डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतातील स्त्री-चळवळ समतेच्या संदर्भात

वसाहतवादाच्या काळात स्त्रियांसाठी म्हणून अनेक सुधारणा केल्या गेल्या. परंतु त्यांतूनच स्त्रीप्रश्नाचे नवे रूप घडविले गेले हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. इ.स.1829 मध्ये सतीबंदी कायदा झाला. इ.स.1839 मध्ये त्यात ‘ऐच्छिक सती’चे कलम घुसडले गेले. इ.स.1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आला. ह्या कायद्यान्वये पुनर्विवाह झाल्यावर त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची पोटगी नाकारली गेली. पुनर्विवाहितेला पोटच्या मुलांवरचा हक्क सांगता येईना. मृत पतीच्या संपत्तीवरील अधिकारही नाकारला गेला.

एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना भारतातील स्त्री-चळवळीसमोर फार मोठी आव्हाने आणि विचित्र गुंतागुंत उभी राहिली आहे. राज्यकर्त्यांनी स्वीकारलेले जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे धोरण, देशाच्या कानाकोपऱ्यांत हिंस्र होत जाणारा जात-जमातवाद, सतत वाढत जाणारा, चेहरा हरविलेला, विशेषतः स्त्रियांच्या बाट्याला येणारा बलात्कारासारखा हिंसाचार, धर्माच्या नावाखाली केले जाणारे व्यापारी, युद्धखोर राजकारण- या सर्व प्रक्रियांमधून ‘स्त्री-प्रश्न’ घडविला जात आहे. जेव्हा तिसऱ्या जगाच्या दारिद्र्याचे एकमेव कारण ‘वाढती लोकसंख्या’ असे ठरविले जाते, तेव्हा भारतातील स्त्रियांवर आणि त्यांतही निरक्षर आणि दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाशयांवर 'प्रयोग' केले जातात. आणि तेही पहिल्या जगाने घातक म्हणून त्याज्य ठरविलेल्या गर्भनिरोधक उपाययोजनांचे! संस्कृतीच्या क्षेत्रात जागतिकीकरण प्रवेश करते, तेव्हा भारतीय स्त्रीची एकसाची, एकसत्त्वी प्रतिमा निर्माण केली जाते. अशी प्रतिमा एकीकडे पाश्चात्त्यविरोधी तोंडवळा असलेली असते तर दुसरीकडे भिन्न जातीजमातींत भिन्न भिन्न रूपांत वावरणाऱ्या स्त्रियांना त्यांचे भारतीयत्व नाकारणारीही असते. 

सुधारणांतून स्त्री-प्रश्नाचे नवे रूप
वसाहतवादाच्या काळात स्त्रियांसाठी म्हणून अनेक सुधारणा केल्या गेल्या. परंतु त्यांतूनच स्त्रीप्रश्नाचे नवे रूप घडविले गेले हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. इ.स.1829 मध्ये सतीबंदी कायदा झाला. इ.स.1839 मध्ये त्यात ‘ऐच्छिक सती’चे कलम घुसडले गेले. इ.स.1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आला. ह्या कायद्यान्वये पुनर्विवाह झाल्यावर त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची पोटगी नाकारली गेली. पुनर्विवाहितेला पोटच्या मुलांवरचा हक्क सांगता येईना. मृत पतीच्या संपत्तीवरील अधिकारही नाकारला गेला. संगारी, वैद ह्यांनी या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते सामाजिक चळवळीच्या दोन जाती कल्पिता येतात. लोकशाहीवादी आणि आधुनिकीकरणवादी.

लोकशाहीवादी चळवळी पाया आणि इमारत या दोहोंमध्ये परिवर्तन साधू इच्छितात. लैंगिकतेवर आधारित श्रमविभाग आणि संपत्तीचा अधिकार यांचे आमूलाग्र परिवर्तन करणे आणि पुरुषसत्ताक विचारप्रणालीवर आघात करणे अशा दोन्ही गोष्टी ह्या चळवळी करू पाहतात. शेतकरी, कष्टकरी, स्त्री-पुरुषांच्या चळवळी या अशा स्वरूपात असतात. सामाजिक सुधारणावादी वा राष्ट्रवादी चळवळी सार्वजनिक जीवनात सहभागी होण्यास मध्यमवर्गीय स्त्रियांना भरपूर वाव निर्माण करतात. ह्या चळवळी वर्गीय विषमतेवर आघात करीत नाहीत. तसेच त्यावर भरही देत नाहीत. ह्या आधुनिकतावादी चळवळी स्त्रियांना वैवाहिक नात्यामध्ये सहचारिणीची भूमिका घेण्यास, तसेच भिन्न व्यवसायांमध्ये प्रवेश करण्यास, राजकीय चळवळींमध्ये सहभागी होण्यास मदत करतात. 

नेहरू युगातील भारतीय पुरुषसत्तेचे विश्लेषण ‘देवी’ आणि ‘दासी’ नावाच्या भेदभावाच्या संदर्भात झाले आहे. भारतीय घटनेने 15व्या कलमानुसार स्त्रियांना एकीकडे समान हक्क बहाल केले. पण त्याच वेळी स्त्रिया आणि मुले अशा चौकटीत ‘विशेष संरक्षणा’ची गरज नोंदविली. प्रत्यक्षात या मागासपणाची नैतिक जबाबदारी राज्यसंस्थेने स्वतःकडे घेतली नाही. भारतातील पुरुषसत्ताक व्यवस्थेवर नेमके बोट ठेवण्याऐवजी स्त्रियांची अवनत स्थिती आपल्या एकूण मागासपणाशी जोडली. मागास-दुर्बलपणा संपला की स्त्रिया आपोआप सबल होतील असे मानले. 

डाव्यांचा आशावाद आणि गांधींचे मार्गदर्शन 
डाव्या विचारवंतांनी भारतीय समाजसंरचनेचा पाया वर्ग हा मानला. पाया ढासळला की जात, लिंग आदी विषमता डोलाऱ्याचा भाग असल्याने कोसळतील असेही मानले. भांडवलशाही लढ्याव्यतिरिक्त स्त्रियांनी स्वतंत्रपणे आपल्या शोषणाविरुद्ध लढा उभारणे हे फूटपाडेपणाचे लक्षण मानले गेले. थोडक्यात, आधुनिक उद्योगधंद्यांच्या विकासापोटी उद्भवलेल्या नव्या वर्गलढ्यातून जन्मसिद्ध जाती नष्ट होतील, तसेच स्त्रियांचे व्यवस्थात्मक दुय्यमत्वही नष्ट होईल; असा आशावाद येथे दिसतो. नेहरूवादी वा डाव्या विचारप्रणालीतून आलेल्या परंपरा आधुनिकता या द्वैताला गांधींनी दिलेले पर्याय स्पष्ट आहेत. लिंगभावविषयक घडण-पुनर्घडण गांधींच्या जीवनात कशी येते, याचा मागोवा घेताना गांधी पुढील गृहीतके मानतात. स्त्री-पुरुषांमधील भिन्नतेची मुळे शारीरिकतेमध्ये असतात.

समाजामध्ये वावरण्याची दोघांची भिन्न क्षेत्रे असतात. भिन्न भूमिका असतात. मूलतः ते दोघे एकमेकांना पूरक असतात. स्त्रिया निर्मितिक्षम असतात. घराघरांत आई, बायको या नात्यांतून त्यांची निर्मितिक्षमता अभिव्यक्त होते. त्या निव्वळ बाहुल्या नसतात. स्त्रियांमध्ये स्वावलंबन, धैर्य, संयम, शुद्धता आणि दुःख सहन करण्याची अमाप शक्यता असते. म्हणून स्त्रियांचा गुणात्मक दर्जा पुरुषांपेक्षा उच्च असतो. 

स्त्रियांनी राजकारणात 'विशेष' भूमिका बजावली पाहिजे म्हणून असहकाराच्या चळवळीत चरखा, दारुविरोधी, परदेशी कपड्यांच्या दुकानांविरोधी निदर्शने, असे खास कार्यक्रम गांधींनी आखले. विवाह फक्त अपत्यजन्मासाठी असतो. अपत्य-जन्माव्यतिरिक्त संभोग म्हणूनच विकृती आहे. स्त्रीने आपली लैंगिकता नाकारली तरच ती उच्च नैतिक आणि आत्मिक भूमिका बजावू शकते. एकीकडे नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ, प्रेमळ पत्नीस्वरूपी सेवाभावी, निष्ठावान, मातृत्व पेलणारी, मुले आणि राष्ट्र घडविणारी, खादी विणणारी, घरात समान जबाबदारी पेलणारी स्त्री, तर दुसरीकडे लैंगिकताविरहित, स्वतःहून अपत्य-जन्माचा हक्क नाकारणारी, देशसेवेसाठी कुटुंब-जीवनाचा त्याग करणारी, अशी स्त्री वरील घडण व पुनर्घडण प्रक्रियेतून रचली गेली. स्त्रीवादाच्या एक अभ्यासक सुजाता पटेल यांच्या मते भारतीय समाजात स्त्रीला मोठ्या प्रमाणात महत्त्वाची भूमिका देणाऱ्या गांधींनी स्त्रियांच्या शोषणाची मुळे शोधताना सरंचनात्मक विश्लेषण केले नाही. ह्यामुळे घराच्या चौकटीतील स्त्रीचे आई व पत्नी हे रूप महत्त्वाचे मानून समग्र स्त्रियांची अस्मिता आक्रसली गेली.

दुसऱ्या एक अभ्यासक मधु कीश्वर यांच्या मते गांधींनी स्त्रियांकडे सुधारणेस योग्य अशी वस्तू म्हणून न पाहता आत्मभान असलेले माणूस म्हणून पाहिले. स्त्रियांवरील घरात, घराबाहेर होणाऱ्या अत्याचारांचा विचार करताना गांधींनी प्रत्येक स्त्रीला कुटुंबामध्ये व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आणि स्वायत्तता मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला. ही त्यांनी दाखविलेली फार मोठी अंतर्दृष्टी होती. गांधींनी कुटुंबातील सत्तासंबंध मोडण्यासाठी पतीला नकार देण्याचा मूलभूत हक्क स्त्रियांना बहाल केला. सामाजिक स्वास्थ्यासाठी प्रौढ विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असला पाहिजे असे म्हणणारे गांधी, स्वयंनिर्णयाने संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या भारतीय विधवांकडे हिंदुत्वाचा प्रतिनिधी म्हणून तसेच मानवतेला मिळालेली देणगी म्हणून बघत होते. मधू कीश्वर यांनी आपल्या लेखातून स्त्रीवादी चळवळ बांधू पाहणाऱ्या समकालीनांना असे सुचविले आहे की स्त्री-प्रश्नांचा विचार करताना गांधींच्या विचारांची सम्यक, चिकित्सक दखल घेणे गरजेचे आहे.

पेरियार यांचे विश्लेषण
या संदर्भात व्ही. गीता या स्त्रीवादी चळवळीत कृतिशील सहभाग घेणाऱ्या अभ्यासकांनी मांडलेला पेरियार यांचा विचार समजावून घेऊ. समानता हे मूल्य स्त्री-पुरुष संदर्भात खऱ्या अर्थाने राबवायचे तर हिंदू जातिबद्ध समाजाशी, स्त्रियांच्या देहपातळीवरील अस्तित्वाशी, त्यातील उतरंडीच्या रचनेशी कसे गुंतागुंतीचे नाते आहे हे पाहणे आवश्यक आहे, हे पेरियार यांनी ओळखले. म्हणून पेरियार यांच्या चर्चाविश्वात 'स्त्रिया' हा शब्द एकीकडे ‘जाती’चा शिक्का घेऊन येत असला तरी सर्व स्त्रियांच्या दडपणुकीत काही साम्य असते, हे पेरियार नाकारत नाहीत. त्यांच्या मते ब्राह्मणी, पुरुषसत्ताक समाजात सर्वच स्त्रियांना प्रेम, माया आणि वासना, इच्छा-आकांक्षा या संदर्भात निवड करण्याची जी साधी मानवी गरज असते तीच नाकारली जाते.

कुटुंबउद्धारासाठी स्त्री-शिक्षण, मातृत्वाचे नैसर्गिकीकरण नाकारून पेरियार यांच्या आत्मसन्मान चळवळीने स्त्री-शूद्रांना त्यांचे हरवलेले स्वत्व आणि देहपातळीवरील अस्तित्व प्राप्त करून दिले, धर्माच्या वर्चस्ववादी काचातून सुटून सर्वसामान्य माणसांना स्वतःच्या प्रतिष्ठेतून राष्ट्रीय अस्मितेचे भान यावे, असा हा प्रयत्न होता. विवेकाधिष्ठित मुक्त समाज निर्माण करण्याच्या ह्या प्रकल्पात स्त्री-पुरुष समानता साधण्यासाठी स्त्रियांचा विचार लोकशाही राज्याचा नागरिक या दृष्टीने करावा, अशी पेरियार यांची धारणा होती. भारतीय जीवनात सम्यक परिवर्तन घडवू पाहणाऱ्या जोतीराव फुले यांनी जातीच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या उतरंडीविरोधी भूमिका घेताना स्त्री-पुरुष समतेचा विचार वैशिष्ट्यपूर्ण रीतीने केला. 

फुल्यांची समग्र दृष्टी
स्त्रियांचे दास्य, कनिष्ठ जातींची घुसमट, शेतकऱ्यांचे कंगालीकरण आणि भारतीय समाजाची अवनत अवस्था यांकडे फुले समग्रतेतून पाहत होते. म्हणून स्त्री-प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी आपल्या कृतींतून, विचारांतून स्त्रियांना समता, ज्ञाननिर्मितीचा हक्क मिळण्याची गरज आणि घरादाराची पुनर्रचना होण्याची गरज यांवर भर दिला. स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या विषमतेचा उलगडा भाषा, संस्कृती, धर्म, जातींची बंदिस्ती अशा व्यापक चौकटीत केला. पेरियार यांच्या विचारांचा स्त्रीवादी भूमिकेतून जसा विचार केला गेला तसा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वेध घेतला गेला नाही. किंबहुना बराच काळ आंबेडकरांच्या उदारमतवादी विचारांत स्त्री-प्रश्नाच्या सोडवणुकीची मुक्तिदायी दिशा आहे की नाही, याविषयी भारतातील स्त्रीवादी विचार संभ्रमित असावा असे वाटते. दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य महासभेच्या जाहीरनाम्याच्या मसुद्यामध्ये शरद पाटील निःसंदिग्ध शब्दांत भारतीय संस्कृतीचे आद्य निर्माण स्त्रियांनी केले असे मांडतात.

पाटील स्त्री-पुरुष समतेचा भारतातील इतिहास पुढीलप्रमाणे मांडतात. ‘‘एकूण आद्य भारतीय संस्कृतीची निर्मिती मुख्यत्वेकरून तत्कालीन भारतीय स्त्रियांनी केली हे स्पष्ट होते... दासप्रथाक वर्णसमाजाची जागा सामंतप्रथाक जातिसमाजाने घेतली. निमस्वतंत्र शूद्रातिशूद्र जातिजमाती व स्त्रिया यांच्या वाढत्या शोषण-पीडनातून जातिसमाजाचा विकास होऊ लागला... चक्रधर व बसवनंतर स्त्री-पुरुष समतेचा अपूर्व व अनन्य असा सक्रिय पुरस्कार फुलेंनी केला. जातिव्यवस्था विरोध, खराखुरा निधर्मीपणा व स्त्रीमुक्ती अविभाज्य कसे आहेत, याचे आद्य दर्शन देशाला त्यांच्या साहित्याने घडवले.’’ 1975 पासून नव्या पायावर स्त्री-प्रश्नाचा विचार मांडू पाहणारी स्त्री-चळवळही आता सर्व स्त्रियांच्या वतीने बोलण्यापूर्वी भिन्न जाती-वर्ग-यांतील स्त्रियांचे जगणे किती अंगांनी भिन्नपणे घडविले गेले हे तपासून घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. विशेषतः जागतिकीकरणाच्या नव्या झंझावाती बदलांच्या काळात स्त्री-चळवळीच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. कष्टकरी घरातल्या स्त्रियांना अर्थार्जनावरोबर विश्रांती, प्रतिष्ठा, संस्कृती निर्मितीसाठी अवकाश ह्या साऱ्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन त्या दिशेने भरीव पावले टाकली पाहिजेत, असे करताना स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून नवी नैतिकता, नवा सार्वजनिक सत्यधर्म आणावा लागेल.
 

Tags: स्त्री-शोषण पेरियार म. गांधी म. फुले स्त्री-चळवळ आणि समता वैचारिक feminist exploitation Gandhi phule women's movement & equality ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विद्युत भागवत,  पुणे

स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके