डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद लातूर येथे 30 जून व 1 जुलै रोजी होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, कृतिशील धर्मचिकित्सा, समाजसुधारकांचा सत्यशोधकी वारसा यांबाबत तेथे सखोल विचारमंथन होईल. वैज्ञानिक जाणिवांची शिक्षणक्षेत्रात अंमलबजावणी होण्यासाठी कृतिकार्यक्रम ठरेल. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते होत आहे. त्यांच्या उद्घाटनपर भाषणातील काही भाग…
 

आपल्या सर्वांच्या विचारार्थ संयोजकांनी जी रूपरेखा तयार केली आहे, तीत 1] वैज्ञानिक दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनातील प्रश्नाकडे पाहणे, 2] अंधश्रद्धांना विरोध, 3] अनिष्ट रूढी, प्रथा, कर्मकांड, परंपरा नाकारून होकारात्मक पर्याय शोधणे, 4] धर्माची विधायक चिकित्सा करण्याची मानसिकता तयार करणे आणि 5] सत्यशोधकी जाणिवा व्यापक परिवर्तनाशी जोडून घेणे, अशी पाच उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहेत. ती साध्य करण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागणार आहेत. ते करण्याचा निर्धार केला तर देव आणि धर्म यांना आमचा विरोध नाही; त्यांच्या नावावर सर्वसामान्य जनतेला लुबाडणाऱ्या दलालांविरुद्ध आमचा लढा आहे, अशी भूमिका स्वीकारणे कितपत परिणामकारक ठरेल, याचा विचार करण्याची गरज आहे.

पूर्वसूरीचे अपयश
बुवाबाजी, चमत्कार, दैववाद, ज्योतिष, भुताटकी, भानामती, देवदेवस्की, करणी, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंगात येणे, रूढी, कर्मकांड इत्यादी अनिष्ट परंपरांचे पालन या सर्वांविरुद्ध महाराष्ट्रात ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाद्वारे सतत 27 वर्षे लोकांचे प्रबोधन करण्याचा र.धों. कर्वे (1882-1953) यांनी निकराचा प्रयत्न केला. संततिनियमनाच्या आजच्या भाषेत कुटुंबनियोजनाच्या किंवा कुटुंबकल्याणाच्या धोरणाला स्वतंत्र भारतातील सरकारची मान्यता मिळवून देण्यात त्यांना आयुष्याच्या अखेरीस यश मिळाले खरे; पण बुद्धिप्रामाण्य-वाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जनमानसात रुजवण्यात त्यांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. आज अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठी चाललेल्या चळवळीत सहभागी झालेल्या आणि विज्ञान निष्ठा आणि विवेकवाद यांचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांनी आपले पूर्वसूरी असलेल्या रघुनाथराव कर्वे यांच्या अपयशाची चिकित्सा करण्याची आवश्यकता आहे. 

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा 
थोर वैज्ञानिकही अखेर माणसेच असतात. प्रत्येक माणूस हा ज्या काळात जन्मतो आणि जगतो त्या काळाचे अपत्य असतो. धर्म माणसाला जन्मतःच लाभतो तो आईवडिलांकडून. मायबोली शिकताना धार्मिक चालीरीती आणि भाषा बालपणीच त्याच्या अंगवळणी पडतात. सणवार, पूजापाठ, शिष्टाचार, स्वर्गनरक, पापपुण्य तसेच सदाचरण-दुराचरण यांबाबतच्या समजुती वगैरेंमुळे व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धांची जडणघडण बालपणीच होत असते. 

रघुनाथराव कर्वे, आयझॅक असिमॉव्ह वगैरे विचारवंत अखेरपर्यंत नास्तिक राहिले. देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म, अध्यात्म वगैरेवरची श्रद्धा कोवळ्या वयातच मनातून उखडली गेल्यानंतर ते आयुष्यभर विवेकाधिष्ठित वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार व प्रसार करीत राहिले. भूक, हिंस्र पशू, रोगराई, मृत्यू यांविषयी मानवाला वाटणाऱ्या भयातून देव आणि धर्म यांचा उदय झाला. आपल्यावर प्रसन्न होऊन वर देणारा देव तसेच कोप झाल्यावर शाप देणारा, शिक्षा करणारा देव ही दोन्ही रूपे म्हणजे भयग्रस्त माणसाच्या मनाचे खेळ होत. देव आणि भक्त यांच्यामधला दलाल म्हणजे पुरोहित. राजकीय सत्ता भोगणाऱ्यांची आणि पुरोहित वर्गाची युती आइन्स्टाईनला समाजविघातक वाटत असे. देव नव्हे तर माणसाच्या बाह्य व आंतरिक गरजा त्याच्या कृती निर्धारित करीत असतात असे आइन्स्टाईनचे म्हणणे होते. [डी.पी. ग्रिबॅनॉव : उपरोक्त, पृ. 109.] धर्मग्रंथाच्या विळख्यात सापडलेल्या आणि धर्मपीठाने जाचक बंधने लादून जखडून टाकल्यामुळे गुदमरू लागलेल्या विज्ञानाला मोठया मुश्किलीने श्वास घेण्याची मोकळीक मिळवून देण्याचे श्रेय आइनस्टाईनने निकोलस कोपर्निकस (1473-1543), गॅलिलिओ गॅलिली (1564-1642) आणि थोहान्स केपलर (1571-1630) या तिघा वैज्ञानिकांना दिले आहे. 

गॅलिलिओने प्रयोग करून अ‍ॅरिस्टॉटलची अनेक मते खोटी असल्याचे सिद्ध केले. यामुळे गॅलिलिओविरुद्ध अ‍ॅरिस्टॉटलच्या मतांविषयी अंधश्रद्धा असलेल्या विद्यापीठीय विद्वान आणि धर्माचार्यांनी युती करून काहूर माजवले.
सतराव्या शतकात आधुनिक विज्ञान उदयाला येण्यापूर्वी वैज्ञानिक किंवा तत्वज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बहुतेक जणांची देव, धर्म, आत्मा, परलोक, पुनर्जन्म, धर्मग्रंथ, प्रेषित वगैरेंवर श्रद्धा होती. 

एक पाहणी 
आधुनिक विज्ञानाला चारशे वर्षांचा इतिहास आहे. विसाव्या शतकात 1914 साली आणि 1934 साली शंभर निवडक अमेरिकन शास्त्रज्ञांच्या धर्मासंबंधीच्या मताविषयी एका मानसशास्त्रज्ञाने केलेल्या नमुनापाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला. 

उच्च प्रतीच्या शास्त्रज्ञांत नास्तिक शेकडा 71, ईश्वरवादी 13 आणि बाकीचे साशंक असल्याचे नमुना पाहणीत आढळले.
[समाजस्वास्थ्य: जानेवारी 1935 पृ. 193-197.]

शास्रज्ञ
________________________________________
निर्जीव पदार्थ शास्त्रज्ञ
जीवशास्त्रज्ञ
समाजशास्त्र
मानसशास्त्रज्ञ

निर्जीव पदार्थशास्रज्ञ
जीवशास्त्रज्ञ
समाजशास्रज्ञ
ईश्वर मी मानतो
________________________________________
38
27
24
10
मरणोत्तर जीवन आहे
41
29
25    ईश्वर मानीत नाही
________________________________________
47
60
67
79
मरणोत्तर जीवन नाही
32
44
48    माहित नाही
________________________________________16
13
09
11
माहित नाही
20
27
27

एडवर्ड जे. लार्सन आणि लॅरी विथम यांनी ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकाच्या सप्टेंबर 1999 च्या अंकात ‘सायंटिस्ट्स अँड रिलिजन इन अमेरिका’ या शीर्षकाचा एक सर्वेक्षणावर आधारलेला लेख प्रकाशित केला. त्यावरुन ईश्वरास मानणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून पूर्णपणे नास्तिक असलेल्या वैज्ञानिकांमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांचा आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या सदस्यांचा समावेश आहे. 1914, 1934, आणि 1999 च्या पाहण्या अमेरिकेपुरत्याच मर्यादित होत्या. रशिया, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, चीन, भारत आणि इस्लामवर श्रद्धा असलेले देश यांमधील वैज्ञानिकांची देवावर व धर्मावर श्रद्धा आहे की नाही याबद्दलच्या पाहण्या झालेल्या दिसत नाहीत. 

धर्माचा वाढता प्रभाव 
“शास्त्रीय ज्ञानाच्या वाढीबरोबर धर्माची ग्लानी वाढत जाणार आणि धर्म म्हणजे अज्ञानाचे गमक हा सिद्धांत अधिकाधिक खरा ठरणार", असा पूर्णतया नास्तिक असलेल्या रघुनाथराव कर्वे यांना विश्वास वाटत होता. [समाजस्वास्थ्य: जानेवारी 1935, पृ.197.) “सर्व धर्माचा आजपर्यंत इतिहास पाहिला तर तो असा दिसतो की आधुनिक शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीपुढे धर्माची एकसारखी पीछेहाट होत चाललेली आहे." [समाजस्वास्थ्य : 15 जानेवारी 1939, पृ.193.) रघुनाथराव कर्वे यांच्या निधनानंतरच्या गेल्या 48 वर्षांच्या काळात विज्ञानाने बरीच प्रगती केलेली असली तरी धर्माची पीछेहाट होण्याऐवजी किंवा त्याला ग्लानी येण्याऐवजी विज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांतही जनमानसावरचा धर्माचा प्रभाव वाढत चाललेला दिसतो. विसाव्या शतकातल्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या सुळसुळाटामुळे धर्मप्रेम क्षीण होण्याऐवजी किंवा धर्माला ग्लानी येण्याऐवजी धर्मप्रेम दृढ होत चाललेले दिसते. भारतातील दूरचित्रवाणीच्या खासगी मालकीच्या वाहिन्या तसेच सरकारच्या नियंत्रणाखालचे दूरदर्शन अंधश्रद्धांच्या निर्मूलनाला हातभार लावण्याऐवजी अंधश्रद्धांच्या वाढीला मदत करताना दिसतात. बुवा आणि बाबा, साधू आणि साध्वी, फलज्योतिष, यज्ञ, कुंभमेळा वगैरेचे प्रस्थ माजविण्यात टीव्हीचा फार मोठा वाटा आहे.

बहुसंख्य हिंदू मूर्तिपूजक तर आहेतच. ईश्वरी अवतार, आत्मा, पुनर्जन्म, चातुर्वर्ण्य यांवर त्यांची मनोमन श्रद्धा असल्यामुळे महापुरुषांची देवळे बनवणे, त्यांचे नामस्मरण करणे, त्यांची मंदिरे बांधणे वगैरे प्रकार भारतात सहजगत्या केले जातात. 

“आपल्या अज्ञानी शुद्रादि अतिशूद्गांच्या मुलांस सुशिक्षण देण्याकरिता शाळा बांधण्याच्या कामी खर्च न करता वाई, बनारस, प्रयाग, नाशिक वगैरे ठिकाणी राम-कृष्णांची देवालये बांधण्यात अतोनात खर्च करितात. याला कोणीतरी नीती म्हणेल काय ?" असा सवाल करून “हा एवढा अनर्थ कशावरून म्हणाल, तर भागवत व रामायण यांवरूनच होय",  असे जोतिरावांनी ठाम विधान केले आहे.

धर्माचे रूप
आपण सगळेजण बोलताना वा लिहिताना धर्म हा शब्द वापरीत असलो तरी तो निरनिराळ्या अर्थाने त्या शब्दाचा अर्थ इतरांना मान्य असेलच असे नाही, याचे आपण सदैव भान ठेवणे आवश्यक असते. 

धर्म या संस्कृत शब्दासाठी इंग्रजी भाषेतील ‘रिलीजन' हा शब्द सर्रास वापरला जात असला तरी तो यथार्थ प्रतिशब्द म्हणता येत नाही. रिलीजन हा शब्द आरंभी जादू, धर्मविधी, प्रार्थना, बळी देणे, प्रार्थना करणे वगैरे अर्थांशी निगडीत होता. नंतर सृष्टीचे नियंत्रण करणारा ईश्वर, आत्मा, देवपूजा वगैरे रिलीजनचे अविभाज्य भाग बनले. धर्म या संस्कृत शब्दाचे धम्म हे प्राकृत रूप आहे असा बहुतेकांचा गैरसमज असतो. हे दोन्ही शब्द समानार्थी नसून त्या दोन भिन्न संकल्पना आहेत. तसेच या दोन शब्दांमध्ये केवळ भाषिक भेद नसून गुणात्मक फरक आहे, याकडे डॉ. आंबेडकरांनी लक्ष वेधले आहे. धर्म, रिलीजन किंवा मजहब वैयक्तिक असून ती प्रत्येकाची खासगी बाब आहे असे मानणारी मंडळी प्रत्येकाने तो आपापल्यापुरताच मर्यादित ठेवावा असे प्रतिपादन करतात पण धर्मावर विश्वास असलेल्या हजारो लाखो लोकांच्या समुदायाला धर्माचे सार्वजनिक रूप फार प्रिय असते.

श्रद्धा-अंधश्रद्धा
प्राचीन काळातही भारतात ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे चार्वाकासारखे नास्तिक होते. त्यांचे अपवाद सोडल्यास नास्तिकांची संख्या थोडी आणि आस्तिकांची संख्या पुष्कळ, अशी स्थिती तेव्हाही होती. आजही तीत फार फरक पडलेला नाही. 

महात्मा गांधींची देवाधर्मावर गाढ श्रद्धा होती. कोणत्याही धर्माचे सत्य स्वरूप श्रद्धेमध्ये आहे असे ते म्हणत असत. देवाच्या अस्तित्वासारख्या विषयात चिकित्सक बुद्धीला स्थान नसते, असे गांधीजींचे मत होते.बुद्धिप्रामाण्यवादी रघुनाथराव कर्वे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी जीवनाची चिकित्सा करीत असत. त्यांना गांधीजींची देवाधर्मावरील श्रद्धा म्हणजे निव्वळ वेडगळपणा वाटत असे. 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये रघुनाथराय कर्वे फरक करीत नसत. सर्व धर्मात श्रद्धेला अतिशय महत्त्व असते. दोन आणि दोन मिळून चार होतात हे सर्वांना माहीत असते आणि प्रत्येकजण ही गोष्ट खरी मानतो. हे साहजिकच आहे. पण याला कोणी श्रद्धा म्हणणार नाही. एखादी गोष्ट खोटी आहे अशी आपली खात्री असूनही ती खरी मानणे किंवा निदान तिच्या खरेपणाबद्दल शंका असून ती खरी मानणे याला श्रद्धा म्हणता येईल... ज्यांच्याजवळ बुद्धी पुरेशी नाही किंवा काही कारणाने ज्यांना तात्पुरता मानसिक थकवा आला असेल त्यांना श्रद्धा ठेवल्याने कदाचित बरे वाटत असेल; कारण मग विचार करण्याचे कारण राहात नाही. पण याकरिता जर श्रद्धा चांगली म्हणायची असेल तर अफूच्या गुंगीनेही काहींना बरे वाटते म्हणून तीही चांगली म्हणावी लागेल. श्रद्धा ठेवणे म्हणजे स्वतःला एक प्रकारची गुंगी आणणे होय. युक्तिवादाच्या कसोटीला न लावता कोणी सांगेल ते खरे मानणे हीच श्रद्धा. [समाजस्वास्थ्य : 15 जुलै 1937, पृ.34.] श्रद्धेमुळे सर्व प्रकारच्या भोंदूंचे फावते आणि श्रद्धेमुळेच थिऑसॉफी, फलज्योतिष, ख्रिश्चन सायन्स अतींद्रिय ज्ञान, मृतात्म्यांशी संवाद वगैरेंचे प्रस्थ माजते असे रघुनाथराव कर्वे यांचे म्हणणे होते.

वैज्ञानिक दृष्टिकोन
अनेकांना खऱ्या वाटणाऱ्या समजुती पुराव्यानिशी अगर प्रयोग करून खोट्या असल्याचे सिद्ध करणे शक्य होते ते वैज्ञानिक पद्धतीचा काळजीपूर्वक उपयोग केल्यामुळे. निखळ विज्ञानाचे उद्दिष्ट त्याचा शोध घेणे हेच असते. जिज्ञासेपोटी घटिताचे (फॅक्टस्) निरीक्षण करून वैज्ञानिक त्यांचे काळजीपूर्वक अचूक वर्गीकरण करतो. सर्जनशील प्रतिभेच्या मदतीने तो विज्ञानविषयक नियम निश्चित करतो. तसे करण्यापूर्वी तो प्रयोग करून त्याची सत्यता पडताळून पाहतो. त्याने प्रयोगांती सिद्ध केलेला नियमही सपशेल चुकीचा किंवा सदोष असण्याची शक्यता अगर केवळ भास असण्याची शक्यता असते आणि तिचे भान ठेवून आत्मटीकाही करण्याची त्याची तयारी असते. वैज्ञानिक सत्य हे नेहमी हंगामी स्वरूपाचे असते आणि अन्य वैज्ञानिकांनी प्रयोग करून ते सत्याभास असल्याचे सप्रमाण सिद्ध केले तर ज्याला प्रथम ते सत्य वाटलेले असते तो वैज्ञानिकही आपली चूक कबूल करून सत्याचा नव्याने शोध घेऊ लागतो. 

न्यूटन किंवा आइन्स्टाईनसारखे वैज्ञानिक अंतिम सत्य आपल्याला गवसले आहे असा भ्रम बाळगीत नाहीत. आपल्याला जे खरे वाटते ते खोटेही असू शकते याची जाणीव ठेवून सत्याचा शोध घेण्यात ते मग्न होतात. 

आपण ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वैशिष्टयाकडे आइन्स्टाईन, फाइनमन यांसारख्या अव्वल दर्जाच्या वैज्ञानिकांप्रमाणेच जॉन ड्युईसारख्या तत्ववेत्यानेही लक्ष वेधले आहे. [जॉन ड्युई : फ्रीडम अँड कल्चर, 1952, पृ.122.] वैज्ञानिक सत्यशोधनातच ज्यांना आनंद मिळतो अशी माणसे संख्येने थोडी असली तरी त्यांचे अस्तित्वही समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक असते. निरपेक्ष वृत्तीने ज्ञानार्जन करणारी माणसे वैज्ञानिक पुरावा मिळाल्याशिवाय कोणत्याही समजुतीवर अगर सिद्धांतावर विश्वास ठेवण्यास तयार नसतात. व्यक्तिशः आपल्याला पसंत असलेल्या निष्कर्षास अग्रस्थान देण्याऐवजी पुरावा जी दिशा दाखवतो त्या दिशेने वैज्ञानिक जातात. आपले अभ्युपगम (हापयोथिसिस) पुराव्याच्या किंवा प्रयोगाच्या कसोटीला उतरतात की नाही, हे ते पारखून पाहतात. श्रद्धाधिष्ठित मत आग्रहाने अगर अभिनिवेशाने मांडण्याचे त्यांना वावडे असते. 

आपल्याला जे खरे वाटते त्याबद्दलही त्यांच्या मनात शंका असते. ते आपले शब्द किंवा सिद्धांत अंतिम मानीत नाहीत. कोणाही बाबाचे वाक्य ते प्रमाण मानीत नाहीत. 

धार्मिकांचा दृष्टिकोन श्रद्धेवर आधारलेला असतो तर वैज्ञानिकांचा दृष्टिकोन बुद्धीने केलेल्या तर्कावर आधारलेला असतो आणि जिज्ञासेमुळे केलेल्या निरीक्षणावर आधारलेले अनुमान प्रयोग करून सिद्ध झाले की तो ते स्वीकारतो. इतरांशी वाद केल्यानंतर आणि त्यांनी त्याचे मत चुकीचे असल्याचे सिद्ध केल्यावर तो आपले पूर्वीचे मत त्याज्य मानतो. धार्मिक ज्ञान शाश्वत असते आणि ते श्रद्धेमुळे लाभते असे म्हटले जाते. वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधामुळे धर्मग्रंथांतली मते खोटी ठरतात तेव्हा धर्मोपदेशक वैज्ञानिकांच्या सिद्धांतावरून रान उठवतात.

धर्माची दृष्टी
वैज्ञानिकांनी अनेक शोध लावले तरी ते नवीन असल्याचे कबूल करण्याऐवजी हजारो वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी ते लावले असल्याचे धर्मावर श्रद्धा असणारी माणसे सांगतात. 1981 साली विश्वस्थिती शास्त्रासंबंधीची एक आंतरराष्ट्रीय परिषद व्हॅटिकन शहरात भरली होती. त्या परिषदेत सहभागी होण्यासाठी स्टीफन हॉकिंग निमंत्रित प्रतिनिधी म्हणून गेले होते. महास्फोट (बिग बँग) होऊन विश्वाची निर्मिती झाली आणि त्यांनतर उत्क्रांत होत होत आजचे रूप त्याला प्राप्त झाले. तसेच या विश्वाचे भवितव्य काय असेल याबद्दल स्टीफन हॉकिंगने आपली मते मांडली. विश्वाला आरंभ नाही तसाच त्याच्या निर्मितीचा क्षण असेही काही नाही असे हॉकिंगने प्रतिपादन केले. परिषदेचे समारोपाचे सत्र झाल्यावर सर्व प्रतिनिधी पोपला भेटले. तेव्हा पोप म्हणाला, ‘महास्फोटानंतर विश्वाची कशी उत्क्रांती झाली याची चर्चा करण्यास हरकत नाही मात्र महास्फोट हाच निर्मितीचा क्षण असल्यामुळे आणि तो ईश्वराने घडवून आणलेला असल्यामुळे त्याबद्दल संशोधन करू नये.’ सकाळच्या सत्रात पोपला नको असलेल्या विषयावर हॉकिंगने भाषण केले असल्यामुळे पोपसमोर आपण या विषयावर चकारशब्द उच्चारला नाही आणि मौन धारण करणे पसंत केसे असे हॉकिंगने लिहिले आहे. (स्टीफन हॉकिंग : उपरोक्त, पृ. 122) गॅलिलिओ कालवश झाल्यानंतर बरोबर तीनशे वर्षांनी आपला जन्म झाला असल्यामुळे आपली अवस्था गॅलिलिओसारखी होऊ नये म्हणून आपण गप्प बसलो असे हॉकिंगने गमतीने लिहिले आहे.

विज्ञान, धर्म व सद्भाव
दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराला नवनवीन शस्त्रास्त्रांची निर्मिती करून हातभार लावणाऱ्या काही वैज्ञानिकांना विज्ञान आणि धर्म यांच्यामधील तीन शतकांहून अधिक काळ चाललेला संघर्ष विसरून त्यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण करण्याची गरज असल्याचे जाणवू लागले. विज्ञान आणि धर्म यांची क्षेत्रे भिन्न असली आणि त्यांच्या आस्थेचे विषय वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये विरोध वा संघर्ष असला पाहिजे असे समजण्याचे कारण नाही असा युक्तिवाद दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जुलियन हक्सले हा जीवशास्त्रज्ञ करू लागला. विज्ञान आणि धर्म यांचे संबंध परस्पर पूरक असावेत कारण मानवजातीच्या भवितव्याविषयीची चिंता धर्मवेत्त्यांना जशी वाटते तशीच ती वैज्ञानिकांनाही वाटते; धर्माशिवाय विज्ञान लंगडे होते आणि विज्ञानाशिवाय धर्म आंधळा बनतो, हे आइन्स्टाईनचे मत धर्मवेत्ते उद्धृत करू लागले. 

धार्मिक माणसांचा चमत्कार, साक्षात्कार, प्रार्थना वगैरेंवर विश्वास असतो. वैज्ञानिकांचा मात्र त्यावर विश्वास नसतो. एका मुलीने पत्र लिहून आईन्स्टाईनला विचारले, “शास्त्रज्ञ प्रार्थना करतात का ? करीत असले तर ती कशासाठी ?” या मुलीला उत्तरादाखल आईन्स्टाईनने लिहिले, “घडणाऱ्या घटनांचा ओघ सर्वशक्तिमान अस्तित्वाला प्रार्थना करून बदलता येतो या कल्पनेवर शास्त्रज्ञ विश्वास ठेवू शकत नाहीत. मात्र आपले जीवन विज्ञानाला वाहिलेल्या व्यक्तीची निसर्गाच्या विविध व्यापारातून एका ज्येष्ठतम प्रज्ञेचा आविष्कार होत असल्याची आणि आपल्या तोकडया सामर्थ्याच्या जाणिवेमुळे तिच्यापुढे विनम्र होण्याची सद्भावना दृढावते. विज्ञाननिष्ठ व्यक्तीच्या मनातील हा धार्मिक सद्भाव अर्थातच सर्वसामान्यांच्या भोळ्या धार्मिक कल्पनांहून अगदी निराळा असतो."

मूलतत्त्ववाद व धर्मनिरपेक्षता
धर्माचे प्रस्थ असलेल्या विकसनशील देशातील समाजांमध्ये आधुनिकीकरणामुळे आणि आर्थिक विकासामुळे ऐहिकीकरणाची प्रक्रिया गतिमान होईल, धार्मिक समजुती, परंपरा आणि रूढी यांचा जनमानसावरील पगडा कमी होत जाईल अशी युरोप-अमेरिकेतल्या पंडितांना आशा वाटत होती ती फोल ठरली. तुर्कस्तान, इजिप्त, इराण, लेबनॉन, ट्युनिशिया या देशातील सत्ताधीशांनी आधुनिकीकरण म्हणजे पाश्चात्त्यीकरण असे समीकरण मांडले ते सपशेल चुकीचे असल्याचे मूलत्ववाद्यांच्या विजयामुळे सिद्ध झाले.

धर्मग्रंथांतील वचने अक्षरशः खरी असतात अशी मूलतत्त्ववादी माणसांची श्रद्धा असते. आपला धर्म सर्वांत श्रेष्ठ असून अन्य धर्मीयांनी तो स्वीकारणे त्यांच्याच हिताचे आहे असे त्यांचे म्हणणे असते. आपल्या धर्मग्रंथांत अंतिम सत्य सांगितलेले असून त्याविषयी कोणी शंका घेतलेली त्यांना सहन होत नाही. अलीकडच्या पन्नास वर्षांच्या काळात वैज्ञानिकांनी जे महत्त्वाचे शोध लावले त्याबाबतचे उल्लेख धर्मग्रंथात आढळतात असेही मूलतत्त्ववाद्यांचे म्हणणे असते. नास्तिक आंधळे असतात; श्रद्धावान आस्तिकांनी डोळे उघडे ठेवले असल्यामुळे त्यांना सत्याचे दर्शन होते असा धर्मनिष्ठ माणसांचा दावा असतो. 

इंग्रजी राजवटीत मुस्लिम लीगने केलेल्या धर्माधिष्ठित राजकारणामुळे देशाची फाळणी होऊन पाकिस्तान अस्तित्वात आले आणि ते इस्लामिक गणराज्य झाले. भारतीय घटनेच्या शिल्पकारांनी मात्र भारत हे हिंदुराष्ट्र किंवा हिंदूंचे गणराज्य असल्याचे घोषित केले नाही. स्वतंत्र भारतात व्यक्तीला आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचे, त्यानुसार आवरण करण्याचे किंवा त्याचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असले तरी ते सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता यांच्या मर्यादेतच उपभोगता येते. संविधानसभेतील चर्चेत अल्लादि कृष्णस्वामी अय्यर यांनी या मर्यादांचे समर्थन करताना सांगितले की ज्या समाजात नरबळी, अस्पृश्यता यांसारख्या प्रथा धर्माचे कवच घेऊन वावरतात तेथे अनिर्बंध धर्मस्वातंत्र्य दिले तर समाजाची प्रगती थांबेल. धर्म आणि रूढी या भिन्न गोष्टी असून अंधश्रद्धेवर आधारलेल्या रूढी नष्ट करण्यास अग्रक्रम यावा असे काहींचे म्हणणे असते; पण अनेक रूढी, प्रघात, परंपरा व समजुती यांचा उगम धर्मग्रंथातच होत असल्यामुळे त्यांच्यावर प्रहार करणे म्हणजे धर्मभावनांना धक्का देऊन त्या दुखावणे ठरते.

यज्ञसंस्कृती
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन वर्षांत नागपूरला अग्निस्तोम वाजपेय यज्ञ झाला. नांदेडला अश्वमेध थाटात पार पडला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे सोमयाग महायज्ञ झाला आणि तो महाभारत काळानंतर प्रथमच होत असल्याचा गंगाखेडच्या संयोजकांनी दावा केला. अग्नीच्या उपयुक्ततेतून अग्निपूजा निघाली आणि अग्निपूजेतून यज्ञसंस्था निघाली अशी पक्षाची कुळकथा सांगून वैदिककाळी यज्ञ तिकडे जय, तिकडे अग्नी तिकडे विजय हे केवळ साहचर्य होते; कार्यकारणभाव नव्हे असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे. (समग्र सावरकर वाङ्मयः खंड 3, 1964, पृ.325) अलीकडे यज्ञसंस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून पद्धतशीर प्रयत्न करणाऱ्यांचा हिंदुधर्माभिमान जितका जाज्वल्य आहे तितकाच सावरकरांचा धर्माभिमान जाज्वल्य होता. तरीही विमानयुगात यज्ञ करणे त्यांना हास्यास्पद वाटत होते. एकेक अनाथालय हे एकेक अश्वमेध यज्ञाइतके पुण्यप्रद आहे असे सावरकर म्हणत असत. 

गंगाखेडला ग्वांअयन सौमयाग करणाऱ्या संयोजकांनी आपल्या यज्ञामध्ये शुद्ध वैदिक स्वरूपाच्या विज्ञाननिष्ठ प्रक्रियांचा आविष्कार होत असल्याचा दावा केला होता. धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणाऱ्या पां.वा. काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्वांअयन हा यज्ञ संतती, ऐश्वर्य, मोठेपणा, उच्चाधिकार, स्वर्ग यांच्यासारख्या निरनिराळ्या फलांची प्राप्ती व्हावी म्हणून केला जातो. एक वर्षभर चालणाऱ्या सत्रातील अत्यंत महत्त्वाचा दिवस महाव्रत हा असतो. “त्या दिवशी अनेक चमत्कारिक आणि विक्षिप्त विधी करण्यात येतात. वेदीच्या उत्तरेकडील भागात एक वेश्या आणि एक ब्रम्हचारी परस्परांची निंदा करतात. यज्ञामध्ये भाग न घेतलेल्या एका त्रयस्थ पुरुषाचा आणि एका स्त्रीचा एका बंद केलेल्या मंडपात समागम घडविण्यात येतो." (काणे उपरोक्त, पृ. 377) गंगाखेडच्या ग्वांअयन सोमयागात हे प्रकार झाले काय ? झाले असलेच तर त्यांना विज्ञाननिष्ठ प्रक्रियांचा आविष्कार म्हणावयाचे काय ? 

आमच्या धर्मभावना दुखवू नका म्हणणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बजावले होते, “ज्याला जे सत्य वाटेल ते त्याने प्रकटपणे उपदेशावे, जो धार्मिक वा सामाजिक आचार लोकहिताला विरुद्ध जातो आहे तो तसा असल्याविषयी युक्तिसंगत चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकास असावा, जी खोटी, घातक आणि अनिष्ट ती ती समजूत धर्म म्हणून जरी आचरली जात असली तरीही तिचा उच्छेद करणे हे प्रत्येक लोकहितैषी पुरुषाचे कर्तव्यच आहे. ती समजूत धार्मिक असली तरी दुर्बुद्धी आहे. बुद्धी नव्हे." (समग्र सावरकर वाङ्मय : खंड 3, 1964, पृ.430) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीला तीव्र विरोध करणारेही वर उल्लेखिलेल्या त्यांच्या मतांशी सहमत होतील.
 

Tags: स्टीफन हॉकिंग आईन्स्टाईन नांदेड गंगाखेड स्वातंत्र्यवीर सावरकर र. धों. कर्वे Stephen Hawking Einstein Nanded Gangakhed Swatyantravir Sawarkar R. D. Karve weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके