डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अग्निकुंडात उगवलेला गुलाब : महादेवभाई देसाई

1942 च्या 'भारत छोड़ो' आंदोलनात गांधीजींना भेटीची संधीही न देता ‘भारत छोडो' ठरावाने बिथरून देशभर धरपकडीचे सत्र इंग्रज सरकारने सुरू केले. गांधीजींना त्यांच्या निकटवर्तीयांबरोवर 'आगाखान पॅलेस' मध्ये डांबण्यात आले. महादेवभाई देसाईही आगाखान पॅलेसमध्ये बंदी होते. तेथेच 15 ऑगस्ट 1942 रोजी त्यांचे निधन झाले!

महादेवभाई देसाई हे गांधीजींचे स्वीय सहायक होते. त्यांचे सुपुत्र एक नाणावलेले लेखक आणि संपूर्ण क्रांती विद्यालयाचे संचालक श्री. नारायण देसाई यांनी गुजराती भाषेत त्यांचे चरित्र लिहिले आहे. पुस्तकाची गुणवत्ता जाणून गुजराती भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ म्हणून साहित्य अकादमीने पुस्तकाला पुरस्कारही दिला आहे. नारायण भाईंनी चिकाटीने केलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे डबल क्राऊन आकाराच्या सातशेवर पृष्ठांचा हा ग्रंथ. ग्रंथाची तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती झटक्यात संपून गेली !

1942 च्या 'भारत छोड़ो' आंदोलनात गांधीजींना भेटीची संधीही न देता ‘भारत छोडो' ठरावाने बिथरून देशभर धरपकडीचे सत्र इंग्रज सरकारने सुरू केले. गांधीजींना त्यांच्या निकटवर्तीयांबरोवर 'आगाखान पॅलेस' मध्ये डांबण्यात आले. महादेवभाई देसाईही आगाखान पॅलेसमध्ये बंदी होते. तेथेच 15 ऑगस्ट 1942 रोजी त्यांचे निधन झाले! गांधीजींनी कुटुंबीयांना तारेने ही बातमी कळवली. लिहिले. "महादेवला योग्याचे आणि देशभक्ताचे मरण आले. त्याबद्दल वृथा शोक करू नये." पण ही तार कुटुंबीयांना बावीस दिवसांनी मिळाली! महादेवभाईंचा मुलगा नारायण आणि नारायणची आई दुर्गाबेन दोघेही तेव्हा सेवाग्राम आश्रमातच होते.

महादेवभाईंचा मृत देह गांधीजींच्या समोर होता. गांधीजी विव्हळ होऊन पुटपुटले, "महादेव ऊठ ऊठ बाबा !" पण त्याबद्दल नंतर विचारले तेव्हा ते डॉ. सुशीला नायरना म्हणाले, "त्यात विव्हळता नव्हती. त्याच्या मुळाशी श्रद्धा होती. महादेवने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले असते आणि मी म्हणालो असतो, महादेव उभा रहा, तर तो उभा राहिला असता! कारण तो कित्येक वर्षे माझ्या आज्ञेत होता. माझे शब्द त्याच्या कानी पडले असते तर मला खात्री होती की मृत्यूचा अव्हेर करून तो उभा राहिला असता!"

आपले अर्धे आयुष्य महादेवभाईंनी गांधीजींचे स्वीय सचीव म्हणून घालवले. 1915 साली अहमदाबादमध्ये गांधीजींचे पहिले दर्शन झाले आणि त्यांच्याबरोबर सगळे आयुष्य घालवावे असे त्यांना मनोमन वाटले. त्या वेळी महादेवभाईंचे वय केवळ तेवीस वर्षांचे होते. तेव्हापासून 1942 मध्ये आगाखान पैलेसमध्ये देहावसान होईपर्यंत ते गांधीजींच्या स्वीय सचिवाची भूमिका बजावत राहिले 1917 पासून त्यांनी रोजनिशी लिहायला सुरुवात केली. गांधीजींबरोबर सर्व दिवस कामात घालवून नंतर दैनंदिनीत दिवसभराच्या सर्व गोष्टींची नोंद करायची, हे एक तपच होते. महादेवभाईंची ही दैनंदिनी म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासच आहे. ती राष्ट्रीय संपत्ती आहे. गांधीजी म्हणजे धगधगते अग्निकुंड होते. पण त्या अग्निकुंडातूनच महादेवभाईंच्या जीवनाचा गुलाब फुलला होता. महादेवभाईंच्या निधनानंतर गुजरातचे लोककवी झवेरचंद मेघाणी यांनी जो लेख लिहिला त्याला शीर्षक दिले 'अग्निकुंडमां उगेलुं गुलाब - अग्निकुंडात फुललेला गुलाब !' नारायणभाईंनी आपल्या वडिलांच्या ह्या बृहत् चरित्राला तेच यथार्थ नाव दिले आहे.

पुस्तकाची विभागणी स्मृती, प्रस्तुती, प्रीती, द्युती, आहुती अशी सहा भागांत नारायणभाईंनी केली आहे. महादेवभाईंची दुर्मिळ छायाचित्रे चाळीस पृष्ठांत छापली आहेत. महादेवभाई गुजराती, इंग्रजी, बंगाली भाषांचे जाणकार होते. 'नवजीवन' आणि 'हरिजन’ पत्रांतील त्यांचे लेख आणि गांधीजींचे लेख. लेखांखालची एम्. के. जी. आणि एम् डी. ही अक्षरे न वाचली तर ओळखणेही कठीण होत असे! गांधीजींच्या आत्मकथेचे इंग्रजी भाषांतर महोदवभाईंनी केले. त्यांच्या विचारांची खोली मोठी होती आणि साहित्याची अभिरुची अभिजात होती. गांधीजींचे स्वीय सहायक बनण्याची जोखीम त्यांनी पत्करलाी नसती तर ते गुजरातीतले श्रेष्ठ साहित्यिक ठरले असते. नारायणभाईंनी औपचारिक शिक्षण घेतले नाही. पण इतक्या महापुरुषांच्या संपर्कात ते आले की औपचारिक शिक्षणाच्या साऱ्या सीमा कुठल्या कुठे राहिल्या! आपल्या वडिलांकडून त्यांना फार मोलाचा सांस्कृतिक वारसा मिळाला. हे चरित्र हा त्याचाच परिपाक म्हणावा लागेल. 

वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमादपि' असे महापुरुषांचे वर्णन केले जाते. महादेवभाईंची समाधी आपल्या हातांनी गांधीजींनी बांधली आणि आगाखान महालात असेपर्यंत ते रोज त्या समाधीला फुले वाहत, इतकी मनाची कोवळीक गांधीजींजवळ होती. पण हेच गांधीजी जगन्नाथपुरीच्या, हरिजनांना प्रवेश नसणाऱ्या मंदिरात महादेवभाई गेले म्हणून इतके कठोर झाले की महादेवभाई या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून गांधीजींना सोडून आपल्या दिहेण या खेड्यात जाऊन शेती करायचा विचार करू लागले! पण नारायणभाई आणि त्यांची आई यांना गांधीजींना सोडून जाण्याची ही कल्पनाच असह्य वाटली. महादेवभाईंच्या त्या विचाराच्या संदर्भातली गांधीजींची प्रतिक्रियाही विलक्षण होती.

गांधीजींच्या जीवनाइतके नाट्य फारच थोड्या नेत्यांच्या जीवनात पाहायला मिळते. ह्या जीवननाट्यात सहभागी होणे हे महाकठीण असे कर्म होते. महादेवभाईंना थोडीथोडकी नव्हे तर दोन तपे त्या नाटकात सहभागी व्हावे लागले. नारायणभाईंनी लिहिलेल्या ह्या चरित्रात त्याची झलक पाहायला मिळते. नारायणभाईंनी हे चरित्र लिहिताना उपलब्ध होणाऱ्या सर्व साधनांचा उपयोग केला आहे आणि त्याची नोंद प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी केलेली आहे. अशा बृहत् ग्रंथाला नामसूची व विषयसूची देणे आवश्यक व उपयुक्त असते. तशा दोन्ही सूच्या शेवटी दिल्याने आवश्यक ते संदर्भ सहज मिळतात आणि संदर्भानुसार निवडक वाचनही करता येते. हे काम तसे जिकिरीचेच आहे.

गांधीजींची शतकोत्तर रजत-जयंती साजरी होत असताना महादेवभाईंचे असे बृहत् चरित्र प्रसिद्ध व्हावे हा एक विलक्षण योग आहे. महादेवभाईंचे जीवन चरित्र हे अप्रत्यक्ष असे गांधीजींचे चरित्रच आहे. अशा महत्त्वाच्या पुस्तकाचे सर्व भारतीय भाषांत भाषांतर लौकर व्हावे, यासाठी साहित्य अकादमीने पुढाकार घेतला पाहिजे.

अग्निकुंडमां उगेलुं गुलाब
लेखक  : नारायण देसाई
प्रकाशक : महादेव देसाई जन्म शताब्दी समिती,
गुजरात, हरिजन आश्रम, अहमदाबाद - 28.
किंमत : रु. 50/-

Tags: ग्रंथ परिचय पुस्तक परीक्षण चरित्र गांधीजी महात्मा गांधी नारायण देसाई नारायणभाई Biography Books Gandhiji Mahatma Gandhi #Narayan Desai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके