डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आंतरभारतीच्या सूसन बी. अँथनी पुरस्काराच्या मानकरी : शांताताई नागजीभाई

बत्तीस वर्षांच्या तपस्येमुळे सुरेंद्रनगरच्या सार्वजनिक जीवनात शांताताईंना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या ध्रुव बालाश्रमाचा आता डौलदार वटवृक्ष झाला आहे. सुरेंद्रनगरचे सांस्कृतिक, शैक्षणिक जीवन त्यांनी संपन्न केले आहे. धडाडीची एक स्त्री आपल्या जिद्दीने किती आणि काय करू शकते, त्याचे एक उदाहरणच त्यांनी घालून दिले आहे.

आंतरभारतीच्या 1989 सालच्या सूसन बी. अँथनी पुरस्कारासाठी गुजरातमधील सुरेंद्रनगरच्या शांताताई नागजीभाई देसाई यांची निवड जाहीर झाली, तेव्हा लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. कारण हे नावच गंगाजमनी वाटते. 'ताई' शब्दामुळे त्या मराठी असाव्यात असे वाटते. पण नागजीभाई हे नाव गुजराती वाटते. शांताताईंचे जीवन असे खरोखरच विलक्षण आहे! ज्यांच्या वात्सल्याचा परीघ रक्तसंबंधांपलीकडे पोचलेला असतो, अशांचीच निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. 

सूसन बी. अँथनी ही जागतिक कीर्तीची एक महिला होती. स्त्रियांचा आणि रंगभेदामुळे छळवाद होणाऱ्यांचा उमाळा या स्त्रीला वाटत होता आणि त्यासाठी शांततामय मार्गाने तिने सतत संघर्ष केला. अमेरिकन स्त्रीला नागरिक म्हणून मताधिकार मिळावा म्हणून ही बाई धडपड करीत राहिली आणि तिने जगाचा निरोप घेतल्यावर अमेरिकन स्त्रियांना तो हक्क मिळाला! सूसनने स्वतःचा संसार उभा केला नाही, पण जगातल्या स्त्रियांचे संसार सावरण्यासाठी आपले सारे कर्तृत्व पणाला लावले. तिचे वात्सल्य रक्तसंबंधाने तर मर्यादित झालेले नव्हतेच, पण ते जाति-धर्म-वंश-भाषा-यौन अशा कोणत्याही कारणांनी मर्यादित झालेले नव्हते. शांताताईंचे जीवन याच प्रकारचे असल्याने या पुरस्कारासाठी या वर्षी त्यांची निवड करण्यात आली. 

शांताताईंचा जन्म 10 जानेवारी, 1936 रोजी राजस्थानातील एका सनातनी जैन कुटुंबात झाला. शिक्षणासाठी त्यांना वर्ध्याच्या महिलाश्रमात ठेवले. हा महिलाश्रम गांधी-विनोबा-जमनालाल बजाज यांच्या विचारांनी अनुप्राणित झालेला आहे. त्यामुळे 'शांताताई' हेच त्यांचे नाव रूढ झाले. वर्ध्यानंतर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागात त्यांना ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या सान्निध्यात काम करायची संधी मिळाली. अंत्योदय हा त्यांच्या जीवनाचा ध्रुवतारा बनला.

ताराबाई आणि अनुताई यांना भावनगरच्या दक्षिणामूर्ति संस्थेकडून कार्याची प्रेरणा मिळाली. बालसेवेत कृतार्थता अनुभवणारे गीजुभाई बधेका हे त्या संस्थेचे आधारस्तंभ होते. शांताताईंनी कोसबाड कडून आपला मोर्चा भावनगरकडे वळवला. तेथे गुजरातमधील भटक्या रबारी जमातीचे एक तरुण, नागजीभाई शिक्षणाच्या आशेने आले होते. खूप देशाटन केल्यामुळे ते या निष्कर्षाप्रत आले होते की शिक्षणावाचून तरणोपाय नाही. शिकण्याची त्यांना प्रचंड उत्कंठा लागून राहिली होती आणि त्यासाठी धडपड करत ते भावनगरला पोचले होते. शांताताईंना त्यांच्या धडपडीचे आश्चर्य आणि कुतूहल वाटले. त्यांनी एक दिवस भाबडेपणाने शांताताईंना विचारले, "तुम्ही मला शिकायला मदत कराल?” शांताताईंनी सागितले, “तुम्हाला शिकण्याची संधी मिळावी म्हणून मी जरूर मदत करीन. तुमची तळमळ तुम्हांला यश मिळवून देईल.” 

दोघांना कालांतराने वाटले, आपण परस्परांचे जीवनसाथी बनू शकतो. आनंदाने जीवन घालवू शकतो! पण अशा विवाहाला दोन्ही कुटुंबांचा प्रखर विरोध! माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पाहावे, अशी शिकवण अंगी बाणलेल्या शांताताईंना त्या विरोधाचे कारण समजेना! घरच्या लोकांचा प्रखर विरोध असला तरी भावनगरच्या दक्षिणामूर्ति संस्थेचे नानाभाई व त्यांचे सहकारी यांचा त्यांना पाठिंबा होता. त्या बळावर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडले. लग्नानंतर नागजीभाई शिक्षणासाठी भावनगरला आणि शांताताई सुरेंद्रनगरला नोकरीसाठी, अशी स्थिती झाली!

दोन्ही जमातीतले लोक या लग्नामुळे भडकले होते. त्यांच्या जिवाला त्यामुळे धोका निर्माण झाला होता. शांताताईंशी असलेले संबंध माहेरच्यांनी तोडून टाकले, एवढेच नव्हे तर त्यांच्या रागाला पारावार उरला नाही. शेवटी भावनगरच्या संस्थेने शांताताईंना आपल्या संस्थेत सामावून घेऊन त्यांचा पोटापाण्याचा व संरक्षणाचा प्रश्न सोडवला. शांताताई व नागजीभाईंच्या मनात आले की, आपला पोटापाण्याचा प्रश्न, सुरक्षा आणि शिक्षण हा एक पैलू झाला, पण भटक्या जमातींच्या सेवेच्या हेतुने जे सहजीवन सुरू केले त्याचे काय? मग त्यांनी उत्तर गुजरातमध्ये ग्रामभारती संस्था काढण्याचे ठरविले. जवळ पैसा नसताना संस्था काढणे आणि चालवणे अवघड होते. पण भांडवलाची भरपाई शिक्षक व विद्यार्थी श्रमातून करत. रस्ता चढावाचा आणि काट्याकुट्यांनी भरलेला, प्रत्येक पावलागणिक दमछाक करणारा. त्यातून मग मतभेद निर्माण झाले. स्वतःच्या सुखसुविधांसाठी तडजोडी किती करायच्या? शांताताईंनी नागाजीभाईंची अस्वस्थता ओळखून त्यांना सांगितले, “तुम्ही चिंता करू नका, मोलमजुरी करून आपण पोट भरू. अंत्योदयासाठी आपण आपले सहजीवन समर्पित करायचे ठरवले आहे. वाटेल ते होवो, त्यापासून आपण तसूभरही ढळायचे नाही!"

ग्रामभारतीत पैसे मिळवण्याचा प्रश्नच नव्हता. कफल्लक अवस्थेत त्यांनी सुरेंद्रनगरकडे प्रस्थान केले. मुलाला नागजीभाईंच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले. शांताताई खूप आजारी झाल्या. सगळीच तारांबळ! संकटांचे वादळ सुटले होते, पण त्यांच्या स्नेहीजनांनी सांभाळून घेतले. बँकखात्यापेक्षा हे मित्रप्रेमाचे खातेच अधिक भरंवशाचे ठरले! एक दिवशी रात्री नागजीभाईंना रस्त्यात एक मूल थंडीने गारठलेले दिसले. त्या मुलाला का त्याच्या नशिबावर सोडून द्यायचे? ‘जया न कोणी, प्रभु मी त्याचा। तदर्थ हे हात, तदर्थ वाचा’ ही नागजीभाई आणि शांताताईची निष्ठा. देशात कोट्यवधी लोक असताना कोणा मुलाला निराधार का व्हावे लागावे? त्यांनी त्याला घरी आणले. अशा मुलांची भर पडत राहिली आणि त्यातून उभा राहिला ध्रुव बालाश्रम. अपंग मुलांनाही त्यांनी आपल्या परिवारात सामावून घेतले. 

बावीस वर्षे शांताताई माहेराला मुकल्या होत्या. त्यांनी माहेरचा दरवाजा कधी ठोठावला नाही, पण आपल्या लेकीचे विस्तारलेले मातृत्व पाहून माहेरचे दार सहजपणे किलकिले झाले! ध्रुव बालाश्रमाचा विस्तार होत गेला. लोक मदतीसाठी पुढे आले. बालाश्रम ही सुरेंद्रनगरमधलीच नव्हे तर सौराष्ट्रातली एक लोकांच्या विश्वासाला पात्र अशी महत्त्वाची संस्था बनली. बालाश्रम वसतिगृह, बालगृह, उद्योगशाळा, आरोग्य भवन, बालवाचनालय, अशा अनेक शाखा त्याला फुटल्या आणि एक डौलदार वृक्ष तयार झाला. 

बत्तीस वर्षांच्या तपस्येमुळे सुरेंद्रनगरच्या सार्वजनिक जीवनात शांताताईंना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. शांताताई समाजकल्याणाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. स्त्री प्रगती मंडळ, कुटुंब सल्ला केंद्र, पालक संघटना, सेविका ट्रस्ट, पुरवठा विभाग, महात्मा गांधी रुग्णालय, लोकविद्यालय, साहित्यसेविकांची शब्दलोक संस्था, अमृत महिला सहकारी राज्य समाजकल्याण मंडळ, परिवार कल्याण संस्था, महिला सुरक्षा संस्था अशा वीस-पंचवीस संस्थांच्या कामात शांताताई सहभागी आहेत. सुरेंद्रनगरचे सांस्कृतिक, शैक्षणिक जीवन त्यांनी संपन्न केले आहे. धडाडीची एक स्त्री आपल्या जिद्दीने किती आणि काय करू शकते, त्याचे एक उदाहरणच त्यांनी घालून दिले आहे. अशा कर्तबगार महिलेला ससून बी. अँथनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आंतरभारतीला स्वाभाविकच धन्यता वाटते. यंदाचा हा तेरावा पुरस्कार. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश या प्रदेशांतील भगिनींना आजवर पुरस्कार मिळाले आहेत.

Tags: यदुनाथ थत्ते बालाश्रम अंत्योदय सुरेंद्रनगर शांताताई नागजीभाई balashram antyoday surendranagar shantatai nagjibhai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके