  शिडकावा आहे.) त्यावर ते म्हणतात : आणि- आणि खरं  सांग,  सरकार... माझी कावेरीही आहे त्यांच्याबरोबर?  तेव्हा तो डोळे पुसताच म्हणतात : तू रडतो आहेस हो- मला आठवलं- कावेरी जिवंत नाही. कॉर्डिलियासारखी मेली  आहे ती. परमेश्वरा, घोड्याला,  उंदराला जिवंत राहता येतं  आणि माझ्या कावेरीला मात्र नाही- ती आता कधीच परत  येणार नाही! कधीच नाही! कधीच नाही!  आणि शेवटी मुलगी विचारते : तुमच्या कोकरावरचा  तुमचा राग अजून गेला नाही?  त्यावर ते सांगतात : रागालोभाची किल्मिषं आता माझ्या मनात शिल्लकच राहिली  नाहीत.. मी कोणावरही रागावलो नाही. चैत्रातली सोनेरी  सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे.

नव्या नाटकाचा पडदा  वर जायची वेळ आहे ही. तिसरी घंटा वाजते आहे. धुपाचा  सुवास हवेत दाटला आहे. ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत  आहेत... आणि माझी नटी तर आगंतुकपणे अगोदरच  स्टेजवर जाऊन बसली आहे- माझी वाट पाहत. राजानं मला  सांगितलं आहे,  हे थिएटर आहे म्हणून. (लिअरलाही कॉर्डिलियाने सांगितले आहे की तुम्ही फ्रान्समध्ये नाही,  तुमच्याच भूमीवर आहात.) बस, आणखी काय हवं?  राजा, माझ्याजवळ ये बाळ. ठमे,  तूही ये भवाने. (दोघांना जवळ  घेतात) नटाजवळ शेवट शिल्लक राहते ते फक्त नाटकच.  कर्णानं आपला सोन्याचा दात काढून दिला; मी  नाटकाशिवाय काय देणार तुम्हाला?  मुलगा त्यांना घरी यायला सांगतो तेव्हा रागावून ते  म्हणतात : दूर व्हा! मी सांगतो,  दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक  आहेत. दया दाखवा म्हणून हा ज्यूलियस सीझर कोणाची  प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून  त्याच्यावर दया दाखवत नाही. त्याच्या अढळपदाला तोड  नाही... ते पाहा मारेकऱ्यांनी आपल्या कट्यारी उपसल्या  आहेत,  मला- ज्यूलियस सीझरला मारण्यासाठी. मला  चहूबाजूंनी घेरलंय त्यांनी. तो मारेकरी ओरडतोय- मारा, मारा कट्यारी चालवा- (स्वतःच्या छातीवर कट्यारी  मारल्याचा आविर्भाव करतात) चालवा कट्यारी! (धडपडत पुढे जातात.) ओह! (एक कट्यार लागल्याचा अभिनय  करीत) कोण- कोण - ब्रूटस तूसुधध्दा? - मग मर - सीझर मर - (खाली कोसळतात. सगळे धावतात.) राजा धावत जाऊन, ‘बाबाऽ असे म्हणून त्यांच्याजवळ बसतो,  तेव्हा ते म्हणतात : असं नाटक असतं- राजा- असं- आणि पडदा पडतो.

नटसम्राट बेलवलकरांचा मृत्यू लिअरप्रमाणे मंचावर  प्रत्यक्ष न दाखवता (ते खाली कोसळतात आणि नंतर ‘असं  नाटक असतं,  राजा, असं नाटक असतं...’ असं म्हणतात.)  फक्त सूचित केला आहे, (तोही त्यांची मुले, नात इ. सर्व  जण आजूबाजूला असताना.) कदाचित म्हणूनच हा शेवट  अधिक परिणामकारक झाला असावा. कारण तिन्ही मुली  आणि लिअरच्या मृत्यूनंतरही किंग लिअरमध्ये एडगर अन्‌  केंटचे संवाद आहेत. किंग लिअर पाहिल्यावर ध्यानात राहतो  लिअर,  मात्र नटसम्राट पाहिल्यावर नटसम्राटांएवढीच कावेरीही लक्षात राहते!

 (संदर्भ आणि आधार : नटसम्राट : वि. वा. शिरवाडकर  आणि राजा लिअर : विंदा करंदीकर) 

Tags: marathi theater kusumagraj shakspeare king lear natsamrat नटसम्राट नाटक मराठी साहित्य संस्कृती belvalkar natasamrat natak Marathi hitya sanskruti weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके