डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

श्रद्धांजली : झुंजार लढवैय्या काका देशमुख

भावजागरण दिंडीत औरंगाबादचाही समावेश होता. औरंगाबाद सोडल्यावर त्यांच्या आजाराची बातमी कळली. रुग्णालयात त्यांना भेटायला जाता आले नाही, याची रुखरुख वाटत राहिली आणि 15 मार्च 1983 रोजी त्यांचे निधन झाल्याची बातमी कळली! त्या मंतरलेल्या दिवसांची चित्रे डोळ्यांसमोर तरळली आणि साहसाने तेजाळलेला काकांचा ऐन तारुण्यातला चेहरा नजरेसमोर उभा राहिला. त्या काळात काकांनी जे जे केले ते चिरस्मरणीय राहील. त्यांच्या शोकमग्न कुटुंबियांचे हार्दिक सांत्वन.

श्री. काका देशमुख यांची गाठ चाळीसगाव तालुक्यात पातोंड्याच्या परिसरात झाली. हैदराबादच्या निजामाची टर्रेबाजी नाहीशी करून लोकेच्छेप्रमाणे हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सीमेलगत शिबिरे सुरू होती, अशाच एका शिबिरात ते भेटले. तारुण्याने मुसमुसलेला तो एक साहसी जवान होता. निजामाच्या राज्यात खोलवर शिरून ते सरकार खिळखिळे करण्याच्या योजनांत काका गुंतलेले होते. त्यांची मुलूखगिरी जोमाने चालू होती. त्याबाबतच्या मसलतीसाठीच ते शिबिर होते. खानदेशातही सेवादलाचा सर्व वेळ सेवक असल्याने अशा कार्याशी माझा निकट संबंध स्वाभाविकपणेच होता. हैदराबाद संस्थानातील नाक्यांवर हल्ले चढवून निझामच्या प्रशासनाचा आत्मविश्वास नाहीसा करणे आणि लोकांचा विश्वास वाढवणे, हे चळवळीचे मुख्य उद्दिष्ट होते. काका घोड्यावर बसण्यात वाकबगार तसेच नेमबाजीतही अग्रेसर. सेवा दलाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा. म्हसवडला भरलेल्या सेवादल शिबिरात त्यांनी एका रात्री लुटूपुटीच्या हल्ल्याचे जे प्रशिक्षण दिले ते अनुभवपूत आणि म्हणून फार रोमांचकारी होते. शिबिरातील तरुणांना त्यांनी मोहिनी घातली. 

हैदराबादची पोलिस कारवाई झटपट उरकता आली त्याला कारण काकांसारख्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेले वातावरण. पोलिस कारवाई संपली आणि काकांनी तालुक्यातल्या करंजखेडला सेवादलाचे एक शिबिर आयोजित केले. मी आणि दशरथ पाटील शिबिरासाठी गेलो. काकांनी आपल्या भागातील तरुण शिबिरासाठी गोळा केले होते आणि बाकीचीही जमवाजमव केली होती. निझामी सत्तेचे उरलेसुरले अवशेष निखंदून काढण्याचे प्रयत्न चालू होते. रझाकारांच्या अत्याचारांच्या कितीतरी कहाण्या शिबिरार्थी तरुणांकडून ऐकायला मिळाल्या. रक्ताचा घाम करून पिकवलेले सोन्यासारखे पीक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आले असताना रझाकार एकमेकांना म्हणत, 'ये खेत तो मैं लूंगा!' त्या जुलमाचा बदला घेण्याच्या कल्पनेने पेटलेले अनेक लोक न कचरता बंदुकांचा वापर करत! त्या भागात काकांचा दबदबा मोठा होता. 

'तरुणपणी समाजवादाचे काकांना स्वाभाविकच आकर्षण होते आणि त्यासाठी त्यांनी पुष्कळ खस्ताही खाल्ल्या. पुढे काका काँग्रेसमध्ये गेले. जुन्या मित्रांबद्दलचा जिव्हाळा मात्र कायम होता. कुठल्या तरी जातीच्या चौकटीत स्वतःला बसवल्याशिवाय जसा कोणी हिंदू बनू शकत नाही त्याप्रमाणेच कुठल्यातरी गटात सामील झाल्यावाचून काँग्रेसवाला होता येत नाही आणि गट आणि गोट सांभाळण्यासाठी नाही नाही त्या गोष्टी करण्याची पाळी येते! काकांवरही ही पाळी आली. अनेक सहकारी संस्थांत त्यांनी वर्चस्व मिळवले, आमदारकीही मिळवली पण त्या मामल्यांत काकांचे शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य त्यांना गमवावे लागले. मध्यंतरी काँग्रेसवाले झालेले काका भेटले, पण ओळखू येऊ नये इतका त्यांच्यात बदल झाला होता! त्यांनीच मला ओळखले आणि जुन्या सुहृदभावाने ते वागले. 

भावजागरण दिंडीत औरंगाबादचाही समावेश होता. औरंगाबाद सोडल्यावर त्यांच्या आजाराची बातमी कळली. रुग्णालयात त्यांना भेटायला जाता आले नाही, याची रुखरुख वाटत राहिली आणि 15 मार्च 1983 रोजी त्यांचे निधन झाल्याची बातमी कळली! त्या मंतरलेल्या दिवसांची चित्रे डोळ्यांसमोर तरळली आणि साहसाने तेजाळलेला काकांचा ऐन तारुण्यातला चेहरा नजरेसमोर उभा राहिला. त्या काळात काकांनी जे जे केले ते चिरस्मरणीय राहील. त्यांच्या शोकमग्न कुटुंबियांचे हार्दिक सांत्वन.

Tags: काँग्रेस. धैर्य रझाकार निझाम हैदराबाद काका देशमुख Congress. #यदुनाथ थत्ते Courage Razakar Nizam Hyderabad Kaka Deshmukh #Yadunath Thatte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके