डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्त्रियांसंबंधीचे धोरण घटना समितीतच ठरले तर त्याला अर्थ राहील, नाही तर पुढे कायदे होतच राहतील, बदलतही जातील. म्हणून घटना समितीत मूळ उद्देश मान्य व्हावेत, म्हणून या सर्व जणी आग्रही होत्या. जिथे जिथे त्यांच्या दृष्टीने काही गफलत होण्याची शक्यता दिसली, तिथे त्या सर्वांनी एकजुटीने विरोध केला. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच स्वतंत्र देशात पहिले राष्ट्रगीत गाण्याचा, राष्ट्राला राष्ट्रध्वज अर्पण करण्याचा मान महिलांना मिळाला. हंसा मेहता यांना घटनेवर सही करण्याचा मान मिळाल्याने स्वातंत्र्यसंग्रामातील स्त्रियांच्या योगदानावर जणू सुवर्णमुद्राच उमटली! 

भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 या दिवसापासून अमलात आली. घटनेचा मसुदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांडपंडित कायदेतज्ज्ञाने केला. महात्मा गांधींनी 1922 मध्ये या देशाच्या राज्यकारभाराचे भवितव्य ठरविण्यासाठी निर्वाचित सदस्यांची समिती असणे आवश्यक असल्याची मांडणी केली; पण ही मांडणी-मागणी या स्वरूपात पुढे आली, ती काँग्रेसने 1934 मध्ये केलेल्या ठरावामुळे!

त्याहीपूर्वी काँग्रेसने 1906 मध्ये जी स्वराज्याची मागणी केली होती, त्यात घटना समितीची कल्पना अंतर्भूत होती. स्वतंत्र भारताची घटना स्वातंत्र्य, बंधुत्व, समानता, सर्वधर्मसमभाव मानणारी व लोकशाही व्यवस्थेची असावी, हे गृहीत तत्त्वच होते. या उद्दिष्टांना बाधा येईल, असा कोणताही कायदा करता येत नाही. हिंदी स्वातंत्र्याचा कायदा अमलात आल्यावर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती अस्तित्वात आली. त्यात प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधी, काही प्रसिद्ध वकील व अन्य काही प्रतिनिधींचा समावेश करून ही समिती स्थापण्यात आली. या समितीवर काही स्त्रियांची निवड झाली होती; पण त्यापैकी बहुतेक स्त्रिया काँग्रेस, मुस्लिम लीग अशा पक्षांच्या कार्यकर्त्या होत्या. त्या वेळी त्यांची संख्या दोन्ही हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी होती.

अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना 1927 मध्ये झाली होती. या परिषदेची स्थापना करण्यात सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृतकौर, हंसा मेहता अशांसारख्या विदुषी होत्या. त्या सर्व जणी काँग्रेसप्रणीत चळवळीत सक्रिय होत्या. त्यांचे म्हणणे असे होते की, स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार घटना समितीतच होणे जरुरीचे आहे. त्यामुळे स्त्रियांचा प्रतिनिधी घटना समितीत असणे आवश्यक आहे. सरोजिनी नायडू, हंसा मेहता यांनी हा मुद्दा काँग्रेसमध्ये लावून धरला व त्यांची मागणी मान्य झाली. मुस्लिम लीगने या समितीवर बहिष्कार घातला.

पुढे कॅबिनेट मिशन प्लॅनखाली निवडणुका झाल्या. त्यात 13 स्त्रिया निवडून आल्या. रेणुका रे व राधाबाई सुब्बरायन यांची महिलांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. अशा एकूण पंधरा महिलांनी घटना समितीत काम केले. 1.सरोजिनी नायडू, 2.हंसा मेहता, 3.दुर्गाबाई देशमुख, 4.राजकुमारी अमृतकौर, 5.अम्मू स्वामीनाथन, 6.पूर्णिमा बॅनजी, 7.विजयालक्ष्मी पंडित, 8.ॲनी मस्कहरांन्स, 9.दक्षिणांयनी वेलायुधन, 10.कमला चौधरी, 11.लीला रॉय, 12.सुचेता कृपलानी, 13.बेगम ऐझाझ रसूल, 14. रेणुका रे, 15.मालती चौधरी. वरील सर्व महिला सदस्य हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून आल्या असल्या, तरी  त्यात बंगाली भाषक महिलांची संख्या अधिक दिसते.

या यादीतील अनेक जणी उच्चविद्याविभूषित होत्या. निरनिराळ्या विषयांत त्यांनी ऑक्सफर्ड व केंब्रिजसारख्या नावाजलेल्या विद्यापीठांतून शिक्षण घेतले होते. अम्मू स्वामिनाथन (आझाद हिंद फौजेच्या महिला विभागप्रमुख कॅप्टन लक्ष्मी सहगल- स्वामिनाथन यांची आई) या रूढार्थाने म्हणजे शाळा-कॉलेजमध्ये जाऊन शिकल्या नव्हत्या. त्यांचे सर्व शिक्षण इंग्रज शिक्षकांकरवी घरीच झाले. त्यांचे हे शिक्षण विषयवार व त्या-त्या विषयात तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांकडे झाले. अम्मू स्वामिनाथन यांच्यामध्ये उपजत तैलबुद्धी असल्याने त्या वक्तृत्वात कमी पडल्या नाहीत. त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. सर्व उच्चविद्याविभूषित महिला सदस्य या परदेशातून शिक्षण घेऊन आल्यावर इतर काही उद्योग-व्यवसाय न करता स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाल्या होत्या, हे त्यांचे वैशिष्ट्य होय.

घटना समितीच्या निवडणुकीत स्त्रिया, अल्पसंख्य, हरिजन यांना तिकिटे दिली पाहिजेत, असा गांधीजींचा काँग्रेसकडे आग्रह होता. त्यामुळे या सर्वांना काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले. या घटना समितीत जस्टिस पार्टी, हिंदू महासभा, शेकाप व मुस्लिम लीगचे उमेदवार होते. या पक्षांपैकी मुस्लिम लीगच्या बेगम एझाझ रसूल सोडल्या, तर इतर कोणत्याही पक्षाने स्त्रियांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांची उपस्थिती ही समितीत नव्हती. घटना समितीतील 15 जणींपैकी एकही बॅकबेंचर नव्हती. बैठकींना पूर्णवेळ हजेरी, घटना समित्यांच्या उपसमित्यांतून जबाबदारीने काम करणे, अभ्यासू वृत्ती, निर्भीडपणा हे गुण या सर्व महिला सदस्यांत होते.

त्यांच्यापैकी काहींनी सर्व कलमांवर आपला ठसा उमटविला. उदा.- दुर्गाबाई देशमुख यांनी महिलांचे प्रश्न, त्यांची सामाजिक बाजू व कायदेशीर गोष्टी यांवरील चर्चेत खूपच योगदान दिले. रेणुका रे यांनी स्त्रियांच्या संदर्भातील कलमांवर भर दिला. सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू व विजयालक्ष्मी पंडित यांनी सरनाम्याला धरून कलमांची चर्चा करण्यात अधिक रस घेतला. यापैकी काही जणींची पार्श्वभूमी व कार्य समजून घेणे उचित ठरेल.

सुचेता कृपलानी यांचा जन्म 1906 मध्ये अंबाल्याला झाला. सुचेताबाईंचे वडील कट्टर ब्राह्मो समाजवादी असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण व त्या काळात मुलींना नाकारले गेलेले स्वातंत्र्य दिले. परिणामी, सुचेताबाईंचे शिक्षण अंबाला व पुढे लाहोर विद्यापीठात झाले. पदवीनंतर त्यांना बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. तिथेच त्यांचा परिचय जे.बी.ऊर्फ दादा कृपलानी (पुढे आचार्य कृपलानी नावाने प्रसिद्ध) यांच्याबरोबर झाला. परिचयाचे प्रेमात व प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले. कृपलानी व सुचेताबाई यांच्या वयात सुमारे 22 वर्षांचे अंतर असल्यामुळे त्यांच्या लग्नाला दोन्ही घरांतल्या लोकांकडून विरोध होणे स्वाभाविकच होते. आचार्य कृपलानींमुळे त्या गांधीजींच्या सहवासात आल्या. नोकरी सोडून काँग्रेसचे काम करू लागल्या. त्या गांधीजींच्या सूचनेवरून आचार्य कृपलानींबरोबर 1946 मध्ये नौखालीमध्ये गेल्या. आचार्य परत आले तरी सुचेताबाई नौखालीतच राहिल्या.

स्वत: बंगाली भाषिक असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. विस्थापितांच्या व जखमी रुग्णांच्या त्या ‘माँ’ झाल्या. पूर्व बंगालच्या खेड्याखेड्यांत जाऊन त्यांनी शांतता व अहिंसेचा प्रचार केला. बंगाल विधानसभेतर्फे त्या घटनासमितीत निवडून गेल्या होत्या. सुचेताबाईंच्या म्हणण्याप्रमाणे घटना समितीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची बैठक होऊन, चर्चेने निर्णय घेतले जाऊन दुसऱ्या दिवशी मांडले जात. एखाद्या सदस्याला वेगळे काही बोलायचे असले, तरी त्याला तशी मुभा होती. कोणत्याही कलमावर, उपकलमावर दुरुस्ती आणण्याचा व त्यासाठी पक्षातील इतर सदस्यांचे मन वळविण्याचा अधिकार होता. सुचेताबाईंनी याचा फायदा अनेक वेळा घेतला. संपत्ती व मालमत्तेच्या अधिकारांच्या संदर्भात दुरुस्ती मांडावी, हे त्यांनी काही समविचारी सदस्यांना पटवून दिले. बी.एन.राव यांनी या कलमाला दुरुस्ती तयार केली, ती सुचेताबाईंनी समितीसमोर मांडून त्यावर उत्तम भाषण केले.

काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच या दुरुस्तीला विरोध असल्यामुळे ती घटना समितीच्या बैठकीत फेटाळली गेली. पण पक्षाच्या विरोधात असले तरी त्या दुरुस्तीवर जनमत बनवले जाणे आवश्यक होते आणि त्याचा फायदा सुचेताबाईंच्या सडेतोडपणामुळे निश्चित साधला. कलम 31 च्या संदर्भात पंडितजींनी पक्षाच्या बैठकीत जी भूमिका घेतली, तिच्या उलट भूमिका घटना समितीत घेतली; म्हणून अवाक्‌ झालेल्या सुचेताबाईंनी नेहरूंना चांगलेच सुनावले. परिणामी, नेहरूंनी पुढे दोन वर्षे सुचेताबाईंशी अबोला धरला. सुचेताबाईंचा विरोध किती योग्य होता, ते पुढे गोलकनाथ केसमुळे स्पष्ट झाले. दि.14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री स्वातंत्र्याचे स्वागत करण्यासाठी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात घटना  समितीची सभा झाली. त्या सभेची सुरुवात सुचेताबाईंच्या आवाजात ‘वंदे मातरम्‌’ या राष्ट्रगीताने झाली होती. दि.1 डिसेंबर 1974 रोजी हृदविकाराने या विदुषीचे निधन झाले.

राजमुंद्री नावाच्या काकीनाडमधील एका खेड्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात 1909 मध्ये जन्मलेली दुर्गा एक तेजस्वी विदुषी व कनवाळू कार्यकर्ती होईल, असे भाकीत त्या काळी कोणी केले असते, तर ते हसण्यावारीच नेले असते. त्या काळात प्रथेप्रमाणे आठव्या वर्षी दुर्गाबाईंचे लग्न जमीनदाराच्या एका मुलाबरोबर झाले. वयात आल्यावर लग्नाचा खरा अर्थ समजला. जमीनदार कुटुंबातील बंधने त्यांना जाचू लागली. घरातल्या विरोधाला न जुमानता वयाच्या 12 व्या वर्षी एका महिलेच्या दारूड्या नवऱ्याविरुद्ध दुर्गाबाईंनी स्त्रियांचा मोर्चा काढला. आपला संसार करण्याऐवजी समाजाच्या हितासाठी लढले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. ‘आपण लग्नाच्या बंधनातून मुक्त होऊ इच्छितो. तुम्ही मात्र परत संसार उभा करा,’ असे पती सुब्बाराव यांना सांगून त्या शांतपणे संसारमुक्त झाल्या. लग्न झाले तेव्हा इयत्ता चौथी पास झालेल्या दुर्गाने बनारस हिंदू विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा दिली. त्यानंतर मद्रास विद्यापीठातून बी.ए. ऑनर्स व एलएल.बी. केले.

दुर्गाबाईंनी मद्रासमध्ये वकील म्हणून खूप नाव कमाविले. दुर्गाबाईंना पुढील शिक्षणाकरता विलायतेला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली, पण त्याच वेळी युद्ध सुरू झाले म्हणून त्या जाऊ शकल्या नाहीत. दुर्गाबाई 1946 मध्ये घटना समितीच्या सदस्य म्हणून निवडल्या गेल्या. घटना समितीत त्यांची उपस्थिती शंभर टक्के होती. पंडित नेहरू, गोपालस्वामी अय्यंगार, बी.एन.राव अशा दिग्गज नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. घटना समितीच्या स्टिअरिंग समितीच्या त्या सदस्य होत्या. त्यांनी घटना समितीत 750 दुरुस्त्या मांडल्या. त्यातल्या काही के.संथानम्‌ व अनंतस्वामी अय्यंगार यांनी त्यांना मांडण्याकरिता सुचविल्या होत्या.

पुढे जे हिंदू कोड बिल पास झाले, त्याला आकार देण्यात दुर्गाबाईंचा महत्त्वाचा वाटा होता. त्या घटना समितीत प्रश्न व मुद्दे वारंवार उपस्थित करीत. अशाच एका त्यांच्या मुद्यावर डॉ.आंबेडकर वैतागाने म्हणाले, 'Here is a woman with a bee in her bonnet.' डॉ.आंबेडकर स्त्रियांची females, women and ladies  अशी वर्गवारी करीत. दुर्गाबाईंना त्यांनी women वर्गात बसविले होते. स्त्रियांच्या अधिकारासंबंधी त्यांनी घटना समिती व प्लॅनिंग कमिशन यामध्ये फारच मेहनत घेतली. या विषयाबाबत त्या बोलू लागल्या की, त्यांचे दुर्गा नाव सार्थ वाटे. स्त्रिया व समाजातील दुर्बल घटक यांच्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. या आंध्रकन्या व महाराष्ट्राच्या सुनेने (सी.डी.देशमुख यांची पत्नी) एक समृद्ध जीवन जगून 1981 मध्ये जगाचा निरोप घेतला.

हंसा मेहता या मुंबई व गुजरातमधून घटना समितीवर पोहोचलेल्या एकुलत्या एक महिला. हंसाबेन लंडनमध्ये पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या असता, सरोजिनी नायडूंची ओळख झाली. या परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले व ते दोघींनाही आयुष्यभर पुरले. सरोजिनीबाईंमुळेच त्या स्त्रियांच्या चळवळीकडे ओढल्या गेल्या. लग्नानंतर त्यांच्या अंगच्या सुप्त गुणांना धुमारे फुटले. मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर त्या निवडून गेल्या. भारतीय महिला परिषदेच्या (AIWC) अध्यक्षपदी असताना राजकुमारी अमृतकौर व लक्ष्मी मेनन यांच्या साह्याने त्यांनी स्त्रियांच्या अधिकाराची सनद बनवली. त्या सनदेत स्त्रीजीवनाशी सर्वस्पर्शी मुद्दे होते. हिंदू कोड बिल बनविताना त्याचा उपयोग झाला, यावरून त्या सनदेचे महत्त्व लक्षात येते.

हंसाबेन 1946 ते 1950 दरम्यान घटना समितीच्या सदस्य होत्या. घटना समितीने स्त्रियांच्या अधिकारासंबंधी विचार करण्यासाठी जी उपसमिती बनविली, त्यावर हंसाबेन व राजकुमारी अमृतकौरही होत्या. हंसा मेहताना सुचेताबाई, दुर्गाबाई, विजयालक्ष्मी पंडित यांनी उत्तम साथ दिली. समान  नागरी कायद्यासंबंधी दुरुस्तीची मागणी त्यांनी लावून धरली. त्याबाबतचा त्यांचा आग्रह मान्य झाला नाही, तेव्हा हंसाबेन यांनी आपली असहमती नोंदवून घ्यायला भाग पाडले. दि.14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री हिंदी स्त्रियांनी स्वतंत्र भारताचा ध्वज आपल्या प्रतिनिधी म्हणून राजेंद्र प्रसादांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्याची जबाबदारी हंसा मेहतांवर सोपवली होती. हा राष्ट्रध्वज बरोबर रात्री बारा वाजता भारत स्वतंत्र झाल्याचे सांगत डौलाने फडकला.

हंसाबेन फार मोठ्या विदुषी होत्या. भारताची घटना तयार झाली, त्यावर मोजक्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हंसा मेहता त्यातील एकमेव महिला होय. अत्यंत संपन्न व दीर्घायुष्य लाभलेली ही भारतकन्या वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धापकाळाने निवर्तली.

स्वातंत्र्यपूर्व काळात नेतेच नव्हे, तर कार्यकर्तेही मूल्यांची जपणूक करणारे होते. रेणुका रे या त्यापैकी एक! भारतीय महिला परिषदेची प्रतिनिधी म्हणून घटना समितीवर रेणुकाबाईंची नियुक्ती झाली होती. आजकालच्या नियुक्तीप्रमाणे ती नियुक्ती म्हणजे एक राजकीय सोय नव्हती. रेणुकाबाईंनी इंग्लंडच्या सुप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षणसंस्थेतून अर्थशास्त्रातली पदवी घेतली. जगप्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ होरॉल्ड लास्की, क्लेमंट ॲटली, बेव्हरेज यासारखे राज्यशास्त्र-अर्थशास्त्रातील प्रकांडपंडित तिथे प्राध्यापक होते. वयाच्या 16व्या वर्षी कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून काम करीत असताना रेणुका यांनी महात्मा गांधींना अगदी जवळून पाहिले. त्यांचे राहणीमान गांधीतत्त्वाप्रमाणे होते.

घटना बनवीत असताना निरनिराळ्या कलमांखाली स्त्रियांना कसा न्याय मिळवून देता येईल, या बाबतीत मार्गदर्शन व्हावे यासाठी रेणुका रे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या स्वीकृत सदस्य होत्या. भारतातील स्त्रियांच्या चळवळीतील एक कार्यकर्ती म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांची नियुक्ती झाली होती. धर्मस्वातंत्र्य, समान नागरी कायदा, मुलाला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा, याबाबतची रेणुका रे यांची घटना समितीतील भाषणे सभागृहात व बाहेरही फारच गाजली. वृत्तपत्रांनी या भाषणांना फारच प्रसिद्धी दिल्यामुळे रेणुका रे यांचे घटना समितीतील व अ.भा.म. परिषदेच्या झेंड्याखाली केलेले काम जनतेपर्यंत पोहोचले.

घटना समितीत विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू यांनी महिलांना आरक्षण देण्याविषयी आपले परखड विचार मांडले. याबाबत डॉ.आंबेडकरांना सरोजिनी नायडू म्हणाल्या, ‘‘आजपर्यंत कर्तृत्ववान स्त्रीला कुठे संधी दिली गेली नाही, असे घडलेले नाही. आमचे नेते व कार्यकर्तेही महिलांची योग्यता ओळखतात. त्यामुळे अशा प्रकारे कायद्याने महिलांना आरक्षण दिले गेले, तर कदाचित त्यांच्यातील जिद्द संपेल. आमचा आमच्या बंधूंवर विश्वास आहे. ते कर्तबगार महिलेला ती केवळ महिला म्हणून कदापिही डावलणार नाहीत, याची खात्री आहे.’’ पण या विश्वासाविरुद्ध कालचक्र फिरूही शकते, हे या विदुषीच्या लक्षात दुर्दैवाने आले नव्हते.

राजकुमारी अमृतकौर या कपूरथळ्याची राजकन्या. त्यांच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांचे राजपद गेले. समाजकल्याण या विषयाचा अभ्यास करण्याकरिता त्या लंडनला गेल्या होत्या. पुस्तकातून समाज जाणून घेण्यापेक्षा तो समाजात मिसळूनच कळेल, अशी त्यांची धारणा होती. ही राजकन्या अभ्यासक्रम अर्धवट टाकून स्वगृही परतली. गांधीजींची अनुयायी बनली. हंसा मेहता, दुर्गा देशमुख, रेणुका रे व सुचेता कृपलानींना अमृतकौर यांचा मोठा फायदा झाला. याशिवाय मुस्लिम लीगच्या बेगम एझाझ रसूल यांनीही धर्मस्वातंत्र्य व स्त्रियांच्या प्रश्नांवर भाषणे केली आहेत.

पूर्णिमा बॅनर्जी (अरुणा असफअलींची बहीण) यांनी भारतात परतल्यावर राष्ट्रीय आंदोलन व महिला चळवळीत स्वत:ला झोकून दिले. युनिफॉर्म सिव्हिल कोड या शब्दाला विरोध करून घटना समितीचे सभागृह दणाणून सोडले. कॉमन सिव्हिल कोड या शब्दांचा आग्रह धरला. स्त्रियांसंबंधीचे धोरण घटना समितीतच ठरले तर त्याला अर्थ राहील, नाही तर पुढे कायदे होतच राहतील, बदलतही जातील. म्हणून घटना समितीत मूळ उद्देश मान्य व्हावेत, म्हणून या सर्व जणी आग्रही होत्या. जिथे जिथे त्यांच्या दृष्टीने काही गफलत होण्याची शक्यता दिसली, तिथे त्या सर्वांनी एकजुटीने विरोध केला. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच स्वतंत्र देशात पहिले राष्ट्रगीत गाण्याचा, राष्ट्राला राष्ट्रध्वज अर्पण करण्याचा मान महिलांना मिळाला. हंसा मेहता यांना घटनेवर सही करण्याचा मान मिळाल्याने स्वातंत्र्यसंग्रामातील स्त्रियांच्या योगदानावर जणू सुवर्णमुद्राच उमटली!

आज या महिलांपैकी कोणीही हयात नाहीत. ज्यांनी ‘जगातली एक सुंदर राज्यघटना- जी स्वातंत्र्य, समता व बंधुभावावर आधारलेली राज्यव्यवस्था तयार करून दिली, त्या समस्त सदस्यांना विनम्र अभिवादन!  

(रोहिणी गवाणकर यांच्या ‘अग्निशिखा’ या पुस्तकातून)   

Tags: राष्ट्रगीत सुचेता कृपलानी रेणुका रे विजयलक्ष्मी पंडित रोहिणी गवाणकर नेहरू बाबासाहेब आंबेडकर अप्पू स्वमिनाथन दुर्गाबाई देशमुख हंसा मेहता अमृता कौर स्त्री संविधान राज्यघटना Rohini Gavankar National Anthem Sucheta Kripalani Renuka Ray Vijayalaxmi Pandit Neharu Babasaheb Ambedkar Appu Swaminathan Durgabai Deshmukh Hamsa Mehata Amrita Kaur Constitution weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके