डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाठशाळेकडून लोकशाळेकडे (जनसामान्यांच्या विज्ञानासाठी)

अंतराळ, अण्वस्त्र, संरक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी अभिमानास्पद कामगिरी केली असली तरी अद्यापही समाजातील फार मोठा वर्ग पायाभूत सुविधांना वंचित आहे. गलिच्छ शहरे, रस्ते, वस्त्या, अस्वच्छ पाणी, धार्मिक वाद, गुन्हेगारीचे प्रमाण- अशा गंभीर समस्यांचे काय? तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही इंडिया विरुद्ध भारत असा झगडा चालू आहे. ‘शेतकऱ्यांचे बरेवाईट आम्हांलाच समजते,’ हा वरच्या वर्गाचा अहंकार आहे. केवळ तंत्रज्ञानाची ही प्रगती 'भारताला' उपयोगी पडणारी नाही. यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार अभ्यासक्रमात बदल करायला हवा.

गेल्या काही दशकांत अंतराळ, आण्विक, संरक्षण व शेती या क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांनी भरपूर व अभिमानास्पद कामगिरी केलेली असली तरी आपण तेवढ्यावर आत्मसंतुष्ट राहून भागणार नाही. स्वातंत्र्याच्या वेळी आपण जी स्वप्ने पाहिली त्यांच्या जवळपासही आपण पोहोचलेलो नाही हे कबूल केले पाहिजे. ‘आपण’ याचा अर्थ स्वातंत्र्य मिळाले त्या वेळची पिढी. अद्याप 50% लोकांनी शाळा पाहिली नाही. भयानक पर्यावरण समस्या, गलिच्छ शहरे, रस्ते, वस्त्या, अस्वच्छ पिण्याचे पाणी, सांडपाणी व संडासाचे प्रश्न. प्रादेशिक व धार्मिक वाद, भाषा व जातीचे प्रश्न, गुन्हेगारीचे प्रमाण, लोकसंख्येचा प्रश्न हे सर्व प्रश्न गंभीर समस्या म्हणून उभे आहेत.

सामान्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन 

आपल्या देशाबद्दल मी जे म्हणतो ते काही प्रमाणात जगातील इतर देशांनाही लागू आहे. आशिया व आफ्रिका खंडांतील देशातील लोक आपण क्षणभर बाजूला ठेवू. पण जे लोक चंद्रावर गेले, तंत्र व विज्ञान क्षेत्रात ज्यांनी आश्चर्यकारक शोध लावले त्यांचे काय? हे लोकसुद्धा यात मागे नाहीत. संहारक असे आपल्याकडे भरपूर साठवणारे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या निरपराधी जनतेवर बॉम्बहल्ला करते. कारण काय, तर दुसऱ्या राष्ट्राने संहारक अस्त्रांचा साठा आपल्या अध्यक्षाच्या राजवाड्यात लपवून ठेवला आहे. व्हिएतनामी जनतेवर बॉम्बचा वर्षाव करणारे लोक हेच आहेत. सर्व वस्तू मुबलक प्रमाणात मिळत असताना हे लोक असे का वागतात हे समजत नाही.

सखोल विचारमंथन, भव्य स्वप्ने पाहणारी दृष्टी, नवनिर्मितीचा ध्यास इत्यादी हे सर्व मी समजतो. मग सामान्य माणूस, कामगार, शेतकरी, अश्राप मुलेमुली, वृद्ध यांच्या प्रश्नांबाबत हे सर्व उदासीन का? शास्त्र व तंत्रज्ञानाच्या प्रगतीने तर करुणेपासून आपल्याला दूर नेले नाही ना? प्रत्येक देशातील शास्त्रज्ञांची व तंत्रज्ञांची संख्या मूठभर असते. हे लोक त्यांच्याच कामात इतके व्यग्र असतात की समाजातील इतर सामान्य प्रश्नांकडे लक्ष घालण्यास त्यांना वेळ नसतो.

नैतिक मूल्यांबाबत हे लोक निष्क्रिय असतात. शास्त्रज्ञांनी लावलेला शोध, आपले स्वतःचे ज्ञान, वाचन, अभ्यास यातच ते इतके मश्गूल असतात की आपला वारसा ते विसरतात. ह्या हजारो वर्षांच्या वारशामधून आपले पालनपोषण झाले, यातूनच कलानिर्मिती झाली. आपले संगीत, वाङ्मय, गीत, नृत्ये ही याच वारशातून मिळालेली आहेत. भारताला 'भारत' म्हणतात. कारण ही हजारो वर्षांची अनामिक परंपरा यामागे उभी आहे. पिढ्यान्पिढ्या आलेली ही संपत्ती आहे. आपले महान ग्रंथ घेतले तरी ते एका व्यक्तीने लिहिलेले नाहीत तर ज्याने प्रथम सुरुवात केली त्यात नंतरच्या महान ग्रंथकारांनी भर टाकून अशा ग्रंथांचे सौंदर्य वाढवले. भारतीय तत्त्वज्ञान व महान ग्रंथांमागे हजारो वर्षांची परंपरा आहे. ती आपल्या रक्तात मुरलेली आहे.
 
ग्रामीण निर्मितिक्षमतेचा विचार नाही

आपण जेव्हा आपल्या शैक्षणिक संस्था उभ्या करून शैक्षणिक पद्धती ठरवली, वैज्ञानिक संस्था उभ्या केल्या तेव्हा ग्रामीण निर्मितिक्षमता व ग्रामीण शहाणपण यांचा आपण विचारच केला नाही. आपल्याला असे वाटले की सामाजिक शहाणपणापेक्षा वातानुकूलित संस्थांमधून होणारी निर्मिती व शोध याचीच देशाला जरूर आहे. मग आपले अभ्यासक्रम परदेशांतील वैज्ञानिक संस्थेच्या आधारावर ठरविण्यात आले किंवा येथील उच्च वर्गास सोयीस्कर असे ठरविण्यात आले.

आजूबाजूच्या सामाजिक वातावरणात पूरक ठरणाऱ्या अभ्यासक्रमांचा विचार झाला नाही. येथील वैज्ञानिक संस्थांनी समाजात असलेले शहाणपण गृहीत धरले नाही. यामुळे आपल्या देशातील शैक्षणिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान या संस्थांमध्ये समाजाबद्दल आपुलकी राहिली नाही. त्यात नीरसपणा आला. शिक्षणाबद्दल सामान्य माणसांत तिरस्कार निर्माण झाला. शिक्षणामुळे समाजाशी दुरावलेपणा येतो असा समज दृढ झाला. उपग्रह तयार करणे, तो अवकाशात सोडणे किंवा लेखनिक तयार करणे यासाठी शिक्षणाचा उपयोग होऊ लागला.

नवीन योजनांची आव्हाने पेलत असताना अगदी अलीकडे या उणिवांची जाणीव आपल्या संस्थांना होऊ लागली आहे असे मला जाणवू लागले आहे. शास्त्रज्ञ आता प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करतात. पण ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणे शास्त्र सामान्य माणसाला समजावून न सांगता शास्त्राची फक्त महती गातात. समाजाकडून शहाणपण शिकण्याची त्यांची तयारी नसते. समाजाशी बांधिलकी वाढविण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत. सोपे प्रश्न कठीण होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. सामान्य माणसांचे सोपे प्रश्न व त्याची उत्तरे वातानुकूलित प्रयोगशाळेत बसून सापडणार नाहीत. उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल. म्हणून मी काही उदाहरणे देतो. प्रस्थापित शास्त्रज्ञ याकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना हे प्रश्न सामान्य वाटतात. एम्.फिल. किंवा पीएच.डी.साठी याचा उपयोग नसतो.

तंत्रज्ञानातही ‘इंडिया विरुद्ध भारत

पंजाबमधील एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. आपल्या शेतीला डिझेल पंपाच्या साहाय्याने पाणी देऊन निवांत बसला होता. पंप चार तास चालू होता म्हणून त्याने पंपाला विश्रांती दिली होती. पंपाबद्दल त्याला प्रेम वाटत होते. पंप बिघडला तर तो स्वतः दुरुस्त करी. त्याचा 10 वर्षांचा मुलगासुद्धा पंपदुरुस्ती करीत असे. विश्रांती घेत असताना शेतकऱ्याच्या मनात विचार आला की सैन्याने वापरलेल्या व मोडीत निघालेल्या जीपला याचा काही उपयोग होईल का? त्याला खात्री वाटली की मी हे करू शकेन.

इतर शेतकऱ्यांनाही असा विचार सुचला असेल, पण त्यांनी पुढे काही केले नाही. याने मात्र सगळी जुळवाजुळव केली. एक जीप, लाकडी गाडी, चार टायर्स इत्यादी. यासाठी त्याला 40,000 रुपये खर्च आला. एका वेळेस 20 माणसे व म्हैस नेण्याची क्षमता असलेली गाडी तयार केली. तासाला 40 कि.मी. या वेगाने ही गाडी जात असे. दुरुस्तीला सोपी, शेतीसाठीही उपयोगी. हे पाहून इतर शेतकऱ्यांनी हाच प्रयोग केला. परंतु त्यात यश आले. काही शेतकरी यात तज्ज्ञ झाले.

'जुगाड' असे नामकरण करण्यात आले. वाहतूक नियंत्रण विभागाने जुगाडला मुख्य रस्त्यावर परवानगी नाकारली. पण संख्या वाढत आहे. हे लोण हरियाना व राजस्थानमधील शेतकऱ्यांत पसरले. मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला. खेड्यापाड्यांमधून टॅक्सीप्रमाणे या जीप्स धावत आहेत. राजस्थानमधील शेतकऱ्यांबरोबर मी बोललो. त्यांना जुगाडची संपूर्ण माहिती झाली आहे. ते खुशीत होते व जुगाडबद्दल अभिमानाने बोलत होते. वाहतूक नियंत्रण विभागाचे नियम मी समजू शकतो, पण ट्रॅक्टर, ट्रेलर व जुगाड यांत जुगाडपासून जास्त धोका आहे असे कोणी सिद्ध केलेले नाही. जुगाडची जाहिरातबाजी कोणी केली नाही. पण त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. याचा अर्थ ग्रामीण गरजा भागविण्याची क्षमता या वाहनात आहे.

माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजने याची दखल घेतलेली नाही. मी स्वतः गेली दोन वर्षे यासाठी कॉलेजबरोबर संपर्क साधून विनंती केली आहे. पण उपयोग झाला नाही. या क्षेत्रातले शिक्षित तज्ज्ञ जुगाडमध्ये चांगली सुधारणा करू शकतील, वेग व सुरक्षितता वाढवतील, या बाबत मी संबंधित क्षेत्राच्या उद्योगपतींबरोबर बोललो. त्यांची प्रतिक्रिया जुगाड रस्त्यावर आणू नये अशी होती. उपयोगी वाहन असूनही सर्व जण दुर्लक्ष करतात. जाहिरातीशिवाय या वाहनाचा झालेल्या प्रचाराबद्दल या वर्गाला काहीच सोयरसुतक नाही. याचा अर्थ सामान्य शेतकऱ्याने तयार केलेले उत्पादन म्हणून ते टाकाऊ, आधुनिक नाही असे वरच्या वर्गाला वाटते. या वर्गाला असे वाटते की आमची परवानगी न घेता असे उत्पादन करणारे हे कोण? ‘शेतकऱ्यांचे बरेवाईट आम्हालांच समजते,’ हा यांचा अहंकार आहे. असे उत्पादन इंडियातील नियमास धरून नाही.

तीन वर्षांपूर्वी मी माझ्या कमिटी सभासदासह पतियाळाजवळील एका कृषी केन्द्राला भेट दिली. शेतकऱ्यांना शेतीबद्दलची सगळी माहिती या केन्द्राकडून दिली जाते. संस्था चांगले काम करीत असल्याचे आमच्या लक्षात आले. या भागातील शेतकरी वर्षातून चार पिके घेतात व शेती उत्पादनाबाबत ते चांगले माहीतगार आहेत हे आम्हांस माहीत होते. शेतकरी वर्गाकडून तुम्हांला नवीन कल्पना मिळतात का असा प्रश्न मी शास्त्रज्ञांना विचारला. त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. म्हणून मी त्यांना एखादे उदाहरण विचारले. त्याने सांगितले की, कृषी केन्द्रास नेहमी भेट देणाऱ्या एका शेतकऱ्याने चार पिकांशिवाय सूर्यफुलाची लागवड केली असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर मी त्याला मूर्खात काढले. कारण ही वेळ पक्ष्यांची धाड येण्याची आहे व पक्षी जर तुटून पडले तर सूर्यफुलाबरोबर त्याची हिरवीगार शेतीही नष्ट होणार होती. शेतकरी म्हणाला की मी काही मूर्ख नाही. संभाव्य संकटाची कल्पना मला आहे. म्हणूनच मी मधमाश्याही पाळल्या. या मधमाश्या सूर्यफुलाकडे जातात व त्यामुळे पक्षी येत नाहीत. या प्रयोगात मी यशस्वी झालो आहे. माश्यांच्या भीतीमुळे पक्षी येत नाहीत की माश्या हे पक्ष्यांचे भक्ष्य असल्याने पक्षी पिकाकडे दुर्लक्ष करतात, याचा उलगडा मला झालेला नाही, या सर्वांचा परिणाम म्हणजे शेतकरी चार पिके तर घेतोच, शिवाय 'सूर्यफूल व मध' हे ग्रामीण ज्ञान विद्यापीठ किंवा प्रयोगशाळेत मिळेल का? 

जनतेची शास्त्रीय चळवळ

अशी खूप उदाहरणे माझ्याजवळ आहेत, पण लेख वाढेल म्हणून मी हा मोह टाळतो. 'जनतेची शास्त्रीय चळवळ' यात मी स्वतःला बऱ्याच वर्षांपासून गुंतवून घेतले आहे. मी विद्यापीठ अनुदान मंडळाचा अध्यक्ष झालो त्याच्या आधीपासून एका विषयावर चर्चा चालू होती. तो विषय म्हणजे सर्व विद्यापीठांतील व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एक वर्षभर ग्रामीण भागात जावे व अशिक्षितांशी संपर्क साधावा, त्यांच्याकडून शिकावे व शिकवावे तसेच थोडीफार सामाजिक बांधिलकी घेऊन परत यावे, ग्रामीण भागाशी संपर्क वाढवावा. यातूनच MANAR (Mass Action for National Regeneration) कल्पना पुढे आली.

विद्यापीठ व ग्रामीण भाग जोडण्याचा आमचा प्रयत्न होता. या योजनेचा थोडा फायदा झाला. समाज बदलण्यात आपलाही हातभार लागला पाहिजे हे ते विसरले होते, पण विद्यापीठाचे संकुचित क्षेत्र सोडून ते जेव्हा मोठ्या ग्रामीण क्षेत्रात गेले तेव्हा प्रश्नांची त्यांना जाणीव झाली. त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. प्रश्नांची आंतरराष्ट्रीय उत्तरे येथे उपयोगाची नाहीत हे त्यांना समजले.

तज्ज्ञांनी शोधलेल्या उपायांचा समाजात उपयोग नाही म्हणून समाजाला दोष देणे चुकीचे आहे. म्हणून जर स्थानिक उपाय शोधावयाचे असतील तर समाजाच्या गरजा, सामाजिक प्रश्न व स्थानिक माहिती आणि शहाणपण समजून घेतलेच पाहिजे. ग्रामीण जनतेच्या सतत सान्निध्यात असणे, प्रश्न समजून घेणे, शिकणे व शिकविणे आणि ग्रामीण जनतेबद्दल कणव वाढवणे हेच महत्त्वाचे आहे. काही प्रयोग आम्ही चालू केले आहेत. अनेक स्वयंसेवकांचा एक जथा आम्ही तयार केला. अंदाजे 50,000 खेडयांना आम्ही भेटी दिल्या, शेकडो चर्चासत्रे घेतली, रस्ते बांधले, पाणी पुरवठ्याचे प्रश्न हाताळले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाची झालेली विभागणी - इंडिया व भारत - विद्यार्थ्यांच्या लक्षात आली. ग्रामीण भारताची दैन्यावस्था समजली. या सर्व प्रश्नांच्या मुळाशी असलेले कारण आमच्या लक्षात आले, ते म्हणजे शाळेच्या दप्तराचे ओझे. 

पाठशाळेकडून लोकशाळेकडे 

आपली मुले खूप काही शिकतात हे म्हणणे बरोबर नाही. आपण त्यांना पाठांतर शिकवतो. विषयाची समज देण्याची भावना यामागे नसते. शाळा म्हणजे मुलांच्या दृष्टीने जग आहे. ज्ञान दोन विभागांत मोडते. शाळेतले व जीवनातले. पण हे दोन विभाग एकमेकांना पूरक आहेत याचे भान आपल्याला झाले नाही. याचा परिणाम म्हणजे समाजापासून वेगळे राहण्याची वृत्ती. लहान मुलांची शाळेतली गळती यांमुळे होते व गळती न झालेली मुले समाजापासून दुरावतात. समाजापासून म्हणजे ‘इंडिया’पासून.

आपल्या शिक्षणपद्धतीत ही वृत्ती सतत चालू आहे. एका बाजूला उद्योगाशी आपला संबंध नाही, तर दुसरीकडे पारंपरिक कलाकौशल्याशी सोयरसुतक नाही. आपल्या देशातील चांगल्या इंजिनियर्सना देशाच्या वातावरणापेक्षा बाहेरच्या जगाबद्दल आपुलकी व ते तिथे मोकळेपणाने वागतात. देशातील आव्हाने त्यांना क:पदार्थ वाटतात. या परिस्थितीत बदल केल्याशिवाय शास्त्र व तंत्रज्ञानाची प्रगती ‘भारता’ला उपयोगी पडणार नाही. त्यासाठी अभ्यासक्रमाचे स्वरूप स्थानिक परिस्थितीनुसार बदलले पाहिजे, सुधारणा केली पाहिजे. याप्रमाणे आपण बदल केले तर कलेची निर्मिती चांगल्या प्रकारे होईल.

‘लेखनिक वर्ग निर्माण करणारी शिक्षणपद्धती’ हा जो शिक्का बसला आहे व अजूनही त्याच प्रकारे शिक्षण चालू आहे हे बदलले पाहिजे. परीक्षा हे साध्य झाले आहे. याऐवजी परीक्षा म्हणजे चांगले शिक्षण मिळणे. योग्य कामासाठी योग्य तरुण निर्माण करणे यासाठी साधन झाले पाहिजे. या लेखात मी जे विचार मांडले त्या धर्तीवर विचार केल्यास आपल्या देशातील प्रश्न सध्याच्या शिक्षणपद्धतीमुळे निर्माण झाल्याचे दिसून येईल. हे बदलले पाहिजे. 'मनार' व आमचा गट यांमधील माझे मित्र व सहकारी 'लोकशाळा' कार्यक्रम राबवतात. यात आमची घोषणा आहे ‘पाठशाळेकडून लोकशाळेकडे’

(अनुवाद : कृ. रा. लंके)

(सौजन्य : 'करंट सायन्स', 10 जानेवारी 99)

Tags: मनार अनुभवातून ज्ञान पुस्तकी ज्ञान ‘पाठशाळेकडून लोकशाळेकडे’ सामाजिक manar knowledge through experience book knowledge from local school to people's school social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके