पत्रकारिता केलेल्या आणि कथा-कादंबरी, नाटकलेखन यांतही उत्तम कामगिरी असलेल्या मोजक्याच व्यक्ती साहित्यविश्वात आपल्याला दिसतात. त्यात प्रामुख्याने चार्ल्स डिकन्स, हेमिंग्वे, मार्क ट्रेन, इयान क्लेमिंग (जेम्स बॉन्ड फेम) यांचा उल्लेख करता येईल. तर आपल्याकडे धरमवीर भारती, खुशवंत सिंग, अमिताव घोष, कमलेश्वर ही नावे दिसतात. मराठीत आचार्य अत्रे, प्रभाकर पाध्ये, अरुण साधू, विजय तेंडुलकर ही काही प्रमुख नावे. जागतिक साहित्य विश्वात याच गटात खुलून दिसणारे आणखी एक नाव म्हणजे फ्रेडरिक फोसिंथ. 86 वर्षांचे समृद्ध आयुष्य व्यतीत करून ते हे जग सोडून गेले. (9 जून 2025) ही बातमी आली आणि जगभरात त्याबद्दल हळहळ व्यक्त झालीच, पण आपल्या देशात विशेषतः मराठी पत्रकारिता विश्वानेही त्याची मनापासून दखल घेतली.
फ्रेडरिक फोर्सिस यांची विशेष दखल घेतली गेली, याचे एक प्रमुख कारण म्हणजे ते कमालीचे लोकप्रिय होते हे आहेच, पण त्यांच्या लेखणीला असलेला सत्याचा आणि वास्तवतेचा स्पर्श. मार्क ट्रेनचे एक अप्रतिम वाक्य आहे. त्याचा मथितार्थ असा की, 'सत्य हे काहीवेळा कल्पित कथांपेक्षाही अचंबित करणारे असते, कारण कल्पिताला शक्यतांचे बंधन असते पण सत्याला नाही.' फोर्सिथच्या सत्यकथा या पठडीतल्या होत्या. काल्पनिक विश्वात वाचकांना नेणारे, पण त्याला वास्तवाचे तोरण बांधणारे शैलीदार लेखक म्हणून ते जगाला माहीत झाले. भारतीयांना आणि एकूणच चित्रपटप्रेमी मंडळींना हे ठाऊक झाले ते 'द डे ऑफ द जॅकल' या चित्रपटामुळे. त्यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर तो बेतलेला होता.
बहुतेक वेळा जगातील उत्तम कलाकृती, निर्मिती यांच्यामागची कथाही विलक्षण आणि अद्भुत असते. ही कादंबरीही त्याला अपवाद नव्हती. त्यांना मुळात लेखक आणि पत्रकार असे काही व्हायचेच नव्हते. त्यांना जग हिंडून पाहायचे होते, भटकायचे होते, त्यासाठी ते विमान उडवायला शिकले आणि पत्रकारिता हा पेशाही स्वीकारला. भटकंतीचा छंद पुरा करण्यासाठी ही दोन्ही क्षेत्रे योग्यच म्हणायची. 1958 ते 1965 अशी सात वर्षांची मुख्य प्रवाहातील पत्रकारिता केल्यानंतर बीबीसी वार्ताहर ही जबाबदारी त्यांनी पेलली, पण व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यानंतर नोकरी सोडून ते मुक्त पत्रकार म्हणून आफ्रिकन युद्धात बातमीदार म्हणून पुन्हा कार्यरत झाले. युद्ध संपल्यानंतर स्वगृही परतल्यावर हातात काही काम नाही या अवस्थेत 'द डे ऑफ द जॅकल' या कादंबरीचा जन्म झाला. दोन पौंड मिळावेत आणि आला दिवस साजरा व्हावा या एकमेव हेतूने त्यांनी टाइपरायटरला हात लावला होता. पण त्यांच्या लेखणीत एक वेगळीच जादू होती आणि ती होती सत्य आणि वास्तव यांच्या मखरात कथासूत्र गोवण्याची.
द गॉल या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाचा हत्येचा प्रयत्न हा या कादंबरीचा केंद्रबिंदू होता. केवळ 35 दिवसांत ही कादंबरी त्यांनी हातावेगळी केली होती. तीन प्रकाशकांनी त्यांचे हे बाड साभार परत पाठवले होते. चौथा नाकारण्याच्या मनःस्थितीत असताना हचिनसनने ते स्वीकारले आणि ही कादंबरी प्रसिद्ध झाली. 35 वेळा ती पुनर्मुद्रित झाली, 30 भाषांमधील कोट्यवधी वाचकांनी तिचा आस्वाद घेतला. आजही तिची विक्री जोमाने सुरू आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील कथासूत्राप्रमाणे फ्रान्सच्या द गॉल यांच्या हत्येचा खरेच प्रयत्न झाला होता. आणि यातील सर्व बारीकसारीक तपशील लेखक महाशयांनी गोळा केले होते. त्यांच्या आधारे काही काल्पनिक प्रसंगांची पेरणी करत हा थरार त्यांनी उभा केला. 'द गार्डियन' वृत्तपत्राने या कादंबरीची मोठी प्रशंसा केली होती. 'ही उत्कंठावर्धक कादंबरी आहे की सत्य घटना' असे म्हणत यातील वास्तववादी तपशिलाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दोन वर्षांतच यावर चित्रपट तयार झाला. हा चित्रपट मी पुण्यातील बेस्टएंड या सिनेमागृहात पाहिला होता. या चित्रपटाने दोन-अडीच तास अक्षरशः मला खुर्चीला खिळवून ठेवले होते.
रोमहर्षित करणारा आणि कमालीचा वेगवान असा हा सिनेमा प्रचंड गाजला. थ्रिलर या प्रकारातला असूनही त्यातील राजकीय-सामाजिक संदर्भामुळे तो सर्वसाधारण प्रेक्षक आणि जाणकार समीक्षक या दोघांनीही नावाजला आणि फ्रेडरिक फोर्सिथ बघता बघता एक सेलिब्रिटी लेखक झाला. चित्रपट तयार करण्यासाठी एका विशिष्ट शैलीत कथानक असले तर निर्माता-दिग्दर्शक स्टुडिओज यांचे लक्ष वेधले जाते. फोर्सिथला हे तंत्र फार लवकर अवगत झाले. हॉलिवूडने या लेखकाला अक्षरशः पायघड्या घातल्या, 'द ओडेसा फाइल' हा चित्रपट एका पत्रकाराच्या नाझी संघटनेच्या प्रमुखाला शोधून काढण्याच्या प्रयत्नाचे दृश्यरूप आहे. चित्रपट हा कादंबरीच्या तुलनेने थोडा सपक होतो. हा अनुभव आपण 'गॉड फादर' या मारिओ पुझोच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाबाबत घेतला आहे. 'पॉपिलॉन' बाबतीतही तेच झाले आणि इथेही त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते. चित्रपटाचा नायक एक पत्रकार आहे. त्याचा पडद्यावर सतत वावर असल्यामुळे यातील रहस्य आणि चित्तथरारक घटना प्रभावीपणे समोर येत नाहीत. अर्थात अभिनय, चित्रपटाचा वेग आणि यांच्या कथानकाची ताकद यांमुळे प्रेक्षकांनी याचे उत्तम स्वागत केले होते. आफ्रिकेतील सरकार उलथून टाकण्यासाठी एका ब्रिटिश उद्योगपतीने सुपारी देऊन काही युद्ध शिक्षण घेतलेल्या व्यावसायिकांना तिथे पाठवलेले असते, या विषयी 'द डॉग्ज ऑफ वॉर' या कादंबरीतून त्यांनी एक चित्तथरारक पट वाचकांसमोर उभा केला. त्यानेही वाचकांना भुरळ पाडली.
गोष्ट सांगताना त्यातील प्रसंग ते असा गुंफत की, वाचकांना ते कल्पित नसून सत्य आहे अशी अनुभूती मिळत असे. सहा-सहा महिने ते संशोधनाच्या कामात गढलेले असत. आणि एकदा का तपशील नक्की झाला की टाइपरायटरचा खडखडाट सुरू होत असे. एकूण पाच दशके या लेखकाने कितीतरी विषय हाताळले. इराण-इराक युद्ध, कुवेतवरचा हल्ला, अमली पदार्थांचा व्यापार, दहशतवाद, अणुऊर्जा समस्या, या प्रत्येक कथानकात सत्य घटना आणि बातमी अशी विरघळलेली असते की, एक वेगळेच रसायन त्यातून समोर येते आणि मंत्रमुग्धतेच्या प्रदेशात वाचक गुंतून जातो. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात लोकप्रियतेचे उच्चांक गाठलेला 'अॅव्हेंजर' हा टेलिव्हिजन चित्रपट हा यांच्याच लेखणीची करामत होती. फोर्सिथ यांची नवी कादंबरी आली की सुजाण वाचकांच्या रांगाच पुस्तकांच्या दुकानासमोर लागत असत. त्यामुळे त्यांच्या लेखनसंपदेच्या 7.5 कोटी प्रती जगभर खपल्या असतील तर त्यात आश्चर्य ते कोणते? त्यांच्या नावावर 25 कादंबऱ्या आहेत. 'द फॉक्स' ही त्यांची अलीकडची कादंबरी.
जगभरातील प्रमुख नेते, राजकारणी त्यांच्या साहित्याचे चाहते होते. एवढेच काय एका दहशतवाद्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी एक हॉटेलवर छापा घातला, तेव्हा त्या खोलीत 'द डे ऑफ द जॅकल'ची प्रत टेबलावर आढळली होती.
कथाकार म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी ठरली. उत्तम कल्पना, नेमके तपशील व व्यक्तिरेखा आणि शेवटी अचंबित करणारी तरीही तार्किक कलाटणी हे त्यांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य सांगता येईल. 'द व्हेटरन', 'नो कमबॅक्स' हे त्यांचे कथासंग्रह याची साक्ष देतात. एयरफोर्समध्ये काम करतानाचे अनुभव त्यांनी 'द शेफर्ड' या कादंबरीत शब्दबद्ध केले आहेत. अतिशय वेगळ्या धाटणीची ही कादंबरी त्यांच्या सर्वोत्तम लेखनापैकी एक मानता येईल. त्यांच्यातला खरा पत्रकार आपल्यासमोर आला ते नायजेरियन युद्धात (1967-1970) त्यांनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे. बीबीसीतर्फे तिथे गेले असताना ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरोधात जगासमोर वास्तव मांडण्याचे धाडस त्यांनी केले आणि परिणामतः नोकरीवर गदा आली.
ते पुन्हा युद्धभूमीवर मुक्त पत्रकार म्हणून हजर झाले. या युद्धात तेथील भीषण दुष्काळाची कहाणी त्यांनी जगासमोर मांडली, विद्यमान सरकारसमोर न झुकणारा हा लेखक म्हणूनच वेगळा ठरतो. आजही आपल्याला या पाठीला कणा असलेल्या पत्रकार-लेखकाकडून बरेच काही शिकता येईल.
रॉयटर आणि बीबीसीसाठी त्यांनी काम केलंच, शिवाय गुमहेर म्हणूनही कामगिरी बजावली. शीतयुद्धाच्या काळात हे जोखमीचे काम त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी केले, त्यातून आर्थिक लाभ फारसा झाला नसला, तरी अनेक वर्ष खबऱ्या म्हणून व्यतीत केलेला थरारक कालखंड त्यांच्या नावावर आहे. कादंबरीकार, कथाकार म्हणून त्यांची जडणघडण होण्यात हा अनुभव नक्कीच उपयोगी पडला असणार. विषयाचे सखोल ज्ञान, चालू घडामोडींचा नेमका वेध घेण्याचे कसब आणि वाचकस्नेही शैली यांमुळे हा लेखक भाषा आणि प्रांत ओलांडून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला.
त्यांच्या आत्मचरित्राचे नावही त्यांनी खास ठेवले होते, 'द आउटसाइडरः माय लाइफ इन इंट्रीग'. आपल्या जगण्यातल्या घटनांबद्दल चकित झालेला लेखक इथे आपल्याला भेटतो. ते वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मिडल ईस्ट, सायप्रस, लेबेनॉन इथे तणावकाळात फिरले. गुप्तहेर म्हणून त्यांनी बर्लिनमध्ये केलेले काम आत्मचरित्रात डोकावून जाते. एकीकडे पत्रकार आणि दुसरीकडे खबऱ्या अशी दुहेरी भूमिका बजावताना आलेले त्यांचे अनुभव मुळातच वाचण्यासारखे आहेत. फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन आणि रशियन भाषा अवगत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे फ्रेडरिक फोर्सिथ यांनी या आत्मचरित्रात त्यांच्या आफ्रिकेतील पत्रकारितेबद्दल सविस्तर लिहिले आहे आणि नंतर ते आपल्या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांबद्दल लिहिते झाले आहेत.
त्यांच्या आयुष्याचा वेध घेणारा 'इन माय ओन बर्ड्स' या मालिकेतील माहितीपट बीबीसीमध्ये सध्या निर्मिती प्रक्रियेत आहे. त्याचे काही शॉट्स अलीकडेच पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या राजकीय भूमिका स्पष्ट होत्या. ब्रेकझिटला त्यांचा पाठिंबा होता. हवामान बदल याबाबतच्या उपाययोजनंबद्दल आपले मतभेद आपल्या 'द डेली एक्स्प्रेस'च्या साप्ताहिक सदरात ते स्पष्टपणे मांडत असत. अगदी अलीकडे एका मुलाखतीत त्यांना 'नवीन काय लिहिणार असे विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणाले, 'न वापरलेले कोरे करकरीत दोन टाइपरायटर्स माझ्याकडे अजूनही आहेत. बघू या...' अर्थात, आता त्यावर त्यांची बोटे फिरणार नाहीत. पण जगभरातील साहित्यविश्वाला पाच दशके सत्याची महिरप असलेला जो किणकिणाट फ्रेडरिक फोर्सिथ यांनी वापरलेल्या टाइपरायटर्सनी झंकारत ठेवला, तो कसा विसरता येईल ?
Tags: 'The Outsider: My Life in Intrigue'. fedrick forsith arun sadhu vijay tendulkar prabhakr padhye ambitao ghosh khushwant singh dharmavir bharti hemingway eyan flaming marc twane charles dikens journalism keshav sathye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या