डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सत्तेच्या राजकारणात आपले स्थान टिकवावयाचे असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. विशाल द्विभाषिकाच्या नेतृत्वाच्या लढाईत जे आपल्याबरोबर नव्हते त्यांना यशवंतरावांनी मंत्रिमंडळात घेतलेच नाही. याचे तळवलकरांनी नमूद केलेले कारण (मंत्रिमंडळात एकोपा असावा) हे खरे आहे; पण त्याचबरोबर राजकारणात धोका पत्करणे नको असते हेही असले पाहिजे. यशवंतरावांच्या राजकारणाबद्दल आणखीही एका आक्षेपाची चर्चा तळवलकरांनी केली आहे. तो म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांतील मराठा समाजातले अनेक कार्यकर्ते आपले पक्ष सोडून या काळात काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी ताबडतोबीची प्रलोभने दाखवली गेली असे म्हणता येणार नाही हे तळवलकरांनी सोदाहरण दाखवले आहे. परंतु सत्ता राबवण्याची संधी बहुजन समाजाला उपलब्ध असताना विरोधी पक्षात कशाला राहावयाचे असे वातावरण त्या काळी महाराष्ट्रात निर्माण झाले होते हे नाकारता येणार नाही.  

 

राजकारणी व्यक्तीचे, त्यातही दीर्घकाळ सत्तेत असणाराचे चरित्र लिहिणे ही एक तारेवरची कसरत असते. काही चरित्रकार चरित्रनायकाच्या गुणवर्णनाच्या अतिरेकाने चरित्रग्रंथाला बखरीची कळा आणतात तर काही आपल्या मनातील पूर्वग्रहामुळे चरित्र रंगवण्यासाठी प्रयोजन नसतानाही काळा रंग जादाच वापरतात.

चरित्रलेखनाला आवश्यक असलेली तटस्थता आणि चरित्रविषयाकडे त्रयस्थपणे पाहण्याची शक्ती दोन्ही ज्यांच्याजवळ आहे असे चरित्र लेखक फार कमी असतात.

दुसरी अडचण असते ती अशी की राजकारणातल्या उच्चस्थानी असलेल्या नेत्याच्या मनाचा ठाव ज्यामुळे थोडाफार लागू शकतो अशी जवळीक असण्याची संधी फार कमी लोकांना उपलब्ध होते. सत्तेमध्ये जे सहकारी असतात किंवा जे आपले शासकीय कर्तव्य म्हणून अशा नेत्याचे साहाय्यक असतात अशांजवळ त्या नेत्याचे व्यक्तित्व जोखण्याची शक्ती असतेच असे नाही.

योग असा की यशवंतरावांना राम प्रधानांसारखे शासकीय साहाय्यक मिळू शकले आणि सार्वजनिक जीवनात ज्यांनी यशवंतरावांबद्दल स्नेह बाळगला पण आपल्या जवळिकीचा लाभ घेण्याची कल्पनाही ज्यांना शिवली नाही आणि आपल्या वस्तुनिष्ठतेचे व्रत सांभाळण्यासाठी सत्तेच्या लाभवर्तुळाच्या बाहेर राहणेच ज्यांनी पसंत केले असे गोविंदरावांसारखे काही मित्र यशवंतरावांना मिळाले.

1946 सालच्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत यशवंतराव काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले व स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात संसदीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1946 पासून जवळजवळ पन्नास वर्षे या ना त्या रूपात यशवंतराव सत्तेमध्ये होते.

स्वातंत्र्यानंतरची ही पन्नास वर्षे देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात घडी बसवणारी म्हणून महत्त्वाची होती. ज्यांना या प्रक्रियेत दीर्घकाळ राहता आले आणि काही ठसा उमटवता आला त्यांपैकी यशवंतराव हे एक महत्त्वाचे नेते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गोविंद तळवलकरांनी ‘यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व’ या नावाचे एक चरित्र लिहिले आहे. मौज प्रकाशन गृहाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे.

मराठीतील एक व्यासंगी, बहुश्रुत आणि रोखठोक पत्रकार म्हणून गोविंद तळवलकर ओळखले जातात. तळवलकरांच्या संपादनकाळातला ‘महाराष्ट्र टाइम्स’ हा ज्ञानाविषयी आस्था बाळगणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा आरसा मानला जाई.

आपल्या व्यवसायाचा एक भाग म्हणून पत्रकाराचा राजकारण्यांशी थोडाफार संबंध येतोच. हा संबंध कायम राखावयाचा पण ते नाते बरोबरीचे ठेवावयाचे, त्याला दाता आणि याचक असे स्वरूप कधीही येऊ द्यावयाचे नाही हा दंडक त्या काळात काही मराठी पत्रकारांनी पाळला आणि सत्तेवर आपला नैतिक अंकुश कायम ठेवला. तळवलकर हे अशा पत्रकारांपैकी एक होते.

यशवंतराव चव्हाण आणि गोविंदराव तळवलकर यांचा पत्रव्यवहारही थोडाफार उपलब्ध आहे. त्यावरून त्यांचे हे मित्रत्वाचे एकमेकांचा आदर राखणारे नाते स्पष्ट होते. निर्भीडपणे आपण सल्ला द्यावा पण तो मानावयाचा की नाही हे सर्वस्वी त्या राजकीय नेत्यावर सोडून द्यावे हे पथ्य गोविंद तळवलकरांनी पाळले आहे. यशवंतरावांना जवळून पाहण्याची, त्यांच्याशी अनेक बाबतींत चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली. या सर्व गोष्टींमुळे तळवलकरांनी लिहिलेले यशवंतरावाचे चरित्र हा वाचकांच्या कुतूहलाचा विषय होणे स्वाभाविक आहे.

तळवलकरांची भूमिका ‘त्यांचीही एक बाजू असू शकते’ हे लक्षात ठेवून वेगवेगळ्या वेळी यशवंतरावांनी घेतलेल्या भूमिका समजून घेण्याची आहे. यशवंतरावांसारख्या राजकीय इतिहास घडविणाऱ्या नेत्याचे चरित्र हे त्या कालखंडाचे, विशेषतः त्यातील राजकीय इतिहासाचे चरित्र असते. चरित्रनायकाच्या सार्वजनिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा किंवा त्याने विशिष्ट वेळी घेतलेल्या भूमिकांचा अन्वयार्थ भोवतालच्या राजकीय परिस्थितीच्या आणि इतर घटकांच्या जोडीने समजून घ्यावा लागतो आणि नंतर त्याच्या भूमिकेची योग्यायोग्यता ठरवावी लागते.

भारतीय आणि जागतिक राजकारण त्याचबरोबर महत्त्वाच्या सांस्कृतिक घडामोडी याबद्दलची तळवलकरांची जाण आणि त्यांचा व्यासंग या चरित्रलेखनाला उपयोगी पडला आहे. यशवंतरावांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे हेही या चरित्रग्रंथांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

राज्य आणि देशपातळीवर नेतृत्वाची संधी यशवंतरावांना स्वातंत्र्यानंतर उपलब्ध झाली असली तरी त्यांचे व्यक्तित्व स्वातंत्र्यपूर्व काळात घडत होते. 1931 साली कराची काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून आणि मॅट्रिकच्या वर्गात असतानाच 1932 साली त्यांना 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली, तेव्हापासून प्रत्यक्ष कृतिशील राजकारणाशी यशवंतराव जोडले गेले होते.

स्वातंत्र्यलढा ही एका दृष्टीने मूल्यशिक्षणाची एक शाळा होती. तुरुंगात आचार्य स.ज. भागवत, ह. रा. महाजनी अशा अनेकांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला. एकीकडे राजकीय विचारप्रवाहांची यशवंतरावांना ओळख होत होती तर दुसरीकडे जीवनाच्या अनेक क्षेत्रांत बहुजन समाजाला योग्य स्थान नसल्याची जाणीवही होत होती.

समाजवादी नेते आणि रॉयवादी मंडळी या दोन्हींच्या संपर्कात ते आले होते. बहुजन समाजातील प्रतिनिधी विधिमंडळात गेला पाहिजे असा आग्रह यशवंतराव आणि त्यांच्या मित्रांनी धरला आणि काँग्रेसने आत्मारामबापू पाटलांना तिकीट दिले व त्यांना यशही मिळाले. राजकारणातही सामाजिक दृष्टी ठेवता येते याचा हा पहिला धडा होता.

पुढे बेचाळीसच्या चळवळीत ते सहभागी झाले. 1946च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बाळासाहेब खेरांनी त्यांना सांसदीय सचिव म्हणून नेण्याची तयारी दर्शविली. प्रारंभी यशवंतरावांनी या देकाराचा स्वीकार केला नाही; परंतु नंतर ती नेमणूक स्वीकारण्याचे ठरवले.

याच सुमाराला महाराष्ट्रात काँग्रेसमधून समाजवादी बाहेर पडले होते आणि बहुजन समाजातील काही कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला होता. काँग्रेसमध्ये बहुजन समाजाला आणण्याचा प्रयत्न केशवराव जेध्यांच्यापासून सुरू झाला होता. परंतु आता दोन पर्याय बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्यासमोर उपलब्ध झाले होते. एक तर बहुजन समाजाचे राजकारण करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षात सामील व्हावयाचे किंवा काँग्रेसमध्येच राहून संघटनेत बहुजन समाजाचा सहभाग वाढवावयाचा, परंतु त्याचबरोबर विवेक बाळगत सर्वांना बरोबर घेऊन जायचाही प्रयत्न करावयाचा.

30 मार्च 1948 रोजी काँग्रेसजनांच्या एका बैठकीत काँग्रेसमध्येच राहण्याचा आणि ‘लोकशाहीप्रधान राजकारणात, समाजकारणात आणि अर्थकारणात इष्ट बदल घडवून आणावयाचे’ असा निर्णय झाला. यशवंतराव चव्हाण या मेळाव्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांपैकी एक होते. जातिभेद फुलवण्याच्या प्रयत्नांना विरोध करावयाचा आणि काँग्रेसशी निष्ठावंत राहून संघटना मजबूत करावयाची ही उद्दिष्टेही या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितलेली आहेत.

एका अर्थाने या मेळाव्यात यशवंतरावांच्या पुढील जीवनातील राजकीय धोरणाचे एक महत्त्वाचे सूत्र ठरून गेले. संघटनेची चौकट सोडायची नाही आणि आपल्याला हवे ते बदल संघटनेच्या माध्यमानेच साध्य करवून घ्यावयाचे हे ते सूत्र होते. ज्या ज्या वेळी एखाद्या विशिष्ट तत्त्वासाठी संघटनेपेक्षा वेगळी भूमिका जाहीरपणे घ्यावयाची की संघटनेची शिस्त पाळत आत राहूनच त्या तत्त्वासाठी प्रयत्न करायचा हा प्रश्न निर्माण झाला त्या त्या वेळी यशवंतरावांनी संघटनेला प्राधान्य दिले आणि तिची शिस्त पाळण्यासाठी आपल्या मनाला थोडी मुरडही घातली.

काही वेळा भावनात्मक प्रश्न निर्माण झाले, लोकक्षोभही शिगेला पोहोचला; परंतु यशवंतरावांनी त्या काळी लोकप्रिय होऊ शकणारी भूमिका घेतली नाही आणि संघटनेचे धोरणच मान्य केले. त्यांच्या या धोरणाचा नंतर त्यांना राजकीय लाभ झाला; परंतु प्रत्यक्ष अशा भूमिका घेताना काही काळ अप्रिय व्हावे लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर काकासाहेब गाडगीळ, स्वामी रामानंद तीर्थ आणि यशवंतराव चव्हाण यांनी पक्षशिस्त पाळत लोकांची मागणी संघटनेच्या चौकटीत पुढे नेण्याचा आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला असे दिसते.

तळवलकरांनी या चरित्रात यशवंतरावांची पक्षाशी असलेली बांधिलकी व पक्षाच्या माध्यमातूनच मागणी मान्य करवून घेण्याची पद्धत अनेक उदाहरणांनी स्पष्ट केली आहे. एखाद्या प्रश्नासाठी सार्वजनिकरीत्या होणारी चळवळ ही जनमानसात मान्यता पावते.

संघटनेच्या माध्यमात विरोधी मत असलेल्या नेत्यांकडून आपल्याला हवे ते मान्य करवून घेणे हा अधिक अवघड आणि लोकांना त्या काळी तरी न समजू शकणारा मार्ग असतो. यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या मर्यादेत जे केले ते तळवलकरांनी योग्य रीतीने मांडले आहे.

यशवंतरावांचा स्वातंत्र्यानंतर लगेच सत्तेशी संबंध आला; परंतु राज्यपातळीवरचे एक नेते म्हणून त्यांना त्यानंतर चार-पाच वर्षांनी  मान्यता मिळाली. विशाल द्विभाषिकाचे नेतृत्व त्यांना मिळण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच काही योगायोगही उपयोगी पडले.

मोरारजी आणि भाऊसाहेब हिरे या उभयतांच्या स्वभावाचे कंगोरे माहीत असलेल्या यशवंतरावांना त्याचा लाभ मिळाला. राजकारण हे विविध योगायोगांनीसुद्धा माणसासमोर संधी उपलब्ध करून देते. त्या संधीला कसे सामोरे जायचे हे त्या व्यक्तीच्या राजकीय चतुरतेवर अवलंबून असते. या चातुर्यात अप्रामाणिक काही नसते.

प्रत्येक राजकीय पावलाला अनेक संदर्भ असतात व त्याचे अनेक परिणामही अपेक्षित असतात. शंकरराव देवांच्या नेतृत्वाविरुद्ध मनमोहन राजवाड्यात झालेले बंड हा जसा काँग्रेस संघटनेची महाराष्ट्रातील चौकट मजबूत राहावी यासाठी केलेला एक प्रयत्न होता; तसाच तो महाराष्ट्राचे नेतृत्व बहुजन समाजाच्या हाती असावे यासाठीसुद्धा अप्रत्यक्षरीत्या झालेला प्रयत्न होता.

लोकशाहीमध्ये बहुजन समाजाचे लोक सत्तेमध्ये यावेत, राज्यशकटाचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा करण्यात आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात चुकीचे काही नाही. लोकशाही यशस्वी व्हावयाची असेल तर बहुजन समाजाचा सत्तेधला सहभाग मोठा असलाच पाहिजे. यशवंतरावांनी यासाठी काही सूत्रे मनाशी बाळगली होती.

पहिले म्हणजे बहुजन समाजात सुशिक्षित आणि तरुण नेतृत्व निर्माण केले पाहिजे. अनेक ठिकाणच्या जुन्या नेत्यांना त्यांच्याबद्दल आदर दाखवीत पण बाजूला सरकवत नवे तरुण नेतृत्व निर्माण करण्याचा यशवंतरावांनी प्रयत्न केला. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांतून अशा तरुणांचे शिक्षण होईल ही अपेक्षा त्यांनी बाळगली.

थोडासा अनपेक्षित योगायोग असा झाला की महाराष्ट्राची निर्मिती 1960 मध्ये झाली, 1962 मध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या आणि पुढच्याच वर्षी यशवंतरावांना महाराष्ट्राचा निरोप घेऊन संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत जावे लागले. नेतृत्व निर्मितीच्या प्रयत्नातील यशवंतरावांचे सरळ मार्गदर्शन नंतर स्वाभाविकपणेच कमी झाले.

यशवंतरावांच्या राजकारणातले आणखी दोन महत्त्वाचे विशेष लक्षात घेतले पाहिजेत. हे राज्य एका जमातीचे राज्य होईल अशी शंका व्यक्त झाली तेव्हा तिचा प्रतिवाद त्यांनी स्पष्टपणे केला. हे राज्य सर्व जातीजमातींना बरोबर घेऊन जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.

त्यांच्या मनातल्या सुसंस्कृततेत रोगट आणि टोकाची जातीयता बसणे शक्य नव्हते. त्याचमुळे यशवंतरावांचा राज्यकारभार चालू असताना अनेक ठिकाणी विविध जातींची गुणवान माणसे आपल्याला दिसत. मागास जमातींच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेही दिसते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्यावर झालेल्या मूल्यसंस्कारांना विविध प्रकारच्या वैचारिक आणि ललित ग्रंथांच्या वाचनाने बळ दिले होते. त्यांच्या मनाची मूळचीच बैठक या विवेकपूर्ण विचारांना पोषक होती.

सत्तेच्या राजकारणात आपले स्थान टिकवावयाचे असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. विशाल द्विभाषिकाच्या नेतृत्वाच्या लढाईत जे आपल्याबरोबर नव्हते त्यांना यशवंतरावांनी मंत्रिमंडळात घेतलेच नाही. याचे तळवलकरांनी नमूद केलेले कारण (मंत्रिमंडळात एकोपा असावा) हे खरे आहे; पण त्याचबरोबर राजकारणात धोका पत्करणे नको असते हेही असले पाहिजे.

यशवंतरावांच्या राजकारणाबद्दल आणखीही एका आक्षेपाची चर्चा तळवलकरांनी केली आहे. तो म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांतील मराठा समाजातले अनेक कार्यकर्ते आपले पक्ष सोडून या काळात काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी ताबडतोबीची प्रलोभने दाखवली गेली असे म्हणता येणार नाही हे तळवलकरांनी सोदाहरण दाखवले आहे. परंतु सत्ता राबवण्याची संधी बहुजन समाजाला उपलब्ध असताना विरोधी पक्षात कशाला राहावयाचे असे वातावरण त्या काळी महाराष्ट्रात निर्माण झाले होते हे नाकारता येणार नाही.

जसे सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व बहुजन समाजाकडे हवे तसेच विरोधी पक्षाचे नेतृत्वही बहुजन समाजाकडे हवे. विरोधी पक्षात सत्तेशिवाय काही काळ राहण्याची सवय कार्यकर्त्यांना लागली पाहिजे असा आग्रह धरणारे महाराष्ट्रात कोणीच नव्हते. अर्थात विरोधी पक्ष बळकट करण्याची जबाबदारी यशवंतरावांची नव्हती हे मात्र खरे.

महाराष्ट्रात सहकारी चळवळीला जी शक्ती दिली ती यशवंतरावांनी आणि सत्तेच्या माध्यमातून. या चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची आर्थिक पुनर्रचना करावी, समृद्धी आणावी हा तर या चळवळीचा हेतू होताच; पण त्याचबरोबर ही चळवळ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणारी राजकीय शाळासुद्धा बनावी, लोकांसाठी काम करण्यातून त्यांचे नेतृत्व तयार व्हावे हाही तिचा एक उद्देश यशवंतरावांच्या मनात होता.

दुर्दैव असे झाले की या चळवळीतून काही सन्माननीय अपवाद वगळले तर पदाधिकाऱ्यांचे राजकीय महत्त्व आणि आर्थिक शक्ती वाढली. सामान्य सभासदांचा त्या मानाने फारसा फायदा झाला नाही. सहकार चळवळीला हे जे अनिष्ट वळण लागले त्या वेळी यशवंतरावांचा राज्याच्या सत्तेशी सरळ संबंध उरला नव्हता.

चिनी आक्रमणाचा अनपेक्षित धक्का बसल्यानंतर आणि प्रकृतीही उताराला लागल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना ज्यांची पाळेमुळे लोकांत रुजलेली आहेत अशा सहकाऱ्यांची गरज अधिक भासू लागली. यशवंतरावांची कार्यक्षमता, पक्षनिष्ठा आणि आपल्यावरसुद्धा असलेली निष्ठा नेहरूंना माहीत होती, म्हणून यशवंतरावांची निवड त्यांनी आपले सहकारी म्हणून केली आणि त्यांना दिल्लीला बोलावून घेतले.

दिल्लीचे राजकारण राज्याच्या राजकारणापेक्षा फारच गुंतागुंतीचे होते. देशभरातल्या विविध नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांच्यामागे उभ्या असलेल्या  विविध शक्ती या सर्वांचा विचार करूनच केंद्रीय नेतृत्वाला निर्णय घ्यावे लागत असत.

प्रारंभीच्या काळात विश्वासाच्या पायावर नेहरू आणि चव्हाण यांचे संबंध उभे राहिले; पण दिल्लीतील वर्षभराच्या कामातच आपले पंख छाटण्याचा काही प्रयत्न चालू आहे अशी चव्हाणांना शंका येऊ लागली. दोन वेळा तर त्यांना नेहरूंना भेटून राजीनाम्याची तयारीच दाखवावी लागली होती. या काळातल्या पेचप्रसंगांचे आणि यशवंतरावांच्या मानसिक अवस्थेचे अतिशय चांगले चित्रण राम प्रधानांच्या ‘वादळमाथा’मध्ये आहे.

यशवंतराव दिल्लीत गेले आणि राष्ट्रीय राजकारणाचा भाग बनले. तो काळ हा वेगाने घडणाऱ्या गुंतागुंतीच्या घटनांचा काळ होता. चिनी आक्रमण, त्यानंतर दोनच वर्षांनी नेहरूंचे निधन, पुढच्याच वर्षी पाकिस्तानबरोबर दोन वेळा युद्ध, याच काळात दोन वेळा पंतप्रधानपदासाठी झालेले संघर्ष, काँग्रेस पक्षाचे विभाजन, पक्षशिस्तीची सर्वांनीच लावलेली वाट आणि मते मिळवण्यासाठी आकर्षक घोषणा आणि चमकदार कार्यक्रम यांचा वापर करण्याचा राजकीय प्रघात, पंतप्रधानांची निवडणूक अवैध ठरताच घटना गुंडाळून टाकण्याचा झालेला प्रयत्न, सामान्य नागरिकांपासून केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्वांचीच झालेली मुस्कटदाबी आणि आणीबाणी अशा अनेक वादळी घटनांनी भरलेला हा काळ होता.

या सगळ्या राजकीय नाट्यात कोणती तरी भूमिका- वाट्याला आलेली अगर स्वतः निवडलेली- करणे यशवंतरावांना भाग होते. ज्याबद्दल वाद होऊ शकत होता त्या विषयाबद्दल भूमिका घेताना यशवंतरावांच्या राजकीय मूल्यदृष्टीचा आणि स्वभावाचा कस लागणे अपरिहार्य होते.

आणीबाणी जाहीर झाली तेव्हाच्या आणि खुद्द आणीबाणीत यशवंतरावांच्या क्रियाप्रतिक्रियांच्याबद्दल तळवलकरांनी फारसे काही लिहिलेले नाही. त्याबद्दल त्यांनी काही लिहावे अशी वाचकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे.

हे खरे की पक्षाविरुद्ध अगर नेत्याविरुद्ध बंड करणे ही यशवंतरावांची मानसिकताच नव्हती. स्वतः एसेएमनीच सांगितलेली एक गोष्ट मला आठवते. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी इंदिरा गांधींनी तामीळनाडूमधले द्रमुकचे सरकार बरखास्त केले.

एसेएमचा सल्ला असा होता की तामीळनाडूचे सरकार बरखास्त केल्याचा निषेध म्हणून यशवंतरावांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व सरळ कराडला येऊन राहावे. त्यांच्या अशा कृतीमुळे देशातल्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना एक नवा संदेश जाईल आणि यशवंतरावांचे नेतृत्वही देशव्यापी होण्याला मदत होईल. यशवंतरावांनी अर्थात असे काही केले नाही.

पुढे जनता राजवटीच्या शेवटच्या काळात यशवंतरावांनी पक्ष सोडला, मोरारजींचे सरकार कोसळल्यानंतर चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधानपद स्वीकारले आणि नंतर पुन्हा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, या तीनही निर्णयांबद्दल त्यांच्या मित्रांनाही आश्चर्य वाटले. काही निकटवर्तीयांनी त्यांना अशी पावले उचलू नका असा सल्लाही दिला होता. (त्यात राम प्रधान आणि तळवलकर दोघेही होते.) पण तो यशवंतरावांनी मानला नाही. इंदिरा काँग्रेसमध्ये परत आल्यावर यशवंतरावांना जी वागणूक मिळाली ती त्यांच्या सर्व चाहत्यांसाठीसुद्धा दुःखदायक होती.

चरित्राच्या शेवटच्या भागात तळवलकरांनी यशवंतरावांच्या एकूण व्यक्तित्वाच्या मूल्यमापनासाठी काही परिच्छेद लिहिले आहेत. त्यांत व्यक्त झालेले काही अभिप्राय महत्त्वाचे आहेत.

ते लिहितात- ‘‘स्वतःचे सामर्थ्य आणि स्वतःच्या मर्यादा या दोन्हींची जाण असलेल्या व अधिकारपद भोगत असलेल्या वा भोगलेल्या व्यक्ती थोड्या दिसतात. यशवंतराव अशा व्यक्तींपैकी एक होते. शक्तिस्थानामुळे ते अहंकारी बनले नाहीत आणि मर्यादांमुळे काही पदे मिळाली नाहीत म्हणून ते कुढत बसले नाहीत.’’

यशवंतरावांचे चरित्र कथन करीत असताना शक्यतो त्यांच्या आपल्या खाजगी संभाषणाचा अगर चर्चेचा आधार घ्यावयाचा नाही असे एक पथ्य तळवलकरांनी पाळलेले दिसते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मशताब्दीच्या वेळी तिचे चरित्र लिहीत असताना थोडासा मोकळेपणा घ्यावयास अर्थातच हरकत नसते. परंतु तळवलकरांची भूमिका नेहमीच काटेकोर असते. 

स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्ष लोकशाही राबवत असताना ज्यांनी जाणीवपूर्वक काही धोरणे आखली आणि राबवली अशा नेत्यांत यशवंतराव चव्हाण यांची गणना करावी लागेल. महाराष्ट्रात त्यांची राजकीय कारकीर्द ही यशाची चढती कमान होती. यशवंतरावांनी संरक्षणमंत्रिपद आणि नंतरच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या तरी दिल्लीचे राजकारण वेगळेच होते. यशवंतरावांनी आयुष्याचा अगदी शेवटचा काळ वगळला तर पक्षनिष्ठेला नेहमी प्राधान्य दिले. दिल्लीच्या राजकारणात मात्र नेत्याचे लांगूलचालन आणि त्याच्या किंवा तिच्या लहरीनुसार आपल्याही भूमिका बदलणे यालाच महत्त्व आहे हे त्यांना दिसले.

महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राची राजभाषा, वाङ्‌मय आणि संस्कृती यांबद्दल त्यांनी जी कमीत कमी हस्तक्षेपाची आणि तरीही सर्वतोपरी साहाय्याची भूमिका घेतली तीही त्यांच्या लोकशाहीनिष्ठेचा आणि सुसंस्कृततेचाच एक भाग होती.

आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. तो म्हणजे यशवंतरावांइतके निष्कलंक व्यक्तिगत चारित्र्य आज सत्तेच्या राजकारणात पाहावयास मिळणे अवघड आहे. त्यांच्या अनेक धोरणांबद्दल मतभेद असणारांनाही त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याबद्दल नेहमीच आदर वाटत आलेला आहे. या ग्रंथाने राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांचे कर्तृत्व पाहण्याचे एक साधन उपलब्ध झाले आहे.

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व आणि कर्तृत्व 
गोविंद तळवलकर
प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई 
किंमत : 500/- रुपये

Tags: नरेंद्र चपळगावकर इंदिरा काँग्रेस गोविंद तळवलकर पं. नेहरू यशवंतराव चव्हाण Narendra Chapalgaonkar Indira Congress Govind Talwalkar Pt. Nehru Yashwantrao Chavan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरेंद्र चपळगावकर,  औरंगाबाद, महाराष्ट्र
nana_judge@yahoo.com

निवृत्त न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद पीठ.  वैचारिक लेखक.   न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख. 'मराठवाडा साहित्य परिषदे'च्या विश्वस्त मंडळाचे पंधराहून अधिक वर्षे अध्यक्ष होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके