कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायला हवं, हे मी प्रामुख्याने शिकलो. कधीकधी एखादा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. स्टोरीटेलच्या बाबतीत हेच झालं. भारतात अकरा भाषांमध्ये स्टोरीटेल सध्या काम करत आहे. त्यांपैकी हिंदी आणि मराठीला चांगला प्रतिसाद मिळत होता. भारतात महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन कंटेंट देण्याचं, किंवा पेड एंटरटेन्मेंटचं क्षेत्र अजून बऱ्यापैकी लहान आहे. पैसे देऊन विकत घेऊन पुस्तकं वाचणारे अवघे तीनचार कोटी लोक भारतात आहेत. असं असताना ऑडिओबुकला मिळणारा प्रतिसाद साहजिकच कमी असणार होता. मग त्यापैकी कोणत्या भाषेला प्राधान्य द्यायचं, कशावर फोकस करायचं, याचे निर्णय त्या त्या वेळी घ्यावे लागले. त्यातून मला खूप शिकायला मिळालं. व्यवसाय करताना कुठलीतरी एक गोष्ट अत्यंत एकाग्रतेने करायची; ती शाश्वत वाढत राहील यासाठी काम करायचं, आणि ती पुरेशी वाढली की त्यानंतर दुसऱ्या गोष्टीला हात लावायचा, हा या काळाचा धडा होता.
स्टोरीटेल या ऑडिओबुक्सच्या ॲपचे इंडिया हेड म्हणजे योगेश दशरथ! त्यांनी स्टोरीटेल हे मूळ स्वीडिश असलेले ॲप भारतात आणले आणि इथे एखाद्या स्टार्ट-अपप्रमाणे चालवून ते वाढवलेदेखील! पुढच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये स्टोरीटेल भारतात पाच वर्षे पूर्ण करत आहे. एक स्वीडिश प्लॅटफॉर्म- तोही पुस्तकांवरचा- भारतात आणण्यापासून ऑडिओबुक्सचे कल्चर भारतात विशेषतः मराठीत रुजविण्याचा प्रवास नक्की कसा होता हे समजून घेण्यासाठी घेतलेली मुलाखत.
प्रश्न - उस्मानाबादमधील एका छोट्याशा गावातून तुम्ही सुरुवात केलीत, तिथून इंजिनिअर ते आयआयएमचा प्रवास, मग युरोपमध्ये जाऊन आयटीत काम केलंत, आणि मग अचानकच सगळं सोडून स्टोरीटेलसारख्या एका मोठ्या कंपनीची इंडिया ब्रँच स्टार्ट-अप म्हणून सुरू केलीत. हा प्रवास नक्की कसा होता?
- मी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नावाच्या गावातील आहे. माझा बराचसा प्रवास पुस्तकांसोबतच झालेला आहे. मी लहानपणी शिक्षणासाठी कळंबहून माझ्या आजोळी म्हणजेच लातूरला येऊन राहिलो, कारण त्या काळी कळंबमध्ये चांगल्या इंग्रजी शाळा नव्हत्या. तिथे आजीआजोबा, मामा यांच्या सोबत असल्याने अभ्यास कर, असं सतत म्हणणारं कुणी आजूबाजूला नव्हतं. परीक्षेत पास झालं की बास! माझ्या आजीला पुस्तकांची प्रचंड आवड होती. तिच्या सोबत लायब्ररीमध्ये येणं-जाणं व्हायचं; घरातही हस्तपान, बोलती सुपारी, काचेचा राजमहाल, यांसारखी लहानसहान पुस्तकं असायची. त्यामुळे जरी मी इंग्रजी शाळेत जात असलो तरीसुद्धा पहिलं पुस्तक मी मराठीच वाचलं असावं. आधी लहानसहान पुस्तकं वाचायचो, आणि त्यानंतर चौथी-पाचवीपासून मी कादंबऱ्या वगैरे वाचायला सुरुवात केली, त्यातही सुरुवातीला सुहास शिरवळकर! लातूरमधील बलभीम वाचनालयात सदस्यांना दोन पुस्तकं देत असत. मी तिथं रोज जाऊन पुस्तकं बदलून आणायचो, एक आजीचं आणि एक माझं! माझ्या पुस्तकांमध्ये रहस्यकथा, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, शरदचंद्र वाळिंबे, इत्यादी असायचे. तसंच आजीच्या पुस्तकांमध्ये योगिनी जोगळेकर, कुमुदिनी रांगणेकर यांचा समावेश असायचा. मी तेही वाचू लागलो. पुस्तकं वाचता वाचताच माझी शाळा झाली आणि दहावीत असताना ठरवलं की आता थोडा फार अभ्यासही करू, इंग्रजीही सुधारू. मग मी टाइम्स ऑफ इंडियासारखी इंग्रजी वर्तमानपत्रं, वाचनालयातील काही पी.जी. वुडहाऊस यांसारख्या लेखकांची इंग्रजी पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली. माझ्या मते आयुष्यात खरा अभ्यास मी दहावीला गेल्यावरच केला असेल. मला आजही आठवतंय, सातवीत असताना मला विज्ञानाला 35 गुण होते, तेही त्यांनी पास करण्यासाठी दिले असावेत. पाचवी-सहावीची 55, 59 वगैरे टक्के असणारी प्रगतिपुस्तकं आजही माझ्याकडे आहेत. माझं नशीब चांगलं असल्याने घरी मार्कांकडे लक्ष देणारं फारसं कुणी नव्हतं. मी पास झालो की त्यांना ते पुरेसं असायचं. दहावीनंतर सायन्स, आर्ट्स असं काहीतरी निवडावं लागतं याचीही मला कल्पना नव्हती. ही 1995 ची गोष्ट! त्या काळी आमची जनरेशन या बाबतीत फारशी जागरूक नव्हती, आणि त्या काळी भारतात फारशा जॉबच्या संधीही नसायच्या.
दहावीत चांगले मार्क पडल्यानंतर लातूरमधील शाहू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, तिथं सर्वच मेरिट होल्डर्स होते. तिथे माझ्याकडून इतकी चांगली तयारी करून घेण्यात आली की, बारावीत चांगले मार्क्स पडणं क्रमप्राप्तच होतं. तिथून मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. आज मागे वळून पाहताना मी केमिकल का घेतलं असावं, त्याचं उत्तर येतं की ते तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं म्हणून! त्या काळात मार्क्स चांगले पडले की, एक तर इंजिनिअर व्हायचं किंवा डॉक्टर! मला बायोलॉजी फारसं आवडत नव्हतंच, त्यामुळे इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. इतका सोपा तो प्रवास होता. पुढे जाऊन कुठंतरी नोकरी वगैरे करायची आहे हे ध्यानीमनीही नव्हतं. त्या काळी घरातून महिना दीड-दोन हजार रुपये मिळत असत, त्यामुळं इंजिनिअर झाल्यानंतर सहा-सात हजार रुपये महिन्याला मिळाले तरी पुष्कळ आहे, असं स्वप्न होतं. या संपूर्ण प्रवासात सगळीकडेच माझ्याकडे वाचनालयाचं सदस्यत्व असायचंच, कारण पैशांअभावी पुस्तकं विकत घेणं हा पर्याय नव्हता. इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक सेमिस्टरला पाच महिने कॉलेज, पाच विषय आणि अभ्यासाला पीएल व उरलेला महिना पुस्तकवाचन हे ठरलेलंच होतं. त्या काळी मग काही मित्रांसोबत जीआरईची तयारी केली, तेव्हाच दोन-तीन मित्र म्हणले म्हणून कॅटचीही तयारी केली. इ.स.2000 मध्ये केवळ फॉर्म भरला आणि परीक्षा दिली. कॅट म्हणजे शेवटी इंग्लिश, मॅथेमॅटिक्स आणि ॲनेलिटिक्स. मॅथेमॅटिक्स तर दहावी-अकरावीच्या लेव्हलचंच असतं. त्यामुळे प्रश्न इंग्लिश आणि ॲनेलिटिक्सचाच होता. पुस्तकवाचनाची सवय असल्याने वाचनाचा वेग चांगला होता. त्याचा फायदा झाला आणि पहिल्या वर्षीच कॅटमध्ये चांगला स्कोअर आला. केमिकल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत पास झालो असलो तरी ते येत होतं असं म्हणता येणार नाही. कारण आपल्याकडंच इंजिनिअरिंग थेरॉटिकल असतं. आतून कुठंतरी असं वाटत होतं की, आपण इंजिनिअरिंगला न्याय देऊ शकलो नाही. दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा कॅट दिली आणि आयआयएम लखनौमध्ये प्रवेश मिळाला. तिथं दोन वर्षं चांगलं शिक्षण मिळालं आणि नंतर नोकरीही मिळाली. खरं तर तिथंही अभ्यासाकडं पूर्ण लक्ष होतं असं म्हणता येणार नाही. तिथंही पुस्तकं वाचण्याचा नाद होताच. आयआयएममधील सर्वांत नोटेबल गोष्ट म्हणजे वर्गात परीक्षेचा पेपर सोडवून सर्वांत आधी बाहेर पडायचो. कोणतीही तीन तासांची परीक्षा असली तरी पहिल्या चाळीस-पन्नास मिनिटांत जे येत असेल ते लिहून बाहेर पडायचं.
तिथून मग चेन्नईच्या एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये गेलो, त्यानंतर पुढे आयएमजी नावाच्या बँकिंग अँड इन्शुरन्स कंपनीत गेल्यानंतर दहा वर्षं ॲमस्टरडॅम आणि प्रागमध्ये राहणं झालं. नेदरलँडचं वर्क कल्चर भारतापेक्षा फारच वेगळं आहे. तिथले माझ्या टीममधील लोक एखादी गोष्ट पटली नाही तर तसे स्पष्ट सांगायचे आणि म्हणायचे की, पटवून द्या. त्यामुळे ते आपल्याकडील वर्क कल्चरपेक्षा मला फार वेगळं वाटलं. अशा अनेक गोष्टी तिथं शिकायला मिळाल्या. तिथं अनेक लोक मी असेही पहिले की, ज्यांना प्रमोशन नको असायचं. एका विशिष्ट पातळीला ते ठरवत असत की, इथं माझा वर्क लाइफ बॅलन्स चांगला आहे. तसंच तिथले अनेक लोक आठवड्यातील केवळ चारच दिवस काम करीत असत. मीही मग चार वर्षं असंच काम केलं, त्यामुळं तीन दिवसांचा वीकेंड मिळायचा. परिणामी पुस्तकं, टीव्ही, सिनेमे, भटकंती, या गोष्टीही मनसोक्त करता आल्या. ते करता करता पुढे काय काम करायचं, कुठल्या कामात मजा येतेय, याचा विचार सुरू झाला.
तिकडे 2010-11 मध्ये प्रोफेशनल कोचकडं जाऊन तुमचे करिअर ॲस्पिरेशन्स काय आहेत वगैरे तपासून घेऊ शकत होता. ते केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की, मला कॉर्पोरेट लॅडरमध्ये वरवरची पदं मिळविण्यापेक्षा इंटरेस्टिंग काम करण्यात जास्त रस आहे. आधी मी प्रोजेक्ट मॅनेजर आणि नंतर प्रोग्रॅम मॅनेजर होतो. त्यानंतर मग आणखी पुढं जावं, हाताखाली पन्नास-एक माणसांनी काम करावं, आणखी पैसे कमवावेत असा विचार फारसा येत नव्हता. नेदरलँडची एक जमेची बाजू अशी होती की म्हणजे पदपातळीअनुसार पगारात फारशी तफावत नव्हती. मॅनेजरचा पगार तुमच्याहून केवळ दहा-वीस टक्केच जास्त असतो. त्यामुळे मी ठरवलं की, जे इंटरेस्टिंग वाटेल तेच काम करायचं. त्यानंतर मग मी आमच्या युरोपिअन ऑपरेशन्समध्ये जाऊन इतर युरोपिअन देशांमध्येही काम केलं. तसंच 2014-15 उजाडल्यानंतर व भारताबाहेर येऊन दहा-एक वर्षं झाल्यानंतर मी आणि माझी बायको सायली, आम्ही चर्चा केली की नेदरलँडमध्ये राहिल्यास रस्ता स्ट्रेट फॉरवर्ड आहे; तो म्हणजे घर घ्यायचं, बँकांचे हप्ते भरायचे, वगैरे वगैरे. पुढच्या वीस वर्षांचा रोडमॅप काय असेल याचा अंदाज बांधू शकत होतो. पण आम्ही असा विचार केला की भारतात परत यावं, घरच्यांजवळ काही काळ तरी राहावं, जेणेकरून आजीआजोबांना भेटायला सहज एका दिवसात जाता यावं. शेवटी कुठंतरी असा विश्वास होता की, पुढं गरज पडल्यास नोकरी काय कुठंही मिळेलच! त्या वेळी आम्ही भारतात यायचं हे ठरवल्यानंतर ऑगस्ट 2015 ला शाळेचं वर्ष म्हणून बायको व मुलगी भारतात आल्या. मी हातातील प्रोजेक्ट संपवून वर्षाअखेरीस येणार होतो. त्या वेळेस हा विचार नक्कीच केला होता की आता टिपिकल नोकरी करायची नाही; काहीतरी लिखाण करू. अर्थात आणि दहा वर्षं भारताबाहेर काम केल्यानंतर तिथली वस्तुस्थिती काय असेल याचा अंदाज नव्हता.
त्याच वर्षी माझं घर ॲमस्टरडॅम आणि ऑफिस द हेगला असताना त्या त्रेपन्न किलोमीटर प्रवासात माझा एक तास जात असे. घरातून निघून सायकलने ट्रेन स्टेशनला जायचं, तिथून पन्नास किलोमीटर अंंतरावर ट्रेनने जाऊन दहा मिनिटांत ऑफिस, असा प्रवास असायचा. त्या वेळेस स्टोरीटेलच्या जाहिराती दोन्हींकडच्या रेल्वे स्टेशन्सवर असायच्या. त्या जाहिरातींमध्ये ‘तुम्ही सध्या कोणतं पुस्तक ऐकताय?’ एवढंच लिहिलेलं असायचं. तोपर्यंत ऑडिओ बुक्स हा प्रकार मी काही फारसा वापरलेला नव्हता. खूप लहानपणी बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडेंच्या गोष्टी मी कॅसेटवर ऐकायचो, आमच्या घरी त्याचा संपूर्ण सेट होता. काही दिवस या जाहिराती पाहिल्यांनंतर मी स्टोरीटेलचं ॲप्लिकेशन फोनमध्ये डाउनलोड केलं आणि थोडंफार वापरलं. कालांतराने त्याची सवय लागली. एखादं इंटरेस्टिंग पुस्तक घरातून निघताना हेडफोन्समध्ये सुरू करायचं आणि एक-दीड तास जाता-येता ते ऐकायचं. त्यानं प्रवासही सुखकर व्हायचा आणि पुस्तकही ऐकलं जायचं. या सवयीमुळे जेव्हा आम्ही भारतात परतायचं ठरवलं तेव्हा मी पाहिलं की, भारतात ऑडिओ बुक्सची काय परिस्थिती आहे? त्या वेळेस एक-दोन कंपन्या होत्या. पण इतकं काही नव्हतं. मग मी स्टोरीटेलच्या वेबसाइटवरील ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवायचं ठरवलं. भारतातही लोकांना पुस्तकं फार आवडतात, पण ऑडिओ बुक्सचं फारसं मार्केट नाहीये, त्यामुळं त्या क्षेत्रात काही तरी सुरू करण्याचा माझा मानस आहे, अशा आशयाचा मेल मी त्यांना केला. माझं नशीब असं की, त्या काळात स्टोरीटेल इंटरनॅशनल एक्स्पान्शन करण्याच्या विचारात होतं. त्यांनी मला बोलावणं धाडलं, त्याप्रमाणे मी डिसेंबर 2015 मध्ये तिथं (स्वीडनमध्ये) स्वखर्चाने गेलो, त्यांनी जाण्या-येण्याचा भत्ता दिला नव्हता. तिथं जाऊन मी माझं प्रेझेंटेशन दिलं. त्यातील काही गोष्टी मी आधीही केल्या होत्या. उदाहरणार्थ, प्रागमध्ये कंपनी सेटअपमध्ये आमच्या जुन्या कंपनीसाठी मी एक संपूर्ण हब सेटअप केलं होतं. स्ट्रॅटेजी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, यांचा अनुभव तर गाठीशी होताच; पुस्तक पब्लिशिंगचा मात्र शून्य अनुभव होता. मी जानेवारीत इकडे आलो आणि त्याच वेळी रुस्तन पांडे या हाफ इंडियन व हाफ स्वीडिश अशा स्टोरीटेलच्या चेअरमननी त्यांच्या मुंबई दौऱ्यात मला भेटून विचारलं की, ‘काय करशील?’ त्याने मला भारताविषयी अभ्यास चालू करण्यास सांगितलं. त्यानंतर मी स्टोरीटेलचं काम सुरू केलं मला आठवतंय की, मी तेव्हा एकटाच होतो आणि आमचं कॉन्ट्रॅक्टही एक-दोन महिन्यांचंच झालं. कारण आताच्या मानाने त्या काळची स्टोरीटेल ही कंपनी छोटी होती; केवळ सत्तर-ऐंशी लोकांचा समूह होता. अशा प्रकारे माझा भारतातील स्टोरीटेलचा प्रवास सुरू झाला.
प्रश्न - मला स्टोरीटेलच्या भारतातील तुमच्या प्रवासाकडे यायचंच आहे, पण त्याच्याही आधी स्टोरीटेल ही नक्की काय संकल्पना आहे ते सांगाल का?
- स्टोरीटेल ही कंपनी 2005 मध्ये स्वीडनमध्ये योनास टॅलेंडर आणि यॉन हॉक्सन यांनी ‘बुकिलूर’ या ओरिजिनल नावाने सुरू केली. त्याचा अर्थ ‘स्वीडिश भाषेत बोलणारी पुस्तके’ असा होतो. योनास टॅलेंडरची गोष्टही अत्यंत इन्स्पायरिंग आहे. तो याआधी स्वित्झर्लंडच्या रोश नावाच्या कंपनीत काम करत असे आणि तिथून अमेरिकेत सतत प्रवास करताना तो ऑडिबलवर पुस्तकं ऐकत असे. त्या वेळी त्याला याची कल्पना सुचली की हे आपण स्वीडनमध्ये सुरू करावं. त्यानंतर त्याने नोकरी सोडून 2005 मध्ये यॉन हॉक्सनसोबत ऑडिओ बुक्सची कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ दोनच ऑडिओ बुक्स होती, आणि जुन्या नोकिया फोनवर ते स्ट्रीम करत असत. जवळजवळ चार वर्षं काम केल्यानंतर 2009 मध्ये कंपनी डबघाईला आली. जेमतेम दोन महिने तग धरण्याइतपात पैसे उरल्यावर एका फंड रेजिंग प्रोग्राममध्ये योनास गेले आणि तिथे आपली कर्मकहाणी सांगितल्यानंतर एका इन्व्हेस्टरने स्टोरीटेलच्या दहा टक्के मालकीहक्काच्या बदल्यात दहा मिलिअन स्वीडिश क्रोना म्हणजेच पंचाऐंशी लाख रुपये इतकी रक्कम दिली. ही खूपच फायदेशीर गुंतवणूक होती. हा इन्व्हेस्टर आणि रुस्तन पांडे नावाची व्यक्ती एकत्रितरीत्या स्टोरीटेलमध्ये गुंतवणूक करत होते. 2009-10 मध्ये रुस्तनने योनाससोबत स्टोरीटेलमध्ये मार्केटिंगचं काम करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी स्टोरीटेलनं स्ट्रीमिंग फीचर सुरू केलं. त्याआधी लोकांना ऑडिओ बुक्स डाउनलोड करून ऐकाव्या लागत, पण 2010 ची जगातील पहिली स्ट्रीमिंग ऑडिओ बुक्स सर्व्हिस स्टोरीटेलने सुरू केली. त्याच वेळी स्वीडनमध्ये आयफोन आला आणि त्यामुळे डेटा स्पीडमध्येही फरक पडला. या फरकाने स्टोरीटेलची चांगली प्रगती सुरू झाली. आज स्टोरीटेल ही स्वीडनमधील लिस्टेड कंपनी असून जगभरातील जवळपास 22 कोटी लोक स्टोरीटेल ऐकतात.
प्रश्न - स्टोरीटेल जरी लिस्टेड कंपनी असली तरी तिचा भारतातील प्रवास हा एका स्टार्ट-अपसारखाच होता, तो नक्की कसा झाला?
- भारतातील प्रवासात मी मघाशी म्हटल्याप्रमाणे नशिबाचा मोठ्ठा वाटा होता. 2016 ला मी भारतात स्टोरीटेल सुरू केलं तेव्हाच नेटफ्लिक्सही भारतात लाँच झालं. मी प्री-स्टडी करत होतो, तेव्हाच जिओ लाँच झालं. तुम्हांला आठवत असेल तर 2015 मध्ये प्रत्येक 10 एमबी आणि 50 एमबी डेटासाठीही पैसे मोजावे लागत होते आणि एक ऑडिओ बुक 30-40 एमबीचं असायचं. तेव्हा असा प्रश्न होता की हे कसं होणार? त्यामुळे 2016 मध्ये प्री-स्टडी सुरू केल्यानंतर सुरुवातीला मी खूप लोकांना भेटलो आणि त्यातील काही मित्रांची मला खूप मदत झाली. भारतात या सगळ्या गोष्टीत मी खूपच नवा होतो, आणि त्यातून मला पब्लिशिंगमधलं काहीच माहीत नव्हतं, कोणाच्याही ओळखी नव्हत्या. पुण्यात संतोष देशपांडे मेडियाक्युरामध्ये आहे, तोही कळंबचाच आहे. तसंच अनंत नाथ म्हणून एक दिल्ली प्रेसचा ओनर आहे, तो माझ्या सोबत आयआयएममध्ये होता. अमित टेकाळे नावाचा मेनका प्रकाशनतला एक मित्र केमिकलला माझ्या सोबत होता. तिथं एकत्र असताना आम्ही गॅदरिंगमध्ये अशा गोष्टींविषयी गप्पा मारायचो. अशा दोघा-चौघांच्यामुळे हळूहळू ओळखी वाढू लागल्या. साहजिकच ग्लोबल कंपनी असल्याने काम करण्याचं मॉडेल तयार होतंच, त्याचीही मदत झालीच.
भारतात लोकांना सुरुवातीच्या काळात मी ऑडिओ बुक्ससाठी फोन करायचो तेव्हा अनेकदा लोकांना त्याचा अर्थच माहीत नसायचा; ऑडिओ बुक म्हणजे नक्की काय असतं, त्याचे राइट्स कसे असतात, ऑडिओ बुक्स तयार कसे करायचे, असे असंख्य प्रश्न सोडवता सोडवता बराचसा कालावधी गेला. सुहास शिरवळकरांची पुस्तके हे आम्ही साइन केलेले पहिले डील. संजय सोनवणी यांनीही अतिशय उत्साहाने त्यांची काही पुस्तकं आम्हांला दिली आणि त्या काळी आम्ही ऑडिओ बुक्स करताकरताच ऑडिओसाठी ओरिजिनल लिखाण करण्यासही सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात भारतात बिझनेस उभा करणं हे नक्कीच सोपं काम नव्हे. विशेषतः एफडीआय असलेली कंपनी म्हटलं की ई-कॉमर्सचे कायदे समजून घेण्यातही बराचसा वेळ जातो. कंपनी कशी काढली जाते, पब्लिशिंग कसं केलं जातं, त्याबरोबरीनेच ऑडिओ पब्लिशिंगही कसं करावं; या तिन्ही गोष्टी समजून घेण्यात पहिलं वर्ष-दीड वर्षं गेलं.
नोव्हेंबर 2017 मध्ये आम्ही लाइव्ह गेलो म्हणजे त्याआधीची दीड वर्षे मी काम करत असलो तरी लोकांना स्टोरीटेल दिसतच नव्हतं. त्यामुळे लोकांना अनेकदा भेटून, पुस्तकांचे कॉपीराइट्स, स्टुडिओसोबत काम करणं, पुस्तकाला आवाज देणं, वगैरे गोष्टी समजावून सांगाव्या लागत असत. त्यातल्या त्यात आपल्याकडं थिएटरची परंपरा असल्यानं आर्टिस्ट आणि स्टुडिओ व्यवस्था चांगली आहे; फक्त त्याचा ऑडिओसाठी कसा वापर करावा, हे कळणं गरजेचं होतं. अनेक ऑडिओ आर्टिस्ट्स यायचे ते जाहिरातींसाठी काम करायचे. पण त्या शैलीत आणि पुस्तक वाचनाच्या शैलीत प्रचंड फरक असतो, तोही समजावून सांगावा लागतो. सुरुवातीला असं लक्षात आलं होतं की, भारतात पैसे कमावण्यासाठी सर्वांत चांगले मार्केट हे इंग्रजीचं आहे, आणि त्याखालोखाल सर्वांत जास्त हिंदीभाषक आहेत. त्यामुळे इंग्रजी आणि हिंदी सुरू करणं सोपं होतं, पण मराठी ऑडिओ बुक्ससाठी परदेशांतील मॅनेजमेंटची मनधरणी करण्यास थोडा वेळ लागला. मी मॅनेजमेंटला म्हटलं की, मी मराठी आहे आणि त्यात कसं काम करायचं ते मला माहीत आहे, आणि मराठीतील समृद्ध परंपरेमुळे मराठी ऑडिओ बुक्स लोक नक्कीच ऐकतील. थोडा वेळ लागला, पण त्यांना ते पटलं. मग आम्ही ठरवलं की इंग्रजी, हिंदी, मराठी या तीन भाषांमध्ये ऑडिओ बुक्स करायची. तिथून मग फाउंटनचे ओसवाल यांनी आपली सगळी लायब्ररी आम्हांला आनंदानं दिली. अशा रीतीने आम्ही 27 नोव्हेंबर 2017 रोजी केवळ साडेचारशे ऑडिओ बुक्स 499 रुपये प्रतिमहिना दराने लाँच केले.
प्रश्न - भारतात काम करताना नेहमीच एक मुद्दा असतो तो म्हणजे हे अजूनही एक विकसित होत जाणारे मार्केट असल्याने आणि आजही यूट्यूब फ्री असल्याने, जे पुस्तक हातात मिळणार नाहीये, ज्याच्या मूर्त स्वरूपाचं समाधान आपल्याला मिळणार नाहीये, अशा ऑनलाइन सर्व्हिससाठी म्हणजेच ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी पैसे देणं व त्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करणं कितपत अवघड गेलं?
- आपला देश जरी एकच असला तरी देशाचे असे विविध भाग पाडता येतील ज्यांची आपापली डिजिटल मॅच्युरिटी वेगळ्या लेव्हलची आहे. त्यामुळे एक वर्ग असा आहे ज्यांना पैसे मोजून क्वालिटी कन्टेन्ट ऐकणं यात फार काही मोठं वाटत नाही. दुसरा एक मोठा वर्ग असा आहे ज्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजण्याची सवय नाही. हे आव्हान अजूनही आहेच. मी पूर्वी वाचनालयातून पुस्तकं घ्यायचो, तेव्हा स्वतः विकत घेतलेलं पुस्तक खूप नंतरचं. त्यामुळे मला माहीत आहे की, अनेकांकडे पुस्तकं विकत घेण्याइतके पैसेही नसतात. एखाद्याकडे शंभर रुपयेच असतील तर तो त्यातून अन्न घेईल की पुस्तकं? पुस्तक वाचायला आवडत असेल तरी साहजिकपणे खाण्याला प्राधान्य दिल जातं. त्यामुळे भारताची लोकसंख्या खूप मोठी असली तरी अशा सर्व्हिसेस सगळ्यांना विकत घेणं परवडत नाही हेदेखील खरं आहे. शिवाय एक असा वर्ग आहे ज्याच्याकडे पैसे आहेत, पण त्यांना अजून या गोष्टींची सवय आणि अनुभव नाहीये. माझ्या दृष्टीनं सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून लोकांना हा ऑडिओ बुकचा अनुभव देणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं की, हे कन्टेन्ट इतकं दर्जेदार आहे की तुम्ही त्यासाठी पैसे मोजावेत, हे माझं पहिलं काम होतं. हे काम आजही आव्हानात्मकच आहे आणि ते आम्ही सतत करतच असतो.
मला आनंद आहे की आज बरेच जण पैसे देऊन कन्टेन्ट ऐकतायत. गेल्या तीन वर्षांपूर्वी आम्ही 499 रुपये प्रतिमहिना लाँच केलं तेव्हा ती किंमत भारतीय मार्केटच्या दृष्टीने जास्तच होती. मात्र ऑगस्ट 2018 मध्ये आम्ही ती किंमत 299 रुपये प्रतिमहिना इतकी केली. आणि त्यानंतर आमच्याकडे किमतीवरून येणाऱ्या तक्रारी खूप कमी झाल्या. पण काही असेही लोक होते जे म्हणत की, आम्ही फक्त मराठी ऐकतो तर केवळ मराठी ऑडिओ बुक्स आम्हांला कमी दरात पाहिजेत. त्यामुळे आम्ही 99 रुपये प्रतिमहिना ‘सिलेक्ट मराठी’ असं केवळ मराठी पुस्तकं असणारं सब्स्क्रिप्शनही लाँच केलं. भारतीय मार्केटचा अंदाज घेत आम्ही सतत स्वतःला बदलत गेलो आणि त्याचा फायदा झाला.
जे लोक पैसे देऊन हे ॲप ऐकतात त्यांच्या बाबतीत कंपनीसमोरचं आव्हान आहे की, त्यांना आकर्षक वाटेल असा कन्टेन्ट सतत पुरवत राहणं. त्यामुळे आम्ही सतत नवनवा कन्टेन्ट ॲड करत असतो. मराठीमध्येही आपल्याकडे आता हजारो मराठी ऑडिओ बुक्स आहेत आणि आपण दर महिन्याला काही नवे ऑडिओ बुक्स रिलीज करत आहोत, जेणेकरून नवा कॅटलॉग लोकांना आकर्षित करेल. असाही एक वर्ग असतो ज्यांच्याकडे पैसा आहे, पण पुस्तकांवर खर्च करण्याची सवय नाही. अशा प्रेक्षकवर्गाला कन्व्हिन्स करणं हे कन्टेन्ट बिझनेसमधील आपणां सर्वांचंच काम आहे; की आम्ही तुम्हांला खूप चांगला कन्टेन्ट देतो- अँड वी व्हॅल्यू यू सो यू शुड व्हॅल्यू अस!
प्रश्न - या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मला दिसतेय ती म्हणजे तुम्ही मराठी भाषेला दिलेलं प्राधान्य! तुम्ही भारतात लाँच करताना इंग्रजी, हिंदीसोबतच मराठीही घेऊन आलात; भारतातील एकाच भाषेत सब्स्क्रिप्शन देण्याचा स्टोरीटेलचा पहिला प्रयोग तुम्ही मराठीत केलात. तुम्ही स्वतः मराठी असलात तरी एकंदरीत मराठीची वाचनसंस्कृती आणि विशेषतः पु. ल. देशपांडे, व.पु. काळे यांच्यापासून चालत आलेल्या ऑडिओ कॅसेट्स, म्हणजेच अभिवाचनाची परंपरा यांचा तुम्हांला कितपत फायदा झाला?
- आजचं जग हे डेटा-ड्रिव्हन इन्साइट्सचं आहे त्यामुळे एक कंपनी म्हणून वापरकर्त्यांच्या माहितीनुसार तुम्ही तुमचा बिझनेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असता. आमच्या श्रोत्यांमध्ये मराठी भाषकांचे प्रमाण चांगलं आहे. यावरूनच हे दिसून येतं की मराठी गोष्टी ऐकणारं मार्केट प्रगल्भ आहे आणि त्यात पु.ल., व.पु., द.मा. या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. ऑडिओ कॅसेट्स, कथाकथन, रेडिओवरील श्रुतिका हे आपल्याकडे पूर्वापार होतंच. माझ्या मते मध्यंतरी एक काळ असा होता, जेव्हा कॅसेट्सकडून सीडीमध्ये ट्रान्झिशन होताना या गोष्टी थोड्या फार मागे पडत गेल्या, हे मार्केट सीडीच्या जमान्यात कॅरी फॉरवर्ड झालं नाही. त्यामुळे त्यातून इकॉनॉमिक बिझनेस मॉडेल तयार करू इच्छिणाऱ्या लोकांची संख्याही कमी झाली. त्यानंतर फास्ट फॉरवर्ड टु इंटरनेट वर्ल्ड, आजच्या जगात इंटरनेटमुळे या गोष्टी पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहेत. यात नक्कीच मराठी संस्कृतीचा मोलाचा वाटा आहे. मराठी श्रोतृवर्ग आहे, त्याला हे सगळं हवंच होतं. पण कोणी देणारं नव्हतं ते द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत एवढेच!
प्रश्न - आणखी एक मूळ प्रश्न असा उरतो की आजकाल लोकांचं जगणं खूप फास्ट झालं आहे. तुम्ही जेव्हा संपूर्ण पुस्तकं आणता, तेव्हा ती काही तासांची असतात. तर लोकांना इतकं सलग ऐकायला वेळ आहे का? कारण बाकी ऑडिओमध्ये कमी वेळाचे पॉडकास्टच जास्त चालतात. तर हे गणित नेमकं कसं काम करतं? उदाहरणार्थ, मी आता कथेच्या एका अत्यंत थरारक पॉइंटला आलोय तर मी आज ते पॉझ करून उद्या ऑफिसला जाताना परत चालू करणार का? लोकांना तीन-चार तास वेळ काढणं कसं जमतं? याला तुम्ही काही उपाय शोधला आहे का?
- माझ्या दृष्टीनं हा सवयीचा मुद्दा आहे. समजा, मी आता आमची आजवरची पुस्तकं पाहिली; उदाहरणार्थ, अच्युत गोडबोलेंचं ‘मुसाफिर’, शरद पवारांचं ‘लोक माझे सांगाती’, विश्वास नांगरे-पाटील यांचं ‘मन में हैं विश्वास’, शिवाजी सावंतांचं ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ ही सगळी मोठमोठी पुस्तकं आहेत आणि ते एकेक पुस्तक पूर्ण ऐकायला 38-40 तासही लागतात. तरीही लोक ते ऐकत आहेत! त्यामुळे मला असं वाटतं की, हा संपूर्णपणे एक्स्पोजरचा मुद्दा आहे. नेटफ्लिक्सवर सोशल डिलेमा होतं, व्हिडिओ बघायचा, बिंज वॉच करायचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मी स्वतः संध्याकाळी 7-8 नंतर मोबाइलवर सोशल मीडिया बघतच नाही. पण रात्री झोपताना मात्र अर्धा-एक तास पुस्तक ऐकून झोपायला मला काहीच प्रॉब्लेम नसतो. याउलट मी एकटा असतो, प्रवास करत असतो तेव्हा न चुकता रात्री झोपताना एखादी गोष्ट ऐकत झोपतो. खूप छान वाटतं! डोक्यामध्ये इतर काही विचारही येत नाहीत, कोणीतरी गोष्टी सांगत तुम्हांला झोपवतंय असंच वाटतं. या सगळ्या फेजेस असतात असं मला वाटतं. जशी सोशल मीडियाची एक फेज असते, यूट्यूबचीही फेज होती. एके काळी भारतात ऑर्कुटचीही फेज आली होती. शेवटी आपल्याला काय- गोष्टींमध्ये हरवायचं असतं. प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी एक जागा असते. पुस्तकं म्हणजे पोळी आणि वरण-भात असतं, सोशल मीडिया म्हणजे सामोसा आणि वडापाव, पॉडकास्ट हे लोणच्यासारखे असतात. म्हणजे तुम्हांला पाणीपुरी आवडत असेल, पण रोजच पाणीपुरी हे जेवण असू शकत नाही. पॉडकास्टमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. नॉन-स्क्रिप्टेड आणि स्क्रिप्टेड! त्याचं एक वेगळंच स्थान आहे. तिथं तुम्ही विषय इंटरेस्टिंग वाटला तर अर्धा-एक तास घालवू शकता. तसं मी अमित वर्मा यांचं ‘द सीन अँड द अनसीन’ हे पॉडकास्ट ऐकतो. त्याचे बरेचसे एपिसोड्स तीन-साडेतीन तासांचेही असतात. तेही मी ऐकले आहेत आणि काही दहा-पंधरा मिनिटांतच बंदही केले आहेत. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक प्रकारच्या कन्टेन्टची एक जागा असते. मला असंही वाटतं की अजूनही आपण (आणि मीसुद्धा) पुस्तकं ऐकण्यापेक्षा वाचतो जास्त! मला आठवतंय, ‘बिकमिंग’ हे मिशेल ओबामांचं पुस्तक मी ऐकायला सुरुवात केली होती, पण ते खूप मोठं होतं. मग मी ते विकत घेतलं आणि वाचून काढलं. मृत्युंजयसारखं पुस्तक ते मी दोन-चार वेळा वाचलं होतं तरीही पुन्हा ऐकलं. कारण प्रत्येक कलाकारानं त्यात जी एक गोष्ट सांगितली आहे, त्यात जी मजा आहे; ती ते पुस्तक, आवाज, स्पीड यांत अधिक रोमांचक वाटते. तुम्हांला एकदा का गोष्ट आवडली, की तुम्हांला एवढा फरक जाणवत नाही. उद्या जर तुम्हांला वाटलं की मनाची चलबिचल होतेय, तर एक चांगलं पुस्तक लावा आणि त्यातील गोष्ट ऐका! मी स्वतःही हे केलं आहे. माझ्या बायकोचंही कधी डोकं दुखत असेल तर आम्ही पुस्तक ऐकत बसतो आणि त्याचा खरोखरच फायदाही होतो.
प्रश्न - गेल्या दोन वर्षांत बरंच काही बदललं. कोविडच्या साथीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने अनेक बदल घडवून आणले. स्टोरीटेलचा गेल्या दोन वर्षांचा प्रवास कसा होता? जागतिक घटनांमुळे ज्या अडचणी येत गेल्या, त्याचा सामना तुम्ही कसा केला?
- 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाली आणि मार्च महिन्यात भारतात लॉकडाउन सुरू झालं. यादरम्यान सर्वच सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मवर लोकांनी जास्तीतजास्त वेळ घालवणं सुरू केलं. त्याचा फायदा स्टोरीटेललाही झाला. जास्तीतजास्त लोक स्टोरीटेलचं सबस्क्रिप्शन घेऊ लागले. त्यामुळे इंडस्ट्रीसाठी हे चांगले दिवस होते. मागच्या वर्षी मात्र दोन-तीन गोष्टी अशा झाल्या की, त्यांच्यामुळे आमच्या कामावर विपरीत परिणाम झाला. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मसाठी असलेले काही नियम बदलले. त्यानुसार दर महिन्याला आपोआप अकाउंटमधून पैसे कट होऊन नव्याने सबस्क्रिप्शन सुरू होण्याची प्रक्रिया बंद झाली. त्यामुळे थोडासा ब्रेक लागल्यासारखा हा काळ होता. दुसरी समस्या अशी की, गुगलने त्यांच्या ब्राउजरवर सबस्क्रिप्शन ॲप्स चालवणं बंद केलं. वेब रिडायरेक्ट न वापरता थेट ॲपवरच कंटेंट ऐकण्याची सक्ती केली. तर कोरोनामुळे जास्त लोकांनी सबस्क्रिप्शन घेतलं आणि त्यामुळे जो बूस्ट मिळाला, त्याला या दोन गोष्टींमुळे ब्रेक लागला. त्यानंतर या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा स्टोरीटेलच्या भारतातल्या कामांवर मोठा परिणाम झाला. या युद्धामुळे इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलला. पाचेक वर्षांपूर्वी पैसे गुंतवून कंपनी वाढत नेण्यावर भर देणारे (ग्रोथ माइंड सेट) गुंतवणूकदार होते. कंपनी नफ्यात असणे आणि कॅश फ्लो या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या नव्हत्या. तुमची कंपनी ग्रोथ करत आहे ना, हा सर्वांत मोठा फॅक्टर होता. गेल्या वर्षभरात हे समीकरण पूर्णतः बदललं आणि नफा, कॅश फ्लो या गोष्टींना महत्त्व आलं. याचा स्टोरीटेलसारख्या कंपन्यांना थेट फटका बसला. त्याचं कारण असं की, या कंपन्या वाढत असल्या तरी त्यांचा कॅश फ्लो निगेटिव्ह होता. तो निगेटिव्हवरून पॉझिटिव्हवर आणण्यासाठी काही कठोर निर्णय घेणं आवश्यक असतं. ज्या देशांमध्ये ऑडिओ बुकची बाजारपेठ तुलनेने जास्त मोठी आहे त्या देशांना जास्त प्राधान्य देण्याचं स्टोरीटेलने ठरवलं. ज्या देशांमध्ये ऑडिओ बुकचा फारसा प्रसार झालेला नाही, अशा देशांना स्टोरीटेलने दुय्यम स्थान देण्याचं ठरवलं. अर्थात भारत ऑडिओ बुकच्या बाजारपेठेच्या बाबतीत अजून तितकासा स्थिर देश नाही. त्यामुळे भारताच्या बाबतीत झालं असं, की ग्रोथपेक्षा काही काळासाठी नफ्याला महत्त्व देण्याचं धोरण स्टोरीटेलने स्वीकारलं. याचा परिणाम म्हणजे भारत कॅश फ्लो पॉझिटिव्हिटीच्या दिशेने जाऊ लागला. पण दुसऱ्या बाजूला स्टोरीटेलचे नवीन प्रकल्प, नवीन कंटेंट यांच्यावर मर्यादा आल्या. भारतात ऑडिओ बुक इंडस्ट्री अजून बाल्यावस्थेत आहे. तिचा प्रवास सुरू आहे. मात्र अशा वेळी स्टोरीटेलला भारतात दीर्घ काळ काम करता येईल यासाठीचा पाया तयार झाला आहे. पण या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत स्टोरीटेलची वाढ गेल्या काही महिन्यांत तेवढ्या वेगात होऊ शकली नाही. मागच्या दोन वर्षांत या इंडस्ट्रीमध्ये खूपच मोठा स्थित्यंतराचा काळ येऊन गेला. वाढीचा आलेख खूप खाली आणि वर गेला. पण तेजी-मंदीच्या सर्व सायकल्सना सामोरे जाऊन लाँग टर्म खेळीसाठी स्टोरीटेल इंडिया तयार झाली.
प्रश्न - जागतिक पातळीवर एक मोठी कंपनी, आणि भारताच्या बाबतीत मात्र एक स्टार्ट-अप, अशी स्टोरीटेलची सध्याची स्थिती आहे. यामुळे प्रत्येक परिस्थितीत काही तडजोडी करत पुढे जात राहावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेत गेल्या पाच वर्षांत आपल्याला काय शिकायला मिळालं?
- कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायला हवं, हे मी प्रामुख्याने शिकलो. कधीकधी एखादा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. स्टोरीटेलच्या बाबतीत हेच झालं. भारतात अकरा भाषांमध्ये स्टोरीटेल सध्या काम करत आहे. त्यांपैकी हिंदी आणि मराठीला चांगला प्रतिसाद मिळत होता. भारतात महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊन कंटेंट देण्याचं, किंवा पेड एंटरटेन्मेंटचं क्षेत्र अजून बऱ्यापैकी लहान आहे. पैसे देऊन विकत घेऊन पुस्तकं वाचणारे अवघे तीन-चार कोटी लोक भारतात आहेत. असं असताना ऑडिओबुकला मिळणारा प्रतिसाद साहजिकच कमी असणार होता. मग त्यापैकी कोणत्या भाषेला प्राधान्य द्यायचं, कशावर फोकस करायचं, याचे निर्णय त्या त्या वेळी घ्यावे लागले. त्यातून मला खूप शिकायला मिळालं. व्यवसाय करताना कुठली तरी एक गोष्ट अत्यंत एकाग्रतेने करायची, ती शाश्वत वाढत राहील यासाठी काम करायचं, आणि ती पुरेशी वाढली की त्यानंतर दुसऱ्या गोष्टीला हात लावायचा, हा या काळाचा धडा होता. नाहीतर ‘एक ना धड भाराभर चिंध्या,’ अशी गत होते. उदा., मी ज्या वेळी सुरुवात केली, त्या वेळी स्टोरीटेलच्या काही अधिकारी व्यक्तींशी याबद्दल बोलणी सुरू होती. ते दर तीन महिन्यांच्या हिशेबाने या प्रकल्पाचा विचार करत होते. तेव्हा हा तिमाहीचा विचार सोडून द्या, मला भारतात कंपनी नफ्यात आणण्यासाठी एवढं भांडवल लागेल, असं मी ठामपणे सांगू शकलो असतो, तर त्यात मला दोनतीन वर्षांचा वेळ मिळाला असता. ही वेळ आणि प्रयोग करण्यासाठी पुरेसं भांडवल नसेल, तर बऱ्याच गोष्टी अर्ध्यात सोडून द्याव्या लागतात. नवीन प्रयोग करायला आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतोय याचा अंदाज घ्यायला कमीतकमी दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. पहिल्या सहा महिन्यांच्या नंतर आपल्याला हळूहळू अंदाज येऊ लागतो. असं असताना दर तीन महिन्यांच्या टप्प्याने आपण आपल्या प्रयोगाचं मूल्यमापन करू लागलो, तर त्यात वाढच दिसत नाही. दुसरी गोष्ट, कुठल्याही व्यवसायात पैशांचा, कॅश फ्लोचा विचार सर्वांत आधी केला पाहिजे. आम्ही ऑडिओबुक प्रकाशित करतो, तेव्हा त्याचे काही भविष्यकालीन आडाखे असतात. पण त्या त्या क्षणी घ्याव्या लागलेल्या निर्णयांमुळे हे आडाखे वास्तवात येत नाहीत. त्याचाही फटका मोठा असतो. अशा बऱ्याच गोष्टी मला या प्रक्रियेत शिकता आल्या.
प्रश्न - यूट्यूब, कन्टेन्ट क्रिएशन या गोष्टींची, ज्याला क्रिएटर इकॉनॉमी म्हणतात त्याची सध्या खूप क्रेझ आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल?
- तुमची स्वतःची ब्रँड इक्विटी खूप महत्त्वाची असते. प्रत्येक तरुणाने आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात खरोखर चांगलं काम करण्याचा ध्यास या वयात बाळगला पाहिजे. हा चांगलं काम करण्याचा, चांगलं करिअर घडवण्याचा प्रवास लवकरात लवकर सुरू केला पाहिजे. त्यासाठी आपण कोणत्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतो, याचा धांडोळा घेतला पाहिजे. एकदा आपली ब्रँड इक्विटी तयार झाली, की मग तुमच्याकडे स्वातंत्र्य येतं. स्वतःच्या बळावर कोणताही नवीन प्रयोग करण्याचं धाडस येतं. या कंटेंटच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी न्यूजलेटर लिहिणं, पॉडकास्ट तयार करणं, ही कामं सातत्याने करत राहिलं पाहिजे. जे तरुण उद्योजकतेच्या क्षेत्रात येऊ पाहत असतील, त्यांनी कॅशफ्लो म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं पाहिजे. किंवा असा माणूस सोबत घेतला पाहिजे, ज्याला यातली संपूर्ण माहिती आहे. बऱ्याचदा होतं काय, तर गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत असतात तेव्हा आपण खूप मोठी स्वप्नं पाहतो. पण एखाद्या व्यवसायात जशी वाढ असते तशी खाली येण्याची वेळही असते. हा कॅश फ्लो निगेटिव्ह होऊ शकतो, याचा विचार करून काही गोष्टी केल्या, तर त्याचा पुढे जाऊन फायदाच होतो. ते केलं नाही तर आपल्याला कोणत्यातरी गुंतवणूकदारावर अवलंबून राहावं लागतं. आज एखादा व्यवसाय करायचा झाला, तर मी त्यासाठीचा कॅश फ्लो कसा आहे याचा आधी अभ्यास करेन. मग त्याप्रमाणे त्या व्यवसायाचं व्यवस्थापन करेन. जे लोक व्यवसायात आहेत त्यांनी ही गोष्ट अत्यंत गंभीर्याने घेतली पाहिजे. मी जे शिकलो त्यातल्या या सर्वांत महत्त्वाचा गोष्टी होत्या, असं मला वाटतं.
संवादक :विनायक पाचलग, कोल्हापूर
vinayak@vedbiz.com
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या