डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

..‘क्रिएटिव्ह’ इशाऱ्याची ‘डोकोमोड’

मराठी माणसावर विनोद वा टिंगल करायची नाही, मग तो नियम व्यंगचित्रांनाही लागू होणार? मराठी माणसावर व्यंगचित्रे काढायची की नाहीत?  मराठी माणसाची व्यंगात्मक टीका ठाकरे यांनी जेवढी केलीय तेवढी कुणीच केली नाही. वाकड्या तोंडाचा गांधी... मैद्याचे पोते, तेल लावलेला पैलवान... असे म्हणायचे आणि तशी चित्रेही काढायची, हे मनोरंजन यापुढे होणार की नाही? ‘सामना’ने नारायण राणेंची कोलाज केलेली चित्रे छापायची की नाहीत? बाकी कुणावरही व्यंगचित्र काढले तरी चालेल, पण मराठी माणसावर ते बेतणार नाही? खूप प्रश्न राज यांच्या या क्रिएटिव्ह इशाऱ्याने उभे राहिले आहेत.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक दिवसांनंतर एक नवा फतवा काढला आहे. यावेळचा हा फतवा जाहिरात कंपन्यांसाठी आहे. कोणत्याही कलाकृतीत मराठी माणसाचे चित्रण कशा पध्दतीने दाखवू नये याबाबत क्रिएटिव्ह जगताला राज यांनी मार्गदर्शनपर इशारा एका पत्राद्वारे दिला आहे. जाहिरात क्षेत्रातल्या लोकांना मराठी माणसाबाबत क्रिएटिव्हिटी कशी वापरायची याचे लाईनवर्क करून दिले आहे. जाहिरात क्षेत्रात असलेली मराठी माणसे यावर उघडपणे बोलत नसली तरी एका क्रिएटिव्ह माणसानेच या क्षेत्राबाबत अशी इशाऱ्याची भाषा करावी, याची चर्चा मात्र सुरू आहे. खरे तर राज यांनी ज्या पार्श्वभूमीवर ही भूमिका घेतली आहे ती पाहिली तर प्रथमत: त्यांच्या भूमिकेला सामान्य माणसाची सहमती मिळते. 

टाटा-डोकोमोच्या एका जाहिरातीवरून हा सगळा वाद उठला आहे. या जाहिरातीत डोकोमोचे नेटवर्क कसे कुठेही उपलब्ध आहे हे मांडले गेले आहे. खरे तर डोकोमोचे नेटवर्क फार काही चांगले आहे अशातला भाग नाही, पण तरीही आपले उत्पादन विकण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या जाहिरातीत नऊवारी लुगडे घातलेली म्हणजे मराठी मोलकरीण, मोबाईल चोरून आपल्या ब्लाऊजमध्ये ठेवते. पण मोबाईल वाजतो आणि मालकीण तिला रंगेहाथ पकडते, असे दाखवण्यात आले आहे. मराठी माणसाला यातून राग येणे हे स्वाभाविक आहे.

याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जाहिरात क्षेत्रातील इंग्रजाळलेले लोक मराठी बांधवांना आणि माता-भगिनींना कमी लेखतात, त्यांना जाणीवपूर्वक नोकर दाखवतात. आता यापुढे असे प्रकार झाल्यास मनसे या लोकांशी आपल्या पद्धतीने क्रिएटिव्ह चर्चा करायला येईल... 

राज एवढ्यावरच थांबले नाहीत तर वाहिन्यांवरील मालिका, सिनेमा यांत मराठी माणसाचे अवमूल्यन केले जाते तेही यापुढे चालू न देण्याचा इशारा राज यांनी देऊन टाकला. यामुळे या क्षेत्रातील माणसे हबकून गेली आहेत. राज ठाकरे हे स्वत: कलावंत आहेत. चित्र, कार्टून, जाहिरात, सिनेमा हे त्यांचे चर्चेचे आवडते विषय. तासन्‌तास ते या विषयांवर बोलू शकतात.

कला क्षेत्रातील सेन्सॉरशिपबद्दल त्यांनी आजवर तशी कधीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे जगद्‌विख्यात चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्याबाबतचे. तथाकथित हिंदुत्ववादी हुसेन यांना देशद्रोही ठरवीत असताना राज यांनी त्यात कधीही आपला आवाज मिसळवला नव्हता. 

हुसेन हे मोठे कलाकार का आहेत याचे विश्लेषण राज यांच्या तोंडूनच ऐकावे. राज यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन लागले होते त्याला हुसेन यांना बोलावण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख आणि हुसेन यांना एकत्र आणले ते राज यांनीच. हे दोन मोठे कलाकार आमने-सामने आले ते रंगरेषेच्या फटकाऱ्यांतून. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी बऱ्याच दिवसांनी कुंचला हातात धरून हुसेन यांचे व्यंगचित्र काढले, तो क्षण अजूनही माझ्या स्मरणात आहे. अशा राज यांनीच या क्रिएटिव्ह जगाला मराठीच्या मुद्यावरून शिंगावर घेतले आहे.

मराठी माणसावर विनोद वा टिंगल करायची नाही, मग तो नियम व्यंगचित्रांनाही लागू होणार? मराठी माणसावर व्यंगचित्रे काढायची की नाहीत? मराठी माणसाची व्यंगात्मक टीका ठाकरे यांनी जेवढी केलीय तेवढी कुणीच केली नाही. वाकड्या तोंडाचा गांधी... मैद्याचे पोते, तेल लावलेला पैलवान... असे म्हणायचे आणि तशी चित्रेही काढायची, हे मनोरंजन यापुढे होणार की नाही? 

‘सामना’ने नारायण राणेंची कोलाज केलेली चित्रे छापायची की नाहीत? बाकी कुणावरही व्यंगचित्र काढले तरी चालेल, पण मराठी माणसावर ते बेतणार नाही? खूप प्रश्न राज यांच्या या क्रिएटिव्ह इशाऱ्याने उभे राहिले आहेत. मराठी माणसांची टिंगल-टवाळी वा हेटाळणी होऊ नये याबाबत वादाचा काहीच मुद्दा नाही. त्याला विरोध करायलाच पाहिजे. मात्र हा विरोध कशा पद्धतीने करायचा हा वादाचा मुद्दा आहे. 

राज यांनी क्रिएटिव्ह इशारा दिला याचाच अर्थ तो खळ्ळळ... फट्याक.... अशाच पद्धतीचा असणार हे ओघाने आलेच. कोणत्याही मागणीसाठी वा नाराजीविरुद्ध टोकाची भूमिका घेण्याआधी इशारा दिला जातो. मात्र हा इशारा कोण, कसा देतो यावर त्याचे अंतिम टोक काय असणार याचा अंदाज बांधला जातो. मनसेबाबत हा अंदाज चोख आहे. असो. डोकोमोच्या याबाबतच्या एका जाहिरातीत तर आणखी आक्षेपार्ह गोष्ट आहे. 

यात डॉक्टर पेशंटचे ऑपरेशन करतात, टाके घालून निघतात आणि त्यांचा मोबाईल वाजू लागतो. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्यांचा मोबाईल रुग्णाच्या शरीरातच राहिलाय... मला आश्चर्य वाटले ते हे की, या जाहिरातीवर एकाही डॉक्टरने जाहीरपणे आक्षेप का नोंदवला नाही? की त्यांच्या आक्षेपाला किंमत राहिली नसती? 

राज यांच्या इशाऱ्याला मात्र किंमत आहे. काही असो, यापुढे माध्यमांतून मराठी माणसाची टिंगल थांबवण्याचा विडा राज ठाकरे यांनी उचलला आहे. दादा कोंडके आता हयात असते तर त्यांनाही हा इशारा लागू झाला असता का? दादांनी स्वत:च्या बावळटपणावर जगाला हसवले... मात्र पेहराव, भाषा, प्रसंग सारेच या इशाऱ्यात बाद झाले असते. 

असो, यापुढे मराठी माणूस सिनेमातून नोकराच्या भूमिकेत दाखवला जाणार नाही. लक्ष्या हा हिंदी सिनेमातला सदाबहार वफादार नोकर होता. त्याला आता तो रोल मात्र करता आला नसता. बॉलिवूडमध्ये अनेक मराठी कलाकार नोकराची का होईना पण भूमिका घ्यायला रांग लावून आहेत. त्यांना आता वेगळ्या भूमिकांसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

मराठी कलाकारांना राज यांच्या या इशाऱ्याने आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. नोकर सोडून इतर भूमिकांसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. एका अर्थी ते चांगलेही होईल... आता हा क्रिएटिव्ह इशारा नेमका कसा रंग उधळतो तो दिसेलच. मात्र प्रश्न असा आहे की जर त्या जाहिरातीत मराठी बाई सोडून इतर कुठली भाषिक असती तर आपली भूमिका काय? 

मुळात डोकोमोची ही जाहिरात अनेक दिवस दाखवली जात होती. पण एकाही मराठी नेत्याने त्यावर आक्षेप नोंदवला नव्हता. हा आक्षेप नोंदवून डोकोमोकडे पहिली लेखी तक्रार केली ती ज्योती पुनवानी, विजयेंद्र, कामयानी महाबल, मानसी पिंगळे, डॅनियल माझगावकर, चिराग सुवर्णा, गीता शेशू, रोहिणी हेन्समन, लीना गणेश, अनिवर अरविंद, निलंजना बिश्वास, शुक्ला सेन... अशा डाव्या कार्यकर्त्यांनी.

त्यांनी ॲडव्हर्टायजिंग स्टॅन्डर्डस्‌ कौन्सिल ऑफ इंडियाकडेही याबाबत डोकोमोवर कारवाई करण्याची मागणी 7 सप्टेंबर रोजी केली. याचा पुरावा इंटरनेटवर आहे. यानंतर चर्चा सुरू झाली, असंतोष खदखदू लागला. त्याची दखल घेत राज ठाकरे त्याबाबत क्रिएटिव्ह इशारा देते झाले आहेत. डोकोमोविरुद्ध तक्रार करणाऱ्यांची भूमिका मात्र स्पष्ट आहे. नोकराचे काम मराठी बाई करो की गुजराती बाई, तिला चोर दाखवणे हे अत्यंत चुकीचे आहे. 

हलके काम करणारी माणसे चोरच असतात असे मानायचा आपला रिवाज आहे. आपल्या देशात तर काही जमाती गुन्हेगारच आहेत असे आजही मानले जाते. तशीच गत घरातल्या नोकरांची. काही चोरीच्या घटना घडल्या असतीलही, पण सगळेच नोकर चोर असतात अशी धारणा असल्याने अनेक निरपराध लोक अनेक वर्षे न केलेल्या चोरीपायी तुरुंगात गेलेत ही वस्तुस्थिती आहे. 

आठ वर्षांपूर्वी हायकोर्टाने अशा एका खटल्यात निर्णय देताना जे म्हटले आहे ते महत्त्वाचे आहे. चोरीचे समर्थन करता येत नाही, पण अशा चोऱ्यांना आर्थिक विषमता कारणीभूत असते. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळेच नोकर वा तत्सम काम करणारी मंडळी अशा चोरीच्या दुष्ट घटनांत सापडतात... खरा मुद्दा हाच आहे. मराठीपणाच्या बाहेर पडून असे व्यापकपणे या सगळ्याकडे पाहता येईल का? 

Tags: एम एफ हुसैन बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे एम एफ हुसैन M F hussain Raj Thackeray व्यंगचित्र राज ठाकरे डोकोमो नोकर चोरी Cartoon Raj Thackeray Docomo Servants Theft weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

युवराज मोहिते
yuvraj_mohite@yahoo.co.in


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके