डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधीग्रामच्या ग्रामीण विद्यापीठाच्या परिसरात

सायकलस्वारांना जायला दोन तास उशीर झाला, परंतु तिथली व्यवस्थापक मंडळी वाट पाहात होती. डॉ. आरम यांची भेट नागालँड पीस सेंटरचे काम ते कोहिमाला करत असताना झाली होती. नागालँडचे लोक व सरकार यांच्यातले तणाव दूर करण्याचे नाजूक आणि अवघड काम त्यावेळी जयप्रकाशांच्या बरोबरीने डॉ.आरम यांनीही केले होते. त्यानंतर ग्रामीण विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. आरम गांधीग्रामला आले.

मदुराईहून निघून गांधीग्रामला जायचे होते. गांधीग्राम ही एक ग्रामीण भागातील विद्यापीठसदृश संस्था आहे.

1948 साली. सोंदरम् रामचंद्रन यांच्या पुढाकाराने मातृ संस्था सुरू झाली. 1956 साली विद्यापीठ सुरू झाले.

सहा-सात वर्षांपूर्वी गांधीग्रामला आंतरभारती श्रमसंस्कार छावणीचे आयोजन करण्यात आले होते. तिथल्या एका सभागृहाला गांधीग्रामच्या मंडळींनी प्रेमाने आन्तर भारती सभागृह असे नाव तेव्हा दिले. 

छावणीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पाचशे खड्डे खोदून लिंबाची रोपे त्यावेळी लावली होती व त्या रस्त्याला आंतरभारती अव्हेन्यू असे नाव देण्यात आले होते. 

भारत जोडो अभियानाला त्यांचा पाठिंबा गृहीतच धरला होता.

मदुराईला गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आरम यांचे तपशीलवार कार्यक्रम कळवणारे पत्र हाती आले होते. दोन दिवस गांधीग्रामच्या नावे खर्ची टाकलेले असल्याने त्यांनी नेटकी योजना आखली होती.

बरोबर बारा वाजता अभियानातील मंडळी गांधीग्रामला पोचतील अशी कल्पना होती. स्वागतासाठी सर्वजण उत्सुक होते; पण सायकली पोचण्याला उशीर लागेल अशी जाणीव झाल्यावर बाबा आमटे यांनी स्वागताचा स्वीकार करण्यासाठी ठरल्या वेळी पुढे जावे असे ठरले. 

सायकलस्वारांना जायला दोन तास उशीर झाला, परंतु तिथली व्यवस्थापक मंडळी वाट पाहात होती. डॉ. आरम यांची भेट नागालँड पीस सेंटरचे काम ते कोहिमाला करत असताना झाली होती. नागालँडचे लोक व सरकार यांच्यातले तणाव दूर करण्याचे नाजूक आणि अवघड काम त्यावेळी जयप्रकाशांच्या बरोबरीने डॉ.आरम यांनीही केले होते. त्यानंतर ग्रामीण विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. आरम गांधीग्रामला आले.

डॉ. आरम यांचे जीवन आंतर भरतीची वृत्ती जोपासणारे आहे. त्याचे लग्न असम निवासी बंगालच्या सुकन्या श्रीमती मिनोती यांच्याशी झाले. भिन्न धर्मीयांमधले लग्न यशस्वी होते त्याचे डॉ. आरम हे एक उदाहरण आहे.

1927 साली तमिळनाडूतील तिरुनेलवली जिल्ह्यातील कुलशेखरपट्टमला त्यांचा जन्म झाला. 1948 साली मद्रास विद्यापीठातून ते इंग्रजी विषय घेऊन एम.ए. झाले. त्यानंतर अमेरिकेतील ओहियो विद्यापीठातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट मिळवली. 

कोइबतूरच्या रामकृष्ण मिशन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले. 1963 साली श्री. शंकरराव दवे यांनी दिल्ली. पेकिंग मैत्री यात्रेचे प्रस्थान ठेवले तेव्हा डॉ. आरम यांनी त्यात सहभागी होण्याचे ठरवले.

त्यानंतर नागालैंडमध्ये शांतता व सौहार्द निर्माण करण्याचे जे प्रयत्न सुरु झाले त्यात ते सहभागी झाले. लोकनायक जयप्रकाश आणि बी. पी. चालिहा यांचा त्यात पुढाकार होता. कोहिमाला गांधी शांती केंद्र स्थापन झाल्यावर त्याचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले.

शांततेच्या मार्गावर त्यांची अनन्य निष्ठा आहे. जगभरच्या शांतता चळवळीशी त्यांचे संबंध आहेत. आणि त्या निमित्ताने त्यांनी जगभर प्रवास केला आहे. 

भारत जोडो अभियान हे शांततेचे अभियान आहे. दहशत-अत्याचार, हिंसा-विध्वंस यांच्या जागी करुणेचे युग अवतरावे, अशी अभियानाच्या आयोजकांची कल्पना आहे.

देशाचे अंतर्गत प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याला जे प्रतिज्ञाबध्द असतात त्यांची नेत्यांची शांतिप्रवचने जगाच्या बाजारात यशस्वी होण्याची शक्यता. आपल्याच देशबांधवांशी बंदुकीच्या ज्यांना बोलावे लागते त्यांची शांतताप्रवचने इतरांना ढोंगीपणाची वाटली व तशा तऱ्हेने त्यांनी त्यांची वासलात लावली तर आश्चर्य वाटायला नको. 

डॉ. आरम हे शांतता आघाडीवरील एक दुर्दम्य असे सैनिक आहेत. गांधीग्राम विद्यापीठाच्या प्रशस्त आवारात सर्वांची राहण्याची व जेवण्याची सोय केली होती.

काही काळ विश्राम केल्यानंतर विद्यापीठातर्फे ज्या खेडयांत काम चालते अशा दोन खेड्यांच्या भेटीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. ह्या खेडयांत नियोजन समित्या स्थापन करण्यात आल्या असून अगदी अलीकडे ज्या खेडयात काम सुरू झाले असे आचमट्टी हे जवळचे एक खेडे निवडण्यात आले होते व दुसरे चमापट्टी त्याहून अधिक काळ काम सुरू असलेले निवडण्यात आले होते. पंचवीस-तीस खेड्यात विद्यापीठ पोचले आहे.

पहिल्या आचमपट्टी खेड्यात दलित समाजाने स्वागताची व्यवस्था केली होती. सर्वांना चहा देण्यात आला. नियोजन समितीचे सर्व सदस्य हजर होते. गावाचे दैन्य अनेक अंगातून निथळत होते.

सभेतच दोन-तीन लोक दारू पिऊन येऊन बसले होते आणि मधूनच काहीतरी असंबद्ध बरळत होते ! इतरांना समृद्ध करण्यात त्या गरिबांचा पाम सर्ची पडत होता.

बाबा आमटे इंग्लिशमधून बोलले व त्याचा तमिळ अनुवाद मार्केडन यांनी सांगितला तेव्हा लोकांचे डोळे लुकलुकल्याचे दिसले. ज्यांच्या दुःखांना, यातनांना, अन्याय सोसण्याला अद्याप वाणीच मिळालेली नाही त्यांना मुखरित करण्याचे काम युवकांनी करावे अशी अपेक्षा बाबांबी व्यक्त केली. बीव्हॉइस ऑफ द व्हाइसलेस, असे ते म्हणाले. 

समाजातील अन्याय, दास्य, विषमता, वैरविद्वेष पाहून ज्याचे रक्त तापत नाही आणि त्यांच्या निवारणासाठी जो पुढे सरसावत नाही, तो तरुण कसला ? असे से विचारतात.

आपण एकटे आहोत असे क्षणभरही समजू नका. योग्य कामासाठी साहसाने पुढे सरसावतो तेव्हा अल्पसंख्य बहुसंख्य होतो, हे ध्यानी घ्या, असे ते म्हणाले.

युवाच्या व्याख्या एकामागून एक त्यांनी सांगितल्याः 
युवा तो, की जो संकटांचा मुकाबला करताना डरत नाही, इटत नाही. 
युवा तो, की ज्याचे शब्द कृतीचा हात धरूनच पाऊल पुढे टाकतात.
युवा तो, की जो भान राखून योजना आखतो आणि बेभान होऊन अमलात आणतो.
युवा तो, की समाजाच्या गरजा जन्मण्याअगोदर त्यांची ज्याला चाहूल लागते आणि त्यांच्या पूर्तीसाठी जो आपले सर्वस्व पणाला लावतो.
युवा तो, की जो बघ्याची भूमिका घेत नाही, तो गायक नव्हे, नायक बनण्यासाठी उत्सुक असतो.
युवा तो, की जी पेंढा भरलेल्या घोषणाबाजीला फसत नाही.

एकाद्या काव्यासारख्या ओळी, ओळी मागून ओळी झरत जातात. अभियानातल्या युवती आणि युवक गावकऱ्यांबरोबर सरमिसळ बसलेले असतात. एकमेकांना समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न भाषेच्या माध्यमाअभावी केविलवाणा वाटतो. परिस्थितिवश जितका गलिच्छपणा असावा त्याहून अधिक गलिच्छपणा गावांना वेढून असतो.

गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाचे मार्केडन युवकांसोबत सायकलीने जातात. गाडीत बसण्याचा आग्रह ते जुमानत नाहीत, याचा परिणाम युवांवर सहजच होतो. पहिल्या गावानंतर मोर्चा दुसऱ्या चन्नापट्टीकडे वळतो. 

भारतातल्या इतर पाच लाख खेड्यांसारखाच या खेडयाचा तोंडवळा दिसतो. पण व्यक्तिगत गाठीभेटीत असे दिसून येते की त्यांच्या जाणिवांचे वाढलेले आहे.   

आपल्या दुखःद व यातनांचे स्वरूप त्यांच्या ध्यानी आले असून त्यांच्या निवारणाची त्यांची धडपड चालू आहे. 

जवळपास तीस गावांत विद्यापीठ काम करत आहे. पूर्वप्राथमिक व प्रौढ शिक्षण गृह निर्माण, पेयजलाची सोय, शेतीविस्तार, दुधपुरवठा संस्था, मातृसंगम ही स्त्रियांची संस्था, चांभार आणि ताडी काढणाऱ्यांसाठी कार्यशाळा, विसाड्यांसाठी संस्था, छोट्या व्यापाऱ्यांसाठी सोयी आाणि वैद्यकीय व्यवस्था अशी अनेकविध कामे सुजाणपणे विद्यापीठ करते.

शेती पुष्कळच समृद्ध दिसली, पण त्या समृध्दीचा रास्त वाटा गरिबांना आणि श्रमिकांना मिळतो असे वाटले नाही.

रात्री अंधारातून सर्वजण मुक्कामाच्या जागी परतले. अन्नपूर्णा शामियान्यात सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. साधी, स्वच्छ मांडणी, वाढण्यातील अगत्य सर्व गोष्टी जाणवण्याजोग्या होत्या. सायकलस्वारांत काही मंडळी नुसत्या भातावर निर्वाह करू शकणारी नाहीत याची जाणीव रसोई करणारांनी राखली होती. अन्नात स्वादाइतकेचे पुष्टीलाही महत्व आहे. ह्याची जाणीव त्यांच्या रसोईमागे होती.

दुसरा दिवस गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाची जन्मदात्री असलेल्या मूळ संस्थेतील विविध विभागांचे काम पाहण्यासाठी राखून ठेवला होता. मसलिन खादी हे गांधीग्रामचे एक वैशिष्टयपूर्ण उत्पादन आहे. ती खादी पाहिल्यावर डाक्क्याच्या मलमलची स्वाभाविकच आठवण झाली. बारीक सूत काढणाराला तशी मजुरी मिळणेही क्रमप्राप्तच आहे.

चांभारी कामाचा विभागही चांगला दिसला. शिक्षण व रोजगार दोन्ही प्रकारची कामे तिथे चालतात. ग्रामोद्योग वाजवी वेतन देऊ शकतील असे वाटावे, अशी स्थिती दिसली. सरकार ग्रामोद्योगांबाबत धोरण ठरवून त्याची निर्धाराने अमलबजावणी करील तर महाउद्योग व त्यांच्या आश्रयाने वाढणारी विषमता व झोपडपट्टयांसारखे प्रश्न टाळता येतील. शेतीला काही प्रमाणात भांडवल पुरवठाही करता येऊ शकेल. खादीग्रामोद्योगांचे असे दर्शन घडवणारी केंद्रे असल्यावाचून त्यांचे बौद्धिक समर्थन फारसे उपयोगी पडणार नाही.

दुपारी मुद्दाम आंतरभारती सभागृहातच कार्यक्रम ठेवला होता. व्यंकय्या नावाच्या असोसिएशन ऑफ सर्व सेवा फार्म्सच्या कार्यकर्त्याने आपल्या सुस्वर आवाजाने आणि साध्या डफाच्या साथीवर तमिळ गीते सादर करून सर्वांना प्रभावित केले. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या चळवळीतील गाजलेल्या ‘वुई शॅल ओव्हरकम’ या गीताचा त्याच स्वर तालात त्यांनी तमिळ अनुवाद सादर केला तेव्हा सर्वांची दाद मिळाली.

त्यानंतर ग्रामीण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आरम यांनी आपल्या संस्थेची वैशिष्ट्ये मार्मिकपणे विशद केली. ते म्हणाले, 'भारतातल्या कोणत्याही विद्यापीठाच्या संविधानात उद्दिष्टांचा स्पष्ट असा निर्देश आढळत नाही. गांधीग्राम रूरल इन्स्टिटयूटचे ते एक वैशिष्टय आहे. आमच्या विद्यापीठाची शाळा आणि प्रयोगशाळा खेडे हीच आम्ही मानतो. असली भारत खेडयांत वसलेला आहे, हे ध्यानी ठेवून आम्ही सर्व आखणी करतो. देशाचे वरून लादलेले नियोजन लोकांचा खराखुरा सहभाग मिळवण्यात पुरेसे यश मिळवू शकत नाही. गांधी विचारात आधी कळस मग पाया ही रचना बसत नाही. खालून वर बांधणी झाली पाहिजे. आम्ही ग्रामपातळीवर योजना-समित्या स्थापन केल्या असून ग्रामीण गरजा ध्यानी घेऊन नियोजन केले जावे अशी आमची दृष्टी आहे. ग्राम नियोजन समितीवर कोणाही एक गटाचे नुसत्या पुरुषांचेही वर्चस्व नसावे, ही दक्षता आम्ही घेतो, मग विकासाशी संबंधित प्रशासकांना आमने-सामने चर्चेसाठी बोलावतो, विद्यापीठाची मंडळी मध्यस्थांचे काम करतात.

‘प्रशासकांच्या गळी ही योजना उतरवणे हे महाबिकट कार्य आहे. आपल्याला खेड्याची मंडळी साक्षिदाराच्या पिंजऱ्यात उभे करतात अशी त्यांची समजून होती. ग्रामीण लोक उपकाराच्या ओझ्याखाली दबून मनाची गोष्ट बोलायला घाबरत. आता हळूहळू आपण परस्परांचे भागीदार आहोत हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले असून वातावरण खेळी-मेळीचे बनत आहे. ग्रामीण नियोजन समिती, प्रशासक, बँका आणि विद्यापीठ अशी ही चौघांची रचना आता तयार झाली आहे.

‘कनिमान्नुयू’ या सव्वाशे उंबऱ्याच्या गावी आम्ही काही उद्दिष्टे साध्य करू शकलो आहे आणि आमच्या वाटचालीची ती दिशा आहे. शंभर टक्के साक्षरता, शंभर टक्के रोजगार आाणि शून्य टक्के लोकसंख्यावाढ ह्या टप्प्याच्याजवळ हे गाव पोचले आहे.ग्रामीण भागाची समृद्धी पूर्ण रोजगार आणि शुन्य लोकसंख्यावाढ यावरच मुख्यतः आधारलेली असणार. एक नमुना आम्ही तयार शकलो आहोत. विनोबांनी जनशक्ती, महाजनशक्ती, स्त्रीशक्ती, युवजनशक्ती, सज्जनशक्ती अशा पंचशक्ती सहयोगाचे जे अनुपान सांगितले आहे त्याचे अनुसरण केले तर उद्दिष्ट साधेल अशी आमची कल्पना आहे.

‘इतर विद्यापीठात छात्रसेना विभाग आहेत, आमच्या विद्यापीठात शांतिसेना विभाग आहे. शे-दीडशे छात्र त्यात आहेत. शांति कार्य तीन प्रकारे आम्ही करतो. विधायक कार्य हा त्याचा एक भाग आहे. दुसरा भाग वाटावाटीचा तिसरा मार्ग आहे आक्रमक शांततेचा. कन्स्ट्रक्टिव्ह, कन्सिलिएटरी, कॉबेंटिव्ह असा तीन 'सी'चा हा मार्ग आहे. शांतिसेना शिबिरे हा आमच्या विद्यापीठातल्या शिक्षणाचा व प्रयोगाचा अविभाज्य भाग आम्ही समजतो.'

ग्रामीण विद्यापीठात एम्. फिल.चे पाठ्यक्रम अगदी वेगळया तऱ्हेने आखलेले आहेत. विकेंद्रित नियोजन विभाग हे वैशिष्ट्य आहे. त्याचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक आखण्यात आला आहे. एम्. फिल्. चे दोन विद्यार्थी एक कर्नाटकचा व एक केरळचा आमच्या[सोबत सायकलवर वाले होते. त्यांच्याशी जाता-येता चर्चा झाली. हा विषय परंपरागत नव्हे, त्यामुळे सूजन व नवनिर्मितीचा त्यात भरपूर वाव आहे. गांधीविचार आणि शांतिशास्त्र हा आणखी एक वैशिष्टयपूर्ण विभाग विद्यापीठात आहे. पदव्युत्तर विभागात ग्रामीण विकास या विषयाला स्थान दिलेले आहे. ग्रामीण समाजशास्त्र व मानसशास्त्र, पंचायती राज्य सहकारी संस्थांचे व्यवस्थापन हे विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. सफाई विज्ञानाचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात आहे. खादी आणि हातमाग तंत्राचाही अभ्यासक्रम आहे. पदव्युत्तर विज्ञान विभागात ग्रामीण विकास, गृहशास्त्र विस्तार यासारखे विषय आहेत. 

डॉ. आरम यांच्यानंतर श्रीमती मिनोती बाईना भाषण करण्याची विनंती केली. त्यांचे भाषण म्हणजे मातृहृदयातला उमाळ्याचा एक वाहता झराच होता. नागरकोईल भागात हिंदू-ख्रिश्चनात दंगे झाले तेव्हा शांतिसेनेसह त्या त्या भागात गेल्या तेव्हा नागरकोईलचा नागालँड करायला निघाल्या आहेत असा विषारी प्रचार त्यांच्याविरुद्ध तथाकथित हिंदुत्वनिष्ठांनी केला, असे अत्यंत व्यथित होऊन सांगितले. त्या म्हणाल्या, शांततावाद्यांनी अग्निशामक दलाची भूमिका सोडून अशांततेची चाहुल लागताच धावून जायला शिकले पाहिजे. (अॅटिसिपेटिव्ह पीस) कोळ्यांचा झगडा कन्याकुमारी भागात पेटला तेव्हा याची तीव्रपणे जाणीव झाल्याचे त्यांनी सांगितले. एक माता म्हणून मी कळकळीने सांगते की, मानवधर्मं जागवा. माणसामाणसांत प्रेमस्नेहाचे वातावरण निर्माण न करू तर सर्वनाश ओढवेल. मने जोडण्याचे काम फार महत्वाचे आहे आणि धीराने ते करावे लागेल. त्यांची कळकळ शब्दाशब्दातून व्यक्त होत होती. आपल्या मुलांनी आपल्या मोलकरणीचाही आर्शिवाद कसा मागितला त्याची हृदयस्पर्शी हकीकत त्यांची सांगितली. गांधीग्राममध्ये गांधीजींच्या रक्षेवर एक गांधी स्तूप उभारलेला लेखा असून त्याचे वास्तुशिल्प अभिनव आहे. गांधीग्रामच्या स्थापनेच्या वेळी गांधीजींनी जो सदिच्छा संदेश पाठवला होता तो एका फलकावर कोरलेला आहे. ‘सक्सेस अटेंड्स व्हेअर ट्र्युथ रेन्स-जेथे सत्याचे राज्य असेल तिथे यश हमखास आहे, असे गांधीजींनी त्या संदेशात म्हटले आहे.

गांधी विचाराच्या संस्थांतील शांतता, स्वच्छता, टापटीप, गरीबांचा कनवाळा आणि त्यांची अखिल भारतीयता गांधीग्रामसारख्या जतन केली आहे, गांधी विचार साकार व्हावा म्हणून धडपडणारी अति जिवंत केन्द्र मोठया प्रमाणावर निर्माण झाली पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटले.

Tags: नियोजन समित्या ओहियो विद्यापीठ डॉ. आरम तिरुनेलवली . सोंदरम् रामचंद्रन यदुनाथ थत्ते भारत जोडो अभियान गांधीग्रामच्या ग्रामीण विद्यापीठ Planning Committee Ohio University Dr. Aram Tirunelveli . Sondaram Ramachandran Yadunath Thatte Bharat Jodo Abhiyan #Gandhigram's Rural University weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके