डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. आंबेडकर : देव नव्हे, महापुरुष!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विपर्यस्त आणि विद्वेषी लेखन करणारे एक जाडजूड पुस्तक विद्वान (!) पत्रकार अरुण शौरी यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले. अशा खोडसाळपणाचा मुकाबला नेहमी विचारानेच करावयाचा असतो. त्या पुस्तकातील सर्व मांडणीचा समर्थ, सडेतोड वैचारिक प्रतिवाद करणारा ‘डॉ. आंबेडकरांचे मारेकरी : अरुण शौरी’ हा ग्रंथ सुप्रसिद्ध संशोधक डॉ. य. दि. फडके यांनी लिहिला आहे. तो 14 एप्रिलला लोकवाङ्‌मय गृह मुंबई यांच्यातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील ‘डॉ. आंबेडकर : देव नव्हे, महापुरुष!’ हे पहिलेच प्रकरण 'साधना'च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.

नामवंत पत्रकार अरुण शौरी यांचे डॉ. आंबेडकरांसंबंधीचे 663 पानांचे इंग्रजी पुस्तक वाचले तेव्हा 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जन्मदिनानिमित्त पुण्यात केलेल्या भाषणात भारतातील सनसनाटी पीत पत्रकारितेचे डॉ. आंबेडकरांनी जे वर्णन केले आहे, त्याची आठवण झाली. हे वर्णन ए.जी. गार्डिनरने लॉर्ड नॉर्थक्लिफ या इंग्लंडमधील वृत्तपत्रसृष्टीच्या ‘बादशहा’चे व्यक्तिचित्र रेखाटले आहे त्यावर आधारले होते. (ए.जी.गार्डिनर, प्रॉफेट्स, प्रीस्ट्‌स अँड किंग्ज, 1917, पू.8897) नॉर्थक्लिफने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विलायतेत वृत्तपत्रांचे रूप पालटले आणि त्यामुळे पिवळी ‘पत्रकारिता’ फोफावली.

गार्डिनरने केलेले वर्णन हिंदुस्थानातील पत्रसृष्टीलाही लागू पडत असल्यामुळे आपण गार्डिनरशी सहमत असल्याचे सांगून डॉ. आंबेडकर म्हणाले, "वृत्तपत्र चालवणे हा हिंदुस्थानातही एके काळी व्यवसाय होता. आता तो एक व्यापार बनला आहे. साबण बनविण्याच्या धंद्यामागे जसे कोणतेही नैतिक प्रयोजन नसते तसेच वृत्तपत्र चालवण्यामागेही नैतिक प्रयोजन नसते. आपण जनतेचे जबाबदार सेवक आहोत असे वृत्तपत्रसृष्टीतील कोणालाही वाटत नाही. कोणताही हेतू मनात न बाळगता वा रंग न मिसळता वातमी देणे, ज्यामुळे समाजाचे भले होईल अशा सार्वत्रिक धोरणाचा पुरस्कार करणे, चुकीच्या मार्गाने जाणारे कितीही उच्च अधिकारपदे भूषवीत असोत, त्यांची भीती न बाळगता कानउघाडणी करून त्यांना ताळ्यावर आणणे हे हिंदुस्थानातील वृत्तपत्रांना आपले आद्य कर्तव्य वाटतच नाही.

कोणातरी विभूतीची पूजा करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य झाले आहे. बातमीची जागा आता सनसनाटीने घेतली आहे. विवेकावर आधारलेले मत मांडण्याऐवजी आता आंधळ्या विकाराचे प्रदर्शन केले जाते. जबाबदार लोकांच्या मतांना आवाहन करण्याऐवजी बेजबाबदार माणसांच्या भावना आता भडकावल्या जातात. नॉर्थक्लिफची पत्रकारिता म्हणजे हुजऱ्यांनी हुजऱ्यांसाठी लिहिलेला मजकूर, असे लॉर्ड साल्सबरी म्हणत असे. हिंदुस्थानातली पत्रकारिता ही ढोल पिटणाऱ्यांची पत्रकारिता आहे." (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँड स्पीचेस खंड 1, 1979 पृ.227).

डॉ. आंबेडकरांनी समकालीन पत्रकारितेवर कोरडे ओढले त्यालाही 55 वर्षे होऊन गेली. स्वातंत्र्योत्तर काळातल्या ‘मुक्त’ आणि तथाकथित शोधक पत्रकारितेला आता कसलाच धरबंद राहिलेला नाही. शौरींसारख्या पत्रकारांचे लेखन विचारांना चालना देणारे नसून विकारग्रस्त लेखन आहे. विकारक्षुब्धता हे विष असते याची जाणीवही त्यांना नाही इतके हे विष त्यांच्या रक्तात भिनलेले दिसते. "विचार डोळस तर विकार आंधळे. विचार प्रत्यक्ष पुराव्याचा हट्ट धरतील तर विकारांना वाटेल ती भलीबुरी गप्प वेदप्रामाण्य वाटते. विचार इतिहासाचा भोक्ता तर विकार कादंबरीचा चाहता. विचाराचा निर्णय मंदगती असतो. कारण त्याला खऱ्यांखोट्याची निवड अत्यंत कसोशीने करावयाची असते. विकाराचा निर्णय म्हणजे तडकफडक. त्या आंधळ्याला खऱ्यांखोट्‌याचा भेदच उमगत नाही. विचार स्वाध्यायशील तर विकाराला त्याची पर्वाच नसते. विचार मनाचा मित्र. विकार त्याचा कट्टा वैरी. विचाराच्या जोरावर चाललेल्या चळवळीची प्रगती मंद असली तरी त्यांचा विजय निश्चित असतो. विकाराच्या भांडवलावर चालविलेल्या चळवळीचा शेवट शोचनीय होतो." (के.सी ठाकरे, प्रबोधन, 16 जानेवारी 1923). 

'खोट्‌या देवांना भजू नका’ असा संदेश देत मूर्तिभंजकाच्या अभिनिवेशाने शौरींनी करोडो दलितांच्या मनातील डॉ. आंबेडकरांची मूर्ती छिन्नविच्छिन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न येथे केला आहे. आपण भारतीय राज्यघटनेने दिलेला आविष्कार-स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार बजावीत असताना धाकदपटशा दाखवून आपल्या सभा उधळून, आपल्या तोंडाला काळे फासून डॉ. आंबेडकरांचे मागासवर्गीय तरसेच अस्पृश्य जातीत जन्मलेले अनुयायी आपली मुस्कटदाबी करण्याचा सारखा प्रयत्न करीत आहेत असे शौरींचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील अखेरची दोन प्रकरणे खर्ची घातली आहेत. "मी नेमके काय लिहिले आहे? खुद्द डॉ. आंबेडकर जे बोलले आणि त्यांनी जी लिहिले त्यावर माझे तोपर्यंत प्रकाशित झालेले लेख सर्वस्वी आधारलेले होते.

आंबेडकरांच्या गौरवार्थ महाराष्ट्र सरकारने जनतेचा पैसा खर्च करून प्रकाशित केलेल्या खंडांवर माझे लेख आधारलेले होते. आंबेडकरांनी लिहिलेले सरकारांनी आणि इतरांनी प्रसिद्ध करावे आणि ते उद्धृत करण्याचेही स्वातंत्र्य आम्हां इतरेजनांना नसावे हा भाषणस्वातंत्र्याचा अर्थ आहे काय ? काहीही असो, मी लिहिले त्यात काही चुकलेले असेल तर वृत्तपत्रात त्याबद्दल युक्तिवाद करून दस्तऐवजी पुराव्यानिशी त्यांचे खंडन करणे हा त्यावरील इलाज काही काय?"(शौरी, वर्शिपिंग फॉल्स गॉड्स : आंबेडकर अँड द फॅक्ट्‌स विच हॅव बीन इरेझ, 1997, पू.621-622). व्होल्टेअर आपल्या विरोधकाला एकदा म्हणाला होता, "तुझे मत सपशेल चुकीचे असून ते मला मुळीच पटत नाही; पण ते चुकीचे मत मांडण्याचा तुझा हक्क कोणी हिरावून घेऊ लागला तर मी तुझ्या बाजूने उभा राहीन." उदारमतवादी लोकशाहीच्या पुरस्कांची अशीच भूमिका असावयास हवी.

लोकशाही मानणाऱ्याला विचारकलहाला भिण्याचे कारण नसते. विचारांचा मुकाबला विचारांनीच करावयास हवा. एवढेच नव्हे तर विकारग्रस्त लेखनाचा प्रतिवादही पुराव्यानिशीच करावयाचा असतो. शौरींनी डॉ. आंबेडकरांवर लोकन्यायालयात दाखल केलेल्या विस्तृत आरोपपत्राचे खंडन त्यांना समजेल अशा धारदार भाषेतच करणे भाग आहे. हा त्यांच्याबरोबर साधलेला संवाद नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या वादाचा प्रतिवाद आहे.

शौरींची भूमिका सर्व उपलब्ध पुरावे काळजीपूर्वक तपासून निर्णय देणाऱ्या निष्पक्षपाती न्यायाधीशाची नाही तर नव्या बाटलीत जुनी दारू ठासून भरणाऱ्या विक्रेत्याप्रमाणे जुनेच आरोपपत्र लोकन्यायालयात नव्याने दाखल करणाऱ्यां सराईत वकिलाची आहे. त्यामुळे त्या आरोपपत्राचे खंडन करण्यास बचाव पक्षाचे वकीलपत्र घेणे क्रमप्राप्त ठरते. तेही विशेषतः ज्यांच्यावर त्यांनी खोटेनाटे आरोप केले आहेत ते डॉ. आंबेडकर कालवश झाले त्यालाही चाळीस वर्षांचा काळ उलटून गेल्यावर. लोकांची स्मृती अल्पजीवी असते. त्यामुळे इतकी वर्षे लोटल्यानंतर शौरी डॉ. आंबेडकरांविरुद्धचा अद्याप उजेडात न आलेला पुरावा प्रकाशात आणीत आहेत असा त्यांच्या चेल्यांना व चाहत्यांना भ्रम होणे साहजिकच आहे. तो भ्रम दूर करावयाचा असेल तर शौरींनी उपलब्ध पुरावा देताना केलेल्या लबाड्‌या उघडकीला आणणे अटळ होते. महापुरुषांच्या पुतळ्यावर कावळे शिटतात. त्यामुळे त्यांनी केलेली घाण काढून टाकून त्या मूर्तीची साफसफाई कोणालातरी करावीच लागते. 

महाराष्ट्र सरकारने डॉ. आंबेडकरांच्या लेखनाचे व भाषणाचे सर्व खंड अद्याप प्रकाशित केलेले नाहीत. त्यांचा सगळा खासगी पत्रव्यवहार एकत्र करून तो प्रकाशित करण्याचे काम अजून व्हावयाचे आहे. डॉ. आंबेडकरांनी मराठीत विपुल लेखन केले आहे. 'मूकनायक व बहिष्कृत भारत' या त्यांनी चालवलेल्या वृत्तपत्रांतील त्यांच्या लेखांचा एक खंड यथामूल छापण्यात आलेला आहे. शौरींना मराठी येत नसावे. डॉ. आंबेडकरांनी मराठी भाषेत केलेल्या लेखनाचा जसा त्यांनी आधार घेतलेला दिसत नाही तसाच डॉ. आंबेडकरांविषयी आजवर इतरांनी लिहिलेल्या किंवा संपादित केलेल्या पुस्तकातील काही भाग त्यांनी आपल्या पुस्तकात कोठे उद्धृत केल्याचेही आढळत नाही. त्यांची सगळी भिस्त डॉ. आंबेडकरांच्या आणि त्यांच्याविषयी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकांवर आहे. त्यामुळेच शौरी धनंजय कीर यांनी लिहिलेल्या चरित्राचा तेवता थोडासा आधार घेतात; पण चां.भ.खैरमोडे यांनी परिश्रमपूर्वक 12 खंडांमध्ये लिहिलेल्या डॉ. आंबेडकरांच्या विस्तृत मराठी चरित्राचा त्यांनी उपयोग केलेला दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने 1979 ते 1995 कालखंडात प्रकाशित केलेल्या 14 खंडांची एकूण पृष्ठसंख्या 9,196 असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (शौरी पृ. 4). त्याचा अर्थ त्यांनी ही सर्व पाने काळजीपूर्वक वाचली आहेत असा कोणीही करू नये.

14व्या खंडाचे दोन भाग असून त्यातील मजकुराने 1,385 पाने व्यापलेली आहेत. ती शौरींनी वाचली असल्याचा पुरावा त्यांच्या डॉ. आंबेडकरांविषयीच्या पुस्तकात आढळत नाही. हिंदू कोड विधेयक मंजूर व्हावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या प्रयत्नांची शौरींनी दखलही घेतलेली नाही. कारण त्यांना हे विधेयकच एक तर पसंत नसावे किंवा ते डॉ. आंबेडकरांनी मांडल्यामुळे हिंदू धर्म आणि संस्कृती संकटात सापडली असा शौरींचाही समज झाला असावा. त्यामुळे हा सर्व विषयच त्यांनी वर्ज्य मानलेला दिसतो. शौरींनी नमूद केलेली 14 खंडांची एकूण 9,996 पृष्ठसंख्या चुकीची आहे. प्रत्यक्षतः ती नीट मोजली तर 9,756 इतकी भरते. शौरींच्या म्हणण्याप्रमाणे 12 खंडांची एकूण पृष्ठसंख्या 7.371 इतकी आहे. (शौरी पृ.4). तीही चुकीची आहे. काळजीपूर्वक बेरीज केली तर ही पृष्टसंख्या 7,115 इतकी असल्याचे लक्षात येईल. अचूक माहिती देत असल्याचा आभास निर्माण करीत शौरी बेधडक कशी चुकीची माहिती देतात याचा हा एक नमुना आहे. 

अर्थशास्त्रात अमेरिकेतील सिरॅक्यूज विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळविणाऱ्या शौरींना साधी बेरीज करता येत नाही असे कोणालाही वाटणार नाही. पण अगदी प्राथमिक स्वरूपाची माहितीही बरोबर द्यावयाची नाही असा जणू त्यांनी पण केला असावा! नाहीतर अशा वस्तुस्थितीबद्दलच्या चुका त्यांनी पुस्तकात अन्यत्रही केलेल्या वाचकाला आढळल्या नसत्या. ‘स्वातंत्र्यसैनिक’ असा उपहासपर मथळा असलेल्या पहिल्या प्रकरणातील शौरींचे पहिलेच वाक्य वस्तुस्थितीवर आधारलेले नाही.

शौरी सांगतात, "एका अर्थाने आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली ती 9 मार्च 1924 रोजी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये भरलेल्या जाहीर सभेपासून." (शौरी पृ.3) खरे म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनाचा आरंभ झाला तो 20 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीतल्या माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली तेव्हा. तो दिवस पाडव्याचा असूनही पाच हजारांहून जास्त लोक जमले होते. 21 मार्चला या परिषदेत बोलताना राजर्षी शाहू छत्रपती म्हणाले, "अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविल्याशिवाय राजकारण कसे होणार? ज्यांना राजकारण करणे आहे त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे म्हणजे इतर देशांत वागवितात त्याप्रमाणे वागविले पाहिजे आणि तसे वागविल्याशिवाय देशकार्य कसे होणार? आणि असे जो वागवील त्यानेच देशकार्य केले असे म्हणता येईल, इतरांनी नाही.’’ (वसंत मून (संपादक) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक : 1990 – 1,378 (6).

जवळजवळ वीस वर्षांनंतर कोल्हापूर संस्थान दलित प्रजा परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात स्वतः डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. "माझ्या सार्वजनिक आयुष्याचा श्रीगणेशा कै. (शाहू) छत्रपती महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगावच्या परिषदेतच मी गिरवला होता ही गोष्ट येथे नमूद करणे आवश्यक आहे. त्यांना व मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारासाठी रु.2,500 देऊन त्यांनी प्रोत्साहन दिले याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन." (अरुण कांबळे (संपादक), जनता पत्रातील लेख, 13 जानेवारी 1942 रोजी प्रकाशित झालेला लेख 1992 पृ.142) खुद डॉ. आंबेडकरांनाही हे विधान करताना आपण माणगाव परिषदेचे अध्यक्ष होतो याचे विस्मरण झाल्यामुळे त्यांनी अध्यक्षपद शाहू छत्रपतींना बहाल केलेले दिसते. शाहू छत्रपती अध्यक्ष होते ते नागपूर येथे 30 व 31 मे आणि 1 जून 1920 रोजी भरलेल्या बहिष्कृत वर्गाच्या परिषदेचे. या परिषदेत डॉ. आंबेडकरही सहभागी झाले होते. (कित्ता - पृष्ठ क्रमांक दिलेला नाही. हे पान पृ.380 नंतर छापलेले आहे.) 

घटना परिषदेचे सल्लागार (बेनेगल नरसिंगराव) व्ही.एन.राव यांनी 1947च्या ऑक्टोबरमध्ये तयार केलेल्या घटनेच्या पहिल्या मसुद्यात 243 कलमे आणि 12 परिशिष्टे होती अशी शौरींनी माहिती दिल्ली आहे. (पृ.447) तीही चुकीची आहे. तळटिपेत त्यांनी नमूद केलेल्या बी. शिवराव यांनी संपादित केलेल्या ग्रंथमालिकेतील तिसरा खंड पाहून खातरजमा करून पाहिली तेव्हा व्ही. एन. राव यांच्या पहिल्या मसुद्यात शौरी सांगतात तशी 243 कलमे नसून 240 कलमे आहेत असे आढळले. बी, शिवराव हे व्ही. एन. राय यांचे धाकटे बंधू. ते स्वतः घटना परिषदेचेही सदस्य होते. आपल्या बंधूंचा मसुदा समाविष्ट करताना त्यांनी जे परिशिष्ट जोडले आहे त्यातही कलमांची संख्या 240 इतकीच दिलेली आहे. (बी. शिवराव - संपादक, द फ्रेमिंग ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्युशन खंड 3. 1967, पृ.3. आणि 102).

एखादा संशोधक सच्चा आहे की तोतया हे ठरवताना निव्वळ प्राथमिक स्वरूपाची माहिती देतानाही ती अचूक देण्याची क्षमता तो पेलतो की नाही ही एक कसोटी लावली जात असते. शौरींचे लेखन या कसोटीवर पारखून पाहिले तर शौरी हे तोतये संशोधक आहेत अशी त्यांचे चेले व चाहते वगळले तर इतरांची खात्री होईल. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक नियडणुकीत आंबेडकरांच्या पक्षाला (शेडयुल्ड कास्ट फेडरेशन म्हणजेच शेकाफे.) लोकसभेत एकही जागा मिळाली नाही असे शौरी ठाम विधान करतात. (पृ.58). त्याच निवडणुकीत शे. का. फे.चे सरचिटणीस पां.न.उर्फ बापूसाहेब राजभोज यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेची राखीव जागा जिंकली होती याचा शौरींना पत्ताच नाही. शौरी हे भरंवशाचे कूळ कसे नाही हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे देता येतील. शितावरून भाताची परीक्षा करण्यास आतापर्यंत दिली ती उदाहरणेही पुरेशी ठरतील. 

शौरींच्या पुस्तकात अवतरणांची रेलचेल आहे. त्यामुळे मूळ ग्रंथातील मजकुराशी ही अवतरणे ताडून पाहण्याची सवय व सवड नसलेल्यांची ते सहज दिशाभूल करतात. संदर्भ तक्षात न घेता ते दीर्घ उतारे उद्धृत करतात एवढेच नव्हे तर काही वेळा मूळ उताऱ्यातील महत्त्वाची वाक्ये ते चक्क गाळून टाकतात. डॉ. आंबेडकरांनी जे म्हटलेले नाही ते त्यांच्या तोंडी घालण्याची किमया त्यांना साधलेली आहे. पुरावा पाहिल्याशियाय शौरी काहीही लिहीत नाहीत असा सारखा ‘पांचजन्य’ करणाऱ्या त्यांच्या चेल्यांमुळे तर त्यांनी अवतरणे देताना केलेल्या लबाड्‌या उघडकीस आणणाऱ्यांनाही प्रत्युत्तरादाखल अवतरणांचा भडिमार करण्याखेरीज पर्याय राहत नाही. पुस्तकातील अर्पणपत्रिका सोडली तर मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत शौरींनी पुस्तकाची मांडणी अशी केली आहे की त्यांच्या सवर्ण हिंदू चेल्यांचे आणि चाहत्यांचे अंबेडकरांविषयीचे पूर्वग्रह अधिकच दृढ व्हावेत. सूटबूट घालून विलायतेत विमानाने निघालेल्या किंवा पाश्चिमात्य वेषात विलायतेत वावरणाऱ्या डॉ. आंबेडकरांची दोन निवडक छायाचित्रे छापून शौरी काय सूचित करीत आहेत? त्यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या गोपनीय पत्रव्यवहारातील डॉ. आंबेडकरांसबंधीचे प्रतिकूल उल्लेख उद्घृत केले आहेत. या ‘सुटाबुटातील देवाची पूजा करू नका,’ असे शौरी सांगत आहेत.

तीन सव्वातीन पानांच्या प्रास्ताविकात त्यांनी एक विपरीत सिद्धान्त मांडला आहे. कोणतेही राष्ट्र गुलाम बनले की त्यातील जिंकले गेलेले पराभूत लोक प्रथम आपल्या दैवतांना घरात आणि नंतर अलमारीत, कड्‌याकुलपांत लपवून ठेवतात असे शौरींचे म्हणणे आहे. लवकरच जिंकल्या गेलेल्या लोकांना आपण मनोभावे पूजलेल्या देवंतांची लाज वाटू लागते. आपला इतिहास, परंपरा व अनुभव विसरून ते आपल्या दैवतांचा धिक्कार करू लागतात असे शौरींना वाटते. चौदाव्या व पंधराव्या शतकात ही प्रक्रिया जोरात असताना भक्तिसंप्रदायातील साधुसंतांनी देश वाचवला, तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिस्ती मिशनरी आणि मेकॉले यांनी चालना दिली. अशीच प्रक्रिया गतिमान होत असताना स्वामी दयानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, केरळातील नारायण गुरू, बंकिमचंद्र चटर्जी आणि त्यांच्यासारखेच अन्य मूठभर विचारवंत यांनी आपल्या वारशाची आठवण करून दिली.

आपल्या परंपरांवरील श्रद्धा पुन्हा प्रस्थापित केली. आपल्या देवदेवता, आपल्या उपासनापद्धती एवढेच नव्हे तर एका शब्दात सांगायचे तर आपला आपल्यावरीलय विश्वास त्यांनी परत मिळवून दिला असे शौरींना वाटते. त्यामुळे आपल्या भूतकाळाची आपल्याला लाज वाटेनाशी झाली. उलट शतकानुशतके चढउतार अनुभवल्यानंतरही आपल्या राष्ट्राने जगासाठी एक बहुमोल मोती वा हिरा सुरक्षित राखला. हा बहुमोल मोती किंवा हिरा म्हणजे हिंदू धर्म की हिंदू संस्कृती, याबद्दल शौरी स्पष्टपणे काहीच सांगत नाहीत. पण त्यांना या दोहोंपैकी एक किंवा दोन्हीही अभिप्रेत असण्याची शक्यता आहे. 

हॅम्लेटच्या वेडामागेही एक पद्धत होती असे म्हणतात. शौरींबाबतही तसेच म्हणता येईल. बंगालमधले राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, महाराष्ट्रातले महात्मा फुले, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, शाहू छत्रपती, विठ्ठल रामजी शिंदे वगैरे समाजसुधारक शौरींच्या खिसगणतीत नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे शौरीनी त्यांना अनुल्लेखाने मारले आहे. पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळातही जेत्यांचे देव पुजण्याचा तोच क्रम पुन्हा सुरू झालेला दिसतो असे शौरींचे मत आहे. "लोकमान्यांचे जवळ जवळ विस्मरण झाले आहे. नारायण गुरू कोण हे केरळच्या बाहेर कोणाला माहीत नाही. काही भक्तांचे मर्यादित वर्तुळ वगळता ज्यांनी आपण भारतीयांनी आपल्या पायावर उभे राहावे म्हणून आमरण कार्य केले त्या स्वामी दयानंदांची, रामकृष्ण परमहंसांची, श्री अरविंदांची, रमण महर्षींची, कांची येथील परमाचार्यांची आता कोणाला आठवण होत नाही," याची शौरीना खंत वाटते. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेवर साचलेली धूळ अधूनमधून झटकली जात असली तरी त्यांना इहवादाचा वेष चढवून सादर केले जाते. गांधीजींना तर रोजच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यांच्यामुळे देशाची फाळणी करण्यापर्यंत मुस्लीम नेत्यांची मजल गेली असे म्हटले जाते. शौरींना त्याचे दुःख वाटते आहे. त्यापेक्षाही आंबेडकरांसारख्या माणसांचे दैवतीकरण होत असल्यामुळे त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला दिसतो. तसे पाहिले तर मूर्तिपूजकांच्या या देशात स्वातंत्र्योत्तर काळात प्रथम मरणोत्तर दैवतीकरण झाले ते महात्मा गांधींचे. त्यांच्या जयंतीस सरकार आजही सार्वजनिक सुट्टी देत असते. त्यांचा खून 30 जानेवारी 1948 रोजी झाला त्यामुळे 30 जानेवारी हा दिवस आजही ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो.

दिल्लीतील राजघाटावरची गांधीजींची समाधी तीर्यक्षेत्र बनली आहे. देशादेशींचे नेते दिल्लीत आले की त्या समाधीवर पुष्पचक्र वाहून प्रदक्षिणा घालताना दूरदर्शनच्या पडद्यावर दिसतात. ‘समग्र गांधी वाङ्मया’चे 100 खंड भारत सरकारने प्रकाशित केले आहेत. टपाल खात्याने गांधीजींचे चित्र असलेली तिकिटे काढली तशीच सरकारी टाकसाळीतून नाणी, चलनी नोटाही निघाल्या. चौकांना, मोठ्‌या रस्त्यांना, नव्या वस्त्यांना तसेच नव्याने वसविलेल्या नगरांना गांधीजींचे नाव देण्यात आल्याची अनेक उदाहरणे सांगता येतात. सरकारी कार्यालयात गांधीजींचे छायाचित्र लावलेले असते. गांधीजींनंतर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचेही पुतळे उभारण्यात आले. त्यांचीही नावे चौकांना, रस्त्यांना, वस्त्यांना देण्यात आली. शौरींनी अन्य कोणत्याही नेत्याच्या दैवतीकरणाला विरोध केलेला नाही. त्यांना चीड येते ती डॉ. आंबेडकरांचे दैवतीकरण झाले असल्याची! डॉ. आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेने एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर मराठवाड्यात सवर्ण हिंदूंनी जातीय दंगली पेटवल्या. तो निर्णय अमलात आणणे 16 वर्षे लांबणीवर टाकण्यात आले. जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांची नावे विद्यापीठांना देताना दंगली उसळल्याचा किंवा विरोध-मोर्चे काढले गेल्याचा पुरावा आढळत नाही.

आजही आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रकार जितक्या मोठ्या संख्येने घडतात तितके अन्य कोणा नेत्याच्या पुतळ्याबाबत घडताना दिसत नाहीत. दलितांच्या वस्त्या जाळल्या जातात. निरपराध दलितांवर एखादा सामान्य पोलीस उपनिरीक्षकही गोळीबार करून त्यांचे प्राण घेतो. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारे गुन्हेगार नेमके पोलिसांना सापडत नाहीत. दलित स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची गावभर धिंड काढणारेही पकडले जाऊन त्यांना जबर शिक्षा झाल्याची उदाहरणे आढळत नाहीत. दलितांवर अत्याचार केल्याबद्दल भरण्यात आलेले शेकडो खटले 17 वर्षे महाराष्ट्रात अनिर्णित राहिले आणि 1995 साली प्रस्थापित झालेल्या शिवशाहीतील सरकारने ते मागे घेतले. त्याचा निषेध करावा किंवा त्याबद्दल किमान नापसंती व्यक्त करावी असे शौरींसारख्या पत्रकारांना वाटतही नाही.

दलित अत्याचारविरोधी कायदा 1989 साली संसदेने मंजूर केलेला असतानाही त्याची प्रत्यक्षात कसोशीने अंमलबजावणी केली जात नाही आणि कायद्याने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यात कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सत्ताधीश पाठीशी घालतात, या सत्य स्थितीबद्दल अरुण शौरी टीका करण्यास धजत नाहीत, डॉ. आंबेडकरांच्या लाखो अनुयायांनी त्यांना सुटाबुटांतला देव समजून त्यांची नित्यनियमाने पूजा करण्याची प्रथा पाडली आहे. अनुयायांच्या या अपराधाबद्दल डॉ. आंबेडकर कसे दोषी ठरतात हे शौरी किंवा रामच जाणे! 

खुद्द डॉ. आंबेडकरांनी केवळ आपल्यालाच नव्हे तर अन्य कोणाही माणसाला देव बनवू नका असा अनुयायांना वारंवार इशारा दिलेला आढळतो. 1927 सालापासून डॉ. आंबेडकरांचा वाढदिवस त्यांचे अनुयायी सार्वजनिकरीत्या साजरे करू लागले, तेव्हा आंबेडकरांच्या वयाची अवधी 35 वर्षे पुरी झाली होती. स्वतः डॉ. आंबेडकर 1927 पासून 15 वर्षे आपल्या जयंतीनिमित्त भरवण्यात येणाऱ्या सभेस हजर राहत नसत. 

29जानेवारी 1932 रोजी मुंबईतील 114 संस्थांतर्फे बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले तेव्हा उत्तरादाखल भाषण करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "आपण माझी महात्मा गांधींप्रमाणे निष्कारण स्तुती करून मला देवपदाला चढवू नका. देवपदाला चढलेल्या देवमाणसाच्या मागे लागलेले निदान मला तरी स्वतःच्या कमकुवतपणाचे लक्षण दिसते." (चा. भ.खैरमोडे : डॉ.भी.रा.आंबेडकर, खंड 4. 1966, पृ.321). 4 मार्च 1933 रोजी डॉ. आंबेडकरांना समारंभपूर्वक मानपत्र अर्पण करण्यात आले तेव्हाही उत्तरादाखल केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी बजावले, "स्तुतिपर अलंकारयुक्त भाषेने तुमच्याचसारख्या एका माणसास गुणातीत ईश्वर बनविले आहे. हे जर खरे मानले तर या तुमच्या भावना स्वहितनाशक आहेत असे मी समजतो.

आज ‘मूले कुठारः’ म्हणूनच प्रथम दोन शब्द सांगणे प्राप्त आहे. दुसऱ्याला ईश्वर बनवावयाचे व आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकावयचा ही भावना तुम्हांला कर्तव्यपराङ्मुख करणारी आहे. या भावनेला जर का चिकटून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनून तुमच्या अंगी वास करीत असलेली शक्ती निकामी ठरेल व या नवयुगात प्राप्त झालेली राजकीय सत्ता निरर्थक ठरेल. आजपर्यंत तुम्ही या नादान भावनेस तुमच्या मनात घर करू दिल्यामुळे तिने तुमच्या वर्गाचा समूळ नाश केला आहे, मी याच्याही पुढे जाऊन असे सांगतो की असल्या नादान भावनेने तुमचाच काय, पण सर्व हिंदू समाजाचा नाश केला आहे. आपल्या या हिंदुस्थान देशाच्या हीनत्वाला काही कारण असेल तर हे देवपण आहे." (जनता, 11 मार्च 1933) 

1941 साली देवीदास नामदेव कांबळे या विद्यार्थ्यास उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. "महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही, असा समज करून घेतात यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे तो आपण कृतीत आणावा अशी माझी आपणांस आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही असे सांगून थकलो; पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही." (जनता : 14 जून 1941).

1942च्या एप्रिलमध्ये डॉ. आंबेडकरांच्या 50च्या वाढदिवसानिमित्त व मु.रा.जयकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या जाहीर सभेला डॉ. आंबेडकर प्रथमच हजर राहिले तेही यापुढे आपल्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका हे सांगण्यासाठी. त्या सभेत बोलताना ते म्हणाले, "तुम्ही माझा वाढदिवस गेली 15 वर्षे साजरा करीत आहात. माझा नेहमीच या प्रकाराला विरोध असल्यामुळे मी आजवर अशा समारंभाला कधीही हजर राहिलो नाही. तुम्ही आता माझा सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. इतके पुरे झाले. यापुढे माझ्या वाढदिवसाचा समारंभ साजरा करू नका. नेत्याविषयी अपार भक्ती बाळगली की जनतेचा आत्मविश्वास नाहीसा होतो. एखाद्या कसोटीच्या प्रसंगी असा नेता नसेल किंवा कशाचाच विधिनिषेध न बाळगणाऱ्या पुढाऱ्यांच्या तावडीत जनता सापडली तर तिला निराधार असल्यासारखे वाटू लागते. मुक्तीसाठी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीवर विसंबून राहू नका. तुमची मुक्ती तुमच्या हातात आहे आणि ती तुम्हीच प्रयत्न करून मिळविली पाहिजे.’’ (महाराष्ट्र शासन, सोर्स मटेरिअल ऑन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅन्ड मू्व्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड, 1982. पृ.251) जेव्हा जेव्हा भारतात धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा आपण अवतार घेतो या योगेश्वर श्रीकृष्णाच्या वचनावर विसंबून राहिल्यामुळे हिंदू समाज संकटाच्या वेळी कसा अगतिक बनतो त्याचीही त्यांनी श्रोत्यांना आठवण करून दिली. बहुसंख्य भारतीय मूर्तिपूजक आहेत. अवतारी पुरुषाच्या कल्पनेने भारतीय जनमानसाला झपाटलेते आहे. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांनाही त्यांची बाधा झालेली असल्यामुळे डॉ. आंबेडकरांना त्यांच्या हयातीत त्यांनी देवत्व बहाल केते होते. वस्तुतः महात्मा जोतीराव फुले यांच्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनीही अवताराची संकल्पना त्याज्य मानली होती. 

18 जानेवारी 1942 रोजी न्या. रानडे जन्मदिनानिमित्त त्यांच्या केलेल्या 101व्या भाषणात आंबेडकरांनी विभूतिपूजेला व दैवतीकरणाला निःसंदिग्ध शब्दांत विरोध केला. ‘‘हिंदुस्थान हा आजही मूर्तिपूजकांचा देश आहे. धार्मिक क्षेत्राप्रमाणेच राजकारणातही पूजा केली जाते. विभूतिपूजा हिंदुस्थानच्या राजकारणातील दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. विभूतिपूजेमुळे भक्तांचे मनोधैर्य खचते आणि देशालाही ती घातक असते. विभूतिपूजेवर केल्या जाणाऱ्या टीकेचे मी स्वागत करतो. कारण एखाद्याची पूजा करण्यापूर्वी तो खरोखरच महापुरुष आहे, हे तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे असा सावधगिरीचा इशारा त्या टीकेमुळे मिळतो... या देशात ‘खिसेकापूंपासून सावध राहा’ असे फरक ठिकठिकाणी लावलेले असतात. तसेच ‘महापुरुषापासून सावध राहा,’ असे फलक ठिकठिकाणी लावण्याची गरज आहे. " (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रायटिंग्ज अँड स्पीचेस. खंड 9 – 9,979. पृ.230.) 

राजकारणातील भक्तिसंप्रदायाला मात्र डॉ. आंबेडकरांनी सदैव विरोध केला. महात्मे किंवा प्रेषित यांचे स्तोम माजविणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. डॉ. आंबेडकरांच्या 55च्या वाढदिवसानिमित्त 'जयभीम' नियतकालिकाच्या संपादकांनी त्यांना संदेश देण्याची विनंती केली तेव्हा दिलेल्या संदेशातही डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. "हिंदुस्थानात राजकीय नेत्याला प्रेषितासारखा मान दिला जातो ही सत्य स्थिती आहे. व्यक्तिशः मला माझा वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. मी पक्का लोकशाहीवादी असल्यामुळे माणसाची पूजा म्हणजे मला लोकशाहीची विकृती वाटते. एखाद्या नेत्यावर प्रेम करणे, त्याचे कौतुक करणे, त्याच्याबद्दल आदर बाळगणे यासाठी तो नेता खरोखरच पात्र असेल तर लोकशाहीतही तो व्यक्त करण्यास मुभा दिली जाते. पण नेत्याची पूजा करण्यास परवानगी देता येत नाही. (नानकचंद रत्तू, रेमिनिसन्सीस अँड रिमेंबरन्सीस ऑफ डॉ. बी. आर. आबेडकर, 1995, पृ.8788.) 

दैवतीकरणाला आणि विभूतिपूजेला अनेक वर्षे विरोध करणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी 25 नोव्हेबर 1949 रोजी घटना परिषदेत केलेल्या संस्मरणीय भाषणातही आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. भारतीय घटनेचा अंतिम मसुदा संमत केल्या जाण्याचा ऐतिहासिक क्षण जवळ येत होता तेव्हाही भारतीय लोकशाहीला असणाऱ्या संभाव्य धोक्यांची ते घटना परिषदेच्या सदस्यांना जाणीव करून देत होते. "लोकशाही टिकविण्याबाबत ज्यांना आस्था वाटते त्यांनी जॉन स्टुअर्ट मिलने सांगितल्याप्रमाणे सावध राहिले पाहिजे. त्यांनी महापुरुषाच्या पायाशी आपले स्वातंत्र्य वाहू नये. ज्यामुळे महान राजकीय नेत्यांनाही राजकीय संस्था उखडून टाकता येतील असे अधिकार त्यांना देऊ नयेत. ज्या महापुरुषांनी आयुष्यभर देशसेवा केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता दर्शविणे मुळीच चुकीचे नाही. मात्र कृतज्ञतेलाही मर्यादा असते.... जगातल्या कोणत्याही देशातल्या राजकारणाच्या तुलनेने भक्ती, भक्तिमार्ग, विभूतिपूजा यांचा भारतीय राजकारणातील वाटा फार मोठा आहे. धर्माच्या क्षेत्रात भक्तीमुळे आत्म्याला मुक्ती लाभत असेलही. राजकारणात मात्र भक्ती केल्यामुळे किंवा विभूतिपूजा करण्यामुळे अखेर हुकूमशाहीचा मार्ग खुला होतो.’’

(वसंत मून : (संपादक), खेड 13, पृ.1215-1216).

Tags: डॉ. आंबेडकर विरोध विभूतिपूजा दैवतीकरण य.दि. फडके ग्रंथ समीक्षा oppose person worship deification y. d. phadke mahapurush dr. ambedkar book review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके